मंगळवार, ३ मार्च, २०२६

2678. तो आणि ती

 "ये चांद का तुकडा आज इतना उखडा उखडा क्यूं है??" 
यावर तिचा फक्त एक जळजळीत कटाक्ष आणि तो अजूनच कन्फ्युज्ड!
"हे सुंदरी, असे कटाक्ष टाकशील, तर मी इथेच जळून खाक होईन त्यापेक्षा काय झालंय ते सांग युवते." 
तिने काहीच उत्तर न देता फक्त डोळे पुसले आणि याच्या लक्षात आलं आत्ता प्रकरण चांगलंच गंभीर आहे!
"काय झालं??"
त्याची अगदी मऊ हाक आणि मग पुढचे दहा मिनिटे ती फक्त त्याच्या मिठीत ! 
" टाकी रिकामी झाली की अजून आहे पाणी??"
"गप तू." 
" गपतो." 
" श्रेया..... माझ्याशी आजकाल नीट नाही बोलत....." 
"काहे? भांडण झालं?" 
"नाही. झालं असतं तर तुला बोलले नसते का मी??"
तिचा अजूनही त्रासिक स्वर!
"बरोबर ! मग तुला काय वाटतं, का नाही नीट बोलत??" 
"नक्की नाही सांगता येणार. पण बहुतेक तिचा लग्नाचा निर्णय मला पटला नाहिये. हे कदाचित तिच्या लक्षात आलंय. म्हणून ती पूर्वीसारखी बोलत नाहिये." 
"तू तिला स्पष्टपणे कारण विचारलंस नाराज असण्याचं??" 
" हो. ती म्हणाली नेहमी सारखं तर बोलतेय. तुला का वेगळं वाटतंय?? पण मला माहितीये हे नेहमी सारखं नाहिये. ती कशातच मला इन्व्हॉल्व्ह करत नाहिये. आपणहून काही सांगतही नाहिये. माझ्याशिवाय तिने आजवर कधी काही केलं नाहिये. ना मी तिच्याशिवाय काही केलंय. आणि मी आपणहून काही भाग घेतला तर चक्क उडवून लावते मला किंवा दुर्लक्ष करतेय. मला खूप परकं वाटतंय...."
"तुला तिचा लग्नाचा निर्णय का पटला नाही??"
" तो मुलगा चांगला वाटत नाहिये मला. मी तिला मागेही म्हणले होते, हा जसा दिसतो तसा नाहिये."
"तुझ्याकडे हे सिद्ध करायला काही पुरावा आहे??"
" नाही. पण चांगल्या वाईब्ज् नाही येत मला त्याला पाहून."
"मग हा विषय तू डोक्यातून काढून टाक. तिला तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या पद्धतीने घेऊ दे. भविष्यात चुकला तरीही चालेल. ती तिची जबाबदारी आहे. तुझी नाही!!" 
" पण मी चुकीचं किंवा खोटं नाही सांगते. तो नक्की चांगला नाहिये. "
" हे तिला ठरवू दे. भविष्यात तिचं चुकलं तरी चुकू देत. माणूस चुकांमधून शिकतो. तीही शिकेल."
"हेही मान्य आणि म्हणूनच मी तिच्याशी पुन्हा हा विषय नाही काढला. पण तिच्या अजूनही ते डोक्यात आहे.  आमची मैत्री इतकी तकलादू आहे का रे?? की एकमेकींना आम्ही समजून घेऊ नये?? बेसिकली मला तिची काळजी आहे, हा हेतू का लक्षात येत नाहिये तिच्या!?"
"याला उत्तर नाही. तुझा हेतू चांगला आहे. तू योग्य शब्दात मांडला आहेस. तिला नाही पटला तर तू तुझ्याकडून सोडूनही दिला आहेस. आता तिने काय विचार करायचा हे तिला ठरवू दे."
"पण म्हणून इतक्या वर्षांची मैत्री अशी तोडायची?? असं तुटक, तोडून वागायचं माझ्याशी?? मला किती वाईट वाटतंय तू समजू शकतोस. आजवर एक गोष्ट आम्ही एकमेकींशिवाय केली नाही."
" प्रत्येक व्यक्तिचा आपल्या आयुष्यातला रोल आणि त्याचा कालावधी ठरलेला असतो. कोणी आयुष्यभरासाठी आपल्या बरोबर नसतं हे एकदा समजून घेतलं की त्रास होत नाही.
कितीही जवळची, कितीही काळ एकत्र असलेली व्यक्ती असली तरी त्या नात्याला एक्सपायरी डेट असूच शकते.
जसं शाहरुखच्या मूव्हीमधे त्याचा रोल कितीही महत्वाचा असला, चांगला असला, तो एक अभिनेता म्हणूनही त्या मूव्हीमधे चांगला असला. तरीही सगळेच रोल तो करू शकत नाही !! 
त्यालाच हीरो, हिरॉईन, व्हिलन सगळं बनवलं तर तो मूव्ही तू पाहशील का?? तो मूव्ही फक्त शाहरुख आहे म्हणून चालेल का? कोणी बघेल का? नाही!!  तसंच आयुष्यात सगळे रोल एकच व्यक्ती पार पाडू शकत नाही. आणि त्याचं काम झालं की ती निघून जाणार. आपला त्याच्या बरोबरचा तो प्रवास तितकाच होता!!"
" .........................." 
" लगेच नाहीच थांबणार वाईट वाटणं.... पण थोडा काळ जाऊ दिलास की पटेल मी जे बोलतोय ते."
" आत्ताही पटतंय.... पण वाईटही वाटतंय......" 
" वाटणारच ना...... वाटायलाच हवं......जिवंत, संवेदनशील मन असल्याचं लक्षण आहे ते !! पण म्हणून मन तकलादू, दुबळं होऊ द्यायचं नाही ! मान्य करायचं ! नात्यांनाही मर्यादा असतात हे लक्षात ठेवायचं!!"
"ती काल मला जाणवेल, लागेल असं मुद्दाम इतकं वाईट बोलली ना.. आय वॉज शॉक्ड् !! मला ती काय बोलली यापेक्षा ती इतकं नीच बोलू शकते याचं आश्चर्य वाटलं !! वाईट वाटलं रे मला खूप !! मी जिला इतके दिवस, वर्ष ओळखते ती हीच आहे का असा प्रश्न पडला मला!!"
"आपण एखाद्याला जवळचं समजतो पण तोही तसंच समजेल असं नाहिये ना आणि काही वेळा सुरुवातीला आपल्याला जवळचं मानणारा, नंतर बदलूही शकतो. त्याची मतं, विचार बदलू शकतात. त्यामागची कारणं माहीत नाहीत आणि अनेकदा कारणं हाती लागूनही फार काही फरक पडत नाही. कारण नात्यातली नजाकत तोवर निघून गेलेली असते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हे मान्य करून पुढे जायचं. आपणही काही देव नाही ना. माणूस ओळखण्यात चुका होऊच शकतात !. त्याने काय विचार करायचा, कसं बोलायचं हे आपण कसं ठरवणार?? त्यापेक्षा आपण त्रास करून न घेता अलगद तिथून निघून जावं."
"किती मेमोरिज् आहेत यार आमच्या !!! किती किती एन्जॉय केलंय आम्ही !! हजारो लाखो क्षण जे आम्ही मनमुरादपणे जगले आहेत !!! आणि आता...... "
" पण मग हे जे आनंदाचे क्षण आहेत ते तसेच आहेत ना आपल्या आठवणीत?? त्याला कोणीच धक्का लावू शकत नाही!! ते आपण आपल्या पेटीत बंद करून ठेवायचे! असे क्षण असतात ना.... ते खूप गोड असतात.... कधीही पेटी उघडली तरी फक्त आनंद देतात.... त्या व्यक्तीही तशाच त्या क्षणांमधे कायमस्वरूपी बंदिस्त करून ठेवायच्या!! बाकी गोष्टी सोडून द्यायच्या.... कारण आता ती व्यक्ती "तीच जुनी, तेव्हाची" राहिलेली नाही.... त्यामुळे तिच्याबद्दल आकस ठेवण्यापेक्षा तिला त्या क्षणां पुरतंच बांधून ठेवायचं!...... "
"उभा राहा ना समोर."
"तिची शिक्षा मी भोगायची आहे का? अंगठे धरून उभं रहा वगरे, अशी पुढची सूचना आहे का??"
"ना! बसून मला घट्ट मिठी मारता येत नाही !!!"

©® Manasi S B

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...