आज त्याच्या आईच तेराव होत...आई गेल्यावर तिसऱ्याच दिवशी माणिक ने आईचा एक छानसा फोटो फ्रेम करून आणला...
खाली सुवाच्य अक्षरात सौ. मैनाबाई हरीभाऊ शिरसागर...
मृत्यू दिनांक....15-04-1985...
फोटोला रोज सुवासिक फुलांचा हार... सुगंधित अगरबत्ती... धूप... नैवेद्यासाठी जेवणाच्या ताटात गरम गरम जेवण...समोर आईच्या फोटोची फ्रेम... एकुलता एक मुलगा...म्हणून मोलमजुरी करणारे हरीभाऊ एकच स्वप्न पाहत होते...एक वेळ उपाशी राहू...पण पोराला उच्च शिक्षण द्यायचे... माणिक पण हुशार होता... वर्गात दुसरा, तिसरा नंबर कायम असायचा...दहावीत पण चांगले मार्क पडले...कुणी म्हणाले अकरावी , बारावी करा...कुणी म्हणाले डिप्लोमाला घाला... लवकर नोकरी लागून पोरगा हाताशी येणार..
शेवटी हरीभाऊ पोरालाच म्हणाले...
बाबू माणिक ..! हे पाय आमची आयपत नाही... म्हणून शिक्षणाची तडजोड करू नको...! तूही माय...अन् मी कोंड्याचा मांडा करू...! पण बाबू तुले शिकवण्यात कमी पडणार नाही...! येळ पडली त हा बाप सोता गहाण राहीन..! तूही माय लुगड्याले दांड करून घालत जाईन..! तू माह्या बनेणी चे(बनियन) भोकं पाहू नको...! का तुटकी चप्पल पाहू नको...? बाहेरगावी जाच असन शिकाले त थेबी करू...पर तू शिक बाबू...
मायबाप कष्ट करून, जवा पोरग मोठा साहेब होते न... तवा त्या मायबापा ले साऱ्या कष्टाचा ईसर पडते बग...
सगळी चौकशी करून माणिकने ...डिप्लोमा करायला शहरात जाण्याचे ठरवले...
मुख्य म्हणजे गावातल पहिलं पोरग... इंजिनिअर होण्यासाठी बाहेरगावी जाणार होत...आई वडील खूप खुश होते..
कॉलेज ची एडमिशन आणि हॉस्टेल वर राहायला बराच पैसा लागणार होता...शिवाय वह्या पुस्तक...
दोन महिन्यात इतका पैसा कुठून आणायचा हा प्रश्न दोघानाही सतावत होता...माणिक म्हणाला...बाबा दोन महिने वेळ आहे...मी पण कुठे छोटे मोठे काम करतो...तेव्हढाच हातभार...
नाही रे बाबू तु आराम कर...पर बाबू जीव तोडून अभ्यास कर...माह्या अन तुह्या मायचा एक एक घामाचा थेंब आमी मुद्दल म्हणून तुया पाशी गहान टाकतो...
तू साहेब झाला...का आमच मुद्दल व्याजा सगट परत कर... अह, पैसा नको रे...! फक्त पिरमाचे दोन सबुत...! (शब्द)...! पोटाले पोटभर भाकर...! अन् तूय सुख...! आता अर्धपोटी राहून तुले शिकवतो बाबू..!
दोन महिने संपले...माणिक शहरात शिकायला गेला...आपला पोरगा मोठा साहेब होणार...हे सुखच आईवडिलांना अती कष्ट करायला बळ देत होते...माणिक पण चांगल्या मार्कने पास होत होता....
शेवटचे वर्ष होते...माणिकचे पत्र आले...बाबा मला थोडा गणित विषय कठीण जातो...सगळे पोर क्लास लावणार आहे... मी सुद्धा लावायचा विचार करतो...हे शेवटचे वर्ष आहे...चांगले मार्क मिळाले, तर नोकरी पण चांगली लागेल...आई, बाबा त्यासाठी तुम्ही काळजी करू नका...आमच्या शेजारी तीनचार लहान पोर आहेत...त्यांची आई त्यांचे क्लास घे म्हणून मागे लागल्या...त्यातून मी फी भरतो...
लगोलग हरीभाऊ ने पत्र पाठवले...तू क्लास गिस काई घिऊ नोको बाबू...! शेवटाच वरीस हाय..! तवा मन लावून अभ्यास कर..! चांगल्या मारकान पास होय..! वावर हाये आपलं दोन एकर...! गाहान टाकतो...! तूले नवकरी लागली का सोडवून आणु...! तू अजिबात कायजी करू नको..!
हरीभाऊ ने शेती गहाण ठेवली...माणिक चांगले मार्क मिळवून पास झाला...
कॅम्पस मधून नोकरी लागली...हरीभाऊ म्हणत होते...बाबू आता आपली शेती सोडवून आणू...लय व्याज बसते रे...!
माणिक म्हणाला ...बाबा मला आता डिग्री घ्यायची आहे...म्हणजे काय रे बाबू...बाबा ...अजून पुढे शिकायचे आहे...नोकरी करूनच शिकणार...पण पुढच्या शिक्षणाची फी फार आहे...आपण शेती नंतर सोडवू...एकदा डिग्री झाली की बघा कसा पगार मिळतो ते, एका पगारात शेती सोडवून आणतो...तुम्ही काळजी करू नका...
आणि हो , तुम्हाला महिन्याला पैसे पाठवत जाईन...आता फार कष्ट करू नका...माणिक नोकरीच्या गावी गेला...सुरवातीला थोडेफार पैसे पाठवत होता...नंतर खूप खर्च आहे...उरतच नाही म्हणत होता...दोघे कसेबसे दिवस काढत होते...
बघता बघता माणिक ची डिग्री झाली...हरीभाऊ पुन्हा म्हणाले...बाबू आता तरी आपली शेती सोडवून घेऊ...
पुन्हा माणिक म्हणाला...बाबा त्या शेती पेक्षा व्याजच जास्त झाले...सोडून द्या शेतीचा विचार...तसेही आता इथे राहून तुम्ही काय करणार...? लवकरच लग्न करतो... मुलगी मी पाहून ठेवली...माझ्याच कंपनीत आहे... मग पुण्यालाच रहायला या...!
हरीभाऊ डोळ्यात पाणी आणून म्हणाले...माणिक तू काही कर, पर तेवढी शेती सोडवून आण...आमचा जीव हाय त्यात...माय विना पोरग...तसे आमचे होईन शेती बगर...थे काई नाई बाबू... पयले शेती सोडव...तू मले माह्य वावर परत दे...हात जोडतो तुह्या पुढ...
माणिक वडिलांना म्हणाला...आई, बाबा तुमच्या कडून आता शेतीचे काम होत नाही...त्या पेक्षा आपण ते गहान शेत सावकाराला विकून टाकू...तसेही एकदा तिकडे राहायला आल्यावर सारखे येणे होणार नाही...कधीतरी येणार, विसावा म्हणून घर मात्र राहू द्या...
शेवटी हरीभाऊ शेती विकायला तयार झाले...चांगले आठ लाख मिळाले...रस्त्यालगतची काळी शार जमीन होती...बाजूनेच कॅनल होता...त्याचे बारमाही पाणी मिळत होते...
लगेच मुलाचे लग्न केले...केले नाही झाले म्हणावे लागेल...कारण लग्न पुण्याला झाले...माणिक ने गावी पूजा ठेवायला स्पष्ट नकार दिला...लग्नाला सुद्धा ते दोघेच होते...बाकी सगळा माणिक चां गोतावला...
हरीभाऊ लग्नाला आले...तसे तिकडेच राहिले... एक बेडरूम, हॉल आणि किचन चे घर घेतले...दोघे बिचारे ब्लॉक मध्ये, ते सुद्धा हॉल मध्येच अडकून राहिले... हरीभाऊ म्हणाले...बाबू निदान घर तरी मोठं घे रे...दिवसभर त्या सोफ्यावर...आंग टाकाले जमत नाही...तुह्या खोलीत जाव तर सूनबाई आणि तुले बी आवडत नाही...
लगेच माणिक म्हणाला...मोठ्या घराचे भाडे जास्त पडते ... कसे बसे हरीभाऊनी सहा महिने काढले....
बायकोला म्हणाले...माणिक ची माय... तूले इथं गमते का..?
मले त वाटते...मी अजुक पंधराएक दिवस रायलो तर पागल होईन...
चाल आपून आपल्या गावाले जाऊ...अजून थकला नाही हा हरीभाऊ...पुन्हा नव्यानं कष्ट करू...लागतेच काय आपल्याले..? इथं चोरा वाणी राहा लागते...ना लेक धड बोलत, ना सून...
आपुन आपली शेती विकून मोठी चूक केली...आज रातच्याला माणिक आला की त्याले आपले आठ लाख मागू...बँकेत ठेऊ...थोडे कष्ट करू...भागेल आपल...
रात्री माणिक आल्या आल्या हरीभाऊ म्हणाले...माणिक थे आठ लाख काय केले..? आम्ही गावाले जातो...पैसे बँकेत टाकून त्याचे व्याज...आणि थोडे काम करू...भागेल आमच...
माणिक चे बोलने एकूण हरीभाऊ जागेवरच उडाले...
म्हणाला बाबा लग्नावर खर्च झाले...आणि थोडे उरले होते...मग आम्ही दोघांनी ठरवले किती दिवस असे भाड्याच्या घरात राहणार...म्हणून स्वतःचे घर बुक केले...
हरीभाऊ समजून गेले...आपल्याला आपल्याच पोरान फसविल...दोनच दिवसात गावचा रस्ता पकडला...
घरी तर आले, पण बायकोने पुरती हाय खाल्ली... जिवाचं रान करून मोठं केलेलं पोरग असे कसे वागू शकते...सारखा सारखा एकच प्रश्न सतावत होता...आणि तिने अंथरूण धरले...गावातले डॉक्टर केले उपयोग नाही...शेवटी डॉक्टर म्हणाले...शहरात घेऊन जा...भरती करावे लागेल...लगेच माणिकचा मित्र सदा याने माणिक ला फोन लावला...गाडी करून...येत आहे...चांगला दवाखाना शोधून ठेव...आणि पत्ता पाठव...तिथेच काकूंना घेऊन येतो...
त्याने सरकारी दवाखान्याचा पत्ता दिला...ऐडमीट केले...आठ दहा दिवसात घरी सोडले...आता मात्र भाड्याचे मोठे घर घेतले...कारण आजारी आई, आज हॉल मध्ये पण नको होती...एक सतंत्र खोली त्यांच्या साठी केली...जेवनखावण, राहण सगळ तिथेच...हरीभाऊ यांना हे मुळीच रुचत नव्हते...पण बायकोसाठी सहन करत होते...
असेच चार वर्ष गेले...माणिक ची आई पूर्ण बरी होत नव्हती...सारखे काही ना काही चालू...त्यात नातू झाला...पण त्याला हातात घेऊन खेळवायची सोय नव्हती...
हा धक्का त्या माऊलीला सहण झाला नाही...तिने पुन्हा अंथरूण धरले...
आता तर दवाखाना सुद्धा दुरापास्त झाला होता...एक दिवस त्या माऊली ने माणिक..! माणिक..! करत आपला प्राण सोडला...धाय मोकलून रडले हरीभाऊ...
खूप जोरात तयारी केली माणिक ने आपल्या आईच्या अंत यात्रेची...सर्व आप्त, मित्र, ऑफिस चे लोक आले...असेच दाखवत होता...पोराचं आईवर फार प्रेम होत...
हरीभाऊ हे सगळ पाहून खूप अस्वस्थ होत होते...एकच म्हणायचे...आता तुया शिवाय कस जगू...मले बी बोलयुन घे... सांग त्या वरच्याले...
आज चौदावे होते...माणिक ने खास श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता...प्रत्येक जण येऊन श्रद्धांजली वाहत होते...शेवटी माणिक श्रद्धांजली आणि आईची महती यावर बरेच बोलणे झाले...हरीभाऊ मात्र अश्रू ढाळत होते...सगळा कार्यक्रम पार पडला...
आता हरीभाऊ उभे राहिले...म्हणाले...सज्जन हो...माह्या पोरान मायच इतकं कौतिक केलं...भरून पावलो...दोन शबुद मले बी बोलाचे हाय...
माणिक चे एक एक रूप...उपस्थित लोकांना सांगू लागले...हातात ती फ्रेम होतीच...
म्हणाले... ही जी आई ची फ्रेम माणिक ने तयार करून घेतली...ज्या आईचे गोडवे त्याने तुमच्या समोर गाईले...त्या आईच्या खोलीत जरा नजर टाकून या...चला मीच दाखवतो...
बघा एकाच घरात आम्ही दोघे कसे नरक यातना भोगत होतो...
आई , बाबांची खोली पाहून सगळे आश्चर्याने माणिक कडे पाहू लागले...शेवटी बॉस बोलला...माणिक तू तर सारखा आईचे आजारपण सांगून सुट्ट्या घेत होता...
हरीभाऊ म्हणाले...हो बरोबर घेत होता...पण बायकोला फिरायला न्यायला... त्याला विचारा शेवटचे आई म्हणून कधी हाक मारली...तीन तीन दिवसांचे शिळे अन्न खाल्ले आम्ही...
सुटली ती माऊली...एकदाची..! ह्या मरण यातना भोगत असताना वाट्ले...त्यापेक्षा आपण निपुत्रिक असतो तर...निदान पोटापुरत नक्कीच असत आपल्या पाशी...
त्यांनी पुन्हा टेबलावर हातातली फ्रेम ठेवली...फ्रेम जवळ डोके ठेऊन...माणिकची माय येतोय तुमच्या जवळ...असे म्हणत शेवटचा श्वास घेतला...
आज माणिक आणि त्याच्या बायकोचा सभ्यतेचा पडदा...गळून पडला...
©️ सौ प्रभा कृष्णा निपाणे कल्याण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा