मंगळवार, ३ मार्च, २०२६

2690. मिडलक्लास

 ताटात वाढलेलं काहीही टाकायचं नाही, काहीही फुकट घालवायच नाही. नको असेल तर आधीच वाढू नका सांगायचं ह्या लहानपणी आई वडिलांनी लावलेल्या सवयी आजही इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की, आजही हॉटेलात जेवण झाल्यावर वेटर माझी प्लेट उचलताना माझ्याकडे आश्चर्य कौतुक किंवा कधीकधी दयेने देखील बघतो. कारण माझी प्लेट स्वच्छ असते. आश्चर्य किंवा कौतुक प्लेट मध्ये काहीही अन्न फुकट घालवलेले नाही म्हणून. आणि दया मी खूप उपाशी आहे असं वाटून. कारण हल्ली भरपूर मागवून, वाढून घेऊन ताटात ते फुकट घालवणे ह्यात काही लोकांना खूप कूल किंवा श्रीमंत असल्यासारखं वाटतं. मी कुल किंवा श्रीमंत दोन्ही नसल्याने मला ते जमत नाही. 
     मुळात आज बोकाळलेली युज अँड थ्रो ही मानसिकता आम्ही लहान असताना नव्हती. वस्तू रिपेयर व्हायच्या. रिप्लेस हा शेवटचा ऑप्शन असायचा. बनवणारे देखील टिकाऊपणा हा आपल्या उत्पादनाचा एक महत्वाचा गुण आहे असे मानून ती टिकाऊ करण्याकडे लक्ष देत आणि ग्राहकांचा कल देखील वस्तू जपणे, टिकवणे ह्याकडे असे. त्यामुळे वस्तू वापरून, दुरुस्त करून परत आणखी भरपूर वापरून वगैरे झाली तरी तिला व्हॅल्यू असे. ती फेकून न देता उसाचा रसवाला जसा चिपाड परत परत गुर्हाळात घालून रस काढतो तशी त्या वस्तूला आयुष्यातून काढून टाकताना देखील त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याकडे कल असे. मग अश्या वेळी भंगारवला, बोहारीण, रद्दीवाला असे लोक कामी येत. रोजच्या पेपरांची रद्दी अगदी एकावर एक नीट रचून ठेवली जात असे. शाळेत जसे हस्ताक्षराला दोन एक्स्ट्रा मार्क्स बाई द्यायच्या तसा रद्दीवाला आमच्या नीट बांधून ठेवलेल्या पेपर्सना चार आणे एक्स्ट्रा देत असेल, बोहाराणी कपड्यांच्या बदल्यात भांडी द्यायच्या. दुपारच्या वेळी बोहाराणी बोलावून भाव करत बसणे हा तेव्हा अनेक बायकांचा दुपारचा विरंगुळा होता.
     ह्या सर्वात अजब भंगारवाला नामक व्यक्ती होती. त्याला अक्षरशः काहीही दिलं तरी तो त्याचे काहीतरी पैसे देत असे. मला बाबा म्हणायचे देखील "अभ्यास नाही केलास तर भंगारवाला पण घेणार नाही तुला" भंगारवाला चाळीत येऊन खालून त्याच्या किनऱ्या आवाजात "ए जुना पुराना भंगार सामॉsssइण" अशी साद घालायचा आणि मग समान घ्यायला त्याला वर बोलवायचे. मग घरातील जुनी पिंप, बादल्या, मोडकी घड्याळं, इलेक्ट्रिक बोर्ड, क्रिकेट बॅट, खिळे, बाक, पलंग, खुर्च्या काय वाट्टेल ते त्याच्यासमोर ठेवलं जायचं. तो शांतपणे पँटच्या मागे लटकवलेला काटा काढून वस्तूच वजन करुन रक्कम सांगायचा. तो वजन करताना वस्तू आणि त्याच्या मध्ये घुसून चष्मा हाताने वर करून काट्यावरचा आकडा बघणारे लोक अत्यंत विनोदी दिसत. पण मापात पाप होताकामा नये ह्यासाठी तो प्रयत्न असे. मग ती वस्तू विकणारा दोन रुपये वाढवून मागायचा. भंगारवाला एक रुपया वाढवायचा आणि सौदा तुटायचा, अनेक वर्षे, अनेकदा अनेक पिढ्या वापरलेली वस्तू घरातून जाताना देखील काहीतरी देऊन घरातून कायमची दूर जायची.
     गोष्टी खूप साध्या होत्या पण त्यातून वस्तू तसेच आपल्या श्रमाने कमावलेल्या पैशाची कदर करण्याची मानसिकता दिसून यायची. दुधाच्या बाटलीची बुचं किंवा नारळाची शेंडी भांडी घासायला वापरायचे लोक. तेव्हाही कदाचित स्कॉच ब्राईट असेल. पण हेतू फालतू खर्च न करता स्वच्छ भांडी हा असे तो ह्या दोन फुकट उपलब्ध होणाऱ्या वस्तूंनी साध्य होत असे. दिखावा, शो बाजी तेव्हा फार नव्हती. खिशात दहा रुपये असतील तर एक आहे असं दाखवा आणि आठ आणे खर्च करा अशी मानसिकता होती. लोक त्यांच्याकडे असलेल्या पैशावरून (ते दाखववत असलेल्या श्रीमंती वरून) जज केले जात नव्हते. 
        स्त्रिया घर चालवताना पै पै वाचवून, जमा करून एक मोठी गुंतवणूक निर्माण करत असत. माझ्या ओळखीत एका मुलीचे वडील जरा लवकर गेल्यावर तिच्या आईने मुलीचं लग्न वर्षनुवर्षं रिन्यू करून मोठ्या झालेल्या स्वतःच्या लहान लहान fd मोडून केलं होतं. मुळात गम्मत अशी होती की काटकसर म्हणजे गरिबी आणि उधळपट्टी म्हणजे(च) श्रीमंती अशी सोपी व्याख्या तेव्हा बोकाळली नव्हती. त्यामुळे पेपरच्या दुप्पट भाव येतो म्हणून तीन चार मिनिटे आणि थोडा साबण खर्च करून धुतलेल्या दुधाच्या प्लास्टिकच्या पिशव्या अनेक स्वयंपाक घरांच्या ओट्याच्या भिंतींवर चिकटवून वाळायला ठेवलेल्या सर्रास दिसत. त्या एकत्र करून विकल्यावर मिळणारे पैसे जो आनंद देत तो त्या धुवायला खर्च केलेल्या काही तासांच्या मेहेनतीपुढे फिका असे.
       आता जमाना इन्स्टंटचा आणि युज अँड थ्रो चा आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या वस्तू, मैत्री आणि नाती हे सर्वच टिकाऊ असणे किंवा रिपेयर होणे ह्या पलीकडचे आहेत. म्हणूनच ती स्वीकारताना भावना बाजूला ठेऊन उपयुक्तता हा एकच निकष लावला जातो. पण हा बदल आहे आणि तो स्वीकारायला हवा. मी देखील स्वीकारला आहे. पण तरीही तीन महिने जमलेली रद्दी, वीस वर्षांनी बदललेला पंखा माळ्यावर नीट जपून ठेवले आहेत. जरा वेळ मिळाला एखाद्या सुट्टीच्या दिवशी की भंगरवाल्याला बोलावून दोन्ही वस्तू घासाघीस करून देऊन टाकणार आहे. चष्मा वर करून वजन हातात धरलेल्या त्याच्या थरथरत्या हातात असलेल्या काट्यावर असलेले पुसट आकडे बघून नऊ नाही बारा किलो अस त्याला बजावून सांगून त्याने दिलेल्या कळकट नोटा मिळाल्यावर खूप आनंदी होणार आहे. अर्थात आता तर अनेकदा रद्दीवाला मला किती किलो आहे अस विचारून त्यानुसार पैसे देतो. रद्दी काट्यावर पण लावत नाही. कारण मी आधीच घरी वजन केलेलं असतं आणि ते योग्य असतं हे त्याला माहित असत असो. जमाना कितीही बदलला तरी काही सवयी बदलत नाहीत. त्या वज्रलेप असतात. त्यातून मिळणारा आनंद हा ज्याचा त्यालाच कळतो.

-© मंदार जोग :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...