गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1531. डाव खेळून तर बघ

 रविवारची सुट्टी सकाळीच टी.व्ही. वर गाणे चालू होते, 
‘‘अकेले अकेले कहाँ जा रहे हो - अकेले अकेले कहाँ जा रहे हो ।
मेरे साथ आओ - कहॉ जा रहे हो ॥’’
    गाणे ऐकताच मला निलिमाची आठवण झाली. निलिमा ही उच्चशिक्षित - अत्यंत देखणी - हुशार संगणक अभियंता म्हणून नामांकित कारखान्यात काम करणारी मुलगी. लग्नाचा विषय काढला की, लग्न करायचे नाही म्हणते. या विषयाने चिंतित झालेली निलिमाची आई-निलिमाला माझ्याकडे घेऊन आली होती. निलिमाच्या चेहर्‍यावर नैराश्य पण जाणवत होतं. निलिमाशी वैयक्तिक संवाद साधताना तिच्या लहानपणापासून आई-वडिलांच्या भांडणाचा तीव्र परिणाम तिच्या अंर्तमनावर झालेला जाणवला. ती म्हणाली वडील आईला खूप मारझोड करायचे, शिवीगाळ करायचे, गुलामासारखं जीवन ती जगली. स्वतःच्या आयुष्यात तिला कुठलीही गोष्ट मनासारखी करता आली नाही. कामवाली - उपभोगाची दासी असा दुय्यम दर्जा तिने आयुष्यभर सोसला. माहेरच्यांनी पण तिला घरात स्थान दिले नाही. गुराढोरासारखं जीवन ती जगली. सर लग्न म्हटलं कि मला भितीच वाटते.
      मी अध्यात्मात आयुष्य काढायचं ठरवलंय सर. सर्व ऐकून घेतल्यावर मी तिला म्हणालो, हे बघ निलिमा तुझ्या आईच्या काळी स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या नव्हत्या. तू आज 50,000/-रू. प्रतिमहा कमावतेस. त्यावेळी स्त्री ही चुल व मुल यापुरतीच होती. तिला दुय्यम दर्जा असायचा. आज स्त्री-पुरूष समानतेचे युग आहे. त्याकाळी स्त्रीयांच्या संरक्षणासाठी कायदे फारसे कडक नव्हते. आज स्त्रीयांसाठी त्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदेशीर विशेष विभाग शासनाने निर्माण केले आहेत. पूर्वी स्त्री ज्या घरी दिली तेथे तिला कितीही त्रास झाला तरी ते घर तिला सोडता येत नसे. माहेरची लोक इज्जतीसाठी तिला स्वीकारायला नाकारत असत. आज माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला आपल्या घराचे दरवाजे केव्हाही खुले ठेवले आहेत. 
      पूर्वी घटस्फोट हा प्रकार लोकांना मान्य नव्हता. आज समाजाने सहजपणे तो स्वीकारला आहे. पूर्वी समुपदेशन हा प्रकार नव्हता. आज त्यावर कार्यशाळा भरत आहेत. आज बदलत्या जगात स्त्रीने एकटं राहणं म्हणजे अनेक समस्यांना तोंड देणे होय. समाज, नातेवाईक तिला वेगळया पद्धतीने पाहतात. घरगुती कामे, एकटेपणा, आजारपण तिला निराश करत असते. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला सहचराची नैसर्गिक गरज असते. एकटेपणामुळे अनेक भावभावनांचे दमन झाल्यामुळे डिप्रेशन येते. निसर्गाच्या विरोधात जाणे म्हणजे आपले आयुष्य उध्वस्त करण्यासारखे आहे. अमेरिकेत नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार 60% मनोरूग्ण हे त्यांचे कामजीवन उध्वस्त झाल्यामुळे झालेले आहेत. परिस्थितीमुळे एकटी राहणारी माणसे ही  भकास, क्रोधी, निरूत्साही, तक्रारखोर, निराश होतात व सांसरिक माणसांपेक्षा कमी आयुष्य जगतात. नकारात्मक मनोवृत्तीमुळे त्यांचा जीवनरस पिळून जातो. एकदा लग्न झालं की जन्मभर त्यातून सूटका  नाही हे तुझ्या आईच्या पिढीतलं मत आहे. आता समाजाचं चित्र पूर्ण बदललंय. 
      त्याचप्रमाणे तू अध्यात्मात जीवन घालवायचंय असे म्हणते. घरगुती समस्यांना भिऊन जी-जी तरूण-तरूणी अध्यात्म्याच्या वाटेने जातात, मुळात त्यांचा तो पिंडच नसल्यामुळे काही वर्षातच अध्यात्मातील नियम व त्यांचा मुळ स्वभाव यांचे मिलन न झाल्यामुळे परमार्थातील रूक्षता त्यांना अस्वस्थ करून सोडते व तेथून त्यांना मागे फिरावेसे वाटते. जग काय म्हणेन या भितीने ते नैराश्याकडे वाटचाल करतात.  शेवटी या वनवासात पूर्वाश्रमीचे स्मरण करणे व झुरणे सुरू होते. बर्‍याच वर्षानंतर आपली चुक कळते. क्षणवैराग्य हे त्रासाने व भितीने आलेले असते ते जन्मवैराग्य ठरू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात  घेतले पाहिजे. सर्व इच्छा आकांक्षा मनी वसल्या असताना गोसावी होणे निसर्गाच्या विरूध्द असते. 
 संत तुकाराम महाराज ... 
 ‘‘आशा ही समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे ॥’’
 त्यामुळे मनातील विकाराचं दमन करून मनोरूग्ण होण्यापेक्षा निसर्गाच्या नियमांचे पालन करणे आपल्या हिताचे असते.   निलिमा जीवन ही एक अनुभवमालिका असते. प्रत्येकाचे अनुभव-कर्मफळ वेगळे असते. ते स्वतः स्वतःनेच घ्यावयाचे असतात. शेत म्हटले कि पिकाबरोबर तण येणारच, घर म्हटले कि तूतू-मैंमैं होणारच, गुलाबाला पण काटे असतातच. अनुकूल व प्रतिकूल, सुख आणि दुःख, ऊन आणि सावली अशा परस्परविरोधी अनुभवांचा आकृतीबंध म्हणजे जीवन. बहिणाबाईंची कविता तू ऐकलीच असेल, 
‘‘अरे संसार-संसार । त्याला कधी रडू नये ।
गळयातल्या हाराला । लोढणे कधी म्हणू नये ॥’’
      या सगळया चर्चेनंतर निलिमाला मी म्हणालो - ‘एक डाव खेळून तर बघ’ निलिमाने आत्मचिंतन केले व ती लग्नाला तयार झाली. महिन्यातच तिच्याच कारखान्यातील तिला आवडणार्‍या अभियंत्याशी तिचे लग्न ठरले. लग्नपत्रिकेत प्रेषक म्हणून माझे नाव झळकत आहे

डॉ. दत्ता कोहिनकर
(माईंड पॉवर ट्रेनर)
९८२२६३२६३०. 
kohinkarpatil3@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...