गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1529. गेट आउट

      विमानतळावरुन विजयाबाई घरी निघाल्या. त्त्यांची काश्मीर ट्रिप एक दिवस लवकर संपली.खरं तर त्या शनिवारी येणार होत्या पण काश्मीरत बर्फवृष्टीने रस्ते बंद.त्यानी सुनेला सुधाला फोन करून कल्पना दिली होती. मुलाला गिरीषला पण त्यानी फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण नेहेमीप्रमाणे त्याचा मोबाईल नॉट रिचेबल. गिरीषच्या आठवणीने त्याना तिडीक आली, खरतर दुसरा एखादा मुलगा असता तर गाडी घेऊन आईला न्यायला आला असता, पण....पण आपण त्याबाबत दुर्दैवी.
    त्त्यांची टॅक्सी बिल्डिंगजवळ आली. भाडे देऊन त्या छोटी बॅग घेऊन उतरल्या आणि लिफ्टमध्ये शिरल्या. बेल वाजवल्यावर सुधाने दार उघडल. छोटी महिमा यावेळी झोपली असणार हे विजयाबाईंना माहित होतं. सुधाने त्त्यांची बॅग हातात घेतली आणि त्याच्या खोलीत नेऊन ठेवली.
"कसा झाला प्रवास? काश्मीर रद्द झाले शेवटी?"
"हो ना, जोरात बर्फ पडतोय काश्मीरत. तरी नशीब आयत्यावेळी विमानाची तिकिटे मिळाली, नाहीतर दिल्लीत अडकून पडलो असतो आम्ही '.
"महिमा वाट पहात होती आजीची.. आजी, आजी करत झोपली शेवटी.'
"मला पण तिची आठवण येतच होती, खुप खेळणी आणलीत तिला..आता उद्या बघेल, गिरीष आला नाही अजून?
"तुम्ही गेलात त्या दिवशी जे बाहेर पडलेत ते अजून आलेले नाहीत. तुम्ही उद्या यायच्या होतात, त्यामुळे ते उद्या उगवतील '.
विजयाबाईंच्या अंगाची आग आग झाली. या मुलाची त्याना काळजी होती. नवरा मनोहर लवकर गेल्यानंतर या गिरीषला त्यानी वाढवलं, पण याच बायकोत, मुलीत संसारात लक्षच नाही. सतत बाहेर मित्रमैत्रिणीत...व्यसनात.
      एक निश्वास टाकून विजयाबाई जेवायला बसल्या. थोडं खाऊन त्यानी सुधाच्या खोलीत जाऊन महिमाला थोपटले आणि त्या आपल्या खोलीत झोपायला आल्या. विजयाबाई आपल्या खोलीतील झुलत्या खुर्चीवर बसल्या. मुलाचे गिरीषचे काय करायच? याचा विचार करत राहिल्या.त्त्यांचा नवरा मनोहर ट्रेकिंग करताना दरीत कोसळला आणि जागीच मृत झाला तेंव्हा त्या बत्तीस वर्षाच्या होत्या आणि गिरीष दोन वर्षाचा. पण विजयाबाईंना नोकरी होती, म्हणून त्या सावरल्या. लग्नाआधी जेमतेम अकरावी पास विजयाला नवऱ्याने कॉलेजमध्ये जायला लावले, ग्रॅज्युएट झाल्यावर आपल्याच कंपनीत नोकरी मिळवून दिली. मग गिरीषचा जन्म.. सारे काही मस्त, आंनदात होते पण.. स्पोर्ट्स म्हणजे मनोहरचा वीक पॉईंट. सर्व खेळात तो पुढे.टेनिस, क्रिकेट तसेच ट्रेकिंग.. पण दुर्दैव ट्रेकिंग करतानाच पाय घसरून दरीत कोसळून... आपण पण दुःखात कोसळलो पण सावरलो. मनोहरच्या पॉलिसी होत्या, त्यामुळे त्याचे चांगले पैसे मिळाले म्हणून ही जागा घेऊ शकलो. नोकरी होतीच पण मुलाकडे गिरीषकडे म्हणावे तेव्हढे लक्ष देता आले नाही, त्याला अभ्यासात रुची नव्हती. त्याला क्लास होता, पुस्तके वह्या सर्व वेळेवर मिळतं होती पण तो कसाबसा बारावी झाला, मग आपण त्याला फार्मसी कॉलेज मध्ये घातले आणि दोन वर्षांनी एका हॉस्पिटलच्या आवारात मेडिकल घालून दिले.मला वाटले चला, जबाबदारी कमी झाली. आता तो पैसे मिळवील.. मग त्याचे लग्न करू.. मग नातवंड.. पण..
     गिरीष मेडिकल चालवत होता म्हणजे कसे चालवत होता कोण जाणे? खरं तर डॉ भानुशाली हॉस्पिटलमध्येच याच दुकान, डॉ भानुशाली आणि मिसेस भानुशाली दोघांना मोठी प्रॅक्टिस. म्हणजे मेडिकल चांगलंच चालत असणार पण मुलाकडे कधीं पैसे मागितले नाहीत, म्हंटले आपली नोकरी आहे, त्याचे पैसे त्याच्या धंद्यात राहुदेत. आणि अचानक डॉ भानुशाली हॉस्पिटल मधून आपल्याला बोलावणं आलं, आपण गेलो तेंव्हा त्या हॉस्पिटलमधील वातावरण तंग होतं.डॉ भानुशाली यांनी आपल्याला आत बोलावलं. मी समोर येताच डॉ आणि त्त्यांची पत्नी बोलायला लागली 
"विजयाबाई,तुमच्याकडे पाहून आम्ही गप्प बसलो आहोत नाहीतर केंव्हाच पोलीस कम्प्लेंट केली असती '.
"काय झालं डॉक्टर? मी घाबरून विचारले.
"तुमच्या मुलाने हॉस्पिटलमधील नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात ती बचावली तेव्हड्यात एक आया तेथे आली म्हणून.' धरणी मला पोटात घेईल तर बरे, असे मला वाटले. मी तत पप करू लागले.. अंगाला घाम सुटला.. छातीत दुखू लागलं.. घसा कोरडा पडला. मॅडमनी माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मी एका घोटात ग्लासातील पाणी संपविले. माझ्याकडे पहात मॅडम म्हणाल्या 
"आम्ही त्या नर्सला समजावले आहे, तुमच्याकडे पाहून. ती तक्रार करणार नाही पण तुमचा मुलगा आजनंतर या हॉस्पिटलमध्ये दिसता नये, तुमचे मेडिकल दुसऱ्या कुणाला तरी द्या.'
  मी हात जोडले. मान खाली घालून बाहेर पडले. मेडिकलला कुलूप लाऊन मी घरी आले. मनोहरच्या फोटोसमोर बसुन रड रड रडले. त्याच्या मुलाने जवळजवळ बलात्कार केला होता. मनोहरने मिळवलीलेली कीर्ती मातीमोल केली होती. अख्खी रात्र मी  रडून घालवली. चार दिवस गिरीष घरी आला नाही, मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. चार दिवसानंतर दाढी वाढवलेला, कपडे मळलेला गिरीष घरात घुसला तो माझे पाय धरून रडू लागला. बाबांच्या फोटो समोर डोके टेकवून रडरड रडला.
"चूक झाली माझी.. चूक झाली म्हणतं तोंडात मारून घेऊ लागला.   शेवटी मी क्षमा केलीच. मेडिकल बंद झाले मग रिकामा तरी कितीदिवस बसणार? मी त्याच्यासाठी नोकरी शोधू लागले. माझ्या मैत्रिणीचा दीर ट्रॅव्हलिंग कंपनीत होता, त्याला सांगून त्या कंपनीत चिकटवले मी. आता त्याचा पगार मी हातात घेऊ लागले, त्याला खर्चाला आवश्यक तेव्हडेच पैसे देऊ लागले. तो कंपनीत चांगले काम करत होता, मी खूष झाले. त्याचे लग्न करून द्यावे असे मनाने ठरवले. माझा नवरा मला अनाथाश्रमात घेऊन जात असे. तिथल्या लोकांसाठी आम्ही पैशाची मदत करूच शिवाय स्वयंसेवक म्हणूंन काही वेळा काम करत असू, एक विलक्षण समाधान त्यातून मिळे.
मनोहर गेल्यानंतर मी माझी नोकरी सांभाळून कधींकधीं एका अनाथाश्रमात जात असे. थोडीफ़ार पैशाची मदत. कधीं कधीं पुस्तके, वर्तमान पत्र वाचून दाखव असं थोडंफार करत असे. या अनाथाश्रमात सुधा दिसली. तिला कुणीतरी तेथे सोडून गेले होते, ती तेथेच मोठी झाली, बारावी पास होऊन त्या संस्थेत नोकरी करू लागली. तिला आता पगार मिळतं होता, अत्यन्त गुणी, मान वर करून न बोलणारी, नेहेमी हसऱ्या चेहेऱ्याची सुधा मला खुप आवडायची. तिला सून करून घरात आणावे, असे वाटायचे. मी गिरीषला अनाथाश्रमात नेऊन सुधा दाखवली. ती अनाथ असून तिला कोणीतरी दारात सोडून गेले होते, हे पण सांगितले. त्याला सुधा आवडली असे तो म्हणाला. मी सुधाला माझा मुलगा दाखवला. त्याने मेडिकल असताना केलेली चूक पण सांगितली. तिने तरुण वयात अशा चुका होतात, असे म्हणून ती लग्नाला तयार झाली. कदाचित तिला माझा आधार वाटला असेल. मी संस्थेच्या संचालिकाबाईंना सांगून दोघांचं लग्न लाऊन दिल.
    आता सुधा घरी आली. ती पण नोकरी करत होती, मी नोकरी करत होते, गिरीष नोकरीला होता, सर्व आनंदीआनंद होता. सहा महिन्यात सुधाला दिवस गेले आणि मी खूष झाले. या काळात गिरीष उशिरा घरी येऊ लागला.अधूनमधून दारू पिऊ लागला. मी त्याला सक्त सूचना करून सुद्धा त्याचे सुरूच होते. हळूहळू मला बातमी लागली की कंपनीतील एका मुलीसोबत तो रहात आहे म्हणून. मी त्याला कडक शब्दात सुनावले.. पण तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता.. मग महिमाचा जन्म. तो सुधा आणि महिमाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. बिचारी सुधा रडत होती.. आपल्या नशिबाला दोष देत होती.. मी पण असाहाय्य झाले होते, मला माझ्या नवऱ्याची मनोहरची आठवण येत होती. काहीतरी मार्ग काढायला हवा होता, मी त्याच्या कंपनीतील त्या मुलीला पण जाऊन भेटले, पण ती अगदीच निर्लज्ज निघाली. मला सुधाला होणारा त्रास पहावत नव्हता. तिची तडफड पहावत नव्हती. आमच्या ऑफिसमधील मंडळी काश्मीर ट्रिपला निघाली, सुधाने आग्रह केला, तुम्ही या ट्रिपला जा, कुठे जाणे नाही येणे नाही तुमचे. शेवटी मी ट्रीपला गेले आणि एक दिवस लवकर आले, तर माझा मुलगा चार पाच दिवस बायकोमुलीला एकटं सोडून तिच्याकडे? आता हे अती झालं होतं, काहीतरी निर्णय घायलाचं हवा होता. माझा मुलगा असला म्हणून काय झाले.  खुर्चीत बसल्या बसल्या मला हे सर्व आठवत होते. रात्री उशिरा कधीतरी मला झोप लागली.
सकाळी जाग आली तेंव्हा घरात शांतता होती, सुधा संस्थेत गेली असणार, जाताना महिमाला घेऊन जाते ती. 
विजयाबाईंनी उठून चहा घेतला आणि त्या अंघोळीला गेल्या तेंव्हा दारावरची बेल वाजत होती, त्यानी ओळखले, गिरीष आला असणार. त्यानी दरवाजा उघडला. बाहेर गिरीष होता, आईला पहाताच तो चपापला 
"तू केंव्हा आलीस? आज रात्री यायची होतीस ना?
"म्हणून तू पाच दिवस नाहीसा झालास काय? आई यायच्या आधी घरात घुसायचं.. बरोबर.. तुझी बायको बिचारी साधी... रडत बसेल, पण नवऱ्याची तक्रार करायची नाही.
काय चाललंय तुझं गिरीष? एकदा तुला मी सोडवलं, तुरुंगात जाण्याऐवजी घरी आणलं, तुझं लग्न करुंन दिल, एक मुलगी आहे तुला, तरी तू दुसऱ्या स्त्रीच्या घरी.. चार चार दिवस.. कशी लाज वाटतं नाही तुला?
"आई, ती अनाथाश्रमतली मुलगी, माझा विश्वास नाही अशा मुलीवर? कोण कुणाची."
"मी लग्नाआधी तुला कल्पना दिली होती गिरीष, तुझा पराक्रम पण सुधाला सांगितलं होता. पण तिने माफ केल तुला. कधीं त्याबद्दल बोलली ती? आणि तू?
"अनाथाश्रमातील लोकांना, स्त्रियांना शील नसते, असे म्हणतोस? एवढे दिवस बोलले नाही मी, तूझ्या बाबाने या विषयी कधीं कुणाला सांगू नकोस असे सांगितलं मला, पण मी पण अनाथाश्रमात वाढले. माझे पण आई वडील कोण हे मला माहित नाही. पण तूझ्या बाबाने मला त्या ठिकाणी पाहिलं आणि मागणी घातली, आणि तू? एका भल्या बाबाचा नीच मुलगा. त्या नर्सवर बलात्कार करायला निघाला होतास, तेंव्हा कुठे गेले तुझे चारित्र? आता या बाईबरोबर रहातो आहेस, तेंव्हा कुठे विसरलास चारित्र्य?
"आई, मी पुरुष आहे हे विसरतेस?
"अजिबात विसरत नाही, तू माझा मुलगा म्हणून घयायला मला लाज वाटते. एका भल्या बाबाचा तू निर्लज्ज मुलगा आहेस. आज पासून तुझा माझा संबंध संपला. हे माझे घर मी सुधाच्या नावावर करणार आहे आणि माझे सर्व तिलाच देणार आहे. परत या घरात पाय ठेवायचा नाही. मी खाली गुरख्याला सांगून ठेवणार आहे आणि मला किंवा सुधाला त्रास दयायचा प्रयत्न करशील म्हणून पोलीसस्टेशन वर तक्रार लिहून ठेवणार आहे.
चल, चालता हो.. गेट आऊट.. गेट आऊट.
गिरीषला हाताने ढकलत ढकलत विजयाबाईंनी बाहेर काढले आणि धाडकन दरवाजा लावला.

लेखक - प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...