शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

1465. नवीन फ्लॅट : वास्तु पूजन : चावी अन देवीचा नवस

 नवीन फ्लॅट घेतल्यावर आम्ही वास्तूपूजन करायचं ठरवलं. गुरुजी म्हणाले गृहप्रवेश करायच्या आधी सगळ्यांनी बाहेर चला. दारात उंबरठ्याची पूजा वगैरे करून मग शंख नाद करत आणि घंटा वाजवत आत प्रवेश करायचा असतो. मग आम्ही सगळे घरातले एकूण एक जण बाहेर येऊन पॅसेज मध्ये जमा झालो. सकाळीच पूजा आटोपून दुपारी रिसेप्शन करायचं ठरवलं होतं. शिवाय मुहूर्तही सकाळचाच होता. फ्लॅट मध्ये कोणीच नव्हतं. सगळे एकूण एक  पाहुणे बाहेर आले होते. मी छान पैकी धोतर नेसून वर फक्त उपरणे खांद्यावर टाकून हातात पूजेचे ताट घेऊन उभा होतो. बायको शालू नेसून, दागदागिने घालून नटून थटून पूजेसाठी तयार होऊन बसली  होती. गुरुजी मंत्र म्हणतं होते. आम्ही सगळे काहीच समजत नव्हतं तरी  तल्लीन होऊन, अगदी भक्तीभावाने हात जोडून उभे होतो. तेव्हढ्यात अचानक जोराचा वारा आला आणि धाडकन लॅच लागून दरवाजा आपटून बंद झाला. लॅचकुलुपाची किल्ली आत मध्ये होती. लॅच या कुलुपाची आम्हाला सवयच नव्हती. त्या मुळे आम्ही सगळेच्या सगळे बाहेर अडकून पडलो. काय करावे तेच समजेना.
आमच्या घरात काहीही घडलं तरी खापर फक्त माझ्यावरच फोडायचं असते हे बायकोला उपजत ज्ञान आहे. त्या मुळे ती एकदम वैतागली. असे कसे हो तुम्ही वेंधळे, थोडंही लक्ष नसतं तुमच घराकडे. आता झाला ना घोळ. आता काय करणार. बायको ऐकायलाच तयार नव्हती. अग पण मला काय माहित की असा वारा येईल आणि दरवाजा लागून जाईल. अगतिक स्वरात मी. अहो, मग बघत काय उभे राहिलात काहीतरी करा ना. का आता लाईफ टाइम असंच उभं राहणार हातात पूजेचे ताट घेऊन. बायको ऐकतच नव्हती. काय करू मी आता. पूर्वी किल्ल्याचे दरवाजे तोडायला हत्ती दरवाज्यावर धडका मारीत तशी  धडक मारु का आता. मी पण वैतागलो होतो.
अहो ही जोक करायची वेळ नाहीये. आचरटपणा सोडा आणि थोडं वयोमाना नुसार वागायला शिका. काहीतरी करा हो.
अग हो, हो, थांब जरा. मला थोडा विचार तर करू दे. मी काकुळतीने म्हणालो.
अहो, विचार नंतर करा. अगोदर चावी वाल्याला बोलवा ना. बायको कधी कधी एकदम मुद्द्याचं बोलते.
नंतर मला कळलं की चावी वाल्याला बोलवणार कोण. कारण बरेच पाहुणे उघडे वाघडेच बाहेर आले होते. मी तर नुसतं धोतर आणि उपरणं या वरच होतो. मुख्य म्हणजे चावीवाला कुठं असतो या गावात हेच धड माहित नव्हतं. कोणाला विचारावं तर बरेच जण बिल्डिंग मध्ये नवीनच होते. तरी वाचमन ला विचारलं बोलावून तर त्याला काही समजेच ना. मार्केट स्टेशन जवळ म्हणजे पायी अर्ध्या तासावर. बर जाणार तरी कसं.
    धोतरावर कसं काय जाणार बाजारात आणि रिक्षाने जायचे तर पैसे कुठं आहेत. मुळात खिसाच नाही तर पैसे कुठले. पण जावं तर लागणार होतं. ज्यांनी थोडेफार कपडे घातलेले होते त्यांना विचारून पाहिलं तर सगळे नवीन असल्याने कोणीच तयार होईना. शेवटी गुरुजींकडून , धोतर रस्त्यात सुटणार नाही अशा प्रकारे गॅरंटीने बांधून घेतले आणि मीच चावी वाल्याच्या शोधात पायीपायी जायला निघालो.गल्ली ओलांडली असेल नसेल, कुणास ठाऊक कुत्रांना माझ्या बद्दल कसला एव्हढा संताप आला होता. कुठून कुठून चवताळून भुंकत भुंकत अंगावर  धावून येत होते. बर घरात पूजा असल्याने \" हाडं \"हा नॉनव्हेज शब्द पण बोलता येत नव्हता आणि धोतरा मुळे पळतापण येत नव्हतं. येणारे जाणारे विचित्र नजरेने बघत होते.
मी मार्केट मध्ये पाहोचलो तेंव्हा नऊ वाजलेले होते. कोणीतरी माहिती दिली की एक चावी वाला  पलीकडच्या बाजूने रेल्वे पुलाखाली बसतो. पण तो बाराला येतो. तरी मी म्हटलं जाऊन पाहू या लवकर येवून बसला असला तर. म्हणून रेल्वे ब्रिज ओलांडून जायला लागलो आणि काळ्या कोटातल्या टीसी  ची नजर माझ्यावर पडली.
तिकीट प्लीज. टीसी ने हात पुढे केला.
तिकीट नहीं है, मी हिंदीत.
तो रसीद फाडनी पडेगी.
पैसा नही है, चावी के लिए आया था l
काय का चाबी l
लॅच का l
किसके लॅच का l
मेरे घर के l
फिर मेरे पास क्यू मांग रहे हो l
तुम्हारे पास नही आया था, चावी वाले को धुंडने आया था l
कहासे आये हो l
घरसें l
फिर चाबी क्यू चाहिये l
लॅच लग गया l चाबी अंदर रहे गयी l
ओ कुछ भी हो लेकिन रिसीट काटनीही पडेगी l
मेरे पास पैसे नहीं है l
तो पुलिस स्टेशन चलो l
आमचे वाद काही केल्या संपत नव्हते. शेवटी त्याला मी माझ्या दिव्य हिंदीत कसा प्रॉब्लेम झाला ते समजावून सांगितले. त्याला काय समजले देव जाणे. पण माझ्या हिंदीने आणि फडफडणाऱ्या धोतरा मुळे कदाचित तो जेरीस आला असावा. मला दम देऊन त्याने सोडले. मी आपला चावी बनवणाऱ्याचा दुकानाजवळ वाट बघत बसलो. एकदोन जणांना मी भविष्य पाहणारा वाटलो. तर काही जणांना मी फुलं टाकणारा वाटलो. काहीजण कुतूहलाने पाहात पाहात जायचे. बऱ्याच वेळाने चावी वाला आला.
चावी बनाना है l
गरज नसतांना मी हिंदीत.
चाबी आणली आहे का.
नाही हो, घरात अडकली आहे. लॅच बंद झालं हो.
साहेब त्याला पोलीस कंप्लेंट लागते. तुम्ही माझ्या कडून दुसऱ्याच घर उघडून घेतलं तर कोण जबाबदार.
अरे बाबा, घर माझंच आहे.
सगळे असंच म्हणतात.
अरे, उघडल्या नंतर तुला मी घराचे पेपर दाखवेल, मग तर झालं ना. लागल्यास तू तिथं आल्यावर सेक्रेटरीला विचारून घे.
ठीक आहे, पण घरी यायचा वेगळा चार्ज लागेल.
चालेल रे बाबा, पण तू चल आधी .मी त्याला घाई करायला लागलो. असं कसं लगेच चलता येईल हो, दुकानात काही दिवा अगरबत्ती नको का करायला, का उघडायच्या आधीच बंद करून चलू तुमच्या सोबत. आत्ता दहा मिनिटात होईल, थांबा जरा. तोवर एखादी बोहनी पण होऊन जाईल.
माझ्या तर पोटातच गोळा उठला. त्याची साग्रसंगीत पूजा सुरु झाली. मग आम्ही एखाद्या गिर्हाईकाची वाट बघत बसलो. कोणीही माणूस दुकानाच्या जवळ यायला लागला की मला तो कस्टमरच वाटायचा. बराच वेळ झाला.मी वाट पाहून पाहून कंटाळलो होतो. मी त्याला घाई करत होतो.
आज कोणाचं तोंड पाहिलं काही समजत नाही, नाहीतर रोज आतापर्यंत बरेच कस्टमर येवून जातात. तो डायरेक्ट मला पनवती समजत होता. त्याला मी अक्षरशः हात जोडून विनंती केली. डबल फी द्यायचं कबूल केलं. तेंव्हा मोठ्या मुश्किलीने तो तयार झाला. आम्ही दोघेही घराकडे आलो. सगळे वाट बघत बसले होते.
दरम्यान बऱ्याच लोकांनी तारा, खिळे, काड्या घालून लॅच उघडण्याचा प्रयत्न करून बघतलेला होता.
तिकडे गुरुजींची केव्हाचीच कुरकुर आणि घाई सुरु झाली होती. कारण त्यांना लगेच दुसरी पूजा होती. मी त्यांना त्यांच होणार नुकसान भरून देण्याची  गॅरंटी दिली तेंव्हा कुठे ते शांत झाले.
बराच वेळ खटाटोप करून त्या चावी वाल्याने चावी बनवली. घर उघडलं. आम्ही सगळे आनंदी झालो. सगळा कार्यक्रम जाम लेट झाला होता. पण पाडला  कसाबसा पार.
वास्तुशांतीनंतर दोनच दिवसांनी बायको म्हणाली आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जावं लागणार आहे. मी नवस केला होता, तुम्ही चावी वाल्याला आणायला गेले होते तेंव्हा, की आई जगदंबे, यांना आजच्या दिवसात चावी वाला भेटला तर तीन पायऱ्या चढायच्या आणि तीन पायऱ्या उतरायच्या असं करून यांच्याकडून करवून घेत मी गड चढून तुझ्या दर्शनाला येईल. 
तेंव्हा पासून मी डोक्याला हात लावून बसलो आहे. तीन पायऱ्या चढल्या नंतर तीन पायऱ्या उतरायच्या असं करत करत गड चढून जायचा आहे. कारण कितीही विचार केला तरी मी आहे त्याच पायरीवर आहे असं मला वाटतं. बायको म्हणते  ईच्छा असतो तिथं मार्गही असतोच. तुम्हाला जर काही मार्ग माहित असेल तर मला जरूर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...