मंगळवार, ३ मार्च, २०२६

2607. म्हातारपण वन्स मोर

      रिटायरमेंट जसे जसे जवळ येऊ लागते तसे म्हातारपणा स्वीकारायची तयारी सुरू होते कारण आता बऱ्याचशा फॉर्म मध्ये ज्येष्ठ नागरिक वर टिक केल्याशिवाय त्या सवलती मिळत नाही. मग दोघांच्या आता गप्पा सुरू होतात, तरुणपणी कामाच्या व्यापात जे करायचे राहिले आता त्यासाठी वेळ काढूयात. जे छंद जोपासायचे राहिले ते पूर्ण करण्यासाठी वेळ काढुया. असे नानातऱ्हेच प्लॅनिंग आता सुरू होतात.
     रिटायरमेंट म्हटलं म्हणजे बऱ्याच लोकांच्या मुलामुलींचे लग्न झालेले असतात तर काहीजणांना नातनातू आलेले असतात. म्हणजे कळत नकळत मुलांच्या संसारात पुन्हा अडकण्याची वेळ आलेली असते. मुलांचा संसार नवीन आहे म्हणून त्यांना आपली गरज आहे असे वाटते मग नातनातू लहान असतात त्यांना सांभाळायची जबाबदारी असते आणि पुन्हा मग ते सगळं एन्जॉय करायचे राहूनच जाते. जेव्हा आपले छंद जोपासायला वेळ येते तेव्हा शरीर साथ देत नाही फिरायचे असते पण पाय थकून गेलेले असतात, चायनीज खावे वाटते तर पोट साथ देत नाही.
     हे जे जगायचे राहून जातं त्यावर काय उपाय आजचा दिवस आजच जगून घ्या. तरुणपणी ज्या इच्छा मारलेल्या असतात म्हातारपणी पूंजी जमा करण्यासाठी त्या आता तरी पूर्ण करा आणि हो उगाच तरुणपणी तुम्ही किती कष्ट केले, कसा एक एक रुपया जोडून संसार केला हे आजच्या तरुणांना ऐकवत बसू नका कारण एकच लक्षात ठेवा त्यांनी काटकसर केली तर त्यांच्या संसाराला ते फायद्याचे असेल आणि उधळमांडकी केली तर त्यांनाच ते नुकसान करेल. फक्त एक गोष्ट त्यांना कान उघडून ऐकवा की तुम्ही जर उद्याचा विचार न करता फक्त खाऊन पिऊन मज्जा करणार असाल तर आम्ही उद्या वेळ आली तर एक रुपया देणार नाही.आणि हो तुमचा सल्ला मागितला तरच द्या उगाच प्रसादासारखा सगळ्यांना फुकट वाटत बसू नका. बाकीचे हॉटेल मध्ये जात असतील तर तुम्ही पण आनंदाने जा भलेही फक्त वरण भात खा पण उगाच हॉटेलचे चांगले नसते, इतक्या पैशात घरी पोटभर जेवण केले असते असे ऐकवत बसू नये कारण पुढच्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट फोन करून कळवले जाईल आम्ही बाहेरून जेवून येतो मग उगाच तुम्हाला वाईट वाटेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच केली पाहिजे. सगळ्या घरात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आल्याच पाहिजे त्यासाठी काय काय करत बसू नका.
      तुम्हाला तुमचे म्हातारपण आनंदात घालवायचे असेल तर हेच छोटे छोटे उपाय करायचे आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे व्हायचे आहे म्हणजे म्हणायचा प्रश्नच नाही बाई मला तर बघवतच नाही त्यांचे किंवा सहनच होत नाही बोलले ते कारण ज्याचा त्याचा स्वतःचा संसार आहे त्याला तो पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे आणि म्हातारपण म्हणून उगीच सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याची अपेक्षा करू नका. आणि हो कोणीही विचारलं तब्येत कशी उत्तमच सांगा उगाच रडगाणे नको कारण आता ह्या वयात तक्रारी चालूच राहणार.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही आहोत म्हणून तुमचा सगळं बरं चाललेय हे घरातल्या कोणालाच ऐकवत बसू नका कारण हे कलियुग आहे इथे मेल्यावर पण पैसे देऊन माणसं मिळतात रडायला कटू आहे पण सत्य आहे. मग तुम्ही सहज म्हणाल आम्ही इतके कष्ट करून मुलांना लहानाचे मोठे केले ते काय सगळं हे बघायला का ,तर तुमचा मुद्दा जरी अगदी 100% खरा असला तरी ह्या सगळ्या गोष्टी का करायच्या तर तुमचं म्हातारपण मजेत जाण्यासाठी. करून तर बघा आणि मग बघा तुमच्या सल्ल्याशिवाय एकही गोष्ट होणार नाही. तुमच्या शिवाय कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही आणि तुमची खुर्चीची जागा पण तीच राहील.
       ह्या वयात सकाळी उठायचे देवपूजा करायची.आपले छंद जोपासायचे. नातनातू सोबत लहान होऊन लहानपण जगायचे. हातपाय चालतात तोपर्यंत स्वतःची कामे स्वतः करायची.आणि हो मुख्य म्हणजे बदल आनंदाने स्वीकारा उगाच आमच्या काळात नव्हते बाबा असले काही बोलू नका आणि मग बघा सगळे तुम्हाला किती आनंदाने स्वीकारतील आणि प्रत्येक गोष्टीत तुमची आठवण काढतीलच.कारण ह्या वयात सत्ता जोपासन्या पेक्षा तुमचे मन किती जपले जाते हे बघणे गरजेचे आहे तरच आणि तरच तुम्ही औषध-गोळ्यांपासून दूर राहाल आणि म्हातारपण आनंदात जगाल.

वृषाली आशिष शिरुडे
रहाटणी, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...