एका आलिशान कार मधून राजनंदिनी उतरली. पावलं झापझाप टाकत बंगल्याचा जिना चढून आत गेली. "बाबा मला माझा वाढदिवस साजरा करायचा नाही. काही गरज नाही त्या पंचतारांकित हॉटेलची. त्यादिवशी मला घरीच एकटीला राहायचय". ताडताड बोलून तडक पायऱ्या चढून स्वतःच्या बेडरूममध्ये गेली. तिची बेडरूम म्हणजे टीव्ही मध्ये हिरोईनची रूम गुलाबी रंगात न्हालेली असते तशीच हुबेहुब. गुलाबी पडदे, गुलाबी गालिचा, गुलाबी बेड, मलमली कव्हर,मोरपिसाहूनही मऊ गादी अहा सगळा कसा राजकुमारीचा थाट. असणारच आणि गर्भश्रीमंत घर होत तिचं. राजघराण होत तिचं. वडिलोपार्जित इस्टेटही तेवढीच आणि तिचे वडील राज्यातील ख्यातनाम वकील. कशाचीही कमी नव्हती. सगळी सुख अगदी राजनंदिनीच्या पायाशी लोळायची. सगळ्या कामांना नोकर चाकर, कुठे यायला जायला महागड्या गाड्या, दारात सगळ्या सुखसोयी. पण राजनंदिनीला याचा किंचितही माज नव्हता की तसूभरही अप्रूप नव्हतं. तिला सर्वसामान्यांचं मनमोकळं जग जगायचं होतं. खेळायचं, बागडायच, मजामस्ती करायची होती पण ही श्रीमंती, राजमहाल तिचा सोन्याचा पिंजरा होता ज्यात तिचा जीव घुसमटायचा.
एवढ्या श्रीमंत घरात एक उणीव मात्र होती.. तिची आई. राजनंदिनी अवघी बारा वर्षांची असताना तिच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. तेव्हापासून राजनंदिनी एकटी पडली. कोणाशीही बोलणं नाही की, कोणासमोर व्यक्त होणं नाही. त्यात तिची श्रीमंती, प्रतिष्ठा तिच्या मोकळेपणाने श्वास घेण्याच्या आड येत होती. वडिलांचा धाक पहिल्यापासून. जे काही करायचं ते प्रतिष्ठेला सांभाळून अगदी मैत्रीही. सर्वसामान्यांशी बोलणं देखील अपमानास्पद वाटायचं तिच्या बाबांना. राजनंदिनी मात्र याउलट होती. तिला ही चकचकीत दुनिया खोटी वाटायची. कॉलेजमध्येही तिच्याच सारखे श्रीमंतीत न्हालेले पण पैश्याची धुंदी असलेले आणि गर्व असलेले सगळे होते त्यामुळे ती तिथेही एकटीच. जवळच अस फक्त तीच एकटेपणच तिच्या सोबत होत.
आज ती अठरा वर्षाची झालेली. वाढदिवस आई गेल्यापासून साजरा करण्यात काही रस नव्हता, पण बाबासाठी ती शोभेच्या बाहुली सारखी तयार व्हायची. आज तिने त्या गोष्टीलाही नकार दिला. जुन्या अल्बम मध्ये आईचे फोटो न्याहाळत आणि त्या आसवात तिच्या आठवणी उगाळत बसली. तेवढ्यात तिथे काम करणाऱ्या मावशी दोन लहान मुलींना घेऊन हजर होतात. "ताई थोडंस काम होतं तुमच्याकडे. या माझ्या दोन पोरींना डान्स शिकायचाय. तुम्हाला डान्स करताना मी खूपदा पाहिलं म्हणून तुमच्याकडे घेऊन आले. दिवाळी साठी आमच्या इथं डान्सची स्पर्धा ठेवले.. दहा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. आमच्या इथं राहणाऱ्या लहान मुलाला कॅन्सर झालाय त्याच्या उपचारासाठी पैसे पाहिजेत म्हणून या पोरी स्पर्धा जिंकून तेवढीच त्याला मदत करू म्हणतायत. तुम्ही शिकवाल ना ताई?"
राजनंदिनीची मनापासून तर इच्छा नसते, पण दोन निरागस मुली दुसऱ्या निष्पाप मुलाचा जीव वाचावा म्हणून कष्ट घेण्यास तयार असतील, तर या सत्कार्यात आपण त्यांना थोडी मदत करू या विचाराने तिने होकार कळवला. दुसऱ्या दिवशी त्या दोन मुली अजून चार जणींना घेऊन आल्या. राजनंदिनी भरतनाट्यम शिकत होती, बरीच वर्षे. आई गेल्यापासून नृत्यच तीचं सोबती होतं, प्रत्येक क्षणाला. राजनंदिनीचे वडील शक्यतो केसमुळे बाहेरगावीच जास्त असायचे त्यामुळे ती मुलींना मोकळेपणाने डान्स शिकवू शकत होती. त्या मुलींशी दिवसेंदिवस तिची छान गट्टी जमत होती. तिच्या जगातल्या खोट्या मुखवट्याच्या माणसांपेक्षा तिला ही खरी, निरागस माणसं जास्त भावायची. त्यांच्यासोबत दिलखुलास हसता यायचं तिला. गप्पा मारता यायच्या. कोणतीच श्रीमंत गरीबीची भिंत मध्ये यायची नाही. आता कॉलेजमधून लवकर येऊन मुलींची आवर्जून वाट बघत बसायची. उदास आयुष्यात नृत्य आणि त्या मुलींच्या रूपाने हास्याचे रंग पुन्हा पसरले होते. कधी मुली आल्याच नाहीत, तर तिला करमायचं नाही... वाटायचं त्यांच्या वस्तीत जाऊन भेटून यावं का... पण बाबांना कळलं, तर त्या मुलींचं घरी येणही बंद होईल आणि स्पर्धाही हरतील हे तिला नको होतं. काही दिवसांवरच आता नृत्य स्पर्धा येऊन ठेपली. तयारी जोरात चालू होती. बऱ्यापैकी डान्स बसवून झाला. 'ताल से ताल मिला' म्हणत ती मुलींच्या तालात छान मिसळून गेली.
डान्स चालू असतानाच एके दिवशी अचानक तिचे बाबा आले. राजनंदिनीला त्या मुलींसोबत नाचताना पाहून रागाने लालबुंद झाले. आधी त्या मुलींना चक्क घराबाहेर हाकलवलं, आणि कामवाली मावशीला ताकीद दिली की, परत त्या इथे दिसल्या नाही पाहिजेत. नाहीतर तुझी नोकरी जाईल. राजनंदिनी घाबरलीही होती, आणि आतून प्रचंड चिडलीही होती. पहिल्यांदाच खिडकीबाहेरच्या मोकळ्या हवेत श्वास घेत होती ती, आनंदी राहत होती, हसत होती पण त्यावरही विरजण पडलं. बाबांनी तिलाही बजावलं, हे डान्स वगैरे सगळं बंद करायचं आणि फक्त कॉलेजचं अटेंड करायचं. राजनंदिनी आता थांबणार नव्हतीच. तिच्या आईचीही अशीच घुसमट झालेली तिने पाहिलं होतं. बाबांना ठणकावून सांगितलं तिने, "आता या तुमच्या मताप्रमाणे तुमच्या या कथाकथीत माणुसकीचा गंधही नसलेल्या प्रतिष्ठे साठी माझी घुसमटत जगणं मला जमणार नाही. मलाही माझं मन, भावना आहेत आणि मला आनंदाने जगण्याचा हक्क आहे. त्या मुली एक कॅन्सरग्रस्त मुलाला मदत व्हावी म्हणून डान्स करतायत. काहीतरी चांगलं काम करतायत, त्यात मी त्यांना मदत करणारच. तुमची ही दिखाव्याच्या दुनियेची इभ्रत जपता जपता माझ्या आईचाही जीव कोंडला. तिला तिच्या मनासारखं जगू दिल असतं, तर कदाचित काही वर्षे अजून ती जगली असती. तीचं आयुष्य तर मी वाढवू शकले नाही, पण त्या छोट्या मुलाचा जीव वाचवण्यात मी नक्कीच जमेल ती मदत करणार. तुमची इज्जत, इभ्रत,प्रतिष्ठा सगळं जपत बसा. एक दिवस हीच प्रतिष्ठा तुम्हाला एकटं पाडेल आणि त्यावेळी सोबत मी ही नसेन."
एवढं बोलून राजनंदिनी त्या मुलींच्या वस्तीत जाते. पहिल्यांदाच अशा ठिकाणी तिने पाऊल ठेवलेलं. माणसं साधी पण खूप प्रेमळ वाटली तिला. पैशाने नाही, तर प्रेमाने आणि माणुसकीने श्रीमंत असलेली कुटुंब आज तिनं जवळून पाहिली. तितक्याच जवळून त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख पाहिलं पण या दुःखातही ते आलेला प्रत्येक दिवस हसून घालवतात हे तिला कळलं. आपल्या एवढा पैसा नाही त्यांच्याकडे पण समाधान आपल्याहून जास्त आहे याची प्रचिती आली. ज्या मुलासाठी त्या मुली जीवाच रान करत होत्या, त्या कॅन्सरग्रस्त मुलालाही भेटली. आजाराची भीती असण्याऐवजी डोळ्यात वेगळीच चमक, वेगळाच आशावाद तिला तिथे गवसला. तिथून आल्यापासून ती अंतर्बाह्य बदलली. आपल्याच दुःखाला कवटाळून राहण्यापेक्षा या मुलांसाठी काहीतरी करावं असं तिला वाटत होतं. बाबाचा विरोध पत्करून ती मुलींना त्यांच्या वस्तीतच जाऊन डान्स शिकवू लागली. बघता बघता स्पर्धेचा दिवस आला. डान्स तर उत्तम झाला मुलींचा, पण स्पर्धा सुद्धा अटीतटीची होती. निकाल काही क्षणांत लागणार होता. सगळ्यांची धाकधूक वाढलेली. पोटात गोळा आलेला. अखेर प्रथम विजेता म्हणून राजनंदिनी ग्रुपच नाव घोषित झालं आणि राजनंदिनी सहित सगळ्यांनाच खूप आनंद झाला.
आनंद होता, इतकी मेहनत घेतली त्याच फळ मिळालं त्याचा, आनंद होता एक छोटा जीव वाचवण्यासाठी दहा हजार रुपये कमवले त्याचा. आनंद होता राजनंदिनीचा...तिने बाबा, त्यांची ती श्रीमंतीची प्रतिष्ठा, सोन्याचा पिंजरा तोडून मुक्त आभाळी भरारी घेतली याचा. सगळेच खूप आनंदात होते. दहा हजार तर जमा झालेले. अजूनही जमा होतील, हा आत्मविश्वास सगळ्यांचा दृढ झाला. राजनंदिनीही खुश होती पण... पण डान्स संपला म्हणजे आता तीचं हे विश्वही संपणार होतं. परत त्याच पिंजऱ्यात तिला अडकायच होतं म्हणून तिच्या चेहऱ्यावर आंनद फार काही काळ टिकला नाही.
घरी आली, तर बाबा तिची वाट बघत बसलेले. एक पुष्पगुच्छ देऊन त्यांनी तीच अभिनंदन केलं. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. आई गेल्यानंतर पहिल्यांदाच त्या मुलींसोबत राजनंदिनीला खुश पाहिलेलं त्यांनी. कुठेतरी हरवलेली राजनंदिनी त्यांना पुन्हा भेटली. त्यादिवशीच्या राजनंदिनीच्या बोलण्यावर त्यांनी खूप विचार केलेला आणि आता राजनंदिनीला या पिंजऱ्यात डांबून न ठेवता तिला मुक्त उडू द्यायचं, असं त्यांनी ठरवलेलं. स्पर्शातूनच भावना कळतात म्हणतात तसं बाबांनी तिला मायेने मिठीत घेतलं, आणि तिला सगळं काही उमगलं. आई गेल्यानंतर बाबांनी तिला पहिल्यांदाच एवढ्या प्रेमाने जवळ घेतलं. डोळ्यात अश्रू आले नसते तरच नवल. राजनंदिनीने बाबांशी बोलून कॅन्सरग्रस्त मुलाच्या उपचारासाठी लागेल ती मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळची दिवाळी राजनंदिनी साठी खूप खास होती. कारण ही दिवाळी ती त्या सगळ्या गरीब वस्तीतील मुलांसोबत साजरी करणार होती. सगळ्यांना, कपडे, फराळ, गोष्टींची पुस्तके, शालेय साहित्य घेऊन ती वस्तीत गेली आणि सर्वांसोबत इको फ्रेंडली दिवाळी खूपच आनंदाने साजरी केली. त्या लहान मुलालाही त्याच्या उपचारासाठी तिने सगळी मदत केली. आता ती रोज तिच्या राजमहालात सर्व मुलांना मोफत भरतनाट्यम शिकवते. कधीतरी शाळेतले विषयही शिकवते.
असा या राजकुमारीने सोन्याचा पिंजरा तोडला, आणि घेतली उंच भरारी कधीही न थांबण्यासाठी. आता प्रत्येक दिवाळी तिची त्या मुलांसोबत सोनियाची दिवाळी असते.
© सरिता सावंत भोसले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा