जयंतराव व विनायकराव दोघे अगदी जिगरी दोस्त. जवळजवळ चाळीस वर्ष एकाच ठिकाणी नोकरी करून महिन्याभराच्या फरकाने दोघेही सेवानिवृत्त झाले होते. सरकारी नोकरी, त्यात मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे दोघानाही अगदी घसघशीत पेन्शन मिळत होती. दोघांचेही निवृत्ती नंतरचे आयुष्य मजेत चालले होते. सकाळ संध्याकाळ दोघे मित्र व त्यांचा ग्रुप एका ठिकाणी जमायचे, मग काय गप्पा टप्पा, खाणे पिणे उरकून रमत गमत घरी परतायचे हा त्यांचा रोजचा शिरस्ता.जयंतराव व विनायकराव हे जरी अगदी जिगरी दोस्त असले तरी दोघांचे स्वभाव अगदी भिन्न होते. जयंतराव समजूतदार, मृदुभाषी, प्रत्येकाला मदत करणारे होते तर विनायकराव अत्यंत चिडखोर, हेकेखोर, आपले तेच खरे करणारे होते. त्यांच्या स्वभावात 'मी' पणा काठोकाठ भरलेला होता. असे असले तरी याचा त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम झाला नव्हता.रोजच्या सारखेच दोघे एका ठिकाणी भेटणार होते. विनायक रावांना येऊन अर्धा तास उलटला पण जयंत रावांचा पत्ता नव्हता. वाट बघून विनायकरावांचा पारा चढायला लागला. ते रागारागात निघणार तितक्यात समोरून त्यांना जयंतराव येताना दिसले. "अरे ही काय वेळ झाली यायची"? रागातच विनायक रावांनी जयंतरावांना विचारले.
"चुकलो चुकलो, अरे नातवाला कराटेच्या क्लासला सोडायचे होते. इकडेच निघालोच होतो तेंव्हा सुनेला म्हंटले मीच सोडतो. उगाच तिला चक्कर झाली असती रे." जयंतरावांनी स्पष्टीकरण दिले."तुला काय करायची आहेत रे नसती कामे अंगावर घेऊन, त्यांचे ते बघतील की. आता आपले दिवस आराम करायचे आहेत, उगाच पळापळ सांगितली आहे कुणी." विनायकराव म्हणाले."त्यांचे ते बघतील म्हणजे?" काहीश्या नाराजीनेच जयंतराव म्हणाले." ते काही परके आहेत का? आणि माझ्याच नातवाला सोडले ना मी क्लासला, त्याने माझ्याच सुनेचे काम हलके झाले ना. आणि काय होते रे जरा मदत केली तर?""हं... मदत म्हणे, अश्याने तुला गृहीत धरतील सगळे. मी बघ सगळ्यांना कसे धाकात ठेवले आहे. कोणाची बिशाद आहे का मला असली आलतू फालतू कामे सांगायची. आपल्या रुबाबात रहायचे नेहेमी." काहीश्या घमेंडीने विनायकराव म्हणाले.जयंत रावांना त्यांचा स्वभाव माहीत होता त्यामुळे जास्त वाद न वाढवता त्यांनी विषय बदलला, थोडा वेळ गप्पा मारून दोघे आपापल्या घरी परतले.दोघांचेही एकत्र कुटुंब होते. पण जयंत रावांच्या घरी हसते खेळते वातावरण होते तर विनायकरावांच्या घरी त्यांच्या स्वभावामुळे एकप्रकारचा दडपलेपणा आला होता. त्यांच्या या स्वभावाचा मुलगा अविनाश व सून प्राची हिला खूप त्रास होई, पण त्यांना बोलायची कोणाचीच टाप नसे, मुलगा, सून काय पण त्यांची बायको उमा हिलाही बोलायची मुभा नसे. कोणी काही बोलले की विनायकरावांनी जमदग्नीचा आवतार धारण केलाच म्हणून समजा.हे माझे घर आहे, हे मी माझ्या स्वकमाईने बांधले आहे, या घरातील एक ना एक वस्तू मी कष्टाने घेतलेली आहे, या सगळ्यांवर माझा हक्क आहे, त्यामुळे माझ्या घरात मला कोणी अक्कल शिकवायची नाही, मी म्हणेल तीच पूर्वदिशा. मी काहीही करेन, कसेही वागेन मला कोणी काहीच बोलायचे नाही हा त्यांचा अट्टाहास होता, आणि त्यांच्या याच स्वभावाला सगळे कंटाळले होते.
कितीवेळा अविनाशला वाटायचे हे इतके ऐकून घेतल्या पेक्षा दुसरीकडे राहायला जावे, त्यालाही चांगला पगार होता पण आईसाठी त्याला इकडेच थांबणे भाग पडले होते. तो एकुलता एक होता आणि वडील कसेही असले तरी आई त्यांना सोडून त्याच्याकडे कधीच येणार नाही त्याला माहित होते आणि तिला एकटीला त्यांच्या तावडीत सोडून आपण निघून जावे हे त्याला पटत नव्हते. पण इथे राहणेही दिवसेंदिवस कठीण होत जात होते. कारणं साधिशीच असायची पण विनायकराव कधी ती समजूनच घ्यायचे नाहीत.नातवाच्या अभ्यासाच्या वेळी मोठ्या आवाजात टीव्ही लाऊन बसायचे मग दहा वर्षाचा नातू भले दुसऱ्या खोलीत अभ्यासाला बसला असेल त्याची चुळबुळ चालू व्हायची, त्यांना टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितल्यास ते करायचे नाहीतच, उलट माझ्याच घरात मलाच कसे वागायचे, कसे राहायचे हे तुम्ही कोण सांगणार? असे ऐकवायचे. सुनेने कधी भाजी आणा म्हणून म्हंटले तर अशी हलकी कामे मला सांगायची नाहीत म्हणून तिच्यावर डाफरायचे. त्यांच्याशी नेमके कसे बोलावे हेच कोणाला कळायचे नाही.असेच एक दिवशी अविनाशचा कॉन्फरन्स कॉल चालू होता रूममध्ये रेंज येत नव्हती म्हणून तो बाहेर हॉलमध्ये आला तर बाहेर नेहेमी सारखाच मोठ्या आवाजात टीव्ही चालू होता. अविनाशने दोनदा सांगूनही विनायक रावांनी टीव्हीचा आवाज काही कमी केला नाही त्यांच्या अश्या वागण्यामुळे अविनाशला खूप लाजिरवाणे वाटले. त्रासून गेलेल्या अविनाशने विनायकरावांना यावेळी जाब विचारला पण नेहमीसारखेच उत्तर आले घर माझे आहे मी वाट्टेल ते करेन, अविनाशचा संयम यावेळी सुटला तो म्हणाला माझा महत्त्वाचा कॉल चालू होता, त्यावर अतिशय कुत्सितपणे विनायक राव म्हणाले "नोकरी काय तूच करतोस का? मी देखील नोकरी केली आहे, ती देखील मोठ्या हुद्द्यावर आमच्यावेळी नव्हती अशी सोंगे, नोकरीची मिजास मला नको सांगूस.""अहो बाबा, तुमच्या वेळी अशी परिस्थिती होती का? आता नोकरीत किती अनिश्चितता आहे, किती ताण आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? आहे ती नोकरी टिकवणे किती मोठा टास्क आहे माहीत आहे का तुम्हाला? दिलेले टार्गेट पूर्ण करता करता किती नाकीनऊ येतात हे तुम्हाला कसे माहीत असणारं?" आता रागात येऊन अविनाश बोलत होता.
"तुझ्या नोकरीची टिमकी माझ्यासमोर नको वाजवू आणि हे बघ माझ्या घरात उभे राहून माझ्याशी अश्या भाषेत बोलायचे नाही आणि नसेल पटत तर इथून चालते व्हायचे." रागाने लालबुंद होत विनायकराव कडाडले.हद्द झाली होती. इतकी वर्ष आईसाठी गप्प असणाऱ्या अविनाशने घर सोडायचे ठरवले आणि यात त्याची साथ त्याची आई उमाबाईंनी सुद्धा दिली. त्याही विनायकरावांच्या हेकेखोर स्वभावाला कंटाळल्या होत्या. अविनाशची काहीही चूक नाही हे त्यांना दिसत होते, यावेळी सर्वांनीच विनायकरावांना निक्षून सांगितले, येत्या आठ दिवसांत सगळेजण हे घर सोडून जाणार होते.यावेळीही नेहमीसारखे सगळे गप्पच बसणार या भ्रमात असणाऱ्या विनायकरावांना हा मोठा धक्काच बसला. घाईतच ते आपला मित्र जयंतरावांना भेटायला गेले, त्यांना सगळी हकीकत सांगितली. मित्राचा स्वभाव माहित असलेल्या जयंतरावांनी सगळे ऐकून घेतले."अरे गप्प का? बोल ना काहीतरी, तुलाही माझे म्हणणे पटले ना? घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलायची ही का पद्धत आहे? चुकले की नाही अविनाशचे." विनायकराव जयंतरावांना म्हणत होते.किंचित हसत जयंतराव म्हणाले, "ज्येष्ठ.... तू ज्येष्ठ नाहीस तू म्हातारा झाला आहेस." "म्हणजे?....मी समजलो नाही.""अरे ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध ना." विनायकराव न समजून म्हणाले."अजिबात नाही. ज्येष्ठत्व म्हणजे वृद्धत्व नव्हेच.अरे ज्येष्ठत्व अनुभव संपन्न, विनम्र, संयमी असते तर वृद्धत्व अहंकारी व हेकेखोर असते. ज्येष्ठत्व दुसऱ्यांना आधार देते तर वृद्धत्व दुसऱ्यांचा आधार शोधते. अरे माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हायचे असते म्हातारे नाही.""तुझे वागणे तपासून बघ एकदा. तुझ्यात किती अहंकार, किती 'मी ' पणा ठासून भरला आहे. वास्तविक तुझी पत्नी, तुझा मुलगा, तुझी सून, तुझी नातवंडे सगळीच किती समजूतदार आहेत, किती आदर करतात तुझा, किती मान देतात तुला पण तुला ते कधी समजलेच नाही. खरे म्हणजे तुझा मुलगाही उत्तम कमावतो तरी सुद्धा त्याला "आमच्या वेळेस हे असे नव्हते"असे म्हणून आपल्या तालावर नाचवायचे हे कितपत बरोबर आहे? अरे स्वतःच्या पेन्शन वर इतकी मिजास करतोस, कधी मुलाच्या, सुनेच्या अगदी नातवाच्या वाढदिवसाला कधी त्यांना एखादी छोटीशी भेटवस्तू दिली आहेस का? सतत त्यांचेच घेत आलास उलट."
"तरुणपणी आपण आपल्या मनाप्रमाणे वागलो निर्णय घेतले हे विसरून स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आपल्या मुलांना सतत उपदेशामृत पाजले तर तीही आपल्या मनाप्रमाणेच वागणार ना. घरातील वितंडवाद इथेच सुरू होतो. अरे सतत मी हे केले, मी ते केले, मी घर घेतले, मी तुम्हाला शिकवले असे म्हणत असतोस पण हे सर्व गृहस्थाश्रमात असलेला प्रत्येक व्यक्ती करतो त्यात तू असे वेगळे काय केलेस? आपला इगो सांभाळताना दुसऱ्याचा अहंकार आपल्याकडून दुखावला जाणार नाही याचा विचार कधी केलास का? व्यक्ती कितीही लहान असली तरी तिलाही आत्मसन्मान असतोच ना. पण हे तुझ्या गावीही नाही रे.""जवळजवळ प्रत्येक माणसात एक अवगुण लपलेला असतो तो म्हणजे 'सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स '. हा अवगुण तेव्हाच ठरतो जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या कोणालाही आपली जागा घेऊ देत नाही. हे असे काहीसे तुझे झाले आहे. तू तुझी जागा तुझ्या मुलालाही घेऊ देत नाहीस.""काय रे स्वतः ला जेष्ठ म्हणतोस, ज्येष्ठ म्हणजे काय फक्त टीव्ही बघत आरामात लोळणे असते का? आपली शारीरिक स्थिती जर चांगली असेल तर मुलांना मदत केली तर काय हरकत आहे. लोळत पडून लोकांना नुसत्या ऑर्डर देणे म्हणजे ज्येष्ठत्व असते का? आणि या ऑर्डर कोणी पाळल्या नाहीत तर गावभर सांगत सुटायचे मुलगा आणि सून आम्हाला मान देत नाहीत म्हणून. पण मान देण्यासारखे खरोखर आपण वागतो का हे कोण तपासून बघणार?" विनायक रावांना काहीसे उमगत चालले होते, खूप मोठे हातातून निसटून जात आहे असे वाटायला लागले होते. आज पहिल्यांदा त्यांची कोणीतरी इतकी खरडपट्टी काढली होती. त्यांच्या डोळ्यांवर असलेली अहंकाराची पट्टी बाजूला सारली होती.घाईतच ते घराकडे निघाले. घराबाहेर पडणाऱ्या पावलांना त्यांना थांबवायचे होते. घराचे घरपण ज्या व्यक्तींमुळे होते त्यांच्या जवळ अगदी माफीच नाही पण केलेल्या चुकांची कबुली द्यायची होती. घरी गेल्या गेल्या त्यांनी रागात असलेल्या मुलाला, सुनेला, बायकोला बोलावले आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले ज्येष्ठत्वाच्या भ्रामक कल्पना मनामध्ये होत्या माझ्या. पण आता मला समजले आहे ज्येष्ठत्व तरुणांना समजून घेण्यात आहे, त्यांचे मार्गदर्शन करण्यात आहे, विचारले तरच त्यांना सल्ला देण्यात आहे, त्यांना आधार देण्यात आहे. मला केविलवाणे वृद्धत्व नको तर सन्माननीय ज्येष्ठत्व हवे आहे." अविनाश चकित होत बाबांचे बोलणे ऐकत होता, त्याला कळून चुकले होते जयंतरावांनी त्याच्या बाबांना खूप चांगले समजावले होते. आता त्यांच्या कुटुंबात आनंदाचा एक निखळ झरा वाहणार होता हे निश्चित.
धन्यवाद.
© अश्विनी रितेश बच्चूवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा