बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

1551. मुखवटा

    अमेरिकेतून मुलगा-सून व मुलं भारतात परत येणार हे ऐकून लेले पती पत्नी फारच आनंदात होते. अमर अमेरिकेत दहा वर्षे होता. मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्याचं सईशी लग्न झालं. MBA केलेली तरतरीत सई अमेरिकेत छान रूळली होती पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती. अमर-सई व त्यांची दोन मुलं ठरवल्याप्रमाणे भारतात आले. जज्ज लेलेंना कोर्टातील वकिलांनी आजवर एवढे आनंदी बघितले नव्हते. शशीताई लेले पण फारच खुषीत आहेत हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं. विशाखाताईंना गप्प बसवलं नाही. “फार सुनेच्या कलाने घेऊ नका हं! माझे काय झालय बघताय ना?" हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणी टोचून गेला ! सई आणि शशीताईंचं पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा होता पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले. एक दिवस नातवंडांनी बरच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं व शशीताईंनी सई बरोबर अबोला धरला. हो/नाही पलिकडे त्या तिच्याशी बोलत नसतं. पंधरा दिवस सईनं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही. बराच विचार करून तिने त्यांना एक टेक्स्ट पाठवला.
“प्रिय आई ! आपण दोघी एका छताखाली राहतो पण आपली एकमेकीशी फारशी ओळख नाही असं मला वाटतं. दोन मैत्रिणीं सारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारू व let’s get to know each other!” आपण जे करतो आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे. भारतीय संस्कृतीमधे याला अगाऊपणा म्हणतील याची तिला कल्पना होती. या टेक्स्ट वरून घरात रामायण होईल असं वाटत असताना अचानक शशीताईंचं उत्तर आलं..”हो जाऊया पण एक अट आहे..घरचे विषय बोलायचे नाहीत.” सईने ते कबूल केलं.
     त्या रविवारी सई कॅफेला जाण्यास तयार झाली. फिका गुलाबी सलवार कमीस, सडसडीत बांधा, सावळा तजेलदार रंग व रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी खूप नीटनेटकी आहे असं वाटलं. दोन मुलं झाल्यानंतर एवढा सुडौल बांधा टिकवणं आपल्याला कधीच जमलं नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला कॅफे जवळ सोडायला सांगितलं. सईनं कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडलं होतं. खिडकीतून दिसणारे पाण्याचं कारंजं, त्यात लीलया फिरणारे लाल,सोनेरी मासे व हिरवीगार झाडे बघून शशीताई सुखावल्या होत्या. व्हेज कटलेट्स व फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्ट चे चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली.
टेबलावर गॅागल ठेवत सई म्हणाली, “आई, छान आहे हं तुमची साडी!"
त्यानंतर थोडावेळ कुणीच काहीच बोललं नाही.
सईनंच परत विचारलं, “तुम्हाला गाणं कुणी शिकवलं? रामा रामा रटते रटते.. भजन तुम्ही किती छान म्हणता ! ”
शशीताई एकदम खुलल्या. गाण्याची शिकवणी, त्यातल्या जागा, आवडती भजने यावर बोलत राहिल्या. सईला पण त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सईनी परदेशी अनुभवांचं पोतं उपड केलं..सोपं का असतं परदेशी बस्तान बसवणे? त्या थक्क झाल्या. घरातील एकही विषय न बोलता फक्त एकमेकीला समजून घेणं चाललं होतं. कॉफी व व्हेज कटलेट खात बाईचा जन्म, तडजोड यावर खूप गप्पा झाल्या.. दोन पिढ्यातलं अंतर कमी होत होतं.. दोघी खुषीत घरी आल्या. घरी येताच मात्र शशीताई परत सासुबाई बनल्या व अगदी घुमेपणाने वावरू लागल्या. घरात जेमतेम बोलणं व बाहेर मात्र महिन्यातून दोन वेळा जाणं सुरू होतं. नाटक, सिनेमा, अध्यात्म श्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या पण घरी येताच मात्र शशीताईंमधली मैत्रीण लुप्त होत असे व मुखवटा घातलेली घुमी सासु अवतरत असे.
सुमनताईंनी त्यांना कॅफेमधे बघितलं होतं. भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं, “शशीताई, अहो हे अति प्रेम कशासाठी? योग्य अंतर ठेवा तिच्या बरोबर ! या शिकलेल्या मुली ना स्वत:ला फार शहाण्या समजतात.”
कुसूमताई म्हणाल्या, “शशीताई, मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरूवातीला. काही उपयोग होत नाही.” त्यांनी डोळे पुसले.
सईबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता.
एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला, “आई, कशी आहे ग तुझी नवी मैत्रीण सई?”
“मैत्रीण म्हणून छान आहे रे ! पण सून म्हणून फार कमी पडते बघ. ते पॅन्ट शर्ट घालणं काय, ते नॅान व्हेज शिजवणं काय, मुलांना वळण नाही. मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीनं मला बाहेर काढलं असतं घरातून !” शशीताई भडाभडा बोलल्या. 
“आई, आजीनं तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार? कपड्यांचे काय घेऊन बसली आहेस? तिचे मन बघ. ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहतेय. बाहेर तुला ती आवडते पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस. तुझे ताईशी वाद होतात ना? ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस? आणि मुलांना वळण नाही कसं? तुझ्यासारखं नसेल पण तिला जसे लावायचे तसे वळण नक्की आहे."
शशीताई काही बोलल्या नाहीत. अमरचं बरोबर होतं. त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या पण बरं वाटतं नव्हतं म्हणून त्या तासभर आधी घरी परतल्या व दारातच थबकल्या..
त्या दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रीणी येणार हे सईनं सांगितलं होतं. सई त्यांना सांगत होती, “माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात..माझं नक्कीच चुकत असेल पण त्या मला आजवर कधी बोललेल्या नाहीत. आम्ही दोघी मैत्रिणींसारख्या हिंडतो,फिरतो! आपण नोकरी, मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासुबाईं सासरे यांना वेळ दिला पाहिजे..ज्याच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्याला घडवणाऱ्या व्यक्तीना आपण समजून घेतलंच पाहिजे ! मतं जुळत नसली तरी.”
तिची मैत्रीण आभा म्हणाली,”आपण कामावर टिम वर्क नाही का करत? न पटणारे किती जण असतात ग्रूपमधे. घरात पण united front असेल तर किती छान होईल !
उषा म्हणाली, “घरचा एखादा प्रॅाब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे.”
शशीताईंचे डोळे भरून आले. देवाची भजने म्हणत सुनांच्या कागाळ्या करणारा भजनाच्या बायका कुठं आणि या उच्चशिक्षित मुली.. नोकरी करून घराचं घरपण कसे जपायचं याचा चर्चा करणाऱ्या सुना कुठं! अमेरिकेहून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवलय..आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच गढूळ होती..ती बदलली पाहिजे.
त्या चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सई म्हणाली,
 “आई, लवकर आलात? बरं वाटतंय ना? चहा घ्यायला येता का? मैत्रिणींशी ओळख करून देते."
“आले असते ग..पण डोकं दुखतंय..पडते मी जरा !” म्हणून त्या खोलीत आल्या..
एवढचं ऐकायची अपेक्षा असते.
“बरं वाटतय ना?” त्यानचं बरं वाटायला लागतं !
पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सूनेबद्दल तक्रार करत होत्या. शशीताई एकदम म्हणाल्या, "कुसुमताई, सुनेबद्दल कागाळ्या करणे बंद करा. काय मिळणार आहे त्यातून? अहो, आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का?  लहान आहे. चुकेल. पण त्यांना भजनापूर्वी नावं ठेऊन घरचं काही बदलेल का? आणि या चर्चेनंतर “दर्शन दे रे, दे रे  भगवंता... गाताना मन शांत असेल का?” कुसूमताई नाक मुरडून गप्प बसल्या.
“घरचा एखादा प्रॅाब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे.” हा मुद्दा बायकांना पटला ! शशीताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या. आज कुठे शोधिशी रामेश्वर अन्.. गाताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं होतं सगळ्यांच्या ! अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या.
सईला म्हणाल्या, “सई, एक नवं नाटक आलं आहे. खूप छान आहे म्हणे. दोन तिकीटं काढू का?”
सई आनंदाने हो म्हणाली. तिनं अमरकडे कौतुकानं बघितलं. आज एक मुखवटा गळून पडला होता.
“सई, चहा प्यायला ये ग टेरेस वर..आज कॅफेमधे नको.. घरीच गप्पा मारू!” तिच्या कामावरच्या गमती ऐकायला शशीताई उत्सुक होत्या.. “आलेऽऽऽ हो.. म्हणत सई पळत वर गेली.
अमर आणि बाबा कौतुकाने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या बायकांकडे बघत राहिले ! घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना जाणवत होतं.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...