मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

1543. वृध्दाश्रमातली राजा आणिक राणी

    ऐंशी वर्षाचे आजोबा सत्तरीतली आज्जी, वृध्दाश्रमातल्या खेळातील राजा आणिक राणी, उतरत्या वयात त्यांच्या फुलत होती प्रेमकहाणी ! 
आजोबा वदले बघत एकटक आज्जीचा तो चेहरा, 
दिसतेस आजुनही तशीच तु यौवनातील अप्सरा !
कवळीतील दंतपंक्तीच्या स्मिताहास्यातून आज्जीही बोलली,
अजुनही आपण यौवनातील राजकुमार भासता,
परि डोक्याचे टक्कल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यामुळे थोडेशे मार खाता. दोघांचे गुलुगुलू संभाषण चालू होते.
आज्जी पोथी पठणात व्यस्त.
आजोबा मित्रांच्या चमुत मस्त.
दिनक्रम मजेत चाललेला.
    असाच एकदा वृध्दाचा मेळा सायंकाळी  वृध्दाश्रमात होता जमलेला. त्या रम्य सायंकाळी सगळ्यांच्या  गप्पांना ऊत होता आलेला. विषय होता चांगलाच रंगलेला.
"तुझी माझी प्रेम कहाणी" 
आज्जीने केली बोलायला सुरुवात आजोबांना,
"कोण होतास तु काय झालास तु, 
अरे वेड्या कबुल कर आता तरी 
म्हातारा झालास तु !"
    आजोबांना हे चांगलेच झोंबले आजोबा जोमात उत्तरले,
"कोण होतीस तु काय झालीस तु? 
शिडशिडीत चवळीची शेंग आता,
नव्वदअंशी काटकोनात वाकलीस तु!"
    आज्जीला पण मनाला लागले. तिने मग रागातच शब्दांचे फवारे सोडले.
'केसांचा होता तुझ्या पिसारा,
सिनेमातल्या मजनू गत असे तुझा तोरा.
हिरोला शोभेल अशी होती तुझी वेशभूषा, 
कोणीतरी जाळ्यात गावेल हिच तुझी नेहमीच वेडी आशा.
अरे पण सतत तुझ्या पदरी पडायची निराशा.
  आजोबांना पण मग चेव चढला, 
"कॉलेजात होतीस शेलाटी तु परी, 
अगदी परीकथे प्रमाणे तु दिमाखात मिरवायचीस, 
कॉलेजच्या स्नेहसंमेलनात नेहमीच नायिकेची भुमिका तुच वठवायचीस. 
पण मग नायकासाठी मलाच का बरे शोधायचीस?
   आता मात्र आज्जी शब्दात गेली पकडली. पण तेवढ्याच चपखलपणे तिही उद्गारली,
"अरे असे काही नव्हते सिनेमाचे ज्ञान तुला अवगत होते, 
हावभावाची जान होती.
नाट्यकलेची होती तुला आवड आणि 
अभ्यासातुन कायमच तुला असायची सवड. 
म्हणूनच कॉलेज तुला या नायकाच्या भुमिकेत साठी निवडत. 
माझं नव्हतं बरका कुठे तुझ्यावाचून अडत !

हो का ! तर मग ऐक अभ्यासात  का बरे तु मला मदत करत होतीस?
कॉलेजमध्ये तु तर अव्वल होतीस ! मग माझ्यात काय शोधत होतीस?
माझ्या मागे तर तुच लागली होतीस !.. 

काय रे दुसरं तुझ्यात शोधणार? 
तुझे डॅशिंग रूपडं मला भावायचे, 
माझा आयुष्याचा जोडीदार मग मी तुझ्यात पाह्यचे !.
पण मला चांगलेच ठाऊक होते. 
या टग्याला जावई म्हणून बाबा नाहीत स्विकारणार?
तरीही तुला सुधारण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. 
कारण मनातुन तुझ्यावर मी प्रेम करत होते.

शेवटी माझ्या कष्टाला फळ मिळाले. 
आपलं प्रेम जिंकले. 
बाबांची परवानगी मिळाली आणि 
तुझी माझी प्रेमकहाणी सुफल संपूर्ण झाली. 

   आजोबा आता मात्र हळवे झाले. त्यांना खरच आता सगळे आठवले. आज ही आज्जी मिळाली म्हणून आपले जिवन सुधारले. कोठे होतो आपण काय झालो म्हणून त्यांचे आठवणीने डोळे थोडे पाणावले. आज्जीच्या चष्म्यातून हे सुटणार कसे? आज्जीलाही सगळे आठवले. मग ती म्हणाली, सोडा हो मागचे सगळे. जे काही झाले ते चांगलेच. एकमेंकाच्या साथीने तर  हे आहे  सगळे आपण मिळवले. खुप सारे आपण एकमेंकाच्या साथीने सोसले. खुप काही कष्टाने आणि मेहनतीने मिळवले.आता आयुष्याच्या तिन्हीसांजेला आता मात्र शरीरे आपली थकली. खुप काही अनुभववाने मनं मात्र तरुण झाली. परत जोमाने सुरूवात करूया. संसाराचा गाडा चालवताना हरवलेले प्रेम आता परत शोधूया. आता परत एकदा एकमेंकाच्या प्रेमात पडूया, परत हरवलेले ते क्षण परत शोधूया परत एकमेकाच्या प्रेमात पडूया. 
  आजोबा विचार करू लागले. आजवर संसारात खुप उन्हाळे, पावसाळे बघितले. सगळे कर्तव्य हिमतीने पार पाडले. हौसमौजेची गोधडी केली आणि फक्त कर्तव्याची त्याला आवरण घातली. त्या उबदार छायेत मुलेबाळे झोपली. पण आपली मात्र शांत झोप राहून गेली. खरच ती उबदार गोधडी कधी आपल्या वाट्याला आलीच नाही. पण आता तिही  गोधडी जिर्ण झाली. तीला उपभोगून मुले देखील आता दुर गेली. कारण आता त्यांना श्रीमंती अलंकार ल्यायलेला रजईच्या ऊबेची चटक लागली. मुलं आता त्या रजईत ऊब शोधू लागली. मग गोधडी निकामी झाली. घरात तिची अडगळ वाटू लागली. मग स्पेस हे गोंडस नांव देऊन आईबाबांची रवानगी वृध्दाश्रमात केली. उर्वरीत आयुष्य आता आपल्या मर्जीने जगा अशी साखरपेरणी देखील झाली. वर आयुष्य सुखासमाधानाचे आनंदाचे जावो हीच सदिच्छा व्यक्त केली. भरभर सगळा चलचित्रपट आजोबांच्या डोळ्यासमोरून सरकला. काय कमावले काय गमावलं याचा ताळेबंद त्यांनी मनाशी बांधला. एका अर्थाने बरेच झाले.आता तरी मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आजोबा मनोमन खुश झाले.आजोंबाना पण आज्जीचे ते बोलणे  आता मनोमन पटले. आजोबा,आज्जीची जुगलबंदी छान रंगलेली, आजोबा आज्जी बरोबर सगळेच मग हळवी झाली. थोड्या फार फरकाने प्रत्येकाची कहाणी यापेक्षा नव्हती वेगळी. सगळ्यांची मने या जुगलबंदीमुळे गलबलून आली. सगळ्या आज्जीने आपापल्या पदराने तर सगळ्या आजोंबाने आपापल्या शर्टाच्या बाहीने चष्म्यातून  ओळखणारी आसवे गालावर थोपवली. खरच शेवटी तरूण वयाला वळणं देण सोपं असतं. उतारवयात ते कदापिही जमत नाही. कळत होते पण वळत नव्हते.हे प्रत्येकालाच मनोमन पटले.   
    वृध्दाश्रमातल्या घड्याळात सातचे ठोके पडले. आणि घनघन आश्रमातील जेवणाची घंटा झाली. प्रत्येकांने आपल्या आठवणी मनाच्या कप्प्यात खोचल्या. सगळे आपापल्या काठ्या, चष्मा सांभाळत जेवणाच्या हॉलकडे निघाले. रजईत विसावलेल्या पाखरांच्या आठवणीने प्रत्येकाचे मन मात्रं हेलावून गेली. प्रत्येकजण उगाच गळ्यात अडकवलेल्या मोबाईल कडे नजर टाकत होते. कोठे आपल्याकडून मोबाईल वर मिस् कॉल झाला का? रेंजचा प्रॉब्लेम तर नसेल ना? मोबाईलची रेंज बरोबर आहे का? आता तरी वाजेल का? एकटक मोबाईलच्या स्क्रीन कडे आशेने बघत ?
    एक वेडी आशा, 
शेवटी मन पाखरु पाखरु 
उभ्या पिकातलं ढोर, 
किती हाकला, 
हाकला फिरून येतं पिकावरं, 
फिरून येत पिकावरं !

   वाचकहो ! बहुतांश वृध्द आज वृध्दाश्रमात आपले उर्वरित आयुष्य कंठत आहेत. काही इच्छेने तर काही अनिच्छेने. 'स्पेस' या सुंदर नावाखाली तरूण पिढी ऐषाआरामात लोळत आहेत. पण नक्की 'स्पेस' याचा अर्थ काय हो? आईवडीलांची जबाबदारी नाकारणे?  कि त्यांचे ओझं वाटणे?  शेवटी भावणिक गुंतागुंत? बेजबाबदार जिवनशैली ! स्पेस या नावाखाली मिरवून सहजतेने जबाबदारीतून अंग काढून घेणे. पैसा फेकला कि, सगळे मिळते का? अनुत्तरित???

©️ ®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...