गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1521. जांभळीचे झाड

      मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे. शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरवातीला चालत, मग सायकलवरुन आणि हल्ली काही वर्षे स्कुटर वरुन किंवा गाडीतून. शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दिढ किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घयायचो.रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची, रतांब्याची, फणसाची झाडें होती, या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते. माझे मित्र मोठया आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळी खाली थांबायचो. त्या झाडाच्या सावलीखली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो. जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच. जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची, हिरवीचुटुक पालवी, मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबळी होतं, जासजस उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळे काळी होतं. या झाडाला घोसाने जांभळे लागत. जांभळे पिकली की काळिभोर जांभळे टपटप खाली पडत, मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेर पर्यत धस्थपूष्ठ होतं.
     आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो, आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे.पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्याना दयायचो. जांभळीचे झाड अत्यन्त कोरम असते, त्याच्या फानदी वरुन आम्ही कधी ना कधी पडून हात, ढोपरे मोडून घेतली आहेत. मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो. पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जातायेता या झाडावर माझे लक्ष असेच. गाव वाढले, वस्ती वाढली, लोकांनी लांब घरे घेतली. त्या झाडाखाली आता भाजीवाली, फळवली बायका बसू लागल्या.मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी, कधी शेंगा, कधी आंबे घेऊ लागलो. माझ्या बरोबर कधी कधी बायको असायची ती पण भाजीवल्या मावशीच्या ओळखीची झाली. एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो, तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली 
"भाऊंनू, आमका आता दुसरी जागा बघूची लकतली '
"कशाक?
"ह्या जागेची मोजणी सुरु आसा दोन दिवस, रस्त्याच्या रुंदीकरण सुरु होतला. ही झाडा पण तोडतले म्हणतात '.
"काय, झाडा तोडतले? म्हणजे ही जांभळी पण.
"होय तर, ह्या जांभळीवर पट्टे मारलेत ते काय, सरकारचे म्हणून '.
मला एकदम टेन्शन आले. गेली कित्येक वर्षे या इथे जांभळीला पहायची सवय, ते झाड तोडणार? मग या झाडावरची जांभळे खाणाऱ्या पक्षी, कावळे, कुत्री, आम्ही माणसे यांनी काय करावे? या झाडा पासून मिळणारी सावली, आमच्यापासून हिरावून नेणार? मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली. तेथल्या अधिकाऱ्याने मला तेंच उत्तर दिले.
"वाहने खुप वाढली आहेत, सध्याचा रस्ता पुरा पडत नाही, रुंदीकरण करायला हवे, असे सरकारचे म्हणणे, मोजणी झाली आहे. पुढील महिन्यात काम सुरु होईल, त्यामुळे झाडें तोंडावीच लागतील,'
मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले. कलेक्टरसाहेबांचे तेंच म्हणणे. त्या भागात आता वस्ती वाढली आहे. याच  रस्त्यावरून हायवे कडे जाता येते, त्यामुळे रुंदीकरण करावेच लागेल.'  कोणीच दिलासा देत नाही हें पाहून मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला. मी स्वतः वकील होतोच.कोर्टाचा निकाल लागेपर्यत रुंदीकरण थांबले. शेवटी कोर्टात केस उभी राहिली. सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्या नंतर मी कोर्टाला म्हणालो 
"रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडें का तोडता?
माननीय कोर्टाने मला विचारले "वाटेल आलेली झाडें तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे काय? तुम्हाला झाडें तोडू नये असे वाटतं असेल तर झाडें उचलून दुसरीकडे लावा '.
"हें कसे शक्य आहे? मी विचारले.
कोर्ट म्हणाले "शक्य आहे. काही देशात झाडें कुपळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात, तुम्ही हवे असल्यास माहिती घ्या '
मी विचार केला आणि कोर्टाला विचारले "मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो, त्याची परवानगी द्यावी.'
कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी दिली.
 मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेज मधील biology चे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो.
वर्दे यांना विचारले "असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय?
"होय, हल्ली परदेशात मोठमोठे वृक्ष कुपळून ते दुसऱयाठिकाणी लावली गेली आणि ती जगली, अशी उदाहरणे आहेत.'
वर्देनी मला या संबधी माहिती असलेली पुस्तके दिली. मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे, असे सांगितले. बायको माझ्यावर चिडली. असले नको ते धंदे का करता, अशी झाडें कधी जगत नाहीत 'असे सांगून माझा हिरेमोड करू लागली. मी तिला सांगितले "लहानपणा पासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना, त्याला जांभळे लागताना, त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले आहे. ते झाड तोडून त्याचे सरपण करावे, हें मला पाहवणार नाही. माझा हा कदाचित वेडेपणा असेल कदाचित पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला हवा. मी तो करणार आहे. तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेडापासून दूर नेऊ नकोस ' माझा स्वभाव माहित असल्याने बायकोने बडबड केली आणि ती गप्प बसली. मग मी कामाला लागलो. माझ्या ओळखीच्या शिवा लमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली. त्याच्या माणसानी जागा साफ केली आणि चार बाय चार खड्डा खणला. त्यात जुना पालापाचोळा, शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली. सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभूशीत केली. 
     मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला. कुदली फवडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉली मध्ये ठेवले.मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली. घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले. आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवरात उभे होते. माझ्या बायकोला हें काही पसंत नव्हते.ती झाड उभ करताना तिकडे फिरकली ही नव्हती. आता झाड जगवणे हें महत्वाचे होते, आमच्या घरी कामाला येणारी शांता कडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली.  दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती, सायंकाळी घरी आल्यावर पाहिले, शांता ने पाणी घातले होते पण झाडें मलुल दिसत होती. मी रात्री उठून झाडाकडे गेलो, पाने आणि देठ पिवळे होतं होते. सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती, बरीच पाने पिवळी झाली होती. मी कॉलेजच्या वर्देसरांना फोन लावला, त्याचे म्हणणे, जुनी पाने गळून पडत असावीत, त्याची काळजी करू नका, नवीन कोंब येतात का पहा. मी सकाळ दुपारी सायंकाळी मध्यरात्री झाडाकडे पहात होतो. पाणी शेणखत घालत होतो, पण काहीच प्रगती नव्हती. मी निराश झालो. बायको म्हणत होते ते खरेच उगाचच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते. मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले ऐकले, कोणी म्हणाले "असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते, या दिवसात जगणे कठीण,'.दुसऱ्याचे म्हणणे "रोज पाणी घालू नका, त्यामुळे मुळे कुजतात '.
एकांदरीत सर्व मला हसत होते, चेष्ठा करत होते. मी दुःखी होतं होतो. एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो, त्या करिता किती पैसे गेले होते? माझी किती मेहनत? आणि सर्वांनी माझी चेष्ठा करावी? बायकोने जाता येता टोमणे मारावे? आज सहा दिवस झाले, जांभळीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती. त्यावर कोठेही नवीन कोंब येत नव्हते. माझा पराभव झाला होता, आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते. आजूबाजूची लोक, शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती. माझे कशातच लक्ष नव्हते. अजूनही शांता पाणी घालतंच होती. एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्दे सरांकडे गेलो. सरांकडे माझा पराभव मान्य केला. सरांनी शिवाजी विदयापीठतील biology चे प्रमुख डॉ सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांचेशी बोलायला सांगितले. मी रात्री डॉ सामंत यांना फोन लाऊन सर्व हकीगत सांगितली. सामंत यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, मग ते बोलू लागले 
डॉ सामंत -वकीलसाहेब, तुमच म्हणणं मी ऐकलं, तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलंत आणि तुमच्या घराच्या आवारात लावलत. पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील? तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेलं, तर तुम्हाला राग नाही का येणार?
मी -येणार सर, निश्चित येणार, पण मी माणूस आहे आणि ते तर झाड..
डॉ सामंत -इथेच आपली गफलत होते. तुम्हाला काय वाटते, झाडाला संवेदना नाहीत? राग नाही? दुःख नाही? आनंद नाही? झाडांना सहवास, प्रेम नको असत?
मी -सर, मला काहीच माहित नाही याबद्दल.
डॉ सामंत -तुम्ही कोकणात राहता, तुमच्या घरा शेजारी एक नारळीच झाड बागेतील झाडापेक्षा पाचपट उत्पन्न देत, बरोबर.
मी विचार केला, डॉ बरोबर आहे. आमच्या घरच्या बाथरूमचे पाणी घरा शेजारील माडाला जाते त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्त नारळ धरतात.
मी -हो डॉ साहेब, बरोबर.
डॉ सामंत -याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरचंचा सहवास मिळतो. भारतीय शस्त्रज्ञ् डॉ जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे, वनस्पतीना सुद्धा राग, दुःख, वेदना, आनंद असतो. त्याना सहवास हवा असतो.
मी -मग डॉ माझे काही चुकलं का?
डॉ सामंत -खूपच चुकलं. रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेलंय झाडाला उपटून काढतांना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का?
मी -नाही.. नाही.. मला याची काही कल्पना नव्हती.
डॉ सामंत,-ते झाड दुःखी झालाय. तुम्ही त्या झाडाची क्षमा मांगा. त्याला जाता येता गोंजारा. त्याच्या बुंध्यवर डोकं टेकवा, सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्या नंतर मला फोन करा.
डॉ नी फोन ठेवला.
मी हडबडलो. मला वनस्पतीच्या  सवेंदना, भावना या विषयी काही कल्पनाच नव्हती, शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच विषयी धडा होता पण तो पाच मार्कचा एव्हडाच इंटरेस्ट. मी घरामागे आलो, चांदण्यात जांभळीचे झाड निश्चिल उभे होते. त्याचावर नाही फादी नाही पान. मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागलो "क्षमा कर मला, क्षमा कर, तुला न विचारता तुला उपटून काढलं मी. दुष्ठ माणूस आहे मी. माझ चुकलं. कितीतरी वेळ मी रडत होतो.
     दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो, आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती शिंपले. अर्धातास मी झाडासोबत होतो.मग मी कोर्टात गेलो, रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यसमोर ते जांभळीचे झाड होते. रात्री घरी आलो, हातपाय धुतले आणि झाडाकडे गेलो. परत परत त्याची क्षमा मागितली. झाडाला गोंजारले, त्याचाशी गप्पा मारल्या. माझ्या बायकोने माझ्याशी बोलणे सोडल होते. माझे जे काय चाळे चालले होते, त्याची मनातल्या मनात ती चेष्ठा करत असणार. शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती, परत एकदा पाणी घालत होती. दहा दिवस झाले असतील, मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो, एव्हड्यात शांता आली आल्या आल्या ती झाडाकडे आली, आणि मोठ्याने ओरडली "भाऊंनू, ह्या बघा, झाडाक कोंब येता.. हेकाच पुढे फादी येतली आणि पाना पण येतली '.
मी धावलो, खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते.
मी झाडाच्या बुंध्यवर डोकं टेकले आणि रडू लागलो. शांता चे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली, तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली. माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे, झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते. ते दोन कोंब हळूहळू मोठे होतं गेले. आणखी कोंब आले, आणखी कोंब आले... लालचुतुक पाने आली..पाने जून झाली.. फाद्या मोठया झाल्या.. संपूर्ण जांभळाचे झाड पानांनी भरून गेले.

 प्रदीप केळुस्कर 9422381299 / 9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...