मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1484. नवरात्र

     डॉक्टरांच्या क्लिनिक मधून बाहेर पडलेली ती उन्हाच्या काहिलीने दमून गेली होती. खरं तर त्यापेक्षाही डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून ती मानसिक थकली होती.  इतक्यात तिचे आवडीचे रसाचे गुऱ्हाळ तिला दिसले आणि ती आता जाऊन बसली.  एक ग्लास रस पिवून तिचे समाधान झाले नाही. म्हणून तिने आणखी एक ग्लास घेतला. 
‘अग किती रस पितेस बाधेल ना.’
‘तुझे आपले काहीतरीच हां. लहान आहे का मी आता रस बाधायला.’
असे म्हणून ती नेहमीच त्याचे बोलणे उडवून लावायची.  पण आज डॉक्टरांच्या सांगण्यावर तिला विचार करावाच लागणार होता. नवरा अल्झायमरने आजारी.  सगळे सगळे विसरला आहे. दोन दिवस झाले खाणेही विसरला. 
डॉक्टर म्हणाले, ‘आता फार दिवस नाही. कधीही काहीही होऊ शकत. मनाची तयारी करा.’
दोन्हीही मुले फॉरेनला. त्यांना यायला वेळ नाही. चिपळूण मध्ये मोठा वाडा आहे. अजून लोक दोघांना मान देतात. त्यामुळे ही सुद्धा निश्चिंत होती. कधीही काही लागले, अडले तर अख्खा गाव मदतीला येतो. आणखी काय हवे आहे. आज डॉक्टरनी सांगितले की तिला कॅन्सर आहे लास्ट स्टेज. आपल्याला हे ऐकून वाईट वाटले की अजून आपण त्या शॉक मध्येच आहोत हे लक्षात येण्याआधी तिच्या मनात एकच विचार आला. नवऱ्याचे काय माझ्या मागे? रस पिऊन झाल्यावर ती जवळच असलेली तिची आवडती छोटीशी टेकडी तिथे जाऊन बसली. समोर क्षितिज दिसत होते आणि सूर्य हळूहळू अस्ताला चाललं होता. अचानक तिला खूप रडू आले. हमसून हमसून ती रडायला लागली. रडण्याचा जोर कमी झाल्यावर एक अनामिक हुरहुर निराशा तिच्या मनाला व्यापून टाकायला लागली.  सूर्य अस्ताला जाई पर्यंत ती तिथेच बसली. त्या लाल गोळ्याला बघत ती म्हणाली, ‘आज पर्यंत सगळे निर्णय त्यांनी घेतले. पण आता मला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. ज्यात मला तुझी साथ हवी आहे. अस्ताला जातानाही तू अनेक मनमोहक रंगांची उधळण करत आम्हाला उद्याच्या उदयाची आठवण करून देतोस. त्यामुळे अस्ताला जाणारं आमचे मन, परत उद्याच्या आशेने पल्लवित होते. तुझ्याकडून घेतलेली ही चेतना मला माझे कार्य पूर्ण होण्यासाठी सारथी बनेल अशी मी आशा करते.’ आणि अचानक अस्ताला जाणारा सूर्य परत किरणाची उधळण करत गेला. त्याच्या होकाराने ती शांत झाली. 
     कुलूप काढून घरात शिरल्यावर तिने दिवे लावले. अंधारलेले घर एकदम उजळून निघाले. बिछान्यावर झोपलेल्या नवऱ्याला तिने जाऊन हळून उठवले. शंकर त्यांच्या घरीच लहानाचा मोठा झालेला आणि आता तिचा हक्काचा आधार, बाजूलाच बसला होता. नवऱ्याने डोळे उघडून तिच्या कडे परक्या नजरेने बघितले आणि तिच्या मनात एक कळ उठली. दोन वर्षांपासून झालेला हा आजार,त्याला तिच्यापासून लांब घेऊन गेला होता. आधीपासून असेलही कदाचित, पण ह्याचे मितभाषीपणामुळे ते लक्षात आले नाही. आणि जेव्हा आले तेव्हा खूप उशीर झाला होता. पण गेल्या दोन वर्षात त्याने असे परक्या नजरेने बघितले की तिला तेव्हढेच वाईट वाटायचे. मुले अधून मधून फोन करतात, विचारपूस करतात. त्यांचे कर्तव्य संपले. पण हा शंकर आपला आहे. ना जातीचा ना नात्याचा पण आपल्याला गेले दोन वर्ष त्याने जे सावरले आहे. ते ती कधीच विसरू शकत नव्हती. सकाळी ती बरीच सावरली होती. रात्रभर विचार करून ती एका निर्णयाप्रत आली होती. सकाळी सगळे आटपून शंकरला सगळ्या गोष्टी सांगून ती बाहेर पडली. 
     वकील अभ्यकरांकडे ती गेली. सगळे बोलून झाल्यावर तिने सगळे नीट ऐकून घेतले. सगळ्या कागदांवर स्वत:च्या सह्या केल्या. घरी गेल्यावर नवऱ्याचा अंगठा घ्यायचा हे तिने लक्षात ठेवले. बाकी कागदपत्रावर वकिलांनी सह्या केल्या. कागद झोळीत घालून तिथून बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. सुटकेचे समाधान. घरी आल्यावर तिने शंकरला जवळ घेऊन सगळे समजावले. तो तिच्या पायावर पडून रडायला लागला. मोठ्या निग्रहाने डोळ्यातले पाणी आवरत तिने त्याला सावरले. रात्री त्याच्या आवडीचे सोलकढी भात आणि सुरणाचे काप करून तिने वाढले. त्याला काही कळले की नाही हे तिला कळले नाही पण त्याच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य दिसले तिला. आणि कुठेतरी ती सुखावली. सकाळी लवकर उठून घरातले सगळे कागदपत्र, पैसे दागिने सगळे घेऊन ती शंकर बरोबर नवऱ्याला घेऊन निघाली. चिपळूण मधून तिने टॅक्सी मागवली होती ती पनवेल ला आली, तिथे अल्झायमर पेशंट साठी अद्ययावत सेंटर होते. पैसे दिल्यावर सगळे डॉक्टर, नर्स, आचारी, सेवक सगळे मिळत होते. तिने पूर्ण माहिती करून घेऊन इथे त्याला आणले होते. पैसे भरून तिने त्याच्या फाईल मध्ये एक चिठ्ठी ठेवली. आणि त्याच्याकडे ना बघता ती बाहेर पडली. शंकरला हुंदके देताना पाहून तिलाही अगदी निराधार झाल्यासारखे वाटले. पण निग्रहाने तिने निराश विचार मागे सारले. 
‘शंकर गावाचे घर, थोडी नारळी पोफळीची झाडे सगळं तुझ्या नावावर केले आहे. गेल्या जन्मीचे आपले नाते होते ते अजूनही तसेच राहील पण तुला काही तरी देऊन जायचे होते मला. आज तुझ्या कर्जातून थोडी तरी मुक्ती मिळाली मला. तू आता घरी जा.’
‘पण मामी तुम्ही? तुम्ही कुठ जाणार? मी तुम्हाला एकट सोडणार नाही.’
कठोर आवाजात तिने त्याला सावरले आणि परतही पाठवून दिले. तो नजरे आड झाल्यावर ती आपली बॅग उचलत आपल्या भाची कडे गेली. तिच्या हातात पन्नास हजार ठेवून तिने सांगितले की मी जास्त दिवस जगणार नाही आहे. कधी मला काही झालं तर ह्या पैशात भागव. मुलांना कळव पण ते येतील ह्याची मला तरी आशा नाही. त्यानंतर तिने औषधोपचार बंद केले.  एका महिन्यात ती गेली. भाचीने सांगितल्याप्रमाणे केले. नवरा तीन महिने होता. डॉक्टरनी सांगितल्याप्रमणे तोही गेला. संस्थेने त्याचे समान बघितले त्यात एक चिठ्ठी होती.
‘मी आणि माझा नवरा आमच्या चिपळूणच्या साध्या कौलारू घरात सुखी होतो. मुले मोठी झाली, पण इतकी मोठी झाली की आमच्या लहानशा डोळ्यातून ती बाहेर पडली. त्याचे दुःख नाही पण एकदाही त्यांना त्यांच्या जगातून आपल्या आई वडिलांशी बोलावेसे वाटले नाही. आम्ही दोघांनी तेही मान्य केले. आणि आनंदात राहु लागलो. गाव आमचे होते आम्ही गावाचे होतो. दिवसभर आमच्या अंगणात गोकुळ भरलेले होते. पण अचानक ह्यांना अल्झायमर झाला. कुणालाच अगदी मलाही विसरून गेले. मी त्यातही शांत होते. शंकर माझा कुणीही नसून माझा सर्वस्व आहे. त्याने आमचं घर सांभाळले. तीन महिन्यांपूर्वी मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की मला कॅन्सर आह शेवटची स्टेज. तेव्हा मात्र मी हादरले. जर मी आधी गेले तर माझ्या नवऱ्याचं काय होईल. गाववाले दिवसभर, आयुष्यभर येणार नव्हतेच. तोही डॉक्टरांच्या मते चार पाच महिने होता. मग मी मला सगळ्या पाशातून मुक्त केले. घर आणि बाकी सारे शंकरच्या नावे केले आहे. बँकेतले पैसे, दागिने मी माझी दोन्हीही मुलांच्या नाव करत आहे. ते सुद्धा का तर त्यांनी शंकरला घराबाहेर काढू नये. सगळं कायद्याप्रमाणे केले आहे. तरीही त्यांना जे हवे ते मी त्यांना देत आहे. माझा नवरा गेला की माझ्या मुलांना कळवावे. आले तर ठीक नाही आले तरीही ठीक. पण जरी ते आले तरी माझ्या नवऱ्याचा अंतिम देहसंस्कर शंकरनेच करायचा आहे. हे मी मुद्दाम लिहून ठेवले आहे. तुम्ही तुमच्या परीने हे सगळे असेच कराल. माहित असून सुद्धा मी मुद्दाम दोन वर्षांचे पैसे भरले आहेत. त्या पैशात कुणी सनाथामधील अनाथ आला तर त्याला राहुदेत तुमच्याकडे. अनाथ म्हणजे कुणी नसलेला पण सनाथा मधील अनाथ म्हणजे मुले बाळे असूनही अनाथ... माझी कोणतीही तक्रार नाही. पण त्यांच्या साठी वाट बघत मरायचे हे मला मान्य नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. आमच्या दोघांच्या अंतिम क्रियेसाठी मी पैसे दिले होते. त्यामुळे आयुष्यभर ज्या मानात आम्ही राहिलो तोच मान घेऊन अंतिम प्रवासाला निघालो. हातातल्या चिठ्ठी कडे बघत संस्थेच्या संचालकांनी हळूच डोळ्यातले पाणी पुसले आणि ताठ मानेने ते बाहेर आले.  एका मानी कुटुंब प्रमुखाची  तितक्याच मानाने पुढची तयारी करायला. त्याच्या सरस्वती ने केलेल्या, आपल्यातील अनाथ पणाच्या राक्षसाचे निर्दालन जणू तिच्यातल्या कालीची आठवण करून देत होते. तर मुलांना हवे ते देऊन, त्यांना आपल्या इच्छेविरुद्ध न जाऊ देण्यात तिच्यातली दुर्गा उठून दिसत होती.
नवरात्र म्हणजे तरी काय असते. आपल्यातल्या शक्तीला ओळखून तिचा वापर आपल्या आणि जगाच्या कल्याणासाठी करणे ही सुद्धा नवरात्रच आहे.

- श्रद्धा राजेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...