मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1516. अकल्पित नातं

       आज आकाशला नवी आई मिळणार  होती. आई दत्तक घेणार आहेत. त्याचाच दत्तक विधीचा कार्यक्रम चालू आहे. त्याच बरोबर कायदेशीर रित्या रजिस्टर पण होणार आहे त्यामुळे कोर्टाची दोन माणसं, महिला आयोगाची माणसं आकाशचे नातेवाईक, निराधार आश्रमातले संस्थापक, संचालक, आश्रमातल्या बायका, आणी मी आकाशची शिक्षिका. ह्या सगळ्यां लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. एका अनाथ स्त्रीला आकाशची आई होण्याचा मान मिळणार.  बसल्या बसल्या कधी मी भूतकाळात गेले कळलच नाही. 
    आकाशच्या आईवडिलांचा डिवोर्स झाला होता. आणी दोघांनी मुलाची कस्टडी घ्यायला नकार दिला होता. त्याच्या आजी आजोबानी आकाशची कस्टडी घेतली होती. आता आजी आजोबा थकलेत. त्यांच्या शारीरिक कुरबुरी सुरू झाल्यात. त्यांना आता आकाशला सांभाळणे झेपत नाही म्हणुनच  एक आई दत्तक घ्यायची हा निर्णय त्यानी घेतलाय. मी आकाशची स्कूलटीचर आहे. खुप हुशार मुलगा. पण चेहऱ्यावर उदासी भाव. सारखा कुठल्यातरी विचारात असल्या सारखा. कुणाशी मैत्री नाही. बोलण चालणं नाही. एक-दोनदां मी त्याला विचारलं पण. काही बोलायलाच तयार नाही.
एकदां मी आईवर निबंध लिहायला सांगितला. त्यानं मला कोरा पेपर दिला.
हे काय कोरा पेपर? 
म्हणाला मला आई वडिल नाही आहे. मला फक्त आजी-आजोबा आहे आणी तेच माझा सांभाळ करतात. हे सांगताना त्याचे डोळे भरुन आले. केवढं ते वय. सात आठ? मी त्याला जवळ घेतलं. माफ कर. मला माहित नव्हतं. तेव्हा पासून मला त्याच्याबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागलं. माझ्यापरीन मी त्याची मदत करायची. अभ्यासात काही अडचण आली तर मी ती सोडवायची. एकदा सतत दोन दिवस शाळेत आला नाही. त्याच्या शेजारी बसणाऱ्या उमेशला मी विचारलं.
उमेश ! आकाश वर्गात दिसत नाही. आला नाही का आज?
नाही बाई. 
आजारी आहे का?
मला माहित नाही बाई. 
चल ठीक आहे.
संध्याकाळी मी त्याच्या घरी गेले. घरावर नाव पत्ता काही नव्हता. मी आजूबाजूला सगळीकडे  बघितलं. सगळ्यांच्या घरावर नावाची पाटी होती. मी एका मुलाला विचारलं ,बाळा आकाश नातू कुठे राहतो?
तो हसला. म्हणाला तुम्ही तर त्याच्या घरासमोरच उभ्या आहात. दारावर थाप द्या. फक्त आजीच घरात आहे. आकाश आणी आजोबा आत्ताच बाहेर गेलेत.
मला हेच पाहिजे होत. एकट्यात मला आजीशी  मनसोक्त बोलायचं होतं.
मी दारावर नाॅक केलं.
कोण आहे? म्हणंत आकाशच्या आजीने दार उघडलं. आपण? त्यांनी मला ओळखलं होतं. आकाश च्या टीचर? या आत या. मला बसायला सांगुन आतुन पाणी घेऊन आल्या.
आमच्या आकाश ची काही तक्रार? अभ्यास नीट करत नाही का? कुणाची खोडी वैगेरे काढण्यातला नाही आहे.
नाही आजी. तुमचा आकाश शांत आणी हुशार आहे. दोन दिवस वर्गात दिसला नाही. आजारी आहे का?
नाही. आकाश ठीक आहे. मीच नाही पाठवलं त्याला. त्याचे आजोबा गावाला गेले होते. आजच आलेत. त्याला घेऊन बाजारात गेलेत. ते नसले की त्याला माझ्याबरोबर घेऊन जावं  लागतं. शाळेतून आल्यावर कोण बघेल त्याला. मी अशी सहा साडेसहाला घरी येते.
अजून नोकरी?
काय करणार. करावीच लागेल. आई-बापा विना पोर. त्याला वाढवायचं,  स्वत:च्या पायावर उभं करायचय  म्हणजे आम्हाला कष्ट करावेच लागतील ना? जोपर्यंत हातापायत जोर आहे, चांगल आरोग्य आहे तोपर्यंत त्याला सांभाळावच लागेल. 
त्याचे आईबाबा?
घटस्फोट झालाय. दोघेही वेगळे झालेत. मुलाची कस्टडी नाकारली. आम्ही तर नाहीना त्याला वाऱ्यावर सोडू शकंत? आम्ही घेतली त्याची कस्टडी. वडिल त्याचा खर्च उचलायला तयार होते. पण आम्हीच तो नाकारला. आमच्या  ऐपतीनुसार आम्ही त्याचा सांभाळ करू. ते गाव सोडुन आम्ही इथे त्याला घेऊन आलो. भाड्याच्या घरात राहिलो. आताच वर्षापूर्वी हे दोन खोल्यांचं घर घेतलं.
सानेबाई , खरं सांगते...जसजसं वय वाढतं तशी भीतीपण वाढते. आमच्यानंतर ह्या पोराच काय होईल. कोण बघेल त्याला. ह्या चिंतेने रात्र रात्र झोप लागत नाही. काय करावं समजत नाही. हे ही हाच विचार करतात. म्हणायला आकाशाला काका-काकू, आत्या आहे. जबाबदारी नको. कारण आकाशचे बाबा त्याचा खर्च उचलायला तयार असताना आम्ही तो नाकारलाय. मग कशाला कोण जबाबदारी  घेईल? एवढं बोलुन आजीनी मोठा उसासा टाकला. नक्कीच डोळ्यांत पाणी ही असेल. चुप झाल्या. मी ही काय बोलणार. थोड्यावेळाने त्यानीच बोलायला सुरुवात केली. म्हणाल्या, मी एक निर्णय घेतलाय. अजून आकाशाच्या आजोबांना पण सांगितला नाही. वेळ आली की सांगेन तेव्हाच त्याना माझं म्हणण, निर्णय पटेल. जेव्हा ते गावाला जातात तेव्हा मी आकाशाला घेऊन निराधार आश्रमात जाते.
आश्रमात !  ते का? 
कारण मी तिथे काम करते.तिथे 18ते 40 वर्षाच्या मुली- बायका आहेत. काही विधवा आहेत, काही लहानपणा पासून इथेच लहानाच्या मोठ्या झाल्यात. काहींनी  सासरच्या माणसांच्या कच्याट्यातून सुटका करून घेतलीय. अशा अनेक प्रकारच्या अनाथ बायका आहेत. त्यांच्यात मी आकाशला आई शोधते. म्हणूनच मी त्याला माझ्याबरोबर घेऊन जाते. तिथे तो त्या बायकांमधे रमतो. त्याच्या आवडीचा नाश्ता जेवण करतात. त्याचा अभ्यास घेतात. मला काहीही पाहावं लागत नाही. तो ही खूप खुश असतो.
आई शोधताय म्हणजे?  
माझ्या आकाशसाठी एक आई दत्तक घेणार.  हा असा कायदा नाही आहे. जर एक मूल दत्तक घेतलं जावू शकतं एक आई कां नाही?  लहान वयच तसं असतं. असमंजस, निरागस, कोवळं मन असतं. ते जपण्यासाठी आईची गरज असते. ह्याच योग्य वयात  त्याचं मन वळवता येईल. नीट समजावून सांगता येईल. आजी आजोबांनी कितीही प्रेमानं केलं तरी आई ती आईच असते. आईची उणीव जास्त भासते. बिन आई-बापाच्या मुलाला आई आणी एका स्त्रीला आई बनण्याचं भाग्य लाभेल. मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय आणी तशी आई पण मी शोधून ठेवलीय.
म्हणजे?
आश्रमात आहे एक बाई जी आकाशची आई होण्यास योग्य आहे. माया नांव आहे तिचं. ती आकाशची खूप काळजी घेते. त्याला हव नको सगळं व्यवस्थित बघते. आठवी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. दिसायला चांगली, नीट-नेटकेपणा, वागणूक चांगली, प्रेमाने सगळ्यांच करणारी. आकाशला पण ती फार आवडते. खूप खुश असतो तो तिच्याबरोबर. माई म्हणतो तिला. तिचा भूतकाळ बघता ती ही तयार होईल असं आतून  माझं मन मला सांगतय. लवकरच मी तीला विचारणार आहे. तिचा होकार मिळाला की पुढच्या हालचाली.
भूतकाळात असं काय घडलय? मी विचारलं.
एका श्रीमंत कुटूंबानी तिचा विश्वासघात केलाय. आपल्या स्वार्थासाठी तिला फसवलय.
म्हणजे? माझी उत्कृष्टता वाढायला लागली. सांगा ना आजी .
काय असं घडलय तिच्या आयुष्यात?
एक दिवस मी तिला म्हटलं, माया, ऑफिसच्या दोन्ही अलमारी साफ करायच्या आहेत. बाकी कामे बाजुला ठेवुन हे काम आधी कर. तर म्हणाली ,
मावशी उद्या केल्या तर चालतील? मला आज बाहेर जायचय. माझी कामे आटोपून मी जाईन. आजचा दिवस माफ करा. आणी ती निघुन गेली. 
मावशी, दर वर्षी ती ह्याच तारखेला बाहेर जाते. कुणालाही बरोबर घेत नाही. संध्याकाळी परत येते. कधीच आमच्याबरोबर पण येत नाही. कुणाशीच आपलं मन मोकळं करत नाही. कुणाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही, एकजण म्हणाली.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती अलमार्या साफ करायला आली.
मावशी कुठच्या अलमार्या करायच्या?
ह्या दोन म्हणत मी किल्या तिला दिल्या. 
काल कुठे गेली होती गं? मी सहज विचारलं. एकदम तिच्या तोंडून निघाल बालकल्याण आश्रमात. 
काय?  कोणी आहे का तिथे?
नाही.
मला कळलय दर वर्षी ह्याच तारखेला तू बाहेर जाते.
हो, माझ्या मुलाचा वाढदिवस असतो.
आत्ताच तर म्हणाली तुझ कोणी नाही तिथे. मग हा मुलगा? ती एकदम पलटली आणी मावशी म्हणत माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली.
बोल बेटा. काय झालय? तू अशी रडतेस का? काही अघटित घडलय का?  मला सांग.  मन मोकळं कर. अस दुख दाबून ठेवू नकोस.
मावशी, मला मुलगा असून मी त्याची आई नाही. मला तोंड सुध्दा बघायला दिलं नाही त्या नराधमांनी. सुटका होताच त्यानी माझ्या बाळाला पळवलं. मुलगा झालाय ऐवढे शब्द ग्लानीत असताना  माझ्या कानावर पडले होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तर ना मुलगा ना नवरा ना सासू माझ्या जवळ होते. मी एकटी माझ्या खोलीत होते. हाका मारल्या पण कोणीच ऐकलं नाही. थोड्या वेळाने एक बाई जी आया होती ती आली. मी तिला विचारलं माझं बाळ, माझा नवरा कुठेय? तर ती म्हणली बाळाला घेऊन बाहेर गेलेत. मला तुम्हांला  साफ करायचं  होतं, कपडे बदलायचे होते म्हणून मीच बाहेर थांबायला सांगितलय. बोलवू कां त्यास्नी. मी होय म्हटल्यावर बाहेर गेली. आणी  ओरडत आत आली.  म्हणाली ताई  ते बाळाला  घेऊन गेले. त्यांच सामान पण नाय. बाहेर गाडी पण न्हाय. आणी हे बघा काय ठेवून गेलेत. तिने दोन लिफाफे आणी एक चिट्टी माझ्या हातात दिली. चिट्टित लिहिलं होत. आमचं काम झालं. माझा अंश  घराण्याला वारस मिळाला. आता तुझी गरज नाही. पन्नास हजार तुला आणी पांच हजार त्या बाईला दे. हे सगळं वाचून मी टाहो फोडला. 
ती आया मला विचारू लागली. काय झालं ताई? काही झालय का. काय लिवलं हाय तेच्यात. 
बाई, ह्या नराधमांनी फसवलं मला. माझा मुलगा घेऊन पळाले. त्यांच्या घराला वारस पाहिजे होता. माझ्याशी खोटं लग्न केलं. बायकोचं स्थान दिलं. आणी आता मूल घेऊन गेले.
अरे बाप रे. काय भयानक माणसं हायीत. ह्यांना पोलिसांत द्यायला पाहिजेत. 
कुठच्या तोंडानी पोलिसात जाणार. काय पुरावा देणार. सगळच खोटं आहे. खोटं नाव, खोटी नोकरी, खोटं घर. मंदिरात लग्न, इथे घरीच डिलीवरी. काही सुध्दा पुरावे पाठी सोडले नाही. काय करू मी बाई आता? कुठच्या तोंडानी माहेरी जाऊ. काय सांगू ? आईला खूप धक्का बसेल. येवढा मोठा विश्वासघात ती सहनही करू शकणार नाही. माझं संपूर्ण आयुष्य बरबाद केलं ह्या चांडाळानी. 
बाई ते लोक खूप पैसेवाले आहेत. त्यांचा स्व:ताचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यांना मूलबाळ होत नव्हतं, घराण्याला वारस पाहिजे होता, म्हणून माझा बळी घेतला. हे सगळं त्यांनी ह्या चिट्टित लिहीलय.
ती माझ्या पाठीवरून हात फिरवत राहिली. बाई  हे तुमचे पैसे. आता तुम्ही या.
तुमास्नी असं सोडुन कशी जाऊ मी? ओली बाळंतिण हाय. उभं राहयची पण ताकद नाय तुमच्यात. मी डोळे मिटून बसले. स्वयंपाक घर लागलेल होतं. तीने आत जाऊन माझ्यासाठी रव्याची खीर बनवून आणली. म्हणाली थोडी खावून घ्या. खुप थकवा असतो हो. आराम करा. मी हाय तुमच्या संग. उजाडल्यावर बघू काय करायचे ते. पोटात थोडं गेल्यावर मला परत ग्लानी आली. उजाडल्यावर बाई मला आपल्या घरी घेऊन गेली. मुलीसारखी माझी सेवा केली. आठ दिवसात चालती फिरती झाली आणी त्या माऊलीचा निरोप घेऊन माहेरी आले.
आईला भेटायच्या आधी त्या काकूकडे गेले ज्यांनी हे लग्न जमवण्यात पुढाकार घेतला होता. पण तिथेही निराशाच. घराला मोठ्ठ कुलूप. नंतर कळलं ते हे घर सोडून कायमचे मुलाकडे गेले. पक्क झालं त्याही ह्या कटात सामील होत्या. म्हणूनच मी लग्नाला तयार नसतांना आईचा ब्रेन वाॅश करून माझा होकार मिळवला. घरी गेल्यावर आईला सगळं कळल्यावर एवढा जबरदस्त धक्का बसला की त्यातून ती सावरली नाही. जाताना एवढच म्हणाली. तुझ्या सुखासाठीच मी ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला गं. मला माफ कर. बस्स. संपल सगळं. शेजारच्या लोकांना बोलावून आईचं क्रियाकर्म आटोपलं. माझ्याबद्दल लोकांत कुजबुज होवू लागली. काय उत्तर देणार?  मी कायमचं घर गाव सोडून खूप धक्के खात इथे आले. इथे पण मला सहज  आसरा नाही मिळाला. इथे येण्याचं कारण मला सांगाव लागलं. माझ्याकडे  पैसे आहेत अस कुणाला कळलं असतं तर  माझी लूटपाट करून  माझं काय केलं असतं  कुणास ठाऊक. माझ्याकडचे पैसे मी इथे ठेवले. मालती मॅडमना माहित आहे. त्याच देतात मला पैसा. त्या पैशातून ह्या तारखेला मी लहान मुलांसाठी खाऊ, खेळणी माझ्या मुलाच्या वयाच्या मुलांना कपडे देते. पाचचा झाला. आता शाळेतही जायला लागला असेल.
जिथे कुठे माझा मुलगा असेल त्याला दीर्घायुष्य मिळू दे. आईबापाचे भरपूूर प्रेम मिळू दे. सुखी आनंदी असू दे. मनापासून आशिर्वाद देते त्याला. हे एवढच माझ्या हातात आहे मावशी.
ती गप्प झाली. मलाही कळेना काय बोलाव ते. "स्त्री जन्मा ही तुझीच कहाणी."
जग जेवढ चांगलं तेवढच फसवं पण आहे. एक मातृत्वासाठी रडणारी स्त्री तर दुसरी मातृत्व झटकून आपलं सूख शोधणारी स्त्री. आपल्या सुखासाठी मुलाला दूर लोटणारी एक आई आणि मूल जवळ नसताना सुध्दा त्याच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना करणारी ही आई. हे बोलताना माझा गळा दाटून आला.
काय झालं मावशी. एवढ्या भावूक कां झालां.
सांगेन कधी तरी. चल भूक लागली असेल. जेवणाची वेळ झालीय. जा जेवून घे.
तेव्हाच मी ठरवलं. मायाला तिचं मातृत्व मिळवून द्यायचं. जन्म दिला तरच मातृत्व मिळतं अस नाही. आई सारखंच संगोपन करून ही आई होऊ शकते. जन्म न देता यशोदेला कृष्णाची आईच म्हणतात ना. माझ्या आकाशला पण आई मिळेल. मला मनापासून वाटतं मायाच त्याला नीट सांभाळू शकेल. मी तीला आईचे पूर्ण हक्क देईन. लवकरच मी घेतलेला निर्णय पूर्णत्वात आणीन. माझी काही मदत हवी असल्यास मला सांगा. हा माझा फोन नंबर. कधीही फोन करू शकता. मलाही तुमचा निर्णय पटलाय.आजींचा निरोप घेऊन मी निघाले. खरोखर ग्रेट आहे आजी. आकाशच्या भविष्याचा सखोल विचार करूनच हे एवढं मोठ पाऊल उचलतायेत. त्यांना यश मिळू दे देवा. मी देवाला हात जोडले.
    आता आकाश नियमित शाळेत येत होता. आता आजीला त्याला घेऊन आश्रमात जायची गरज नव्हती. आकाशसाठी आई निवडली होती. एक दिवस मला अचानक फोन आला. सानेबाई नमस्कार. मी जिंकले. माझा निर्णय सगळ्यांना मान्य आहे. माया तयार झाली. इथे आकाशचे  आजोबापण पण खुश आहे. म्हणाले खूप विचार करून आकाशच्या भविष्याचा विचार करून तू हा निर्णय घेतलाय. माझा पूर्ण पाठींबा आहे. आता मिळून पुढचं ठरवू. आकाशला मनवायचं काम आता आपल्या दोघांना करायचं. आणी काय आश्चर्य? आकाशही तयार झाला. मायामाई माझी आई होणार हे ऐकुन खूपच खुश झाला. पहिल्यांदाच त्याच्या चेहेऱ्यावर खुशी दिसत होती. बेटू आकाश, आत्ताच कुणाला सांगायचं नाही.
माझ्या सानेबाईनां पण नाही?  
हां त्याना सांग. उद्या तो तुम्हाला सांगेल. म्हणूनच आज फोन केलाय. आता लवकरात लवकर सगळं ठरवायचय. मला राहवलं नाही. फोनवर बोलण्यापेक्षा समक्षच भेटून बोलू. म्हणून मी आकाशच्या घरी आले. नेहमीप्रमाणेच आकाश-आजोबा फिरायला गेले होते.
अभिनंदन आजी. बाजी जिंकली.
पूर्ण नाही. अर्धी.
कसं केलं सगळं?
मालती मॅडमना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. त्याही म्हणाल्या खुप छान निर्णय घेतलाय तुम्ही. माया खरोखरच चांगली मुलगी आहे. तिचा पास्ट बघतां आई  बनून सुद्धा आईपण मिरवता नाही आलं. तुमच्या ह्या निर्णयावर मी पूर्ण सहमत आहे. संस्थेतील मेंबर्सची सोमवारी मीटिंग झाली. म्हणाले, मॅडम तुम्ही एका मुलीचं भलं करताय. मायाला तिचं हरवलेलं मातृत्व  मिळवून देताय. हे एक मोठ पुण्याचं काम आहे. तर हे बोलले. नाही साहेब. आम्हीपण आमचा स्वार्थ बघितलाय. आमच्या नातवाला पण आईची गरज आहे. आमचंही वय वाढतंय. त्याच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही कायदेशीर रित्या मायाला आकाशची आई म्हणून दत्तक घेणार. सगळे अधिकार तिला मिळावे म्हणूनच कायदेशीर स्टॅम्प पेपरवर सर्व साक्षीदारांच्या, नातेवाईकांच्या समक्ष आम्ही मायाला दत्तक घेणार. आमच्यानंतर तिला कुणाचाही कसलाच त्रास होणार नाही म्हणून हा खटाटोप. आपली संम्मती आहे?
अहो ह्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. मायाच्या बाजूने पूर्ण खर्च ही संस्था करणार.
आणी आपले नातेवाईक? 
आकाशच्या काका-काकू आणी आत्याला नीट पटवून दिलं. सुरवातीला थोडी कुरबूर केली. तेव्हा हे बोलले. तुम्ही आधीच त्याची जबाबदारी नाकारलीय. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं.
पण दादा-वहिनी?
त्यांच इथे काहीच देणं-घेणं नाही. घटस्फोट घेताना विचार केला होता का आकाशचा? नाही ना?  प्रॉपर्टीचे सगळे अधिकार मी आकाशच्या नावावर केलेत. तो अठराचा होई पर्यन्त आम्ही बघू. आमच्या नंतर त्याची आई म्हणुन मायाला अधिकार मिळतील. ह्याच्यात काहीही बदल होणार नाही. आकाशची आई म्हणुनच तिला ओळखलं  जाईल. सगळीकडून ग्रीन सिग्नल मिळालय. आता लवकरच आकाशची आई म्हणून मायाचा ग्रृहप्रवेश होईल. आकाशने  मायाच्या गळ्यात  फुलांचा हार घातला व तिच्या मांडीवर बसला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. टाळ्यांच्या आवाजाने माझी तंद्री तुटली. आणि मी पण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. आज आकाशला आई आणी मायाला तिचं हरवलेलं मातृत्व मिळालं. हा एक आगळा वेगळा सोहळा झाला. आणि ह्याची मी पण एक साक्षीदार आहे.
हा एक अकल्पित निर्णय ह्या आजी-आजोबांनी घेतलाय. मला वाटत सरकारने पण अश्या निर्णयाला सम्मती दिली पाहिजे. ही आजची गरज आहे.

इति!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...