"अवनी, हे रिपोर्ट्स तू कसे काय अप्रूव्ह केलेस?"
"काय झालं सर? काही चुकलंय का?"
"हो, बरंच काही. हे रीडिंग्ज बघ. त्यांत अजिबात consistency नाहीये. शिवाय पुढच्या calculations मध्येही गडबड झालीये. पूर्ण automated सिस्टम असली तरी ती वापरताना माणसाला डोकं जागेवर ठेवावं लागतंच ना. कसं काम करतात तुझे इंजिनिअर्स ? जरा दम ते त्यांना आणि या सगळ्या टेस्ट परत करून घे."
सर बोलत असताना अवनी अस्वस्थपणे ते रिपोर्ट बघत होती. खरंच त्यात बऱ्याच चुका होत्या. या आपल्याला कशा दिसल्या नाहीत?
"अवनी, तुझ्याकडून या चुका कशा सुटल्या? Is everything alright? यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून बघतोय मी तू अस्वस्थ असतेस. काही स्ट्रेस आहे का? कशाचा त्रास होतोय का? मला तू मोकळेपणाने सांगू शकतेस."
"नाही सर तसं काहीच नाही."
"नक्की?"
"हो, सर."
"जर तसं काही नसेल तर मी सांगतो, काय झालंय ते. तुला एका ब्रेकची गरज आहे. किती दिवसांत तू सुट्टी घेतलेली नाहीयेस. मला तुझ्या कामावर असलेल्या तुझ्या श्रद्धेची पूर्ण कल्पना आहे. तुला तुझं काम खूप आवडतं आणि तीच तुझी मुख्य प्रायोरिटी आहे हे मला माहिती आहे. पण त्यातही जरा चेंज हवा गं. Think about it seriously and get this retesting done." असं म्हणून सरांनी विषय संपवला.
"Yes, Sir" म्हणून अवनी केबिनबाहेर आली आणि टेस्ट लॅबकडे निघाली.
सर म्हणत होते त्यात काही चूक नव्हतं. अवनी सध्या खरंच अस्वस्थ होती. पण ते नक्की कशाने ते तिचं तिलाच कळत नव्हतं. तिला जसं हवं होतं अगदी तसंच आयुष्य ती जगत होती. तिच्या आवडीचं काम तिला मिळालं होतं जे ती जीव ओतून करत होती. अमर सारख्या हुशार, देखण्या आणि कर्तृत्ववान मित्राशी तिचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. अमरचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्याने तिला ती जशी आहे तसं स्वीकारलेलं होतं. शिवाय तिच्या कधीही मुल न होऊ देण्याच्या निर्णयाला त्याचा पूर्ण पाठींबा होता. In fact त्यालाही कधीच मूल नको होतं. लग्नानंतर अवनीच्या आईवडलांनी आणि सासूसासऱ्यांनी दोघांचं मन वळवायचा हर प्रकारे प्रयत्न केला होता. पण ते बधत नाहीत म्हंटल्यावर त्यांनी यांचा हा जगावेगळा निर्णय स्वीकारून टाकला होता.
अवनी आणि अमर दोघांनाही मुलाला जन्म देऊन त्याच्या मागे आयुष्य घालवायचं नव्हतं. आयुष्यभराची पालकत्वाची जबाबदारी नको होती. त्यांना फक्त त्यांच्या दोघांच्याच जगात सुखी राहयचे होते. जे ते होतेही. पण तरीही हल्ली कसली तरी उणीव भासत होती.
विचार करत करत अवनी लॅबमधे आली. लेटेस्ट टेकनॉलॉजिने सज्ज असलेली ही आद्ययावत लॅब कंपनीसाठी अवनीने उभारली होती. अगदी शून्यातून. त्यामुळे अवनी लॅबबद्दल बोलताना It's my baby असं अभिमानाने म्हणायची. लॅब इन चार्ज म्हणून आनंदाने मिरवायची. अवनीची सगळी भावनिक गुंतवणूक तिच्या करीअर मधे होती आणि मुख्यत्वाने या लॅबमधे होती. अगदी हल्ली हल्ली पर्यंत. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला आयुष्य अगदी संथ झाल्यासारखं वाटत होतं. करीअर एका उंचीवर पोचून त्यात स्टेबिलीटी आली होती. अमर आणि तिच्या नात्यातही एक ठेहाराव आला होता. आयुष्यात नाविन्य, नवचैतन्य असं काही उरलंच नव्हतं. कशासाठी, कोणासाठी आपण धावतोय तेच कळत नव्हतं. जवळच्या मैत्रीणी मुलाबाळात, संसारात आकंठ बुडाल्या होत्या. त्यांच्याकडे अवनीसाठी वेळ नव्हता. आईशी काहीही शेअर करायला गेलं तर तिची गाडी फिरून फिरून मुलावर यायची आणि दोघीत वादच व्हायचे. त्यामुळे तिच्याशीही फार शेअरिंग होतं नव्हतं. अमर त्याच्या कंपनीत कंट्री हेड झाल्याने वाढलेल्या जबाबदाऱ्या निभावण्यात बुडालेला होता. आहेच कोण माझ्याजवळ माझ्या हक्काचं? माझ्यावर अवलंबून असलेलं, माझी वाट बघणार? हल्ली ही पोकळी अवनीला फार जाणवायला लागली होती. 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशी अवस्था झाली होती.
सर म्हणतायत ब्रेक घे, पण तो घेऊन करु काय? अवनी खिन्नपणे हसली आणि तिने मगाचच्या फाईल मधे डोकं खुपसलं.
खिन्न मनानेच अवनी घरी पोचली तर लिफ्टमध्ये तिला आपटे आजी भेटल्या.
गुलाबी साडी नेसून प्रसन्न मनाने त्या जवळच्याच देवळात निघाल्या होत्या, श्रीसूक्ताच्या आवर्तनांसाठी. अवनीला पाहून त्या म्हणाल्या, "अरे वा आज लवकर आलीस वाटतं. चल येतेस का देवळात माझ्याबरोबर? आपल्या सोसायटीतल्या बऱ्याच बायका येणार आहेत. भोंडलाही आहे आज"
नाहीतरी घरी जाऊन करायचं काय हा प्रश्न होताच त्यामुळे अवनी आपटे आजीबरोबर देवळात गेली. संपूर्ण देऊळ आज गुलाबी रंगात नाहून निघालं होतं.
देवीला गुलाबी साडी नेसवली होती. अवनी देवीसमोर हात जोडून उभी राहिली. देवीच्या चेहऱ्यावर कोमलता, करूणा, वात्सल्य या स्त्रीत्वाच्या भावनांतून आलेली परिपूर्णता झळकत होती. देवीच्या त्या प्रसन्न, प्रेमळ चेहऱ्याकडे पाहता पाहता अवनीला एकदम जाणवलं की तिच्या आयुष्यात काय कमी आहे.
'मी इतरांवर प्रेम करण्याची, त्यांची काळजी घेण्याची, त्या काळजीत, प्रेमात जीवाला गुंतवून टाकण्याची म्हणजे माझ्यातल्या स्त्रीत्वाची मूळ भावनाच दाबून टाकली आहे. स्वतःला विसरून निरपेक्ष प्रेम करण्याचा अनुभव नाकारला आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात ही पोकळी आहे.' अवनी विचारांत हरवली.
काही वेळातच श्रीसूक्त आवर्तनांना सुरवात झाली. श्रीसूक्त ऐकता ऐकता अवनीच्या मनातली विचारांची वलय शांत होत गेली. आवर्तनांनंतर आपटे आजींनी त्याचा अर्थही सांगितला.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
आजी म्हणाल्या, या मंत्रामध्ये देवीचे वर्णन केलेलं आहे. यात लक्ष्मीला आर्द्रां असं म्हटलं आहे. आर्द्रां म्हणजे ओली. लक्ष्मीला ओली म्हणण्यामागचे तीन अर्थ घेता येतात. एक ती समुद्रमंथनातून आलेली आहे म्हणून, दुसरा ती आर्द्रां नक्षत्रावर आलेली आहे म्हणून आणि तिसरा म्हणजे स्नेहाचा ओलावा तिच्यामध्ये आहे म्हणून. अशी ही चंद्राप्रमाणे शितल असलेली, आनंद देणारी लक्ष्मी परिपूर्ण आहे.
अवनी श्रीसूक्तातल्या एकेका मंत्राचा अर्थ ऐकत गेली आणि तिच्यासमोर तिचे भविष्यातले ध्येय अधिकाधिक स्पष्ट होत गेले.
माझ्या आयुष्यातली ही अपूर्णता भरून काढणं माझ्यासाठी सहज शक्य आहे. जगात कितीतरी लोक निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमासाठी झुरत आहेत. कित्येक अनाथालयं, हॉस्पिटल्स, वृद्धाश्रम असे असतील जिथे लोकांना प्रेमाने काळजी घेणाऱ्या माणसांची गरज असेल. अशा एखाद्या संस्थेसाठी मी माझा वेळ दिला तर.. इतरांना मायेचा ओलावा देण्यात मनाची गुंतवणूक केली तर. नक्कीच माझंही आयुष्य परिपूर्ण होईल.
या विचाराने अवनीचा मूड बदलला आणि तिने लवकरच त्या बाबत पावलं टाकायची असा निश्चय केला.
"हे देवी माते, माझ्या या निश्चयाला साध्य करण्याचं सामर्थ्य मला दे." अशी देवीकडे मनोमन प्रार्थना करून अवनी आनंदात घरी जायला निघाली.
मायेचा ओलावा जपणारा आजचा गुलाबी रंग अवनीची संध्याकाळ गुलाबी करून गेला.
©® धनश्री दाबके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा