गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1524. कोवळीक

      ती दहावीच्या सुट्टीत आजोळी सोलापूरला आली होती. पुण्याला हुजूरपागा प्रशालेत शिकत होती. पहिल्याच भेटीत आमचे सूर जुळले. कारण अर्थातच वाचनाची समान आवड. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करताना खूप मजा यायची.वाचताना निसटलेली काही सौंदर्यस्थळे पुन्हा गवसायची. रिडींग बिटवीन द लाइन्स म्हणजे नक्की काय असतं हे हळूहळू उमजायला लागलं होतं. आमची मैत्री एखाद्या खळाळत्या निर्झरासारखी आयुष्याच्या चढउतारांवरुन उड्या घेत वाहात होती. आम्ही खूपच क्लोज आलो होतो. इतके की एक दिवस मला तिने तिचे गोड गुपित सांगितले. ती म्हणाली, " मी पुण्यात एका मुलाच्या प्रेमात पडले आहे." मी अक्षरशः थरारलो. माझी कोवळी मैत्रिण चक्क प्रेमात पडली होती. वाऱ्याने कपाळावर येणारे केस मागे सारत माझी नजर चुकवत लाजत होती. मला फार भारी वाटलं. हे मला मला सांगण्याइतकं तिने मला जवळचं मानलं होतं. मी मनापासून तिचं अभिनंदन केलं. काही दिवसांतच ती पुण्याला परत गेली. इकडे पावसाळी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची लगबग सुरु झाली. काॅलेजेस विद्यार्थ्यांनी फुलून गेली. अशातच एका पावसाळी दिवशी मला ती दिसली. माझ्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. मी धावतच तिला गाठून विचारलं, " तू इथे कशी ?"
वरचं आभाळ आणि तिचे डोळे एकदमच भरुन आले. दाटलेल्या गळ्याने ती बोलली, " तो मला खोटं बोलून फसवत होता. पण माझ्या मैत्रिणीने मला थेट त्याच्या घरातच नेऊन उभं केलं तेव्हा त्याचा खोटेपणा उघडकीस आला. मी त्याची गरीबी स्वीकारली असती पण त्याचा खोटेपणा मी कदापि स्वीकारणार नाही. असत्याच्या पायावर प्रेमाचा ताजमहाल कधीच उभा राहात नसतो. आता मला त्याचे तोंडदेखील बघायचे नाही. म्हणून मी पुणं सोडून इथं ॲडमिशन घेतली आहे."
     अचानक परिस्थितीला मिळालेल्या कलाटणीने मी स्तंभित झालो. काळ पुढे सरकत गेला तशी ती नव्या वातावरणात स्थिरावत गेली. तिचं भावविश्व तिने नव्याने उभं केलं. मी त्याचा अविभाज्य घटक होतो. आमची मैत्री आता अगदी दृष्ट लागण्यासारखी घट्ट झाली होती. तसं बघायला गेलं तर आमची मैत्री याच पातळीवर आयुष्यभर टिकायला हरकत नव्हती. पण हळूहळू तिच्यात घडून येत असलेले सूक्ष्म पण निर्णायक बदल मला जाणवायला लागले होते. तिच्याही नकळत ती माझा अवकाश व्यापण्याचा प्रयत्न करु लागली होती. मी इतर एखाद्या गोष्टीत तल्लीन झालो असेन आणि त्याच वेळी ती आली तर तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर आजकाल ते तिला सहन होत नसे. तिच्या भावनांची अशी भरती- ओहोटी सुरु असतानाच तो उधाणाचा दिवस उजाडला. त्या दिवशी गप्पा तुफान रंगल्या होत्या. ती अत्यंत आक्रमकपणे मुद्दे मांडत होती. त्यावेळचा तिचा अभिनिवेश बघण्यासारखा होता. बघता बघता चर्चा "कच्ची धूप" या तेव्हाच्या लोकप्रिय आणि दर्जेदार दूरदर्शन मालिकेवर येऊन ठेपली. आशुतोष गोवारीकर आणि भाग्यश्री पटवर्धन यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत. ती विचार करत म्हणाली, " कच्ची धूप म्हणजे कोवळं ऊन. कोवळं हा शब्द  प्रत्येक ठिकाणी आढळत असतो. इतकं महत्व का आहे या कोवळीकीला? " 
मी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि एकदम थांबलो. ती प्रश्न विचारुन हरवून गेली होती. ती माझ्याकडे बघत होती आणि नव्हती ही. तिचे विशाल नेत्र जणू तिच्या भावनांचा कॅलिडोस्कोप बनले होते. तिच्या मनात कसलं तुफान घोंगावत आहे ते तिच्या डोळ्यांत झरझर उमटणाऱ्या भावनांमधून दृग्गोचर होत होतं. काही क्षणांतच तिने स्वतःला सावरत माझ्याकडे रोखून बघत म्हटलं, " मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. "
मी म्हणालो, " बोल ना. "
ती म्हणाली, " इथं नको. तू किनारा हाॅटेलला ये "
ठरल्याप्रमाणे मी गेलो. ती आधीच येऊन थांबली होती. दूरवरचे एक निवांत टेबल बघून आम्ही बसलो. मी तिच्याकडे पाहिले. ती खाली बघून बोटातील अंगठीशी चाळा करत होती. तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. काही वेळाने तिने नजर वर करत थेट मुद्द्याला हात घातला, " आपले नाते नक्की काय आहे ? " 
मी म्हणालो, "आपण खूप क्लोज मित्र आहोत. "
ती मान हलवत बोलली, "मला तू कायमचा हवा आहेस. "
मी शांतपणे म्हणालो, "आपल्या नात्यातील कोवळीक जपली पाहिजे. "
ती क्षुब्ध होत बोलली, "या कोवळीकीचा एकदा सोक्षमोक्ष लावू यात. तू मला एक्झॅक्टली सांग की कोवळीक म्हणजे काय? "
मी उत्तरलो, " कोवळीक म्हणजे एक असं अंतर जे आयुष्यभर जपायचं असतं. ते पार करतो आहोत असा आभास निर्माण करायचा पण प्रत्यक्षात ते कधीच न ओलांडतासुद्धा प्रचंड जवळीक साधायची. आपली मैत्री हा कोवळीकीचा परमोच्च आविष्कार आहे. तो प्राणपणाने जपायचा आहे. "
तिने गोंधळून जात विचारले, "अंतर आणि जवळीक एकाच वेळी कसं शक्य आहे ?" 
मी बाजूलाच गुंजारव करणाऱ्या भ्रमराकडे नजर टाकली. मग तिच्या खांद्यावरुन पलीकडे बघत बोलू लागलो, 
"निसर्गाने ही कोवळीक युगानुयुगे जपलेली आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असते. ती काहीवेळा त्याच्या खूप जवळ येते. पण अंतराचे भान राखत पुन्हा दूर जाते. सूर्य आणि पृथ्वी यांनी जपलेल्या या कोवळीकीने  अनेक नव्या कोवळीकींना जन्म दिला आहे जसे की कोवळं गवत, कोवळं ऊन, कोवळं कणीस. स्त्री- पुरुषांच्या मैत्रीची सीमारेषा खूप धूसर असते. ती न ओलांडता मैत्री कायम ठेवणे म्हणजेच कोवळीक जपणे होय. अशी कोवळीक जपता आली तर संपूर्ण आयुष्याचंच पहाटेचं दव होऊन जातं बघ."
मी माझं बोलणं थांबवलं. मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती सावकाश उठली आणि टेबलला वळसा घालत माझ्याशेजारी येत वाकून हळुवारपणे कानात पुटपुटली, "कोवळीक म्हणजे काय हे आता मला परफ़ेक्ट कळले आहे" व तिच्या अधरांचे मोरपिस हलकेच फिरवून ती झटक्यात बाजूला  होत झपाट्याने निघून गेली. 
मी वर पाहिले. शुक्राची चांदणी पूर्णचंद्रावर झुकली होती. निमिषार्धातच जवळीक साधून ती त्याच्यापासून दूर होणार होती. युगानुयुगे जपलेली कोवळीक पुन्हा एकदा अनुभवणार होती. 

लेखक  -  जितेंद्र अभ्यंकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...