त्या दिवशी रविवारी माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार होते म्हणून आम्ही अतिशय आनंदात होतो. सगळेजण लवकर उठलो होतो. मुलीची तयारी सुरू होती. अचानक बायकोला आठवलं घरामध्ये पिठाचा एक कण पण शिल्लक नाहीये. मग ती शक्य तितक्या हळू आवाजात माझ्या अंगावर खेकसून म्हणाली,
अहो, उठा ना. लोळत काय पडलात. थोड्याच वेळात ते पाहुणे येतील. चक्कीवर दळायला गहू घेऊन जा. आणि तिथेच उभा राहून पीठ घेऊन या. आणि हो ऐका ना त्याला म्हणावं नीट बारीक दळून दे. मग बायकोने अंदाजे गहू पिशवीत भरून दिले आणि सांगितलं की आता लगेच जा. सकाळी खूप गर्दी असते मग तो वजन करत बसत नाही. त्यामुळे थोडे जास्त गहू मोफत दळून मिळतात. आणि हो त्याला आठवणीने सांगा की मागच्यावेळी नेलेले पीठ खूप कमी भरलं होतं. अगं, पण मागच्यावेळी मी कुठे गहू नेले होते दळायला. मी तर पहिल्यांदाच चाललोय.
अहो, तुम्हाला समजत कसं नाही हो. असं बोलावं लागतं. नाहीतर तो पीठ कमी देईल तुम्हाला. आणि हो दळताना नीट लक्ष राहू द्या. पूर्ण पीठ पडून जाई पर्यंत त्याला दुसरं दळण टाकू देऊ नका. आणि हो त्याने चक्कीचा दगड कधी लावून घेतला होता हे पण त्याला अगोदर विचारा, कारण मागच्या वेळच पीठ कचकच लागत होतं असं सांगा.समजतय ना मी काय काय सांगते आहे ते.
अग, पण मी तर पहिल्यांदाच चाललोय ना चक्कीवर. मी ती गव्हाची पिशवी तिच्या हातातून घेत म्हणालो.
अहो, नुसतं बोलायला काय झालं हो तुमचं. तो काय लगेच तुम्हाला लगेच पीठ आणून दाखवायला सांगणार नाही. आणि हो आपलं दळण टाकल्यानंतर चक्की च्या तोंडावर हाताने ठोकायला विसरू नका. आणि हो दळणाचे पैसे देताना त्याला भाव विचारा. त्याने काहीही भाव सांगितला की तुम्ही एकदम सर्वस्व लुटलं गेल्या सारखा भयानक चेहरा करा आणि चवताळून ओरडा की अरे भाव कधी पासून वाढले. मागच्या आठवड्यात मी दळण घेऊन गेलो होतो.
अग, पण मी तर आज पहिल्यांदाच जातो आहे. मी काकुळतीने बोललो.
काय बोलाव तुम्हाला. अहो नुसता बोलायचं आहे. तो काय तुम्हाला लगेच रिसीट मागणार नाही मागच्या दळणाच्या भावाची. बायकोने दिलेले व्यवहारी सल्ले ऐकून मला खरं तर खूपच टेन्शन यायला लागलं होतं. दळण दळून आणणे एवढी कठीण गोष्ट असते याची मला कल्पनाच नव्हती.त्या पेक्षा तयार पीठच का आणू नये असं मी नुसतं बोलून दाखवल्यावर तिने मुलगी लग्नाची झाली आहे. असा वायफळ खर्च केला तर तिच्या लग्नात पैसे आणणार कोठून. माझ्या माहेरच्या भरवश्यावर राहू नका बरं. या गोष्टी बायको इतक्या तळमळीने सांगत होती की जर मी तयार पीठ आणण्यासारखा खर्च सुरु केला तर माझ्या पोरीच्या लग्नात कितीतरी लोकांना उपाशी राहावं लागेल असं विदारक चित्रं माझ्या डोळ्यसमोर चमकून गेलं. पण या दळण आणतानां इतक्या गोष्टी कशा लक्षात ठेवणार म्हणून मी विचार केला की या सगळ्या गोष्टी कागदावर लिहून घेऊन जाऊ. मग एक कागद घेतला त्यावर बायकोने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी क्रमवार लिहून काढल्या. म्हणजे उदाहरणार्थ आटे का भाव कब से बढ गया है l पिछले टाईम का आटा बहोत कच कच लगा था वगैरे वगैरे.
मग मी शेव्ह वगैरे केली. इन बिन केली. स्प्रे शिंपडला. बूट घातले.आणि गव्हाची पिशवी दळणा साठी हातात घेतली. मला बायकोने एवढं नटून-थटून दळण आणायला जाताना पाहिलं आणि तिच्या पायाची तिडीक मस्तकाला गेली. अहो, तुम्ही दळण आणायला चालले आहात. मुलगी बघायला नाही. काढा ते कपडे आणि घरात नेहमी वापरायचा शर्ट आणि पायजमा घालून जा. असं बूट बीट घालून तुमच्या घराण्यात कुणी दळण आणलं होतं का हो कधी. तिने लगेच आमच्या घराण्याचा उद्धार केला.मला बघायला आले तेंव्हा चांगले कपडे घालून यायला पाहिजे होते, तेव्हा नेमके बिन इस्त्रीचे कपडे घालून आले होते. नशीब माझ्या मैत्रिणीने तेव्हा समजावंलं मला म्हणून नाहीतर मी नकारच देणार होती तुम्हाला . बायकोचा स्वगत सुरू झालं. असं तिला नको त्या वेळी नको त्या गोष्टी आठवत राहतात.अशा वेळी आपण जन्मजात बहिरे आहोत आणि आपल्याशी कोणी बोलतच नाही असं समजून मी निवांत ऐकत राहतो. मग मी तातडीने घातलेले कपडे बदलून पायजमा शर्ट घातला. आणि गव्हाची पिशवी घेऊन चक्की वर जायला निघालो.
चक्कीवर जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग. प्रत्यक्षात तिथं कोणीच दिसलं नाही. पण माझ्याआधी तिथं बरेच लोक दळण घेऊन आले होते असं दिसलं. कारण रांगेने दळणाचे डब्बे ठेवलेले होते. मोठ्याने गिरणीचा खटखट आवाज होत होता. सगळीकडे पिठाचा थर जमलेला होता. कोळ्याची जाळी देखील पांढरी दिसत होती आणि तो दळणारा भैया केसापासून पायापर्यंत पूर्णपीठाने भरलेला होता. फक्त त्याचे डोळे आणि तोंड वेगळंच दिसत होतं.
मला बघितल्यावर तो एकदम ओळखीचं का हसला आणि म्हणाला, आओ साहाब कैसे हो l
मला तो ओळखतो हे पाहून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. घरात जावू दे पण बाहेर साहित्यिक म्हणून मला एक पीठगिरणी वाला भैया ओळखतो म्हंटल्यावर जरा इगो सुखावलाच. मी त्याला विचारलं तुम मुझे पहचानता है l हा साहाब हमेशा का कस्टमर को कोन नही पहचानता l त्याने मला जमिनीवर आणून ठेवलं.
मी त्याला म्हणालो, गेहू का आटा बनाने का है l
तो म्हणाला, हो जाएगा साब रखके जावो. आधा घंटे मे बन जायेगा. मला एकदम आठवलं बायकोने सांगितलं होतं. कितीही वेळ लागो, तिथेच बसून दळून आणायचं. मी म्हणालो, नहीं नहीं अभी चाहिये l मै रुकता हू l
तो म्हणाला, ठीक है lथोडा रोकना पडेगा साब l असं म्हणून त्याने मला चक्कीच्या बाहेर बसायला एक खुर्ची दिली. मी त्याच काम बघत बसलो.लेखक म्हणून मी असा नेहमी निरीक्षण करत बसतो, पण लोकांना वाटतं मी मुद्दामून टक लावून, मान वळवून वळवून पाहात असतो. त्याच दळण दळण्याचे काम सुरू होतं. डबे ठेवून गेलेल्या दळणाच त्याने वजन केलं आणि जास्त झालंल पीठ बाजूला काढल.
अरे ये क्या करता है, मी त्याला विचारलं. तो म्हणाला, साहब लोक जादा गेहू लाते है और कम वजन बताते है इसलिये जो जादा होता है वो मै निकाल लेता हू l
लेकिन ऐसा करना ठीक नहीं है l असं मी बोललो तेंव्हा तो नुसता हसला हातातल्या लोखंडी पान्ह्याने चक्कीवर आवाज करत राहीला. एकापाठोपाठ एक तो दळण टाकत होता. पिठ ईकडे तिकडे उडत होत.
अचानक त्याच्या फोनची घंटी वाजली. अच्छा अच्छा, ठीक है, अभी आता हू असं म्हणतं फोन संपल्यावर तो मला म्हणाला साब एक काम करो ना l मै अभी आता हू l मेरे घर में मेहमान आनेवाले है l आप दस मिनिट के लिए दुकान सम्हालीये ना l
तू जेव्हा मला असं म्हणाला तेव्हा मला धोक्याची जाणीव झाली. मी त्याला म्हणालो अरे, मी कसं काय सांभाळू. मला यातलं काहीच माहित नाही.
तुम्हाला साहेब काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. तुम्ही नुसतं एक दळण संपला की दुसर दळण टाका आणि खालचा डब्बा बदलवा. एकदम सोप आहे आणि मी जे दळण टाकतोय ना तेच मुळे दहा मिनिटे चालू राहील. तुम्ही फक्त कोणी कस्टमर आलं ना तर थांबवून ठेवा. मी लगेच गेलो आणि लगेच आलो. काही अवघड नाही साहेब तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाला. आणि जास्तच त्रास झाला तर हे मेन बटन बंद करून टाका की झालं. या साहेब इकडे. इथं या लाकडी फळीवर उभे रहा. ही टोपी घाला म्हणजे तुमच्या डोक्यात पीठ पडणार नाही. चला साहेब येतो त्याने माझ्या डोक्यात टोपी घातली आणि तो घाईघाईने निघून गेला.
आता त्या गिरणीत मी एकटाच होतो. खट खट आवाज करत दळण दळलं जात होत. दुसऱ्या लोकांना मी दुकानात नवीन आहे हे कळू नये म्हणून मी हातातल्या पान्ह्याने चक्कीवर जोरजोरात आवाज करायला सुरुवात केली. मी पाहिलं होतं तोही असंच करत होता. पीठ इकडे तिकडे उडत होतं मला मजा वाटायला लागली डोके टोपी घातली होती म्हणून केसावर पेठ पडत नव्हतं पण तोंडावर चष्म्यावर पिठाच्या थर जमा लागले. आता मला त्या कामात मजा वाटायला लागली. एवढे छान वाटत होतं की रिटायर झाल्यानंतर एखादी पिठाची गिरणी टाकावी असं मला वाटायला लागलं. नकळत मी गाणं गुणगुणायला लागलो. तेवढ्यात एक बाई कमरेवर पिठाचा डबा घेऊन आली. माझ्यासमोर आदळून म्हणाली अरे भैया इतना आटा वजन मे कम कैसे हुआ l
मला क्षणभर कळत नाही ती काय बोलतेय नुसता बघत राहिलो.
मुझे क्या पता l मी म्हणालो.
अरे चक्की तो तेरी है ना l तिने विचारलं.
नहीं, मेरी नहीं है l माझं ओरडून उत्तर.
तो तू यहा क्या कर रहा है l तिने चवताळून विचारलं.
तेवढ्यात दुसरी बाई आली. दुसरा डब्बा माझ्यापुढे आदळून म्हणाली, अरे भैया पीठ मे क्या पत्थर डाले क्या आटा कितना कचकच लगता है l
मला हे समजत नव्हतं की चक्कीवाल्याशी हिंदीतच का बोलावं लागतं. कदाचित तसा नियम असावा. मी त्या दोन्ही बायांकडे नुसता पाहत राहिलो. त्या दोघी हातवारे करून ओरडायला लागल्या,अरे कुछ तो बोलो, फुकट मे पीस के दिया है क्या l ये आटा बद्ल के दो l मला तर काय बोलावं ते सुचत नव्हतं. गिरणी च्या आवाजात मला ऐकू जावं म्हणून त्या बायका हातवारे करून येव्हढया जोरात बोलत होत्या की त्यांचं बोलणं मला ऐकू जायच्या ऐवजी बाहेरच्या दुसरा लोकांनाच जास्त ठळक ऐकू जायला लागलं आणि हळूहळू गर्दी वाढू लागली.
काही काही लोकं तर भैया हटाव, खळ्ळ खटाक करो, अशा घोषणा द्यायला लागले. मी त्यांना शांत राहण्याचा सल्ला देत होतो. परंतु कोणी माझा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. जिकडे तिकडे पीठ उडून उडून माझ्या चष्म्यावर पीठाचा थर जमा झाला होता. आणि मला अंधुक दिसायला लागल होतं. पायावर तोंडावर सगळीकडे पीठ पीठ जमा झाल होत. दुकानदाराचा कितीवेळ झाला तरी ठिकाणा दिसत नव्हता. तेवढ्यात अजून एक बाई आली आणि तिला अर्जंट दळण पाहिजे होत. दिसायला बरी होती म्हणून मी इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिच दळण घेतलं. तेव्हढ्यात एक बाई आणि मुलगा, आप कोन हो और यहा क्या कर रहे हो असं विचारायला लागल्या वर, मी म्हणालो मै चक्कीवाला हू, असं मी म्हटल्याबरोबर ती बाई एकदमच बिथरल्या सारखी झाली. अम्मा ये अपने अब्बा नहीं है l तो मुलगा भोकाड पसरून रडायला लागला. ती बाई तर कहा गया मेरा शोहर, ठीक तरह से बता, नहीं तो पुलिस को बुलावुंगी l या बाईचा आवाज तर फारच मोठा होता आणि ती अंगावर धावून आल्यासारखी वाटली.आता तिथून पळ काढण्या शिवाय मला पर्यायच राहिला नाही. बाहेर पडता पडता माझा पाय कशाला अडखळला तेच समजलं नाही. एका फळीवर दळणाचे दळून ठेवलेल्या पिठाचे डब्बे ठेवलेले होते. सगळे क्रमाने येवून अंगावर पडले. मी नखशिखांत पिठात न्हाऊन निघालो. आणि सुसाट बाहेर पळत सुटलो.
कसा दिसत होतो देव जाणे. पण चक्की पासून घरापर्यंत एरियातली एकूण एक कुत्री जीव तोडून तोडून माझ्यावर भुंकत होती. बिल्डिंग मध्ये कसाबसा पोहोचलो. बेल वाजवली. घरी आलेल्या पाहुण्यांनी दार का उघडावं बरं. नेमकं मुलीच्या होणाऱ्या सासूबाईने दरवाजा उघडला. मी सरळ आत घुसलो. माझा तो भयंकर अवतार पहिल्यावर तर त्यांची दातखिळीच बसली. त्या होणाऱ्या व्याह्याच्या अंगावर जावून पडल्या. त्या व्याह्याला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. त्याच्या डोक्याला हे टेंगुळ आलं. त्या गडबडीत त्याचा पाय नवऱ्या मुलाच्या पायावर पडला. सगळी पाहायला आलेली फॅमिली रिमिक्स करायला लागली. ही कुठे गेली होती कुणास ठाऊक.त्या गडबडीत मी बाथरूम मध्ये पळालो. अंघोळ करता करता अचानक डोक्याला तोंडाला साबण लावलेला असतांना अचानक पायजाम्याच्या खिशातून लग्नात गुलाबी साडी नेसलेल्या हिच्या मामेबहिणीची रिंग टोन ऐकू येते. मी तसाच फेसाळलेल्या तोंडाने फोन घेतो आणि जगातला सगळ्यात मधुर आवाज माझ्या कानात पडतो, जिज्जू कुठं आहात तुम्ही. लवकर या ना पाव्हणे आलेत घरी.
पण तू कुठं आहेस. मी तर इथंच आहे. मी लाडात येवून बोलतो. जरा बाथरूम जवळ येवून उभी राहा पाहू. मी तिला सांगतो. आणि खसाखसा डोकं पुसत दरवाजा उघडतो सामोरं बायको गोड चेहऱ्याने माझं स्वागत करायला उभी असते. काय हो माझा फोन उचलायला काय धाड भरते का तुम्हाला.दहा फोन केले असतील. एकही उचलला नाही. शेवटी तिचं म्हणाली ताई माझ्या फोनवरून कॉल करून बघ. कदाचीत उचलतील जिजाजी. आणि खरंच तिचा बरोबर उचलला की हो आणि बाथरूम जवळ भेटायला बोलावता का. घरात प्रसंग काय आणि यांच चाललंय काय. देवा देवा... बरं एक सांगा पीठ कुठं आहे. आता या प्रश्नाला काय उत्तर देवू.
आणि तिची ती गुलाबी साडीवाली बहीण कसं बनवलं एका माणसाला अशा नजरेने खवचट सारखी हसत असते. बाहेर व्याही विहीण बाई अजूनही एकमेकांना बिलगून धीर देतं बसले आहेत. कोणीतरी पांढरं पांढरं भूतांसारखं आत धावत गेल्याच त्यांना अंधुक अंधुक आठवतंय.
दत्ता जोशी, अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा