ए.. मीरा, मीरा sss... राधानी ४/५ हाका मारल्या तरी त्या तुळशीबागेतल्या गर्दीमुळे मीराला काही ऐकू गेल्या नाहीत दोन्ही हातातल्या सामानाच्या पिशव्या सांभाळत राधानी तिला गाठलेच.
खांद्यावर कोणाच्या तरी हाताची चाहूल लागताच मीरा थोडीशी दचकली... आणि मागे वळून पाहते तो काय तिची बालमैत्रीण राधा.. तिला काय बोलायचं सुचेना.. खूप वर्षांनी दोघी एकमेकींना भेटत होत्या...आग किती हाका मारल्या तुला शेवटी धावत येऊन गाठलेच तुला..
आग अशी भूत बघितल्या सारखी काय बघतेस माझ्याकडे. आग मी राधा तुझी बालमैत्रीण, आठवत नाहिये का? राधा अगदी लहान मुलासारखे मोठे डोळे मिचकाव बोलली.
आग वेडे ओळखल ना, न ओळखायला काय झाल, इतक्या वर्षांनी तू अशी अचानक समोर आल्यामुळे खर सांगू का.. मला काही सुचलंच नाही..
तस ही तुला बोलायला सुचतं का? अजून आहे तशीच आहेस की अबोलीच्या फुला सारखी
मीरानी तिला हळूच चापट मारली, तुझ्यात पण काही बदल नाही हो.. तश्शीच आहेस.. बोलघेवड्या सारखी.. (दोघी एकदम खळखळून हसल्या)..
बर ऐक ना मीरा जरा गडबडीत आहे ग, तुझा नंबर दे मला तुला फोन करते.. मग बोलू निवांत, खूप बोलायच आहे ग
एवढी कसली ग गडबड, चल कुठे तरी कॉफी तरी घेऊ, इतक्या वर्षांनी भेटलो आपण कॉफी प्यायला तरी चल..
आग आले असते, अनिकेतची मुंज आहे... अरे हो अनिकेत माझा मुलगा.. बर मुंजीला नक्की यायच आहे.. तस मी रीतसर बोलावण करेनच... आधी तुझा नंबर दे पाहू म्हणजे निवांत बोलता येईल.. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.. आणि बाय म्हणत.. राधा गर्दीतून वाट काढत गेली सुद्धा.. तिच्या पाठमोर्या आकृतीकडे मीरा पहात राहिली... आहे तश्शीच आहे अजून, उत्साहाने वाहणारी नदी... स्वतःशीच हसून ती घराकडे चालायला लागली.... एक एक पावलागणिक ती भूतकाळातील.. त्या दिवसांत पोचली..
मीराच्या पणजोबांचा पेठे मध्ये भला मोठा वाडा त्यात दहा एक तरी भाडेकरू असतिल वर भाडेकरू रहायचे आणि खाली मीरा आणि तिचे आई वडील, मोठा भाऊ राहुल, काका काकू, त्यांची मुलगी समिरा, आजी आजोबा.. एकत्र कुटुंब, वरच्या माडीवर राधा आणि तिचे आईबाबा, आई बाबा दोघेही नोकरीला जात त्यामुळे राधा घरी कमी आणि मीरा कडे जास्त असायची
पण दोघींचे स्वभाव एकदम विरुद्ध, मीरा एकदम शांत, संयमी, नीटनेटकेपणाची आवड असलेली त्या विरुद्ध राधा एकदम बडबडी, जरा म्हणुन शांत बसणार नाही, उत्साही खळखळ करत वाहणारी नदी..पण अभ्यासात मात्र दोघीही तोडीसतोड हुशार होत्या.
वाड्याला हा मोठा दिंडी दरवाजा.. मोठ आंगण, अंगणात छान सुबक तुळशी वृंदावन, वाड्यातील सगळी बच्चे कंपनी त्या मोठ्या अंगणात खेळायची, राधाच्या आई बाबांना, मीराच्या आजी आजोबांनी सांगूनच ठेवल होत आहो जशी आम्हाला मीरा तशीच राधा.. तुम्ही निर्धास्त नोकरीला जा.. त्यामुळे राधेच्या आई बाबांची एक काळजी मिटली होती.
भातुकलीचे खेळ खेळता खेळता दोघी कधी मोठ्या झाल्या कळलच नाही..
दोघीजणी दहावीला उत्तम मार्कांनी पास झाल्या, मीरानी आर्ट्स ला admission घेतली, आणि राधाने कॉमर्स.. त्यामूळे कॉलेज आता दोघींची वेगळी, क्लासच्या वेळा वेगळया.. त्यामुळे एका वाड्यात राहून दोघींची भेट थेट रात्री, अंगणात..तुळशी वृंदावन पाशी.
दिवसभर काय काय झाल सगळ बोलायच्या, अर्थात राधाला किती बोलू, काय काय सांगू अस झालेल असायच...
राधाच्या वडलांनी आता स्वतःचा फ्लॅट घेतला होता, त्यामुळे लवकरच आता ते वाड्यातील जागा खाली करणार होते, मीरा आणि राधाच्या घरातल्यांना इतकी एकमेकांची सवय झाली होती, त्यांच्यामधे भाडेकरू आणि घरमालक हे नातं नव्हतच कधी, अर्थात त्यांनी स्वतःची वास्तु घेतली हा आनंद होताच... पण आता ते वाडा सोडणार हे पचनी पडण सगळ्यांनाच जड जात होते..
त्यातच राधा चा वाढदिवस जवळ आला होता, राधानी हट्टच धरला, वाढदिवस वाड्यात साजरा करून मगच वाडा सोडायचा... आई बाबांना तीच म्हणण पटलं .. मग काय वाड्यातील सगळे, म्हणजे इतर भाडेकरू मीराच्या घरचे.. आणि राधा चे कॉलेज फ्रेंड.. असा मस्त वाढदिवस साजरा करायचा ठरल...
राधाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मीरा आणि राधा नेहमीप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावन पाशी भेटल्या, आज दोघीजणी एकदम गप्प गप्प होत्या काय बोलायच सुचत नव्हते... राधानी मीरा चा हात हातात घेतला.. तसा दोघीही रडायला लागल्या... दोघींना काय बोलाव सुचेना.. तितक्यात त्यांच्या रडण्याच्या आवाजाचा मागोवा घेत मीराची आजी तिथे आली, दोघी एकदम बोलल्या आजी तू जागी कशी, झोपली नाहीस.. अस म्हणत दोघींनी डोळे पुसले..
आग आज नेहमीसारखा तुमच्या, बोलण्याचा, खिदळण्याचा आवाज नाही.. म्हंटल काय झाले ते पहाव.. आणि माझी शंका खरी ठरली.. आग पोरींनो सासरी चालल्या सारख्या काय रडताय, की आता पासूनच प्रॅक्टिस करताय रडायची...
काहीतरी काय आजी अजून अवकाश आहे आमच्या लग्नाला.. आग मीरे राधा वाडा सोडून चालली आहे, म्हणजे आपल्याला सोडून नाही काही, आग अधून मधून आपण भेटत राहूच की आपण त्यांच्या कडे जाऊ, ते आपल्याकडे येतील आणि काय ते तुमच्या भाषेत म्हणतात.. एकत्र जमण्याला... Get together म्हणायच आहे का तुला आजी.. हा हा तेच तस पण करू काय...
आणि तुम्ही भेटालच की या ना त्या निमित्ताने...
आग इतक्या दिवसांचे आपले ऋणानुबंध आहेत... असे थोडेच संपणार आहेत...
चला पळा... आता झोपायला..जा, उद्या राधाच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे, धमाल करायची आहे ना.. मग झोप नको का व्यवस्थित व्हायला... हो आजी जातो झोपायला... गुड नाईट.. म्हणत .. दोघींनी आजीला मिठी मारली.. आणि पळाल्या झोपायला...
त्या दोघींच्या पाठमोर्या आकृती कडे पाहताना.. आजीच्या डोळ्यांच्या कडा मात्र.. नकळत पाणावल्या..
राधाच्या वाढदिवसाच्या दिवशी मीराची शंतनूशी ओळख झाली.. अतिशय खेळकर स्वभावाचा समोरच्याला पटकन आपलसं करून घेणारा शंतनू आवडण्यासारखाच होता... मीरा प्रेमातच पडली होती अस म्हणायला हरकत नाही, २ दिवस झाले तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.. खाण्यात लक्ष नाही की अभ्यासात लक्ष नाही, राधाला नेहमीप्रमाणे अंगणात भेटायला पण गेली नाही, ना जाणो पण राधाच्या लक्षात आल तर.. असा विचार तिच्या मनात चमकून गेला..
पुढचे ८ दिवस तसे धावपळीतच गेले, राधाच्या घरची सामान बांधाबांध... शिफ्टिंग.... चांगला दिवस पाहून राधा नवीन घरी रहायला गेली... सुरुवातीला खूपच चुकल्यासारखे झाले... पण आता हळू हळू सवय झाली...
मीरा ला मात्र आता शंतनू शिवाय चैन पडत नव्हते... राधाशी शंतनू बद्द्ल बोलाव का? असा पुसटसा विचारही मनात येऊन गेला...
हो नाही करता करता... मीरानी राधा जवळ शंतनू बद्दल बोलायच ठरवलं..
राधाच्या घरी त्या दिवशी कोणीच नव्हते.. तिचे आई वडील एका लग्ना करता बाहेरगावी गेले होते
त्यामुळे राधानी मीराला घरी रहायलाच बोलवले होते, मीरानी पण ठरवल आत्ताच वेळ आहे राधाला शंतनू बद्दल आपल्याला काय वाटत हे सांगायची..
रात्री दोघीजणी मस्त पैकी coffee पीत गॅलरी मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या.. राधा मला तुला काहीतरी सांगायच आहे.. जास्त आढेवेढे न घेता.. मीरानी शंतनू आवडतो अस सांगून टाकल...
राधा चा 2min तिच्यावर विश्वासच बसत नव्हता... तिला काय बोलाव सुचेना.. ती एकदम गडबडून गेली...
आणि मीरा... शंतनू बद्द्ल भरभरून बोलत होती...
राधा एकदम भानावर आली... हिला आताच सावध कराव का...? शंतनू बद्द्ल....
राधानी सगळ्या प्रकारे मीरा ला सांगून पाहिल पण शंतनू च्या बाबतीत मीरा काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती... आग शंतनू दिसतो तसा अजिबात नाही, पैशांची अफरातफर, व्यसनी..खोट वागणारा असा आहे, या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता.. राधा म्हणाली आम्हाला सुद्धा हे पटत नव्हते.. पण जसे जसे अनुभव आले तसे आम्ही हळू हळू त्याच्यापासून चार हात लांबच रहायला लागलो...
शंतनू मुळे मीरा आणि राधा मध्ये दुरावा निर्माण झाला तो कायमचा...
त्यानंतर आज अशी अचानक ती तुळशीबागेत भेटली.. त्याक्षणी मीराला तिला कडकडून मिठी मारावी अस वाटलं, किती समजावून सांगितले होते तिनी आपल्याला, वेळप्रसंगी भांडली पण होती.. पण आपण तीच अजिबात ऐकून घेतल नाही, त्यावेळी तीच ऐकल असत तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती..
राधाच्या मुलाच्या मुंजीला मीरा आवर्जून तिच्या दोन जुळ्या मुलींना घेऊन गेली होती जुई आणि सई
खूप वर्षांनी राधाचे आई बाबा भेटले.. राधानी तिच्या सासरकडील सगळ्यांची ओळख करून दिली... राधाच्या मुलाची आणि मीराच्या मुलींची मस्त गट्टी जमली...
मुंज सोहळा छान पार पडला... निघतांना मीरा राधाला बोलणार इतक्यात राधाच पटकन तिचा हात हातात घेऊन बोलली, भेटूयात नक्की खूप काही बोलायच आहे तुला.. माहितेय मला.. भेटू नक्की..
मीराचे डोळे पाणावले... ही खरी मैत्री.. पूर्वी झालेली भांडण, दुरावा कुठेही राधाच्या बोलण्यातून दिसत नव्हता, जणू काही घडलच नाही..
कुठे भेटायच... अस ठरत असतानाच.. दोघी एकदमच बोलल्या, वाड्यातल्या तुळशी वृंदावन पाशी, अर्थात आता वाडा नाही, मोठ कॉम्प्लेक्स झाल आहे.. पण आजीच्या इच्छेनुसार तुळशी वृंदावन मात्र आहे...
आज मीरा आणि राधा भेटणार होत्या..
राधा आणि मीरा ठरलेल्या ठिकाणी भेटल्या, जुन्या वाड्यातल्या आठवणी बोलता बोलता, मीरा नी सरळ विषयालाच हात घातला, इतक्यावेळा तू मला सांगत होतीस शंतनू बद्दल पण बहुतेक मलाच ऐकून घ्यायच नव्हत, काही वेळा समोरचा आपल्या चांगल्या करता सांगत असेल ही साधी गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येऊ नये.. इतके आंधळे झालेलो असतो आपण प्रेमात, की कळत असून वळत नसत.. आग मीरा ते वयच तस असत.. बर जाऊ दे आता सांग.. शंतनू काय करतोय सध्या, तू नोकरी करतेस की नाही.. की घरीच असतेस...
शंतनू ना वर आहे..आकाशाकडे बोट दाखवत मीरा बोलली... काय... राधा जवळ जवळ ओरडलीच आग कधी.. आणि कस.. राधाला पुढे बोलताच येईना..
सांगते सांगते.. सगळ सांगते, सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केल आणि भाड्याच्या 2 खोल्यां मध्ये आमचा संसार सुरू झाला.. पहिले काही दिवस छान गेले, पण तु सांगितल्या प्रमाणे, शंतनू ने स्वतःचे रंग दाखवायला सुरवात केली... ज्या ज्या लोकांन कडून त्यानी पैसे घेतले होते ती लोक आता घरी येऊन तमाशा करू लागली, मी एका शाळेत नोकरीला होते, त्या पगारात कसबसं घर चालवत होते, शंतनू फक्त माझ्या कडून पैसे घेण्यासाठी आणि त्याची पुरुषी तहान भागविण्यासाठी घरी येत असे..
माहेरी जाऊ तरी कुठल्या तोंडाने, पण मला ज्यावेळी सई आणि जुईची वेळी दिवस गेले तसा मी निर्णय घेतला, त्यादिवशी मी मनाचा हिय्या करून माहेरी गेले, माझी ही अशी अवस्था पाहून तर राहुल दादा पोलिसात तक्रार दाखल करायला निघाला होता.. पण मीच त्याला समजावून सांगितले त्याचा काही फायदा होणार नाही, उलट माझ्या त्रासा मध्ये भर पडेल..
आग मग मला फोन का नाही केलास.. अशावेळी मैत्री मधली भांडण, राग बाजूला ठेवायचे असतात ग.. राधा म्हणाली.
मान्य आहे ग पण खर सांगते माझा धीरच झाला नाही तुझ्याशी बोलायचा... माझी सगळी जबाबदारी दादा वहिनीने घेतली, सई आणि जुईच्या जन्मा नंतर मी नोकरी करता परत प्रयत्न करायला लागले आणि एक दिवस मला कॉलेज मधून नोकरी करता call आला.. किती आनंद झाला म्हणुन सांगू.. माझ्या या दोन मुलींचा पायगुणच..आता माझ्या मुलींचा खर्च मी करू शकते, मला कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही.. एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात आला.. अर्थात घरातल्यांनी कधीच मला काही कमी पडू दिले नाही..
माझे आणि शंतनू चे संबंध कधीच संपले होते...मध्ये कधीतरी त्याच्या एका मित्रा कडून तो गेल्याच कळल.. खर सांगते राधा मला काही सुद्धा वाटल नाही की डोळ्यात पाणी सुद्धा आल नाही..
काय मजा आहे बघ ज्या माणसावर मी जिवापाड प्रेम केल तो गेल्याच कळल्यावर मला काही सुद्धा वाटू नये...
आजी आजोबा दोघे गेले, वाडा पण जुना झाला होता, तो आम्ही बिल्डरला दिला आणि पैसे घेतले, दादा वहिनी त्यांची 2 मूल बंगलोर ला असतात, काका काकू, आणि आई, आम्ही सगळे जवळच राहतो कोथरूडमध्ये, म्हणजे आमचे फ्लॅट वेगवेगळे आहेत, 10 min च्या अंतरावर, बाबा 2 वर्षा पुर्वी अचानक गेले ग...
समीरा काका काकूंची मुलगी आठवतेय का? तीच पण लग्न झाले आता ती दिल्ली मध्ये असते...
खर सांगू राधा तुझ्याशी बोलले आणि माझ्या मनावरच ओझ उतरल बघ, आज अगदी मोकळ आणि छान वाटतंय.
मला पण खूप छान वाटलं मीरा. दुरावा दूर झाला.. काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच.. वेळ आणि काळ कोणा करता थांबत नाही हेच खर...
आजी काय म्हणायची आठवतय मीरा, आग आपले वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध.. असे थोडेच संपणार आहेत...
©® शिल्पा केतकर 🌹 🌹.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा