शरयूचा भाऊ शौनक शहरातील प्रसिद्ध उद्योगपती होता. दारात चार चार गाड्या, पैसा, प्रसिध्दी सारं काही हात जोडून उभं होतं. त्याने तयार केलेले जीवनोपयोगी वस्तू खरेदीचं अॅप घरोघरी पोचले होते. त्या ॲप द्वारे जनतेला जे हवं ते घरबसल्या मागवता येत होतं. संसारासाठी लागणारं सारं काही एका क्लिक वर घरपोच मिळत होतं. दिवाळीचे दिवस आले होते. कितीही गडबड असली तरी दोन तासाच्या अंतरावर असलेल्या बहिणीकडे भाऊबीजेला जाण्याची प्रथा शौनकने कधी चुकवली नव्हती. शरयुला दादाचा खूप अभिमान होता. शौनक साहेबांची गाडी तिच्या दारात येऊन थांबली की तिची शान वाढत असे.
तिनं दादाला फोन केला. “दादा, भाऊबीजेला सगळे येताय ना? वहिनीशी बोलले आहेच.” दादा हसून नक्की म्हणाला..
दुसरे दिवशी शरयूचा नवरा शरद तिला म्हणाला,"दिवाळीचे चार दिवस स्वामी अभयानंद आपल्या गावात येत आहेत हे तुला माहित आहेच. आपण सगळे त्यांच्या सत्संगाला जाऊ. शरयू, दादा येणार आपल्याकडे म्हणून संचालकांनी स्वामींचा सत्कार त्यांच्या हस्ते करू शकतो का विचारलय. विचार शौनकला.”
शौनकला स्वामींची ख्याती माहिती होती. त्याने एका क्षणात होकार दिला.
भाऊबीजेच्या आदले दिवशी शौनक व वहिनी शरयुकडे आले.
“दादा, किती दमला आहेस रे?” सतत केलेल्या कामाचा ताण शौनकच्या चेहऱ्यावर दिसत होता.
“वन्सं, तुम्हीच सांगा आता. जेमतेम चार तास झोपतो हा. सतत ॲसिडीटी चा त्रास, अपचन होत आहे कारण हे काम. ऐकत नाही तो अजिबात.” वहिनी काळजीत होती.
शौनक हसला. “अग एवढं मोठे साम्राज्य उभं केलय. काम न करून कसे चालेल?"
शरयुनं निःश्वास टाकला.. दादा, आज कपिल असता तर त्याने तुला बरोब्बर पटवून दिले असते. शिवाय तुला लागेल ती मदतही केली असती. किती हुशार होता कपिल!”
“हो. खरय. IIT करत असताना असा अचानक न सांगता सगळं सोडून कुठे निघून गेला कोण जाणे. लहान असताना दादा दादा करत मागे असायचा पण निघून जाताना त्याला माझी थोडीही आठवण झाली नाही. मला काही विचारावेसे वाटले नाही. जिवंत तरी असेल का नाही कोण जाणे!”शौनकनं चष्मा काढून डोळे पुसले..
“दादा, स्वामी अभयानंदांना विचारूया का? ते अंतर्यामी आहेत म्हणतात. आमचा धाकटा भाऊ जिवंत आहे का तेवढं तरी विचारावं असं मला वाटतय.”
“छे छे! कसलं भविष्य अन् कसलं काय! पंचवीस वर्षं पत्ता नाही कपिलचा. स्वामी तरी काय सांगणार!” दादा दमून झोपायला गेला.
दुसरे दिवशी भाऊबीज होती. तिनं शौनकला ओवाळलं. आज कपिल असता तर इथेच दादा शेजारी बसून ओवाळून घेतलं असतं! कपिलच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी दादाच्या हातावर पडले. त्याने तिला हलकेच थोपटले.
चार वाजता स्वामींचा सत्संग होता. त्यापूर्वी त्यांचा सत्कार करायचा होता म्हणून सगळे तयार झाले. शौनक साहेब आले अशी लोकात कुजबुज झाली. स्टेजवर शौनक, वहिनी, शरयु व शरद बसले होते. स्वामी अभयानंद भगवी कफनी घालून स्टेजवर येतात टाळ्यांचा कडकडाट झाला. बुध्दीचं तेज असलेला तो शांत समाधानी चेहरा बघून लोक भारावून गेले. शौनकने स्वामींचा सत्कार केला. स्वामी बोलायला उभे राहिले.
“प्रत्येक जीव जे कर्म करतो ते आनंद प्राप्ती साठी ! मी देखील हिमालयात जाऊन ज्ञान मिळवले केवळ आनंद प्राप्तीसाठीच. गंगोत्री जवळ माझ्या बसला प्रचंड अपघात झाला त्यात मी वाचलो पण हा गालावरील मोठा व्रण आजही आठवण करून देतो की माझे कार्य करण्यासाठी, जनतेला जीवनाचा अर्थ शिकवण्यासाठी मी जिवंत राहिलो आहे. पैसे, दागिने, सत्ता, मूल, बाळ सारे काही माणूस आनंदासाठी करतो पण त्यातून आनंद मिळतो का दुःख? दु:ख आनंदाचा वेष घेऊन येतं ते कसं ओळखायचं? आयुष्याच्या आलेखात सुख-दु:ख कुठे दिसत असतात ते पहा. ते फळ्यावर आलेख काढू लागले. एखाद्या उंच धबधब्यातून कोसळणाऱ्या प्रपातासारखे ज्ञान सभागृहात वहात होते. लोक भारावून गेले होते. भाषण संपले. लोक बाहेर पडले. शौनक स्वामींशी बोलत उभा होता. न राहवून त्याने विषय काढला..
"स्वामी, माझा धाकटा भाऊ कपिल फार वेगळा होता.त्याचे विचार मला पटत नसत. मी IIT मध्ये फायनल इयरला होतो तेव्हा तो तिथे पहिल्या वर्षाला आला. वर्ष संपताच कोणालाही न सांगता तो निघून गेला. गेली पंचवीस वर्षे तो कुठे गेला, त्याचे काय झाले आम्हाला माहित नाही."
शौनक जरावेळ थांबला व म्हणाला, "तो जाण्याच्या आदले दिवशी आमचा खूप वाद झाला होता. IIT ची ॲडमिशन, यश, पैसा कशानेही त्याला आनंद मिळत नसे. त्या दिवशी मी त्याला खूप ओरडलो. आणि नंतर ते भांडण मिटवण्याची मला कधी संधी मिळाली नाही ही गोष्ट मला खात आहे. आईचे डोळे मी नाही पुसू शकलो. मला मार्ग दाखवा, स्वामी !"
स्वामी शौनक जवळ येऊन म्हणाले. "शौनक साहेब, दोष तुमचा नाही आणि त्याचाही नाही. जे घडले ते विधिलिखित होते. तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात. स्वत:ला दोष देऊ नका. आता त्या गोष्टीचा विचार करू नका."
शौनक खाली बघत उभा होता..स्वामी यापेक्षा काही जास्त सांगतील अशी आशा त्याला वाटत असावी. स्वामींचे वाक्य ऐकून इतका वेळ लपवलेले अश्रू सर्व बंध ओलांडून खाली येऊ लागले. शरयुनं दादाचा हात पकडला व ते तिथून बाहेर पडण्यासाठी वळले. पडलेले खांदे, दमलेलं मन, डोळ्यात पाणी आणि भावासाठी व्याकुळ झालेला शौनक बघून स्वामी सुद्धा गलबलले.
“दादा..” मागून हाक आली. शौनकने गर्रकन मागे वळून बघितलं..
“दादा, त्या दिवशी तू बोललास ते चूक नव्हते. आपले मार्ग वेगळे होते म्हणून मी सारे काही सोडून हिमालयात जाऊन साधना केली. तिथेच गुरु मिळाले. आयुष्याचा अर्थ काही अंशी समजू लागला. गुरुआज्ञा झाली की मी मिळालेले ज्ञान जनतेला द्यावे म्हणून मी प्रवचने देत जगभर हिंडतो. तू मला उदयोगपती करण्यासाठी झटत होतास पण मी संन्यासी. तुझा मार्ग तुझा होता. माझा नव्हता.”
स्वामी अभयानंदांच्या दाढी, लांब केस आणि गालावरील मोठ्या व्रणांमागे लपलेला कपिल समोर उभा होता. केवढे नाव मिळवले होते त्याने. शौनकने त्याला कडकडून मिठी मारली. शरयूने त्याचा हात घट्ट पकडला.
"कपिल, सांगून जायचस रे ! आई कायम म्हणायची की स्वामी अभयानंदांचा आवाज अगदी कपिल सारखा आहे. किती मोठा झालास रे. माझ्यापेक्षा मोठा झाला आहेस. तुझे शब्द, तुझी बुद्धिमत्ता, आयुष्याचे सार्थक करण्याचा मार्ग आज लाखो आयुष्यात आनंद आणत आहेत, कपिल !" मी सुध्दा लाखो आयुष्याना भौतिक सुख देतो पण ते क्षणभंगुर आहे. तुझ्या साधनेपासून कोसो दूर."
शरयू घाईनं निरांजने घेऊन आली ! दोन कर्तबगार भाऊ समोर उभे होते. अत्यंत यशस्वी आणि पूर्ण वेगळे !
"दादा, कपिल बसा इथे. मी ओवाळते दोघांना ! कपिल, तुझ्यावर रागवू का तुझे कौतुक करू काही कळत नाही," डोळ्यातले पाणी परत एकदा ओवाळताना दोन्ही भावांच्या भेट देणाऱ्या हातावर पडले. कपिलच्या तोंडून शब्द आले, "ताई, माफ कर मला. आज ओवाळून घे. पुढच्या वर्षी मी कुठे असेन माहित नाही ! आनंदी रहा. वहिनी, जावई बापू, मी कपिल, तुम्हाला नमन करतो ! दादा आई जाण्यापूर्वी माझी तिची भेट झाली होती. जाताना ती एकाच वाक्य बोलली, "सर्वेपि सुखिनः संतु !!"
शरयू कौतुकाने त्या तेजपुंज चेहऱ्याकडे बघत होती. दादा अभिमानाने कपिल कडे बघत होता. दिवाळीच्या लाखो पणत्यांचे तेज त्या चेहऱ्यावर दिसत होते. आपल्या कुटुंबात रहात नसला तरी लाखो कुटूंबाचा तो भाग बनला आहे हे जाणवून ती गहिवरली !
“ताई, मी लोकांना आनंदी व्हायला शिकवेन.” म्हणणारा आठ वर्षाचा कपिल ते शब्द जगला होता. आणि आज समोर दोन भाऊ बसले होते. लाल गंध उभं लावल्याने त्यांचे तेजस्वी चेहरे निरांजनाच्या सात्विक प्रकाशात चमकत होते. दादानं तिला आशीर्वाद दिला. कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, “सर्वेपि सुखिनः संतु!"
आज पंचवीस वर्षांनी शरयुची भाऊबीज पूर्ण झाली होती.
© ® ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा