गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1520. मेलेला माणूस काय करणार ?

"भिती नाही वाटत तुला हे काम करताना?"
"भिती तर जिवंत माणसाची वाटते , ताई. मेलेला माणूस काय करणार?"
किती सहज बोलून गेली ती. कामानिमित्ताने जात असताना मला ती दिसली स्मशानात. नवल वाटलं. एक स्त्री इथे कशी? काय करतेय? परतीच्या वाटेवर सुद्धा ती तिथेच दिसली. उत्सुकता वाढली म्हणून शेवटी मी थांबून आत गेली. शंकराच्या मूर्ती समोर बसली होती ती निवांत. माझं येणं अपेक्षित नसावं तिला, थोडी दचकली. बरेच प्रश्न होते आम्हा दोघींच्याही डोळ्यात. पण तिला बहुधा काही सुचलं नसावं. मग मीच तिला विचारलं, 
" तू इथे काय करतेय? कुणी जवळचं गेलं का? घरी सोडून देऊ का तुला?"
"इथेच रहाते मी ताई. हेच घर आहे माझं आता. जिथं जायचं तिथली वाट इथूनच तर जाते."
स्वतःमध्येच हरवल्या सारखं बोलली ती. मला आणखी जाणून घ्यायचं होतं तिच्याबद्दल. 
"पण तू इथे कशी आलीस?"
"काय सांगू ताई... चार भिंती आणि छप्पर एकदा कोलमडलं की वाट फुटेल तिकडे निघाव लागतं."
कुणी विचारपूस केली की किती आसुसून बोलावंसं वाटतं ! तशीच बोलत गेली ती पुढे. 
"शंकराची मूर्ती, हिरवळ दिसली, अन् विसावली. थकून डोळा लागला. जाग आली, तेव्हा चारी बाजूंनी स्मशान दिसलं, हादरून गेली मी. पण समोर म्हातारा म्हातारी उभे होते. दोघांनी  मायेने विचारपूस केली. हात धरून झोपडीत नेलं. गरम चहा पाजला. भाकर तुकडा दिला. भूक लागते तेव्हा भान नसतं. कुठे  खातो, काय खातो, काहीच महत्वाचं नसतं. बाहेर माणसं कोल्हा लांडगा सारखी लचके तोडतील. इथेच राहा, आमच्यासोबत. आमची लेक म्हणून रहा म्हातारा म्हातारी म्हणाले. मला भरून आलं. मरणाच्या ठिकाणी सुरक्षितता होती. अपुऱ्या भाकर तुकड्यातही मला घासातला घास  द्यायची तयारी दाखवली त्यांनी. आधी प्रेत आलं की भिती वाटायची. मग हळुहळू भिती चेपली. नजरेला सवय झाली. जन्म मरण  हातात नाही, हे कळून चुकलं. जगणं महत्वाचं, मग ते कुठे का असेना. एकदा म्हातारा खूप आजारी पडला. मला जवळ बोलावून म्हणाला, "पोरी, घरदार असलेली माणसं मरतात तेव्हा लाजेकाजेस्तव चार लोक सोबत येतात. पण बेवारस माणूस मरतो, तेव्हाही त्याचं कोणीच नसतं. आपण त्याचं नातेवाईक व्हायचं. होशील नं?" माझी मान आपसूकच हलली. म्हातारा गेला. पाठोपाठ म्हातारी पण गेली. शंकराच्या सोबतीने एक वेगळीच आराधना सुरु झाली." 
मरणाच्या ठिकाणी जगण्याचं तत्वज्ञान ऐकायला मिळत होतं. क्षण भर ती थांबली. आतून खूप बोलावंसं वाटत होतं तिला. मलाही तिने थांबूच नये असं वाटत होतं. तिला बोलतं करत मी विचारलं. 
"तू नेमकं काय करते...पोट कसं भरते? " 
" तुम्ही ज्याला दाह संस्कार म्हणता, त्याला मी मदत करते. लोक पैसे देतात मयताच्या नांवाने पुण्य म्हणून. कोणी भली माणसं नंतर जुने कपडे, शिधा आणून देतात. एकट्या जीवाला लागतच किती? " 
मी मान डोलावली नकळत. "पण ज्यांचं कोणी नाही त्यांचं करून तर तुला काहीच मिळत नसेल."
ती खिन्न हसली. "हा देण्या घेण्याचा व्यवहार जिवंत असेपर्यंत चालतो, ताई. मी मरणाच्या दाराची साक्षीदार आहे. तिथं येतं ते कर्म. तुमचं पाप, पुण्य. माणूस बेवारस नसतो. तो होत जातो. त्याची हजार कारणं. आपल्याला त्यात पडायचं नाही. प्रत्येक माणसाला अधिकार आहे, मेल्यावर त्याचं ' नीट' होण्याचा. मी तेच करते. गेलेली व्यक्ती माझी मागच्या जन्मीची भाऊ, बहीण, आई, वडील असतील असं समजून करते. मनाला समाधान मिळतं. ज्यांनी मला आधार दिला त्यांना दिलेला शब्द पाळला याचं सुख मिळतं. आणखी काय हवं?"
" पण तुला विषण्णता नाही येत? एकटेपणा, हुरहूर, नाही वाटत?"
"सुरवातीला खूप वाटलं. पण याची साथ आहे ना ! " तिनं शंकराच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हटलं. 
आणि एक कळून चुकलं. जगण्याची हिरवी कोवळीक जितकी सुंदर आहे ना, त्यापेक्षाही शाश्वत असतं गळून गेलेलं पिवळं पान. तिचा निरोप घेऊन मी पुढे निघाली, पण मनात आलं,  किती विलक्षण तत्वज्ञान कळलं तिला जगताना. हे तत्वज्ञान आलं तिच्या अनुभवातून. अन् अनुभव आला तिच्या कामातून. केवढी हिंमत लागते हे काम करायला. ज्या दुर्गेच्या मी शोधात होती, ती मला तिथेच सापडली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...