शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

1472. नात्यातला विश्वास

      समीर अस्वस्थपणे मानसोपचारतज्ञ डॉक्टर नेहाच्या समोर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव स्पष्ट दिसत होता. त्याने खोल श्वास घेतला आणि डॉक्टर नेहाला सांगू लागला, "डॉक्टर, माझी बायको साक्षी हल्ली शून्यात हरवलेली असते. ती माझ्या आई-वडिलांचा, भाऊ-भावजयांचा खूप राग धरते. इतका राग की ती माझ्या घरी यायलाही तयार नसते."
डॉक्टर नेहाने  विचारलं, "कुठे आहे तुमची बायको?"
समीरने संकोच करत उत्तर दिलं, "मॅडम, तिला बाहेर बसवलंय. तुम्हाला आधी सगळं सांगायचं होतं, म्हणून मी आधी आलो."
डॉक्टर नेहाने थोडं हसत विचारलं, "ठीक आहे, समीर. तुम्हाला काय सांगायचं आहे, ते सांगा."
समीरने खोलीभर नजर फिरवली, जणू काही त्याला विचार करावा लागत होता की कुठून सुरुवात करावी. "डॉक्टर, मी मोठ्या कंपनीत ऑफिसर आहे. आम्ही दोन भाऊ. माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको माझ्या आई-वडिलांसोबत नागपुरात राहतात. मी नोकरीनिमित्त पुण्यात असतो. माझं आणि साक्षीचे लव्ह मॅरेज आहे. लग्नाआधी ती थोडी हळवी, जिद्दी, आणि स्वतंत्र विचारांची होती, पण तरीही ती मला खूप आवडायची. तिच्या प्रत्येक निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यात, तिच्या स्पष्टतेत काहीतरी खास होतं."
त्याच्या आवाजात एक प्रकारचा कातरपणा आला, "पण लग्नानंतर सगळं बदलत गेलं. आता लग्नाला चार वर्ष झालीत. सुरुवातीचे काही महिने आम्ही नागपुरात राहिलो. पण माझी नोकरी पुण्यात असल्यामुळे आम्ही तिथे शिफ्ट झालो. माझ्या कुटुंबाशी संपर्क फारसा येत नाही, पण तरी ती माझ्या कुटुंबाचा राग का करते, ते मला काहीच कळत नाही. तिच्या वागण्यात खूप बदल झालाय. ती शांत झालीय, एकटी राहते, आणि माझ्याशी पण जास्त बोलत नाही."
डॉक्टर नेहाने समीरच्या चेहऱ्याकडे बघत शांतपणे विचारलं, "तुम्ही म्हणताय की ती तुमच्या कुटुंबाचा राग धरते, पण नेमकं तिला काय त्रास होतोय, हे कधी विचारलंय का? तुम्हाला कधी असं वाटलं का की कदाचित काही गोष्टी तिच्या मनात आहेत, ज्या ती सांगू शकत नाहीये?"
समीरने थोडा वेळ गप्प राहून उत्तर दिलं, "डॉक्टर, मला असं वाटतंय की काहीतरी नक्कीच आहे. पण ती मला कधीच स्पष्टपणे काही सांगत नाही. फक्त 'ठीक आहे' असं बोलून विषय बदलते, पण मला माहीत आहे की काहीतरी बिनसलंय. ती अशी कधी नव्हती."
डॉक्टरने एक क्षण विचार केला आणि मग म्हणाली, "ठीक आहे, समीर. तुम्ही तिला आत पाठवा. मला तिच्याशी बोलायचं आहे."
समीर बाहेर गेला आणि साक्षीला आत पाठवलं. साक्षी खोलीत आली, तिच्या चेहऱ्यावर थोडं संकोचाचं आणि तणावाचं प्रतिबिंब होतं. डॉक्टर नेहाने तिला हसून विचारलं, "कसं चाललंय साक्षी? तू ठीक आहेस ना?"
साक्षीने थोडं हसत उत्तर दिलं, "हो, डॉक्टर. मी ठीक आहे."
डॉक्टरने तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं आणि विचारलं, "समीर म्हणतोय की तू त्याच्या कुटुंबाचा राग धरलायस. नेमकं काय चाललंय तुमच्यात?"
साक्षीने काही क्षण शांत राहून विचार केला. मग ती थोडीशी धीर धरत बोलू लागली, "डॉक्टर, समीर चांगला आहे. पण त्याचं एक आहे की, आमच्या नात्यातल्या प्रत्येक गोष्टीचं त्याला त्याच्या आई-वडिलांना सांगायचं असतं. आमच्या भांडणांपासून ते छोट्या-छोट्या गोष्टींपर्यंत. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं खास नातं नाहीये. माझ्या सासरच्यांना सगळं माहीत असतं आणि मला त्यांच्या समोर कमीपणा वाटतो. त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. ते मला मूर्ख, बावळट समजतात असं वाटतं. बरेचदा सासूबाईंच्या बोलण्यातून जाणवायचं की मी त्यांच्या मुलाला खूप त्रास देते. मी त्याला खूप वेळा सांगितलंय की काही गोष्टी फक्त आमच्यातच राहाव्यात, पण तो कधीच ऐकत नाही."
डॉक्टर नेहाने विचारात पडून विचारलं, "त्यामुळे तू त्याच्या कुटुंबापासून दूर राहतेस?"
साक्षीने मान हलवली, "हो, डॉक्टर. आता मला त्यांच्यात मिसळायचं नकोसं वाटतं. त्यांच्यासमोर जायचं म्हणजे त्यांना सगळं माहीत असतं की आम्ही काय बोललो, काय भांडलो. मला असं वाटतं की आमच्या नवराबायकोच्या नात्यातलं खाजगीपण हरवतंय. त्याचं ते वागणं मला खूप वेगळं वाटतं. त्याच्या आई-वडिलांना सगळं सांगितल्यामुळे ते माझ्यावर जजमेंट पास करतात असं मला वाटतं आणि हळूहळू मी त्यांच्यापासून दूर होत गेली."
डॉक्टर नेहाने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि म्हणाली, "साक्षी, हे बघ. तुझा नवरा काही गोष्टी चुकीच्या करतोय, पण त्याचं त्याच्या आई-वडिलांशी असलेलं नातं विशेष आहे. त्यात बदल व्हायला वेळ लागेल. पण तू त्याला थोडं समजून घेतलं पाहिजे. तुमच्या नात्याचं बंधन मजबूत करायचं असेल, तर तू त्याच्यावर प्रेम दाखवायला हवं. त्याला समजून घे आणि हे पण समजून घे की, त्याचं कुटुंब तुझं शत्रू नाहीये."
साक्षी विचारात पडली. तिला समजलं की डॉक्टर नेहाचं म्हणणं खरं होतं. "डॉक्टर, मला कळतंय... त्यांची काही चूक नाही. चूक माझ्या नवऱ्याची आहे, पण तरीही मला फार तिरस्कार वाटतोय. त्यांच्यामुळे आमचं नातं कधी बहरलंच नाही असं वाटतंय."
डॉक्टरने समजावणीच्या सुरात म्हणाली, "साक्षी, असं नसतं. तुला ते नातं स्वीकारावं लागेल आणि संबंध सुधरवावे लागतील."
"मी प्रयत्न करेन. पण कधी कधी खूप अवघड वाटतं," साक्षी म्हणाली.
डॉक्टर नेहाने तिचा हात धरत हसत सांगितलं, "प्रत्येक नातं सांभाळणं अवघड असतं, साक्षी. पण तू एकदा प्रयत्न करून बघ. जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्याल, तेव्हा सगळं सोपं होईल. आणि हो, साक्षी, नातं टिकवण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. एकदा तुम्ही दोघं एकमेकांच्या भावना समजायला लागलात, तर सगळं सोपं होईल."
साक्षीने हलकंसं हसून मान हलवली. "ठीक आहे, डॉक्टर. मी प्रयत्न करेन."
"आता तू समीरला आत पाठव," डॉक्टरने सांगितलं.
समीर आत आला, आणि डॉक्टर त्याच्याकडे पाहत म्हणाली, "समीर, तुमच्या बायकोला तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची गरज आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट कुटुंबात शेअर करता, ती गोष्ट तिला पटत नाही. तिला असं वाटतं की तुमचं नातं खास राहिलं पाहिजे, काही गोष्टी फक्त तुमच्या दोघात असायला हव्या. तिचं तुमच्या कुटुंबात समोर हसू व्हायला नको आणि या अपेक्षा प्रत्येक बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून असतात."
समीर थोडा गोंधळला आणि म्हणाला, "पण डॉक्टर, मी सहजपणे सांगतो गोष्टी. त्यात काय एवढं?"
डॉक्टर हसून म्हणाली, "सहजपणे जरी असलं तरी, त्यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास कमी झालाय अणि आत्मविश्वस सुध्दा.तिला वाटतं की, तुम्ही तिच्यापेक्षा तुमच्या कुटुंबाला अधिक महत्व देता. आणि प्रत्येक गोष्ट घरच्यांशी शेअर केल्याने तिला असुरक्षित वाटतंय. आता तुम्हाला तिचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल, तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल."
समीरने मान हलवली, "ठीक आहे, डॉक्टर. मी प्रयत्न करेन. मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करेन."
डॉक्टरने समाधानाने हसत सांगितले, "तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्या, आणि पुढच्या महिन्यात परत या. बघूया, काय बदल होतो ते."
समीरने डॉक्टरांचे आभार मानले आणि साक्षीकडे गेला. त्यांच्यातील नातं अधिक मजबूत करण्यासाठी आता दोघांनाही एकमेकांवर प्रेम आणि विश्वास ठेवण्याची गरज होती.
तेवढ्यात समीरचा फोन वाजला; आईचा फोन होता.  
"हॅलो, समीर, काय करतोस?"  
"आई, मी..." थोडं थांबून समीर म्हणाला, "आई, मी थोडं कामानिमित्त बाहेर आहे...रात्री बोलतो आरामात," असं म्हणून फोन ठेवला. साक्षीने विश्वासाने समीरकडे पाहिलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...