सीझन असल्यानं शेठनं दुकान नेहमीपेक्षा लवकर उघडलं. रेडिमेड कपड्याचं जुनं आणि प्रसिद्ध दुकान असल्यानं गिऱ्हाइकाला कमी नव्हती. साठीपार केलेले शेठ स्वतः सगळीकडे लक्ष ठेवून असल्यानं कामगार आपापलं काम करत होते.
“बाळू, नवीन स्टॉक आलाय.गोडाऊन मध्ये उतवरून घे” शेठनी सांगितल्यावर साथीदाराला घेऊन बाळू गोडाऊनवर गेला. माल ठेवताना बाळूचं लक्ष एका मोरपंखी रंगाच्या ड्रेसकडं गेलं.नक्षीकाम केलेला भरजरी ड्रेस बाळूला इतका आवडला की भान हरपून पाहत राहिला.बॉक्समधून ड्रेस काढून निरखून पाहताना तो ड्रेस घातलेली आपली लेक बाळूच्या नजरेसमोर होती.
“काय घ्यायचाय का” सोबतच्या साथीदारानं विचारलं.
“कसला भारीयं.बग ना. ठरलं दिवाळीला पोरीला हाच ड्रेस घ्यायचा. शेठशी बोलतो.”
“बरायेस ना”
“का? काय झालं”
“किंमत बघितली का”
“असलं दोन-तीन हजार,पोरीच्या आनंदापुढं जास नाईत.”
“दहा हजाराला हाय”साथीदार मोठ्यानं म्हणाल्यावर बाळूनं मोठा ‘आ’ वासला.
“आता बोल की.. गप का”
“फायनल.हाच ड्रेस घ्यायचा.”
“लेका,उगा काई बी बोलू नकोस आणि इमोशनखाली अजून कर्ज करू नको”
“पण ड्रेस बग की.कसला झ्याक हाय. लई मनात भरलाय. पोरगी दहावीला पास झाली म्हणून तिला भारी गिफ्ट द्यायचचं. या ड्रेसमध्ये एकदम राजकन्या दिसलं.”
“ते खरंयं !पण लई मोठा घास आहे. सगळं जमतं पण पैशाचं सोंग नाई.”
“तुझं बरोबर हाय पण आपल्यासाठी पैशाची तंगी मरेपर्यंत असणार. आपल्याला नाई पण पोराबाळांना तरी हौस करू दया”
साथीदारानं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण बाळूचा निर्णय झाला होता. पुन्हा एकदा ड्रेस बघून पॅक करून ठेवला आणि दुकानात आला. दिवसभर गर्दीमुळे शेठ बरोबर बोलता आलं नाही. रात्री दुकान बंद करून निघताना बाळू शेठजवळ गेला.
“येक काम व्हतं.”
“सुट्टी आणि पैशे सोडून काहीही बोल” शेठ.
“आज जो नवीन कपड्यांचा स्टॉक आलाय ना”
“त्याच काय”
“त्यातले कपडे फार भारियेत!”
“हा,यावेळी पहिल्यांदा मागवलेत. फार महाग आहेत पण माल जातोय. गिऱ्हाईक घेतयं. तुझं काय काम होतं”
“त्यातला मोरपंखी कलरचा ड्रेस मला पाहिजे” बाळूचं ऐकून शेठ एकटक त्याच्याकडे पाहत राहिले.
“शेठ,असं का बघताय”
“किंमत माहितीये का”
“हा”
“तरीपण घ्यायचाय”
“पोरीसाठी घ्यायचाय. दोन हजार लगेच देतो बाकीचे पगारातून कापून घ्या.”
“आधीच निम्मा पगार उसने घेतलेले पैसे फेडण्यात जातोय. त्यात अजून कशाला भर टाकतोस. स्वस्तातला ड्रेस घे.”
“तुम्ही काहीतरी डिस्काऊंट द्याल की..”बाळूच्या हुषारीवर शेठ मिश्किलपणे हसले.
“चार-पाचशे कमी होतील.”
“बघा अजून काई कमी होतंय का? पोरीला सरप्राइज द्यायचंय”
“तुला दोन मुलं आणि एकच मुलगी ना”
“हा”
“पोरीवर फार जीव दिसतोय.”
“बरोबर बोल्लात.लई गुणाची पोरं आहे. घरची परिस्थिती बघून कधीच काय मागितलं नाय. कायम मन मारत आलीय. दहावीला सत्तर टक्के मिळवले. आमच्या खानदानात कुणाला इतके मिळाले नाईत. म्हणून हे गिफ्ट द्यायचाय.”
“बघ बाबा, जास्त जीव लावू नकोस. नंतर त्रास होतो. पोरी कधी सोडून जातील याचा नेम नाही.”
“ते कोणाला चुकलंय. तसही पोरगी परक्याचं धन. सासरी गेली की कितीही नाई म्हटलं तरी अंतर पडतचं. बापाच्या प्रेमात वाटेकरी होतात. ही पण अजून काही दिसांनी आपल्या घरला निघून जाईल. पण एक सांगू शेठ पोरगी म्हणजे लक्ष्मी ! घरातल्या सगळ्यांपेक्षा फक्त पोरीचीच बापावर जास्त माया असते. फक्त पोरीलाच बापाचं मन कळतं. लक्ष्मीपूजनाला माज्या पोरीचा वाढदिवस हाय. नाई म्हणू नका.” बाळूनं हात जोडले.
“उगीच पोरींचे कौतुक सांगू नको. याच पोरी प्रेमात पडल्या की आईबापाचा विचार करत नाहीत.” शेठच्या बोलण्यातला राग लक्षात आल्यानं बाळू तो काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी बाळूनं दोन हजार शेठच्या हातात ठेवले.
“म्हणजे तू ड्रेस घेणारच. बघ विचार कर. नंतर पैसे परत मिळणार नाहीत.”
“हा फायनल, पोरीसाठी काय पण!”बाळू प्रसन्न हसला आणि कामाला लागला. शेठ मात्र कमालीचे अस्वस्थ झाले.न जर पुन्हा पुन्हा बाळूकडे जात होती. त्याच्याकडे पाहताना मनात विचारांचे मोहोळ उठले. दुसऱ्या दिवशी रात्री दुकान बंद करतेवेळी शेठनं कामगारांना मिठाई आणि बोनस देताना बाळूला थांबायला सांगितलं.
“शेठ काही काम व्हतं का?”
“हा थांब थोडा वेळ..”शेठ बाळू बरोबर बोलत असताना एक तिशीतली मुलगी दुकानात आली.
“तुम्हीच बाळू का”
“हो. काय पाहिजे”
“काही नको. तुम्हांला थॅंक्यु म्हणायला आलेय.”
“मी काय केलं. आपली तर वळख बी नाई.”
“आणि तुम्हांला हे दिवाळचं गिफ्ट ” त्या मुलीनं एक बॉक्स पुढे केला तसा बाळू एकदम मागे सरकला.
“नाई मला नको. कोन तुम्ही?”.
“दादा, प्लीज नाही म्हणू नका.केवळ तुमच्यामुळे.....खूप उपकार झालेत.”
“ओ ताई, काय बोलताय ते समजत नाही. हे परत घ्या”
“बाळू,घे” शेठ पुढे येत म्हणाले.
“शेठ,मी यानला वळखत नाही” शेठ त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. “तुला भेट द्यायला मीच सांगितलं”
“का पण”
“ही माझी मुलगी. हिच्यावर रागावलो होतो. पाच वर्षे भेट नाही की बोलणं नाही पण त्यादिवशी पोरीविषयी तू बोललास तेव्हा खूप आठवण झाली. तुझं लेकीवरचं प्रेम बघून जीव कासावीस झाला. खरंतर ही माझी खूप लाडकी पण मनाविरुद्ध केलेलं लग्न आवडलं नाही. जावई पण भला माणूस आहे. दोघांचा सुखाचा संसार चालूयं परंतु मी मात्र संबंध तोडले. कधी बोललो नाही पण लेकीसाठी जीव कासावीस व्हायचा पण ईगो आड येत होता.”
“पपा..झालं ते झालं.”
“आज बोलू दे. या बाळूचं लेकीवरचं प्रेम बघून खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं. स्वतःचाच खूप राग आला. भेटायची खूप इच्छा झाली म्हणून लगेच फोन केला. माझा आवाज ऐकून ढसाढसा रडायला लागली. मी पण स्वतःला रोखू शकलो नाही. सगळा राग, ईगो फटक्याच्या धुरासारखं हवेत विरून गेलं” बोलताना शेठचे डोळे पाणावले. बाळूला अजूनही आपण नक्की काय केलं हेच समजत नव्हतं. चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेले भाव.
“बाळूदादा, बाप-लेकीचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं ते तुमच्यामुळे म्हणून ही दिवाळी भेट, प्लीज नाही म्हणू नका”. मुलीनं बॉक्स पुढे केल्यावर बाळूनं शेठकडे पाहिलं त्यांनी घ्यायची खूण केल्यावर बाळूनं भेट घेतली आणि शेठला वाकून नमस्कार केला नंतर गाडीतून दोघं गेल्यावर बाळूनं बॉक्स उघडून पाहिला तर त्यात आवडलेला मोरपंखी ड्रेस, सोबत पाकिटात दोन हजार आणि एक चिठ्ठी त्यात लिहिलं होतं माझ्या लेकीकडून तुझ्या लेकीसाठी दिवाळी गिफ्ट.”
मंगेश मधुकर 98228 50034
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा