आजकालच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळविण्यापेक्षा ती टिकवून ठेवण्यासाठी जास्त कसरत व मेहनत करावी लागते, स्वतःचं ज्ञान अद्ययावत ठेवावं लागतं, व्यावसायिक जिवनाच्या चढ उतारावर सतत लक्ष ठेवून रहावं लागतं आणि एवढं करूनही आहे ते स्थान बलस्थान म्हणून टिकून राहीलच याची शाश्वती नसते. मागील कोरोना आपत्तीत आपण याचा चांगलाच अनुभव घेतला आहेच. त्यासाठी आपल्या 'प्लॅन बी' ची तयारी करून ठेवावी, कमीकमी रुपरेषा तरी योजून ठेवावी म्हणजे अगदीच तोंडघशी पडल्यासारखे होणार नाही. निवृत्त बॅंक अधिकारी व प्रतिथयश लेखक श्री. व्यंकटेश देवनपल्ली सरांच्या सर्वच कथा मार्गदर्शक तर असतातच. आजही त्यांच्या लेखणीतून अवतरलेली सुंदर मार्गदर्शक सकारात्मक संदेश असलेली कथा सामायिक करीत आहे. आपणही ती इतरांना शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा ही विनंती.
'जीवन ही एक यात्रा आहे. गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं ते स्वत:च ठरवायचं असतं. मार्गाचा शोध घ्यावा लागतो. दुसरा कुणीच त्याचा नकाशा देत नसतो. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे आपोआप सुचतं.'- आजच्या कथेतून.
'अचानक नोकरी गेल्यामुळे, कोणाही व्यक्तिचे मनोधैर्य कमकुवत होतंं, नाही असे नाही. परंतु त्याचा स्वाभिमान मात्र जिवंत असतो. किंबहुना तो अधिक प्रखर होतो. हे लक्षात असू द्या.' - हे ही आजच्या कथेतून.
फक्त लढ म्हणा.....
“सर आज करवा चौथ है. शामको घर जल्दी जाना है.” सतिंदरने माझी परवानगी मागितली. मी त्याला होकार दिला. तो आनंदाने गेला. मला पटकन आठवलं, गेल्या वर्षीचा करवा चौथच माझ्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस होता. माझ्या डोळ्यांसमोर गेल्या संपूर्ण वर्षभराचा कालपट अलगद उलगडत गेला.
संध्याकाळचे सहा वाजले असतील. अकाऊंट्स हेड, गुप्ता सरांनी मला बोलावलं होतं. मला बसायला सांगितलं आणि हळूच म्हणाले. “सॉरी सुधाकर, तुम्हाला कंपनीचा राजीनामा द्यावा लागेल. नोटीस पिरीयडमध्ये तुमच्या जागी नेमलेल्या व्यक्तिला व्यवस्थित प्रशिक्षित करावं लागेल.” हे ऐकून मला धक्काच बसला. मी आवंढा गिळत म्हणालो, “सर माझी काही चूक झालीय का?”
“सुधाकर, तसं काहीच नाही. यू आर अ जिनियस. आमचं बॅड-लक. आम्ही तुमच्यासारख्या सहकाऱ्याला मिस करतोय. यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. आज करवा चौथ आहे. माझी पत्नी वाट पाहत असेल. मला घरी लवकर जायला हवं” असं म्हणून गुप्ताजी पटकन निघून गेले.
मी विमनस्क मन:स्थितीत घरात पाऊल ठेवलं. मला पाहताच सुलभाच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलत गेले. तिने काळजीभरल्या सुरात विचारलं, “सुधाकर, काय झालं? आज खूप थकल्यासारखे वाटताय. ऑफिसात काही प्रॉब्लेम झाला का? ट्रॅफिक जाम होतं का?” सुलभा चेहरा आणि आवाजावरून समोरच्या माणसाचा मूड अचूक ओळखते.
"सुलु माझा जॉब गेलाय. उद्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे. नोटीस पिरीयडमध्ये कामावर जावं लागणार आहे." मी धपकन सोफ्यावर कलंडलो. तिनं पाण्याचा ग्लास पुढे केला. घटाघटा पाणी प्यायलो.
ती लगेच म्हणाली, “जाऊ द्या हो. हा जॉब गेला तर दुसरा जॉब मिळेल. आता मी नोकरी करतेय ना? आतापर्यंत केलेल्या बचतीतून फ्लॅटचे हप्ते भरू या. काळजी कशाला करताय?”
सुलभाकडून मी इतक्या शांत प्रतिक्रियेची अपेक्षा केली नव्हती. मला खूप मोठा दिलासा मिळाला. थोड्याच वेळात चहाचा कप हातात देत ती म्हणाली, “अहो, राजे कसलंही टेन्शन घेऊ नका. एक दोन महिन्यात तुम्हाला नक्की नोकरी मिळेल."
मी म्हटलं, “सुलु, अग नोकरी लवकर नाही मिळाली तर मी काय करायचं? दिवस कसे काढायचे?”
सुलु खोटं खोटं हसत म्हणाली, “अहो, नोकरी पहिल्यांदा गेलीय का? ही तुमची चौथी नोकरी होती. आता पाचवी मिळेल त्यात काय?”
“अगं, मी आता पन्नाशीला आलोय” मी अगतिकपणे म्हणालो.
माझ्या हातावर थोपटत म्हणाली, “बच्चमजी, पन्नाशीचे झालात म्हणून काय झालं? पंचवीस वर्षाचं अनुभव-धन तुमच्या पाठीशी आहे. घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे भगवंताची काहीतरी वेगळी योजना असते. ही नोकरी सुटण्यामागेदेखील काहीतरी चांगलं दडलं असेल. अचानक नोकरी गेली की कमकुवत मनाचा माणूस ढेपाळतो. ध्येयवेडा माणूस मात्र फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून नव्याने जन्म घेऊन उंच भरारी घेतो. मध्यंतरी पिंपरीच्या आयटीएन्सची कंपनीतली नोकरी गेली होती. ते गप्प बसून राहिले होते का? त्यांनी मिळेल ती नोकरी धरली. काहीजण कॅब सर्व्हिस, काहीजण भाज्यांचे मार्केटिंग वगैरे व्यवसाय करायला लागले. अनैतिक धंदे सोडले तर कुठलाही व्यवसाय करता येतो. इथे कोपऱ्यावर पाणीपुरीचा गाडा लावणारा भय्या माहीताय ना? अहो तो देखील दिवसाकाठी हजार, दोन हजार कमवतो म्हणे. सगळ्यांनीच नोकरी केली तर आपल्या जीभेचे चोचले तरी कोण पुरवणार? कुणाला तरी ते काम करावं लागेलच ना? अर्थात मी तुम्हाला पाणीपुरीचा गाडा लावायला सांगते असं समजू नका.”
“मग मी काय करावं, अशी तुझी अपेक्षा आहे, ते तरी सांग. सुलु मी घरी बसू शकणार नाही. तुम्ही मायलेकी दोघी कामावर गेल्यावर मला घर खायला उठेल.” मी काकुळतीने म्हणालो.
“सुधाकर, जीवन ही एक यात्रा आहे. गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं ते स्वत:च ठरवायचं असतं. मार्गाचा शोध घ्यावा लागतो. दुसरा कुणीच त्याचा नकाशा देत नसतो. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे आपोआप सुचतं. तुम्ही इतके हुशार. अकौंट्समध्ये चॅम्पियन आहात. त्याच क्षेत्रात काहीही करता येईल. एक तर तुम्ही........”
ती अखंडपणे बोलत होती. मला आत्मविश्वासाचे डोस पाजत होती. त्यावेळी मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. बीकॉम च्या शेवटच्या वर्षात मला टायफॉईड झाला होता. बरेच दिवस पिरीयड्सना जाता आले नव्हते. अभ्यास कसा होईल म्हणून मी चिंताक्रांत झालो होतो. आई मला समजावत म्हणाली, “सुधाकर, तुला काही फरक पडणार नाही रे. मला खात्री आहे. मिळालेल्या वेळेत तू सगळा पोर्शन भरून काढशील. आणि तूच टॉपर होशील.” अर्थात तिचं म्हणणं खरं ठरविण्यासाठी मलाही जिवाचा आटापिटा करावा लागला होता. तो भाग वेगळा. करवा चौथचं व्रत उत्तर भारतातल्या स्त्रिया आपल्या पतीच्या योगक्षेमासाठी आणि पति-पत्नी यांच्यातील दृढ नात्याचे, प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून साजरे करतात. आज करवा चौथ असल्याचं सुलभाच्या ध्यानीमनीही नसावं. कसलेही व्रत न करता ती माझ्यावरचे प्रेम आणि दृढ विश्वास अगदी मनापासून प्रकट करत होती.
सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर माझी लेक अनु माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाली, “बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी जॉब करतेय ना? होईल हो सगळं व्यवस्थित.” नकळत माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं. सुलभा आणि अनुजाच्या वागणुकीने मला पत्नी आणि कन्या या नात्यांचा खरा अर्थ त्या दिवशी गवसला. कंपनीने माझ्या जागी एका डायरेक्टरच्या भाच्याला नियुक्त केलं होतं. मी मनात कसलाही आकस न ठेवता, हातचं काहीही राखून न ठेवता त्या तरुणाला अकाऊंट्सची संपूर्ण माहिती दिली. नोटीस पिरीयड संपताच घरी बसलो. अनुजा सकाळी सुलभाला तिच्या शाळेत ड्रॉप करून पुढे ऑफिसला निघून जायची. मी लॅपटॉपवर नोकरीच्या साईट्सवर रिझूमे अपलोड करत बसायचो. पण त्यानंतर काय? एकटं एकटं वाटायचं. माझ्या पूर्वीच्या कंपनीतले अकाऊंट्स हेड मला रोज एखादी दुसरी जॉबची अॅड पाठवायचे. कधी नव्हे ते, बऱ्याच नातेवाईकांचे फोन यायला लागले. माझी नोकरी गेली आहे, हे त्यांना बहुधा माझ्या तोंडून ऐकायचं असावं. एव्हाना सगळ्या मित्रमंडळीत माझी नोकरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
एके दिवशी माझा शाळकरी मित्र ओमप्रकाशचा फोन आला, “सुधा डियर, माझ्या मुलाचा अकौंटन्सी पेपर अडकलाय रे. परीक्षा एका महिन्यावर आलीय. त्याला जरा गाईड करशील का प्लीज. सध्या तू घरीच असतोस म्हणून..."
‘तू घरीच असतोस’ हे त्याचे तीन विखारी शब्द मला झोंबले. ‘अजिबात जमणार नाही.’ असं सांगून मी रागारागात फोन कट केला. संध्याकाळी सुलभा घरी आली. तिला मी हे सगळं सांगितलं.
ती शांतपणे म्हणाली, "सुधाकर, अहो तुम्ही अकौंट्समध्ये टॉपर होता हे तुमच्या सगळ्याच मित्रांना माहीत आहे. ओमप्रकाश भावजीनी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे मदत मागितली असणार. तुम्हाला खिजवण्यासाठी त्यांनी नक्कीच फोन केला नसणार. तुम्ही ऑफिसमध्ये बिझी असता तर ते अशी मदत मागू शकले नसते. आता तुम्ही घरी आहात म्हणून ते तुमची मदत मागताहेत. एवढाच त्याचा साधा सरळ अर्थ आहे. त्यांच्या मुलाच्या जागी आपली अनुजा असती तर तुम्ही शिकवलं नसतं का? त्याला महिनाभर शिकवा. विद्यादानाचं समाधान काय असतं त्याचा अनुभव तरी घ्या.” तिने माझ्या पाठीवर हलकेच थोपटले.
थोड्या उशीरा का होईना मला सुलभाचं म्हणणं त्या दिवशीही पटलं. ओमच्या मुलाला अकौंटन्सी शिकवू लागलो. ओमच्या मुलाचा पेपर नुसता सुटलाच असं नव्हे तर त्याला चक्क ऐंशी मार्क मिळाले. रिझल्टच्या दिवशी ओमप्रकाश पेढे घेऊन आला. त्याने मला घट्ट मिठी मारली. ओमने माझ्या खिशात काही नोटा कोंबल्या. मी काढून पाहिले. दोन दोन हजाराच्या पांच नोटा होत्या. ओम व्यापारी माणूस. आपला फायदा झाला की तो दुसऱ्याला वाटा देणारच. पण मला तो अपमान वाटला. केवळ मी बेकार आहे म्हणून तो मला मदत करतोय असं वाटलं.
मी चेहरा वेडावाकडा करीत म्हटलं, “ओम, अरे यार, असा अपमान करू नकोस ना. अरे तुझा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखाच ना? त्याचे पैसे काय देतोस?” असं म्हणत मी ते पैसे परत त्याच्या हातात ठेवले.
सुलभाने चहा केला. चहा घेता घेता ओम चाचरतच म्हणाला, “सुधाकर, रागावणार नसशील तर माझं एक काम करशील का?”
मी न बोलता त्याच्याकडे पाहत राहिलो. तोच म्हणाला, “माझ्या फर्मचे अकाऊंट्स तेवढे फायनल करून देशील का? अकाऊंट्समध्ये तू एक्सपर्ट आहेस. सगळ्या नोंदी टॅलीत अपलोड केलेल्या आहेत. सीएकडे वेळ नाही रे. महिन्याखेरीला इन्कम रिटर्न्स भरायचं आहे. बघ, काही मदत करता आली तर!”
सुलभा पटकन बोलली. “भावजी खुशाल पाठवून द्या. त्यांच्या डोळ्यांसमोर आकडे नाचत राहिले ना, की त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चांदणं आपोआप फुलत जातं.”
ओमला बोलायला हुरूप आला. तो म्हणाला, “वहिनी आजच पाठवतो. पण तुम्ही त्याला सांगा की मी देईन तो मोबदला त्यानं घेतलाच पाहिजे. मी फुकटचे काम करवून घेणार नाही.”
मग मी म्हटलं, “ठीक आहे बाबा, दे पाठवून.”
ओमप्रकाशचे अकौंट्स मी दोन तीन दिवसात फायनल केलं. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाचे प्रिंट त्याच्या हातात ठेवले. तो जाम खूश झाला. इतक्या लवकर काम होईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. त्याने लगेच पंधरा हजार रूपयाचा चेक माझ्या हातात दिला. नोकरी सुटल्यानंतरची माझी ती पहिली कमाई होती. मी चेककडे पाहत राहिलो.
आम्ही ओमच्या कारने त्याच्या सीएकडे गेलो. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाची फाईल त्यांच्यासमोर ठेवली. ते सगळं पाहून चार्टर्ड अकौंटंट मुरलीधर सरांनी मान डोलावली. ओमप्रकाशने मुरलीधर सरांशी माझी ओळख करून दिली. मी त्याचा जिवलग मित्र असल्याचे आणि मी अकौंट्समध्ये टॉपर असल्याचेही सांगायला तो विसरला नाही. मुरलीधर सर म्हणाले, “सुधाकर माझ्याकडे प्रचंड काम आहे. अकौंट्स करवून घेण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतल्यानं मला ऑडिटींग आणि टॅक्सेशनकडे लक्ष देता येईनासे झाले आहे. माझ्याकडे स्टाफ आहे. पण त्यांना अजून ती मॅच्युरीटी आलेली नाही. तुम्ही तयार असाल तर फायनल स्टेजच्या आणखी वीस फाईल्स मी तुमच्याकडे सोपवू शकतो. सगळ्या नोंदी तपासून बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक काढून दिलंत तर मी तुम्हाला एका अकाउंटचे दहा हजार रूपये देईन.” मी लगेच होकार दिला.
मुरलीधर सरांना ऑडिट आणि टॅक्सेशनवरच भर द्यायचे असल्याने त्यांनी चाळीस क्लाएंट्सचे सुरूवातीपासूनचे अकौंट्सच्या नोंदी करण्याचं कामही त्यांनी माझ्याकडे दिले. त्यामुळे मुरलीधर सरांकडचे चार कर्मचारीही माझ्याकडे आले. आता मला एका ऑफिसच्या जागेची आवश्यकता होती. ती व्यवस्था ओमप्रकाशने पूर्ण केली. आता मला चोवीस तास पुरत नाहीत. प्रचंड काम आहे. वाईट दिवस संपले. आता छोट्याशा फर्मचा का होईना मी मालक झालो आहे.
आज बाबा असायला हवे होते, त्यांना नक्कीच आनंद झाला असता. ते म्हणायचे, ‘सुधाकर, कुठल्या तरी लहानसहान नोकरीचे स्वप्न पाहू नकोस. चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे स्वप्न बघ. गणितातील तुझी गती आणि तुझी चिकाटी तुला नक्कीच यश मिळवून देईल. माझा मुलगा नोकरी करणारा नव्हे तर चार लोकांना नोकरी देणारा व्यावसायिक म्हणून मला पाहायचे आहे. मी तुझ्या पाठीशी आहे.’ कदाचित नियतीला ते मान्य नसावे. वर्षभरातच बाबा गेले. मोठा मुलगा म्हणून नोकरी करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते, शहरातल्याच कंपनीत अकाऊंटंट म्हणून जॉईन झालो आणि बाबांचे स्वप्न विरून गेले. चार्टर्ड अकाउंटंट होता नाही आलं, पण आज आईबाबांचे एक स्वप्न तरी फळाला आले. करवा चौथ ही तिथी माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. सुलभा माझ्यासाठी त्या दिवशी व्रत करत नसेल, परंतु तिचा प्रत्येक क्षण माझे योगक्षेम चिंतण्यातच जात असावा. त्यामुळेच तिच्या शब्दांत इतकं प्रचंड बळ येत असावे. जे अंत:करणातून येते तेच समोरच्या अंत:करणाला जाऊन भिडते. असो.
अचानक नोकरी गेल्यामुळे, कोणाही व्यक्तिचे मनोधैर्य कमकुवत होतंं, नाही असे नाही. परंतु त्याचा स्वाभिमान मात्र जिवंत असतो. किंबहुना तो अधिक प्रखर होतो. हे लक्षात असू द्या. कुसुमाग्रजांच्या “कणा” ह्या कवितेतील उमेद देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी आठवून पाहा. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा ! तुम्ही फक्त लढ म्हणा !!...... एवढेच माझे सांगणे आहे.’
©® व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू, ९५३५०२२११२,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा