शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

1464. सार्थक

 "नमू, अगं चल  नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर केली आहे. ती पटापट संपव बघू. मला जेवण पण बनवायचं आहे आणि मग मला थोडं बाहेर जायचं आहे. बारशाची सगळी तयारी आणायची आहे. हॉल घेतला असला तरी देण्याघेण्याचं बघायला हवं बाई. आमच्या बहिणाबाईंच्या सासरच्या मंडळींनी नाव काढलं पाहिजे 'छान केलं बारस माहेरच्यांनी' म्हणून..." असं नमिताची बहीण मिथिला हसत हसत म्हणाली. पण नामिताचा अजिबात नूर नव्हता खायचा. ती हॉलमध्ये खेळणाऱ्या बाळाकडे एकटक बघून रडत होती. नुसतंच त्याला खेळवल्यासारखं दाखवत होती पण आज ती मनातून खूप दुःखी होती.
       बारसे झाल्यावर लगेचच आठवडाभरात तिला तिच्या घरी परत जायचं होतं. ताईला सोडून जायचं या विचाराने ती नाराज होती. तरी तिने ताईसाठी कसाबसा हसऱ्या चेहऱ्याने नाश्ता केला. मग मिथिला जेवण बनवून थोडा वेळ बाहेर गेली.. जाताना तिने सतराशे साठ सूचना दिल्या नमिताला. आज बरोब्बर अडीच महिने झाले तिला तिच्या ताईकडे म्हणजेच मिथिलाकडे येऊन. 
      नमू चे दिवस भरत आले आणि तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. हिचं बाळंतपण कोण करणार आता? नमू आणि मिथिलाचे बाबा दोन वर्षांपूर्वीच गेले आणि आईला पण या गोष्टीचा मानसिक धक्का बसला. आणि मानसिक त्रास आला की शारीरिक दुखणी डोकं वर काढतात. एकेक आजार चालू होतात त्याप्रमाणे त्यांना कमरेचं मोठं दुखणं निघालं.. साधं उठबस करताना त्रास होत होता, मग बाळंतपण तर आईचा दुसरा "पण"च जणू.. जो पूर्ण करावाच लागतो आणि हसतहसत बायका करतातही. पण शकुंतलाबाईंना एकच ध्यास लागला होता ते म्हणजे नमिताचं बाळंतपण!
      एकदा मिथिला आईकडे आली तेव्हा आई शांत-शांत आहे हे बघून तिने विचारलं, "काय गं आई, अशी शांत का आहेस? काय झालं? तब्येत बरी आहे ना?" 
      तेव्हा शकुंतलाबाई रडव्या स्वरात म्हणाल्या," काय करू मग. डोकंच चालत नाहीये. मी ही अशी अधू झालेली. आता मनूचं बाळंतपण कोण करणार? पहिलं असल्याने ती माझी जबाबदारी, पण कसं जमवू तेच कळत नाहीये. नमुच्या सासूबाई म्हणतायत तिथेच करतो बाळंतपण. पण अगं माझंच मन मला खातंय. सगळं कसं रीतीनुसार झालं पाहिजे. तुला तर माहीतच आहे मला जरा रीतिभातीत कसर राहिली तर अजिबात आवडत नाही. पण..." असं म्हणून शकुंतलाबाई विचारात पडल्या.
      त्यावर मिथिला आईला म्हणाली, "ह्यात तुझी आई.. एवढंच न! अग मी करते की मनूचं बाळंतपण. म्हणजे बघ हो तुला, मनूला आणि तिच्या सासरच्या मंडळींना चालणार असेल तर.." 
     हो नाही करता करता नमू नोकरी करत असल्याने नववा महिना लागला त्याच दिवशी मिथिलाकडे आली. आणि त्याच दिवशी तिचं तिच्या लाडक्या मिथिला ताईकडे डोहाळजेवण होतं. सगळी तयारी मिथिलाने चोख केली होती. फक्त ती तेव्हा जरा नमूपासून लांब लांब रहात होती. बायका पण मिथिलाच्या आईशीच जास्त बोलत होत्या. मिथिलाशी कुणी जास्त बोलत नव्हतं. नमिताला ही गोष्ट खटकली. पण ती आनंदात होती त्यामुळे त्यावेळी तिने बोलणं टाळलं. 
      मिथिलाने संध्याकाळी नमिताची दृष्ट काढली. "माझ्या लाडक्या लाडू ला कुणाची दृष्ट नको लागायला. किती छान तेज आलं आहे ते कुण्णामुळे म्हणजे अगदी माझ्यामुळे सुद्धा कमी नको व्हायला." 
    हा हा म्हणता १० दिवस झाले आणि अचानक एका मध्यरात्री नमिताला पोटात दुखायला लागलं. मिथिलाने अनुभवी बाईसारखी सगळी तयारी केलीच होती. तिच्या नवऱ्याने गाडी काढून लगेच हॉस्पिटलला नेलं. धावाधाव करायला लागली. सासरची मंडळी आत्ता कुठे ८-१० दिवसांपूर्वी मुंबईला गेली होती तोच परत यायला लागलं. आई तर आता परत येऊच शकणार नव्हती. 
     सासरची माणसं पोहोचेपर्यंत गोड बातमी आली सुद्धा होती. गोंडस असा राजपुत्र झाला होता नमूला. सगळीकडे आनंदी आनंदी झाला. मिथिलाच्या घरभर नुसता धुरी, पावडर, शी शू चा वास भरून राहिला होता. मिथिलाने अगदी मनापासून सगळं केलं नमिता आणि बाळाचं. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून सुद्धा तिने नमिताला सांगूनच ठेवलं होतं, "काहीही झालं तरी मी माझ्या हाताने माझ्या लाडू साठी सगळं करणार. आंघोळ वगैरे काय ते घालूदेत बायकांना, पण बाकी बाळाचं सगळं आणि नमूचं खाणं-पिणं सगळं मीच करणार आहे. मला कुठलीच हयगय नकोय. माझा पहिला वहिला भाचा आहे. मावशीने सगळं करायला हवंच. माझ्यासाठी ह्यातलं काहीच करता नाही आलं पण......"असं म्हणून ती थोडी थांबली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण नंतर इकडे तिकडे बघून पुन्हा म्हणाली, "जाऊदे! तू आराम कर बघू. मी आहे सगळं करायला. फक्त ताईला ऑर्डर सोडायची. ताई सगळं देणार. कळलं का नमू". 
       बोलल्याप्रमाणे त्या दोघांचं कित्ती करू आणि कित्ती नको असं झालं होतं तिचं. रात्री बाळ खूप जागवायचं पण तरीही ती सगळं प्रेमाने करत होती. आणि उद्या बारसं सुद्धा येऊन ठेपलं बाळाचं. 
      नमिता विचारांमधून बाहेर आली. बाळाने कार्यक्रम केला होता. पण ती उठणार तेवढ्यात मिथिला आलीच. तिने नमूला सक्तीने आराम करायला लावला. म्हणाली, "अगं आता थोडेच दिवस आराम आहे तुला तो करून घे. नंतर घरी गेलीस की काय आहेच सगळं करायचं. मी कुठे असणार आहे तिकडे. ऑर्डर सोडून घे आत्ताच. नंतर सासूबाई, बाळ आणि नोकरी यात चक्की पिसिंग अँड पिसिंग करत बसणार आहेस." असं म्हणाल्यावर दोघी खदखदून हसल्या.
      बारसं म्हणून मिथिलाची आई आली होती चार दिवसांपूर्वीच. पण कामाला तशी तिची काही मदत नव्हती. ती दुखऱ्या पाठीने आली हेच खूप होतं. तिला तर मिथिलाचं प्रचंड कौतुक वाटत होतं. ती मिथिलाला म्हणाली सुद्धा, "मिथिला धन्य आहेस तू. अगं अगदी आईच्या मायेने करते आहेस सगळं आपल्या धाकट्या बहिणीचं. आजकाल कुणीच करत नाही इतकं. तुझ्यासारखी समजूतदार बहिण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी सगळ्यांना मिळो हीच देवाचरणी प्रार्थना." मिथिलाने हसतच आईला मिठी मारली. 
      मिथिला नमिताचं सगळं करण्यात अगदी गुंग झाली होती. बारशाची तयारी तिने अगदी जोरदार केली होती. तिच्या सासरच्या मंडळींचाही अगदी हिरीरीने सहभाग होता. शेवटी बारशाचा दिवस आला. सगळे गाडीतून हॉलवर गेले. पुरुष मंडळी, नमिताचा आणि मिथिलाचा नवरा सगळे मागच्या खुर्च्यांवर बसले.
       हळूहळू बायकांची आणि घरातल्या मंडळींची वर्दळ चालू झाली. तसं मिथिलाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली. ती स्वयंपाक घरातच जास्त रहायला लागली. 
       नमिताला अशीही नणंद नव्हतीच. त्यामुळे तिथल्या बायकांनी नमितालाच बाळाचं नाव ठेवायला सांगितलं.
      बाळाला पाळण्यात घातलं आणि नमिताने हाक मारली. "ताई अगं इकडे ये ना. तिकडे आत काय करतेस."
       त्यावर एक सत्तरीकडे झुकलेली आजी म्हणाली, "अगं ती कशाला हवी आहे. नाव तर तुला ठेवायचं आहे. ती तिकडे आहे तेच बरं आहे. उगीच आजच्या दिवशी बाळावर तिची सावली कशाला." 
      असं म्हणत असतानाच मिथिला तिथे आली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलं आणि ती परत आत जायला निघाली. तेव्हा नमिताने तिचा हात धरला. ती म्हणाली, "ताई थांब. तू कुठेही जायचं नाहीस. अगं बघ बाळ कसं टूकुटूकु बघतंय तुझ्याकडे. आणि कसा गोड हसतोय गुलाम! ताई बाळाचं नाव तूच ठेवायचं आहेस." 
      तिच्या या बोलण्याने तिकडच्या बायका कुजबुज करायला लागल्या. मिथिलाला कसंनुसं झालं. तिने मानेनेच नमिताला नकार दिला. त्यावर सगळ्यांकडे बघत नमिता म्हणाली, "ही माझी ताई सौ. मिथिला मनोहर पितळे. माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी. हिला मूल नाही म्हणून तुम्हाला ही चालत नसेल इकडे आलेली. हो ना?  पण त्यात तिचा काय दोष. आणि दोष असेलच तर तो तुमच्या दृष्टीचा आहे. 
      तुम्हाला हे दिसलं की तिला मूल नाही. आणि आज नाहीये कदाचित उद्या होईलही. पण तुम्हाला हे का नाही दिसलं की तिनेच माझ्या बाळाचं दोन महिने संगोपन केलं आहे. अहो आई सुद्धा करणार नाही इतकं तिने केलं आहे. अगदी बाळाचं आणि माझंही. किती रात्री तिने जागून काढल्यात हे मला माहितेय. माझी आई होऊन तिने मला जपलं आहे या सगळ्या गोड प्रवासात. 
       आईला जमणार नाही म्हणून कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून तिने आनंदाने हे आमचं ओझं पेललं आहे. तिचं, तिच्या नवऱ्याचं, सासरच्यांच सगळं सांभाळून तिने आमचं केलं आहे. आईची उणीव जराही भासू दिली नाही. माझ्या बरोबरीने तिनेही आईपणाचा 'पण' पूर्ण केला आहे. मी तिच्या जागी असते तर कदाचित मी ही एवढं करू शकले नसते. ताई तुला hats off आहेत. आणि याची जाणीव मी सदैव ठेवीन. 
      आणि राहिला प्रश्न तिने इथे येऊन बाळाचं नाव ठेवण्याचा. तर हे बघा ज्यांना हे रुचत नसेल त्यांनी गेलं तरी हरकत नाही. पण माझ्या बाळाचं नाव त्याची मावशीच ठेवणार." एवढं बोलून नमूने मिथिलाला मिठी मारली. काही मंडळी वगळता बाकी सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून या आदर्श बहिणींचं कौतुक केलं.
      मिथिलाचे डोळे आनंदाश्रून्नी सतत वाहत होते. तिने केलेल्या परिश्रमाचं तिला सार्थक झाल्यासारखं वाटलं. कुठलीही अपेक्षा न धरताही आज तिच्या पदरात भरपूर सुखाचं दान पडलं होतं. शिवाय नमूचं मातृत्वही सार्थकी लागलं. म्हणून तिने बाळाचं नाव पण साश्रू नयनांनी "सार्थक" ठेवलं. आणि देवाला मनोमन प्रार्थना केली "मला मातृत्व अजून लाभलं नसलं तरी बाळाच्या रुपात ही आगळीवेगळी तुझी सेवा करण्याची संधी दिलीस त्याबद्दल खूप आभार!"
ll शुभम् भवतु ll
_
सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...