शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

1536. सखी हो, सुखी होशील

    काय गं मनु कुठे हरवलीस? कधी पासून हाक मारतेय. लक्ष कुठेय तुझ. .आजी गॅलरीतल्या बंगईवर बसून विचारात हरवलेल्या मनुला हाक मारत  गॅलरीत येत म्हणाली. तशी  मनु भानावर आली.
अं काही नाही गं आजी. अशीच जरा तंद्री लागली होती. बोल ना काय म्हणत होतीस. मनुने भानावर येत आजीला विचारलं.
हेच कसल्या तंद्रीत हरवली आहेस हे विचारायचं होतं. लग्न जवळ आलंय तु तर खुश असायला हवं मग अशी उदास का आहेस..मगाशी तो  तुझा आवडता चित्रपट लागला होता टिव्ही वर तरी तुझं लक्ष नव्हतं. काही भांडण वगैरे झालं का अविनाश सोबत ?? आजी  तिथुन काहीच अंतरावर असलेल्या आराम खुर्चीत बसत काळजीने विचारु लागली. नाही गं.. तसं काही नाही. मला वेगळंच टेन्शन येतंय गं आजी. मनू‌ तिथुन उठुन आत आजीच्या आरामखुर्ची शेजारी  मांडी घालून बसत म्हणाली.
अग़ं मग सांग ना..आम्ही कशासाठी आहोत वेडाबाई.. आजी तिच्या कडे पाहत हसत म्हणाली.
आजी मला खुप काळजी वाटतेय. लग्न जसं जसं जवळ येतंय तसं दडपण जाणवतंय गं. म्हणजे आता सगळं बदलणार ..घर ,आडनाव ..नवीन माणसं .. नवीन जग ..तिथे मला नीट मनापासून स्विकारल्या जाईल ना. ही  नवीन नाती मला नीट निभावता येतील ना ? मनु व्यथित होवुन आजीकडे बघत म्हणाली . 
साहजिकच आहे गं..प्रत्येक मुलगी या अवस्थेतुन जाते .. मी सुद्धा या अवस्थेतुन गेलीये.. पण अगं आमच्या वेळीपेक्षा तुमचं जगणं उलट सुखकर आणि सुलभ झालंय ‌..संवादाची कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत की तुम्हाला ..बोला , जाणुन घ्या एकमेकांना.. हेच महत्त्वाचे दिवस असतात गं..एकमेकांना जाणुन घेतल्याशिवाय मैत्र कसं निर्माण होईल..  तु एक चांगली बायको नंतर आधी सखी असायला हवीस अविनाशची .. आणि मला वाटतंय त्या दिशेने तुझी योग्य वाटचाल सुरू आहे काय बरोबर ना ..आजी  म्हणाली..
माहित नाही गं कितपत जमतंय.. पण मी पुर्ण प्रयत्न करतेय आजी त्याला समजून घेण्याचा ..त्याची चांगली मैत्रीण होण्याचा ..आजी तुला माहितीये का मला ना आधी वाटायचं आम्हा मुलींचच घरदार बदलतं तर आमच्यावरच खुप ताण असतो का लग्नाचा ,नवीन नात्यांचा पण मी अविनाशसोबत बोलतांना मला जाणवलं की मुलांवर सुद्धा तितकाच ताण असतो गं. म्हणजे लग्नासोबत येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या, जी  मुलगी आपली बायको म्हणुन  येणार ती आपल्या घरी नीट अॅडजस्ट होईल का, आपल्या आईवडिलांचा आदर करेल का. प्रत्येक फॅमिली टेढीमेढी असते तशीच माझी आहे त्यांना तसं स्वीकारु शकेल का ती आणि सगळ्यात इम्पाॅर्टन्ट आई आणि बायको यांच्या मध्ये माझं सॅण्डविच तर नाही ना होणार?. शेवटचं वाक्य बोलतांना इतकावेळ गंभीरपणे सांगणाऱ्या तिला आणि ऐकणाऱ्या आजीला एकत्रच हसु फुटलं.
काय सांगतेस ..हे सगळं तुला अविनाशने सांगितलं ?? आजीने हसतच विचारलं .. 
नाही गं तो कसला सांगतोय..मलाच जाणवलं त्याच्या बोलण्यातुन .. या मुलांच हे एक मात्र फार अवघड असतं हा ...गिरे तो भी टांग उपर.. काही म्हणजे काहीच सरळसरळ मान्य करणार नाहीत.. भीती वाटते तरी सांगणार नाही. सगळं आपणच ओळखायचं .मनु नाक मुरडत म्हणाली. 
अच्छा आणि तुमचं मुलींचं फार सोपं असतं का मॅडम ?? तुम्ही न सांगता तुमचा मुड बिनसलाय हे ओळखावं लागतंच ना आम्हालाही. तेवढ्यात अविनाश आत येत मिश्कीलपणे म्हणाला.
अरे तु कसा काय अचानक..मनु आश्चर्याने उठुन उभी राहत म्हणाली ‌
मीच बोलावलं गं त्याला.. म्हटलं काही बिनसलंय की काय  तुम्हा दोघांच.. असेल तर समोरासमोर बोलुन  मिटवून टाकता येईल .. तसंही तुझे आई बाबा बाहेर खरेदीला जाणारच होते तर त्यालाही जास्त अवघडल्यासारखं होणार नाही आणि  नाही तरी मला सुद्धा होणाऱ्या नातजावयाशी मनसोक्त गप्पा मारायच्याच होत्या.  काय रे बरोबर केलं ना बोलावलं ते ?? ..आजी हसतच अविनाशला म्हणाली. 
हो आजी  मलाही जाणवलंच‌ होतं हीचा मुड काही बरा दिसत नाहीये दोन दिवस झाले..मी बोलणारच होतो तिला भेटुया का वीकेंडला पण त्याची गरजच नाही पडली. अविनाश आजीला नमस्कार करत मोकळेपणाने म्हणाला‌.
तु बस रे. मी  छान पन्हं आणते  तुझ्यासाठी. केवढं ऊन आहे बाहेर. तुम्ही बसा बोलत. आजी किचनमध्ये जात म्हणाली.
काय मग कसं वाटलं सरप्राइज?? आजी आत जाताच अविनाश  छानसं स्माईल करत  अन् भुवया उंचावत मनु कडे एकटक बघत  म्हणाला. 
तुझ्या स्माईल सारखं. त्यावर  मनुचं घायाळ करणाऱ्या आवाजात तिच्या इतकंच लोभस उत्तर तयार होतं.
हाय...यही तो में पिघल गया !!  अविनाश तिचा पालटलेला नुर पाहुन तिला अजुन खुलवत म्हणाला. 
फिल्मी. मनु  लाजुन  किचनकडे  जात  म्हणाली. पण जातांना अविनाशच्या चेहऱ्यावर मात्र जाता जाता हसु फुलवुन गेली. 
मनु बरं झालं आलीस. जा हे पन्हं घेऊन जा अविनाशसाठी आणि त्याला विचार खायला काय बनवु?? आजी मनुकडे ट्रे देत सांगत होतीच तेवढ्यात अविनाशच आत आला. 
"आजी मला घरी सगळे अवि म्हणतात तेव्हा  मनालीला जसं तुम्ही मनु म्हणता तसं मलाही अविच म्हणा ना. मला आवडेल आता मी सुद्धा घरचाच आहे ना" अवि ट्रेमधला पन्ह्याचा ग्लास उचलत आपलेपणाने म्हणाला. बोलतांना त्याचा रोख मनुकडे सुद्धा होता  हे आजीच्या अनुभवी नजरेतुन सुटलं नाही.
मनु मात्र खाली मान घालून स्वतः शीच लाजुन हसत होती..
बरं बाबा आता तु म्हणतोय तर सवय करायला हवी. आजीही ‌हसुन होकार देत म्हणाली. 
बरं अवि  पोहे करु का खायला की ‌ अजुन काही आवडतं तुला. मला सांग मी ते बनवते ‌!! आजी आपुलकीने विचारु लागल्या.
आजी पोहे चालतील  पण  तुम्हाला मी बनवले तर चालतील का ?? ते काय आहे ना कुणीतरी मला चॅलेंज केलंय. असे  युनिक  कांदेपोहे शक्य करु शकतोस का म्हणून ?? अवि मनुकडे पाहत  म्हणाला.. 
काय ..आमची ही मनु पण ना .. हिच्या डोक्यात कुठुन अश्या नव्या कल्पना येतात देव जाणे ..काय गं का त्याला ‌त्रास देतेस ?? आजी मनुकडे पाहत लटक्या रागात म्हणाल्या..
यात काय त्रास झाला गं आजी आम्हा मुलींना नाही का असंच कांदेपोहे खावुन पसंत केल्या जातं मग कधीतरी फाॅर अ चेंज म्हणून नवऱ्याच्या हातचे पोहे खावेसे वाटले तर कळायला नको नवऱ्याला बनवता येतात की नाही ते  ?? मनु तिचं म्हणणं आजीला पटवत म्हणाली..  
नमुना आहेस तु मनु, तुझी आई ना बरोबरच बोलते. अगं त्याला कुठे सवय असणार आणि नवीन ठिकाणी सुचणार पण नाही. राहु देत रे तु. तिचं काय मनावर घेतोस. आजी मात्र फारसं न पटुन  म्हणाली.. 
त्यावर मनु काही बोलण्याआधी अविच म्हणाला " नाही आजी.. शी इज राईट!!  जर तिला एखादी क्वलिटी इम्पाॅर्टन्ट वाटते तर माझं कर्तव्य आहे तिची इच्छा जपणं.  मला यातलं फारसं काही येत नव्हतं पण मी दिदी आणि आईच्या ट्रेनिंग नंतर अॅटलिस्ट पोहे बनवु शकतो आता. तुम्ही प्लिज बनवु द्या ना मलाच. माझी मनापासून इच्छा आहे.. अविने मात्र  आजीला असं काही पटवलं की शेवटी आजीचा नाईलाज झाला. 
मनुनेही खुणेनेच आजीला मी आहे ना मदत करायला म्हणत आश्वस्त केलं तशी आजी सुद्धा कौतुकाने नातजावयाच्या हातचे पोहे खायला तयार झाली.
आजी तु इथे बस आपण गप्पा मारुया. मी देते त्याला सगळं साहित्य काढून. डोन्ट वरी. मनु आजीपाशी खुर्ची आणत म्हणाली.
आजीने होकार दिला अन् ती एकीकडे अविच्या हालचाली कौतुकाने न्याहाळत मनुसोबत बोलु लागली.
बरं का मनु अविनाशसोबत जशी मैत्री केलीस ना तशीच त्याच्या आईसोबत, वहिनीसोबत, दिदी सोबत सुद्धा करण्याचा प्रयत्न कर हो. कुठल्याही नात्याचा पाया जेव्हा मैत्री असते ना तेव्हा ते नात्याचे बंध आपसुक जपल्या जपतात. त्यात हेवेदावे, स्पर्धा, ईर्षा मत्सर उद्भवण्याची शक्यता आपोआपच कमी होते. तेव्हा जमलं तर नव्या घरात पाऊल टाकतांना आधी सर्वांची  सखी होवुन जा मग बाकी नात्यांची वीण आपोआप घट्ट होईल. आजी मायेने तिला सांगत होती.
आजी तुझं म्हणणं अगदी पटतंय गं मला पण ही वन वे प्रोसेस नसणार ना. टु वे प्रोसेस असते ही. मी माझ्याकडुन हात नक्कीच पुढे करेल मैत्रीचा पण समोरुन तसा प्रतिसाद सुद्धा मिळायला हवा. आणि त्यासाठी  आमची  फ्रिक्वेंसी आमच्या वाईब्स  मॅच  व्हायला हव्या त्या नाही झाल्या तर?? याची भीती वाटते गं. मनुने  एकीकडे डोळे मोठे करत कांदे आणि मिरच्या मीच कापणार असा नजरेनेच अविपाशी हट्ट धरत अन्  त्याला पोहे तेवढे भिजवायला सांगत  इकडे आजीला आपल्या मनातली शंका बोलून दाखवली.
अवि मात्र कौतुकाने तिच्या ह्या छोट्या छोट्या छटा अपुर्वाईने न्याहाळत तिच्या अजुनच प्रेमात पडत होता.
इकडे आजी मात्र मनुच्या शंकांच निरसन करण्यात मग्न होती.
तुझी शंका अगदी रास्त आहे बघ. साद आणि प्रतिसाद दोन्ही आवश्यक आहे. तरच अपेक्षित परिणाम दिसतो. तु म्हणालीस तसं फ्रिक्वेंसी मॅच व्हायला हवी हे सुद्धा अगदी खरंय बरं का. पण समजा ती नाहीच जुळली काही बाबतीत अन् पुर्ण निखळ मैत्री शक्य नसली तरी किमान आपल्या बाजुने शत्रुत्व निर्माण होवु नये, तेढ निर्माण होवु नये याची काळजी तर घेवुच शकतो आपण एकमेकांच्या मतांचा आदर राखुन. वेळच्या वेळी बोलुन मनातलं किल्मिष दुर सारुन. काय कळतंय ना मनु मला काय म्हणायचंय? आजी तिच्या अनुभवाने आलेलं ज्ञान मनुच्या स्वाधीन करत म्हणाली.
हो आजी  नुसतं कळत नाही तर अगदी कोरल्या जातो मनावर तुझा प्रत्येक शब्द. तु सांगतेसच इतकं सहज सोपं करून. आजी तुला कसं जमतं गं सगळं असं इतकं छान सांगायला. मनु आपल्या आजीकडे पाहत कुतुहलाने म्हणाली. 
अवि जो पोह्यांच्या फोडणीची तयारी करत आजीचं बोलणं  मन लावुन ऐकत होता  त्याच्याही चेहऱ्यावर आजीसाठी कौतुकमिश्रीत स्मित पसरलं होतं.
अगं कारण मी आधी म्हणाले तसं प्रत्येक स्त्री या सगळ्यातुन जाते. तुझी ही आजी सुद्धा या अवस्थेतुन गेलीये बाळा. माझं लग्न तसं तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लवकर झालेलं. लग्नानंतर काही वर्ष मी माहेरी होते आजीच्या तालमीत. स्वयंपाकापासुन विणकाम,भरतकाम पर्यंत सगळं निगुतीने कसं करायचं हे तिनेच  शिकवलं मला ‌ आणि मग जेव्हा न्हाणं आल्यावर  माझी पाठवणी झाली ना सासरी तेव्हा माझ्या आजीने अगदी हाच कानमंत्र दिला होता बघ  मला .."सखी हो सुखी होशील. तेव्हा फारसं कळलं नाही पण संसारात पडले आणि हळूहळू उमगत गेलं गं की अरेच्चा यशस्वी संसाराचं रहस्य आजीच्या या चार शब्दातच तर दडलंय." आजी  जुन्या आठवणी सांगत  तिच्या आजीच्या आठवणीने हळवी होत म्हणाली.
खरंच गं आजी  प्रत्येकीने असा  विचार केला अन् आपण स्त्रिया जर एकमेकींच्या मैत्रीणी झालो तर कितीतरी घरात दिसणारे संघर्ष, स्पर्धा, चढाओढ कमी होतील ना. आपण जर  एकमेकींच्या जागी स्वतः ला ठेवून कुठल्याही प्रसंगाकडे बघितलं तर आपल्याला दुसरी बाजु दिसेल आणि वाद, मतभेद विकोपाला जाणारच  नाहीत. किती सुंदर होईल असं होवु शकलं तर. आजी मी खुप नशीबवान आहे की मला असा सुंदर विचारांचा वारसा मिळतोय तुझ्यारुपाने.  तुझ्याशी बोलुन अगदी हलकं वाटतंय बघ. तु माझ्या मनातल्या सगळ्या शंकांच व्यवस्थित निरसन केलंस.  खरंच यु आर द बेस्ट. मी म्हणाले होते ना अविनाश. माझी आजी खुप ग्रेट आहे. मनु हात धुवून आजीपाशी येत तिला मिठी मारत अभिमानाने म्हणाली.
तुझी नाही आपली आजी. अवि पोह्यांवर झाकण ठेवत  मनापासून म्हणाला. तशी आजी समाधानाने हसली.
हात स्वच्छ धुवून आजीकडे येत आजीचा हात हातात घेत आता तो सुद्धा बोलु लागला. "आजी खरंच  मनापासून  थॅन्क्स. तुम्ही मला बोलावलं नसतं तर मलाही हा महत्त्वाचा पैलू गवसला नसता. दरवेळी मुलींनीच सगळी नाती  जपायची असतात असा आग्रह दिसतो आपल्याकडे. पण ती अपेक्षा मुलांकडून फारशी केल्या जात नाही. कारण मुलींना सासरी राहायला जायचं असतं मुलांना नाही  पण तरीही मला वाटतं लग्न हे  जर दोन कुटुंबांच मिलन असेल तर आम्हा मुलांची पण काही कर्तव्य असतातच ना. आजी तुम्ही सांगितलेला सल्ला ना मला सुद्धा खरंच तितकाच मोलाचा वाटतोय. मी कायम लक्षात ठेवेन आणि माझ्या सासरच्या मंडळींचा  फक्त जावई न होता घरातला सदस्य होण्याचा, त्यांचा आधार होण्याचा, त्यांच्या टेन्शनचं कारण नाही तर समाधान होण्याचा कायम प्रयत्न करेन. अविनाश अगदी मनापासून बोलत होता अन् त्याचं ऐकुन आजी अन् मनु दोघींचेही चेहरे आनंद आणि समाधानाने उजळून आले होते. 
     ज्या घरातली  तरुण पिढी तुमच्या सारखी विचारी असेल त्या घरात कायम समाधान नांदेलच असं म्हणणार नाही मी कारण तुमच्या इतकाच आमच्या पिढीचा, वडिलधाऱ्यांचा तसा सकारात्मक  प्रतिसाद सुद्धा महत्त्वाचा आहे हो यासगळ्यात. पण समतोल साधण्यासाठी जर तुमची पिढी आग्रही भूमिका घेत असेल ना तर नक्कीच हे कौतुकास्पद असेल. आजी आता  दोघांच्याही डोक्यावरुन मायेने हात  फिरवत  कौतुकाने म्हणाल्या.  आपली पुढची पिढी फक्त आपल्या विचारांचा वारसा पुढे नेणार नाही तर त्याला आधुनिकतेची झळाळी देत  त्यात तितक्याच प्रगल्भ अश्या स्वविचारांची सुद्धा भर घालणार  या जाणिवेने आजीच्या चेहऱ्यावर  अतीव आनंद व समाधान ओसंडून वाहु लागलं होतं ! 
आजीची तंद्री भंगली ती अविच्या आवाजाने.
मुलगा पसंत आहे ना??  पोह्यांची प्लेट आजी आणि मनु समोर  धरत अविनाश हसुन  विचारत होता.
पोह्याचं काय घेवुन बसलास. पदार्थ आहे तो. त्यात कमी जास्त होत राहणार. मुलाचे  विचारच एवढे सुंदर असल्यावर  त्या मुलाला कोणी नाकारु  शकतं का.. हो ना गं आजी. भारावलेली मनु डोळ्यातले आनंदाश्रू पुसत अन् पोह्यांचा घास अविला भरवत गहिवरल्या स्वरात म्हणाली. आजीनेही कौतुकाने मनोमन दोघांची दृष्ट काढत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.
आजीसारखं मार्गदर्शन आणि अविनाश सारखा जोडीदार अशी सुंदर व्यक्तीमत्वं आपल्या अवतीभवती आहेत या जाणिवेने आता मनुच्या मनातील काळजीचं सावट विरुन गेलं होतं. अविच्या अन् आजीने दिलेल्या कानमंत्राच्या साथीने आता ती सज्ज होती पुढील  नव्या प्रवासासाठी. सखी होवुन नाती जपण्याचा मनापासून प्रयत्न करण्यासाठी ! 

- 'मनस्वी' समीक्षा ✍️ ©®
sam202628@gmail.com
आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे..
कथा नावासहीत शेअर करण्यास हरकत नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...