मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1492. पाऊस

      मैनेला शेवटच्या घरी पोहचायला उशीरच झाला होता. खरेतर गावापासून किंचित दूर असलेले ते घर सोडून द्यावे असे खूप दिवस तिच्या मनात होते. पण मालकीणबाईचा स्वभाव खूपच चांगला होता. शिवाय घरात दोघेच. त्यामुळे भांडेही कमी निघायचे आणि धुण्याचे कपडेही. पगार चांगला, खाडे पडले तरी मालकीण पैसे कापायची नाही, काही नवीन पदार्थ केला तर आवर्जून द्यायची. एकंदर सर्व छान होते त्यामुळे ते घर सोडायचा विचार मैनेने मागे टाकला. आजही मैना भराभर चालत त्या बंगल्याकडे निघाली. घर काही अंतरावर राहिले आणि अचानक पाऊस सुरू झाला. नेमका त्या रस्त्यावर काहीच आडोसा नव्हता. मैना अक्षरशः धावत धावत बंगल्यापर्यंत पोहचली. तरीही भिजली. थरथरत्या हाताने तिने बंगल्याची बेल वाजवली. दोन मिनीटानंतर दार उघडले. दारात साहेबांना पाहून ती एकदम थबकली. साहेब क्वचितच घरी दिसायचे. दुपारी तर नाहीच.
 "ताई नाहीत का?"
 "नाही. ती बाहेर गेलीय. यायला हवी होती एव्हाना. पाऊसामुळे अडकली असेल. तुम्ही भांडे घासून घ्या ना?" 
मैनेने शरीराला चिकटलेली साडी  पदर घेऊन पुन्हा आवळली. तिच्या ओलेत्या शरीरावर साहेबांनी एक ओझरता दृष्टीक्षेप टाकल्यासारखे तिला वाटले.
"नको. मी नंतर येते. परत येईल संध्याकाळी."
"एवढ्या पावसात? ठीक आहे." साहेब काहीसे आश्चर्याने म्हणाले.
    मैना परत जायला वळली. बंगल्याच्या पायऱ्या उतरणार तितक्यात तुफान पाऊस सुरू झाला. इतका की समोरचे काहीच दिसेना. मैनेचा नाईलाज झाला. एवढ्या पावसात जाणे मुर्खपणाचे ठरले असते. अखेर तिने  बंगल्याच्या व्हरांड्यातच थांबणे पसंत केले. तरीही ती काहीशी अस्वस्थ होती. गावापासून दूर बंगला. त्यात मालकीणबाई घरी नाही. पण दूसरा काही पर्याय ही नव्हता. 
       बराच वेळ ती उभी राहीली पण पाऊस थांबण्याचे लक्षण दिसेना. उभे राहून पाय दुखायला लागले. ओलीचींब झाल्याने थंडीही वाजू लागली होती. तेवढ्यात चाहूल लागली म्हणून तिने मागे वळून पाहिले तर एक प्लॅस्टिकची खुर्ची आणि टॉवेल घेऊन साहेब उभे दिसले. खुर्ची व्हरांड्यात ठेवत साहेब म्हणाले, "बसा इथे आणि अंगही पुसून घ्या." टाॕवेल खुर्चीवर ठेऊन साहेब आत निघून गेले.. 
      तिने तो टाॕवेल हातात घेतला. मऊ जाड टर्कीश टॉवेल ती पहिल्यांदाच वापरत होती. तिने अंग भराभर पुसले. अंग पुसतांना साहेब आपल्याला बघत तर नाही ना म्हणून तिने आत नजर टाकली पण साहेबाचा पत्ता नव्हता. खुर्चीवर बसायची मैनेची हिंमत होईना. पण शेवटी पायांचे ऐकावे लागले. ती खुर्चीत बसली. तिला खरेच बरे वाटले. तिने पुन्हा बाहेर नजर फिरवली. पाऊस धुवांधार कोसळतच होता.
'केव्हा थांबतो कुणास ठाऊक का इथेच संध्याकाळ होईल?'
      अचानक घरच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली. उशीर झाला तर दोन्ही पोरं वाट पाहतील‌. शिवाय संध्याकाळचा स्वयंपाकही करायचाय. एक जेमतेम छत्री होती घरी, ती ही आणली नाही याचा तिला आता पश्चाताप झाला.
"घ्या." 
     साहेबांच्या आवाजाने ती भानावर आली. तिने वळून पाहिले तर एका हातात चहाचा कप घेऊन साहेब उभे होते. तिला एकदम संकोचल्यासारखे झाले. "कशाला साहेब?" तिला पुढे पटकन काही बोलताही येईना.
"घ्या. तुम्ही एवढ्या भिजून आल्या. कमीतकमी चहा तर घ्या. तेवढेच बरे वाटेल." साहेबांनी चहाचा कप तिच्या हातात दिला आणि पुन्हा आत निघून गेले.
     ती चहाचा कप तोंडाला लावणार तेवढ्यात ती थांबली. साहेबांनी यात गुंगीचे औषधबिवषध तर टाकले नसेल ना? आपण चहा प्यायचा आणि.. सिनेमात, मालीकांमध्ये असे गुंगीचे औषध टाकून काय काय करतात हे तिने पाहिले होते. पण साहेब कशाला असे करतील? ते तर घरी असले तरी तिच्याशी कधी बोलायचेही नाही. शेवटी मनाचा हिय्या करून तिने पहिला घोट घेतला. तिला एकदम तरतरी वाटली. चहात भरपूर दूध आणि साखर टाकली होती. साहेबांना चहा करण्याची फारशी सवय नसावी. ती हसली. हळूहळू तिने चहा संपवला. कपबशी बाहेरच पावसाच्या पाण्यात धुऊन कोपऱ्यात उपडी ठेवली. तिला खरेच खूप बरे वाटले. 
      पावसाचा जोरही हळूहळू कमी होत होता. तरीही ती थांबली. पुन्हा भिजण्याची तिची इच्छा नव्हती. शिवाय आता तिला इथे बऱ्यापैकी सुरक्षित वाटू लागले होते.
       पाऊस आता बराच कमी झाला होता. ती निघण्याची तयारी करू लागली. टॉवेलची नीट घडी करून तिने खुर्चीवर ठेवली. साहेबांना 'मी जाते' हे सांगण्यासाठी ती दाराकडे वळणार तोच साहेब एक छानशी छत्री घेऊन तिच्यापुढे आले.
"घ्या. पण उद्या आठवणीने घेऊन या. एकच छत्री आहे आमच्याकडे" साहेब हसतहसत म्हणाले. तिच्याही चेहऱ्यावर स्मित उमटले.
 "नक्की साहेब."
       तिने छत्री उघडली आणि निघणार तेवढ्यात ती पुन्हा थांबली. छत्री बंद करून तिने व्हरांड्यात ठेवली आणि बंगल्याच्या आत जाऊ लागली. साहेबांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला पहात म्हणाली, "काही नाही. भांडी घासूनच जाते."
       मैना बंगल्यातून बाहेर पडली तेव्हा बाहेर पाऊस थांबून कोवळे उन पडले होते आणि मैनेला का कोण जाणे, खूपच प्रसन्न वाटत होते.

©® विवेक चंद्रकांत वैद्य, 
नंदूरबार, 8149100210.

(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा वाचण्यासाठी माझ्या 9325927222 या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा -मेघःशाम सोनवणे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...