यशची विजुमावशी हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करत होती. तिची ताई म्हणजेच यशची आई दुसऱ्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये होती आणि काल रात्रीच तिला कन्या झाली होती, यश नंतर आठ वर्षांनी. यशची आई हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याच्या बाबांनी यशला त्याच्या विजुमावशीकडे ठेवले होते. काल रात्री यशच्या बाबांचा फोन आला, कन्या झाल्याचा. ताईला भेटायला आणि छोटीला पहायला मावशी निघाली होती, सोबत यशला पण त्याची बहीण दाखवणार होती. यश अजून झोपून होता, म्हणून मावशी त्याला हाका मारू लागली.
"यश, लवकर उठ.. हॉस्पिटल मध्ये जायचंय.".
"मी नाही येत.."
"अरे तुला बहीण मिळणार आहे नवीन. तिला पहायला जाते आहे मी, चल.. लवकर उठ '
"मी नाही येत... मला कुणाला पहायचे नाही.'
"अरे असे काय करतोस ? तूझ्या बाबांनी तुला आणायला सांगितलंय, तुझी आई पण वाट पहाते आहे तुझी '
"अग मावशी, मला यायचे नाही, तू जा '.. असं म्हणत यशने पांघरून डोकयावरून घेतले. शेवटी विजुमावशी एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली. तिला एकटीच आलेली पाहून यशची आई तिला म्हणाली
"अग विजू, यशला नाही आणलंस?"
"अग ताई, तो यायलाच तयार होईना....करणार काय?"
"चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये आहे मला पण त्याला भेटावसं वाटतय, बरं उद्या घेऊन ये त्याला. सांग आई वाट पहातेय, तुझ्यासाठी बाहुली आणली आहे हाडामासाची 'आपल्या कालच जमलेल्या कन्येकडे पहात यशची आई म्हणाली. दुसऱ्या दिवशी पण यश मावशीसोबत आला नाही मग सायंकाळी त्याचे बाबा विजुमावशीकडे गेले आणि यशला स्कुटरवर बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. बाबांनी यशला हाताला धरून पहिल्या मजल्या वरील रूममध्ये आणले. रूममध्ये यशचे काकाकाकू पण छोटया पुतणीला पहायला आले होते, हास्यविनोद सुरु होते, एव्हड्यात त्याना यश दिसला.
यशला पहाताच त्याच्या आईला फार आनंद झाला, पाच सहा दिवस तो मावशीकडे होता. आई म्हणाली
"यश, तुझी आम्ही वाट पहात होतो, मावशीबरोबर का आला नाहीस काल? इकडे ये, ही बघ तुझी बहीण."
त्याची आई त्याचा हात पकडून पाळण्यातील नवीन जन्मलेली मुलगी दाखवू लागली तसा यशने आईच्या हाताला हिसडा दिला आणि तो लांब जाऊन बसला. मग त्याची काकी त्याच्या जवळ गेली आणि ती त्याला छोटीकडे नेऊ लागली पण तो तिच्या हातातून सुटला आणि खोलीच्या बाहेर गेला.
शेवटपर्यत यशने पाळण्यातील बहिणीला पाहिले नाहीच. आठ दिवसांनी यशची आई छोटीला घेऊन घरी आली मग बारसं झालं नाव चिन्मयी ठेवलं पण सर्वांची चिनू झाली.
यशच्या आईबाबांच्या लक्षात आल, यशला बहीण आवडलेली नाही किंवा आईवडिलांच्या मायेत त्याला पार्टनर नको होता म्हणून असेल पण तो तिला टाळू लागला. तिचा द्वेष करू लागला, ती जर रांगत असेल तर तिला लाथ मारून पुढे जाऊ लागला. यशची आई घरीच असायची त्यामुळे तीच लक्ष असायचे. दुसरीत असे पर्यत यश अभ्यासात हुशार होता, वर्गात पाहिला दुसरा यायचा पण आता तो मागे पडू लागला. घरात सतत चिडचिड करू लागला, भरपूर खायला लागला, हट्ट करू लागला. एकलकोंडा होतं गेला, मित्रांत मिसळेना, पुस्तके वाचेना. फक्त टीव्ही आणि मोबाईल गेम्स मध्ये अडकला. त्याच्या आईबाबांना त्याची काळ्जी वाटू लागली. दिवसेंदिवस त्याचा अभ्यासातील आलेख खाली घसरू लागला.
छोटी चिनू मात्र दादाकडे प्रेमाने पाही. ती बोलायला शिकली द.. द.. दाद्दा.. दाद्द.. दादा. पहिले अक्षर आ.. आ.. करायची सोडून ती दादा म्हणायला शिकली. चिनू लुटूलुटू चालू लागली.. धावत धावत दादाकडे जाई आणि तिचा दादा तिला फटका मारी.. मग ती मोठ्याने ओरडे, आई हातातील काम टाकून धावत येई आणि चिनुला उचले "भाऊ आहेस का सैतान.. का तिच्या मागे लागला आहेस?
चिनूच्या आईला रडू येई. चिनचे आईबाबानी यशसाठी मनसोपचारतज्ञ डॉक्टरची मदत घेतली. डॉक्टर म्हणाले "तो पहिला मुलगा असल्याने तुम्ही मुलाचे खुप लाड केलेत, मग हळूहळू त्याला समज येत होती, या काळात त्याला बहीण झाली. त्यामुळे त्याच्या लक्षात आले. आई वडिलांच्या प्रेमात आणि लाडात भागीदार आला आहे. म्हणून तो विचलित झाला. तो बहिणीचा द्वेष करू लागला. पण हेही दिवस जातील. तो योग्य वयात आल्यावर त्याला बहिणीची माया कळेल, तोपर्यत धीर धरा.
मात्र एका प्रसंगाने चिनूची आई हादरली. चिनूची आई वॉशरूम मध्ये गेलेली, एव्हड्यात यशने छोटया चिनुला उचलले आणि तिचा हात पेटत्या निरंजनावर धरला. चिनू किंचाळली, आई धावत आली. तिने चटकन चिनूचा हात बाजूला केला आणि किचनमधील नळाखाली धरला. चिनूची दोन बोटे भाजली. चिनूच्या आईने यशला दोन फटके दिले आणि चिनुला जवळ घेऊन ती रडू लागली. मग मात्र पुढील दोन वर्षे त्याला विजुमावशीकडे ठेवले. त्याची शाळा बदलली.यश छोटया गावातील शाळेत शिकू लागला, तोपर्यत चिनू शाळेत जायला लागली. चिनुला दादाची आठवण येई मग ती ", दादा.. दादा म्हणत रडू लागे. विजुमावशींच्या गावात दहावी नंतर शाळा नव्हती, त्यामुळे अकरावीत यश पुन्हा घरी आला. त्यावेळी चिनू तिसरीत जात होती. आता तशी ती मोठी होती, त्यामुळे तिच्या आईबाबांना काळ्जी वाटतं नव्हती. यश अकरावीत गेला आणि बाबांची मोपेड शिकू लागला. न सांगता मुख्य रस्त्यावर गाडी नेऊ लागला. असाच भर दुपारी तो गाडी घेऊन क्लासला जाताना त्याला रिक्षाने उडवले. कोणीतरी शेजारील हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले.
बातमी कळताच त्याची आई हॉस्पिटलकडे धावली, वडील ऑफिस मधून आले विजुमावशी आली, शेजारी पाजारी धावले.सुदैवाने मेंदूला मार नव्हता. पण हात मोडला होता. पाय पुरा मोडला होता. शाळेत गेलेली चिनू घरी आली, घराला कुलूप म्हणून तिने शेजारच्या काकूंकडे चौकशी केली, तेंव्हा तिचा दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याने आईबाबा तिकडे गेल्याचे तिला कळले. मग शेजारच्या काकू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. दादाची अशी व्यवस्था पाहून चिनू रडू लागली. तिच्या विजुमावशीने कशीबशी तिची समजूत घातली. डॉक्टरनी हाताला प्लास्टर घातले, कंबरेचा बॉल बदलायचा होता तसेच प्लेट्स घालव्या लागणार होत्या. या गोष्टीना वेळ लागणार होता. सुमारें दीड महिना यश हॉस्पिटलमध्ये होता.
चिनू रोज शाळेला जाताना या हॉस्पिटलमध्ये जायची, तिला दादाची भीती वाटायची म्हणून हळूच दार उघडून दादाला पहायची. मग तिथल्या नर्सना दादाच्या तब्येती विषयी विचारायची. कधी कधी डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन किंवा डॉक्टर राउंडवर असायचे, तेथे जाऊन डॉक्टरना सांगायची "माझ्या दादाला लवकर बरा करा.'
डॉक्टर रोज येऊन यशची प्रगती अजमावत होते, त्याच्या जखमा किती भरल्यात ते पहात होते, औषधे देत होते. एक दिवस डॉक्टर यशजवळ आले ते हसत हसत. यशला डॉक्टर म्हणाले "तूझ्या बहिणीसारखी बहीण सर्वाना मिळावी, मला बहीण नाही रे. म्हणून मला जास्त वाटत. मी राऊंडवर असताना माझ्या मागे मागे येते आणि तुला केंव्हा बरे वाटेल, माझा दादा परत केंव्हा चालायला लागेल, असे विचारत असते. आज तर हद्दच झाली. नेहेमीसारखे मला विचारत होती "माझा दादा केंव्हा चालायला लागेल? मी म्हंटल अजून स्वतःच्या पायाने चालायला चार महिने तरी लागतील तोपर्यत तो कुबड्या घेऊन चालू शकेल. मग एक मिनिट विचार करून ती म्हणाली, मग डॉक्टर माझा पाय कापा आणि दादाच्या पायाला जोडा. मी कुबड्याने चालेन :
"काय?" यश किंचालळा.
"माझा पाय कापा म्हणाली माझी बहीण? आणि दादाच्या पायाला जोडा म्हणाली.
"होय बाबा, यालाच बहिणीची माया म्हणतात. तू नशीबवान. म्हणून तुला बहीण मिळाली. मी दुर्दैवी या बाबतीत."
डॉक्टर आणि नर्स गेले.
यशच्या डोळ्यात पाणी आले. या चिनू चा मी द्वेष केला ती घरात आल्यापासून. त्याच्या नजरेसमोर पाळण्यातील चिनू आली.. मग दा. दा.. म्हणणारी चिनू आली. ढोपराने चालणारी चिनू आली. ती लहान होती तेंव्हा आपण तिला लाथ मारून पुढे जात होतो. एकदा तिचा हात पेटत्या निरंजनावर धरला. ती मोठ्याने रडू लागली, त्याचा आपल्याला आनंद झाला. आपण खदखदा हसू लागलो. तीच चिनू. माझी लाडकी बहीण डॉक्टरना सांगते, माझा पाय कापा आणि दादाच्या पायाला जोडा?
आपलं चुकलं, आपण दुष्ठपणाने वागलो.. डॉक्टर काका म्हणतात", अशी बहीण आपल्याला हवी होती '.
आणि मला अशी बहीण मिळाली तर. मी दुष्ठ. मला लाडकी बहीण कळलीच नाही. बहिणीचे प्रेम.
असे विचार मनात येत असताना यशने पाहिले, दार किलकीले उघडले जात होते आणि त्या फटीतून दोन डोळे त्याच्याकडे पहात होते.
यश हळूच बोलला "चिनू, इकडे ये..चिनुला दादाच्या अश्या प्रेमाच्या हाकेची सवय नव्हती.. म्हणून ती घाबरत घाबरत पुढे गेली. ती जवळ येताच यशने तिला मिठीत घेतलं आणि तो रडू लागला.
त्याचवेळी यशचा डबा घेऊन आलेले त्त्यांचे आईबाबा हे दृश्य पाहून गहिवरले आणि त्यानी दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि ते रडू लागले.
प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा