मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1511. हुंडा

  रेडिमेड कापडाचा व्यवसाय करणारे किशोर सेठ आपला एकुलता एक मुलगा शेखरच्या बाबतीत खूप चिंतेत होते. त्यांच्या चिंतेचे कारण होते शेखरचे अभ्यासात असलेले दुर्लक्ष. बिझिनेस आज जरी खूप चांगला चालला असला तरी त्यात स्पर्धा होत्याच. शिवाय सगळे कॉम्पुटराईझ झाले होते. अश्या नवीन टे्नॉलॉजी शिकून आपल्या लेकाने हा बिझिनेस वाढवावा असे त्यांना वाटत होते. परंतु शेखर अभ्यासाच्या बाबतीत खूपच मागे. दोघे नवराबायको शेखरच्या याच विचारात कायम असायचे. पाचवीत शेखर नापास झाला .आईवडिलांना खूपच काळजी वाटायला लागली. निदान कामापुरता शिकायला  पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता. स्वानंद शेखरचा पाचवीत आलेला  वर्ग मित्र. त्यांची छान मैत्री झाली. दोघांचे एकमेकांकडे जाणे येणे होते. एक दिवस शेखरचे बाबा स्वानंदला म्हणाले. अरे स्वानंद जरा शेखरला पण अभ्यास करायला सांगत जा. नाहीतर त्याला तुझ्या घरीच अभ्यास करायला बोलवत जा बेटा. तुझ्या नादाने तरी अभ्यास करेल. 
हो काका !
नक्की आम्ही मिळून अभ्यास करू.
असे बोलला खरे, पण शेखर काही अभ्यास करायला गेला नाही. 
त्याच्या अभ्यासात सुधारणा सुध्दा नाहीच. 
   त्या दिवशी सोमवार होता. शेखरच्या बाबांचे दुकान बंद होते.  सकाळी सकाळी स्वानंदच्या घरी पोहचले. स्वानंदचे बाबा झाडांना पाणी घालत होते.    
    नमस्कार सर, मी शेखरचा बाबा.  किशोर पाटील, "प्रभावित" रेडिमेड कापड दुकानाचा मालक. तुम्ही मला नावाने ओळखता, प्रत्यक्ष आज पहिल्यांदा भेटतो. 
अरे नमस्कार सेठ !
तुम्हाला कोण नाही ओळखत. 
तुमच्या बद्दल बरेच ऐकून आहे !
बोला कसे काय येणे केले?  सर सेठ म्हणू नका प्लीज!  अहो एक साधा दुकानदार मी. तुम्ही खरतर मोठे !  ज्ञानदानाचे मोठे काम करता !
    सर मी मुद्दाम तुमच्या कडे आलो. माझा मुलगा शेखर , स्वानंदच्याच वर्गात आहे.
    हो माहीत आहे मला. नेहमीच येतो स्वानंद  बरोबर घरी. 
सर मग तुम्हाला माहिती असेल तो पाचवीत नापास झाला. 
हो !
मी त्याला गणित आणि भौतिकशास्त्र शिकवतो. 
हो बोलला तो !
   सर!  तो अजिबात अभ्यास करत नाही. 
सर ! प्लीज तुम्ही त्याचा क्लास घ्याल का.? 
त्याच्यासाठी खूप टेन्शन मध्ये असतो आम्ही दोघे नवराबायको. 
   एकुलता एक मुलगा. मागेपुढे माझाच व्यवसाय सांभाळायचा आहे. पण सर आता जग खूप पुढे चालले. पुढे या व्यवसायात सुद्धा खूप सुधारणा होतील. त्यामुळे शेखर शिकला पाहिजे. असे आम्हाला वाटते. 
   तो घरी अभ्यास करतच नाही. ईकडून तिकडून बसला तर सारखी चुळबुळ सुरु. जरा सुद्धा स्थिर नाही. 
सर ! प्लीज तुम्ही त्याचा क्लास घ्या!  
  शेखरचे बाबा,  माझे एक तत्व आहे. मी मुलांचे क्लास घेत नाही. तुम्हाला हे माहिती असेलच. पण हो मुलांना काही अडचण असेल तर अर्ध्या रात्री सुद्धा माझे दार ठोठाऊ शकतो. 
  मी फक्त माझ्याच विषयाचे असे नाही, तर  कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन करतो .
  ठीक आहे सर, तुम्ही नाहीच म्हणता तर नाईलाज आहे. 
 सर निदान त्याला स्वानंद बरोबर अभ्यास करायला तरी पाठवत जाऊ का.? 
तो स्वतःहून काही अडचण विचारणार नाही.
 तुमच्याकडे अभ्यास करायला आला तर तुमचे पण थोडे लक्ष राहील. 
   हो नक्की पाठवा !
विशेष लक्ष देईन मी त्याच्याकडे. 
दुसऱ्याच दिवशी पासून
शेखर आणि स्वानंद मिळून अभ्यास करायला लागले. 
स्वानंद चे बाबा सुध्दा त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले. हळूहळू त्याची अभ्यासात प्रगती झाली. खूप चांगले नाही पण बऱ्या पैकी मार्क मिळत होते. पास होत होता. शेखर चे आईबाबा खूप खुश होते. वेळोवेळी सर , त्यांची बायको आणि स्वानंद यांचे  आभार मानत होते.   शेखर दहावी पहिल्याच प्रयत्नात पास झाला. शेखरच्या आईबाबांना खूपच आनंद झाला. शेखर ला म्हणाले, सरांना विचारून पुढे एडमिशन घे. 
   शेखर पेढे घेऊन सरांकडे आला.  सर हे पेढे. वाकून नमस्कार केला. 
   सर, काकू आणि स्वानंद तुमच्या मुळे मी हा दिवस बघू शकलो.
   सर आता पुढे काय?
 तुम्हीच सांगा.
   सर म्हणाले शेखर तु पुढे बीकॉम कर. तुला तुझा व्यवसाय सांभाळायचा आहे.  याचा उपयोग होईल, शिवाय कॉम्पुटरचा पण क्लास लाव. आता पुढे सगळे व्यवहार कॉम्पुटर वर होणार. शेखर ने बीकॉम केले. कॉम्पुटरचा क्लास लाऊन त्यात ज्ञान संपादन केले. वडिलांचा बिझिनेस व्यवस्थित सांभाळत होता.   सतत एकच म्हणायचा, सर तुमचे आणि स्वानंद चे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. आज हा शेखर फक्त तुमच्या मुळे उभा आहे.
अरे शेखर आम्ही फक्त निमित्त मात्र रे  !
अभ्यास तर तुझा तूच केलास ना!
सर पण मी तुमच्या घरी स्वानंद बरोबर अभ्यास केला नसता, आणि तुम्ही करून घेतला नसता तर कधीच शिक्षणाचा हा गड पार करू शकलो नसतो.
   फक्त तुमची कृपा !
पुरे अरे !
किती कौतुक ?
सर तुमच्या मुळे मी माझ्या बाबांचा व्यवसाय खूप चांगल्या रीतीने सांभाळत आहे. 
आज माझाच मला अभिमान वाटतो! 
तुम्ही माझे गुरू असल्याचा गर्व वाटतो !
एक दिवस शेखर हातात एक मोठा लिफापा घेऊन आला. 
   सर आता घरी लग्नाचा विषय चालू आहे. खूप चांगले स्थळ येत आहेत. बाबा म्हणतात, शिकला नसता तर लोकांनी मुली द्यायला पण मागेपुढे पाहिले असते. नुसते वडिलोपार्जित दुकान असून चालत नाही. चालवणारा सुध्दा शिक्षित असला पाहिजे. 
सरांची कृपा !
शेखर आपल्या ह्या गुरूचे आणि मित्राचे ऋण कधी विसरू नको. 
 सर बघा न, हे चार स्थळ सांगून आलीत. तुम्हाला काय वाटते?
 कोणती मुलगी माझ्यासाठी योग्य आहे?
 नाही शेखर !
लग्नाचा निर्णय तुझा तु घे !
दोन , तीन वेळा त्या मुलीला भेट !
 बोल ,विचार पटले की बोहल्यावर चढ. माझे आशिर्वाद सदैव पाठीशी आहेत.
  लवकरच एका सुसंस्कारित मुलीशी शेखर चे लग्न झाले. संसार वेलीवर एक गोंडस मुलगा झाला. मिथुन नाव ठेवले. 
 किशोर सेठ,  शेखर वर दुकानाची सर्व जबाबदारी टाकून पूर्ण वेळ आपल्या नातवा सोबत घालवत होते.
एक प्रकारे निवृत्तीचं घेतली होती त्यांनी. स्वानंद आणि शेखर सख्या भावाप्रमाणे एकमेकांना नेहमी साथ देत होते.
   स्वानंदने सुध्दा वडीलांप्रमाने D Ed करून एका शाळेत नोकरी करत होता. थोड्याच वर्षात स्वानंद चे वडील निवृत्त झाले, स्वानंद ला त्यांच्याच शाळेत बोलवून घेतले. स्वानंदचे बाबा, गायधने सर आता पूर्ण वेळ मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवून देत होते. मुलांची घरी रीघ लागायची.  कित्येक जण म्हणाले सर तुम्ही आता निवृत्त झालात. आता तरी मुलांचे क्लास घ्या.आताही त्यांनी स्पष्ट नकार दिला.  परंतु त्यांनी विना मोबदला ज्ञानदानाचे काम चोख केले. स्वानंद सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होता. 
   एक वर्ष उलटले, स्वानंद साठी मुली पाहणे सुरू झाले. त्याची एकच अट होती. माझी होणारी बायको ही शिक्षिका असणार. लवकरच त्याची इच्छा पूर्ण झाली. एका शिक्षक मुलीचे स्थळ त्याला सांगून आले.  स्वानंद म्हणाला, मुलगी  दिसायला सुंदर नसेल तरी चालेल पण शिक्षिकाच पाहिजे. दोघांनी एकमेकांना पाहिल्या नंतर आणि स्वानंद चे उच्च विचार ऐकून त्या मुलीने लगेच होकार दिला.  गावापासून जवळच तिची शाळा होती. स्वानंद आणि ज्योती यांच्या संसार वेलीवर एक फुल उमलले, नाव ठेवले मिनाक्षी. 
  ज्योती आणि शेखरची बायको नंदा दोघींची छान मैत्री झाली होती.सगळे खूप छान चालले होते.
  एक दिवस  स्वानंदचे बाबा मुलांना शिकवत असताना त्यांना अट्ट्याक आला आणि जागेवरच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वानंदच्या आईने याचा खूप धसका घेतला. ती माऊली त्यांच्या मागे सात महिन्यात गेली.
    मिनाक्षी स्वानंद सोबत त्याच्याच शाळेत जात होती. दोन धक्यातुन सावरत नाही तर तिसरा धक्का स्वानंदला बसला. ज्योतीला पांढरे पाणी बऱ्याच दिवसापासून जात होते. पण लागोपाठ हे दोन दुःख. त्यामुळे तिचे स्वतः कडे जरा दुर्लक्ष झाले. आता आता ते जास्तच जाऊ लागले, आज तर चक्क pad घ्यावे लागले. 
   खूप टेन्शन आले तिला. स्वानंदला म्हणाली, आज मी शाळेत नाही जात, शक्य असेल तर तुम्ही सुद्धा सुट्टी काढा. आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ, मला खूप त्रास होतोय. मिनाक्षीला नंदा कडे सोडून दोघे दवाखान्यात गेले. डॉक्टरने तपासणी केली. धक्का दायक अशी बातमी सांगितली. ते म्हणाले मिसेस स्वानंद तुम्ही बाहेर बसा. मला तुमच्या मिस्टरांसोबत थोडे बोलायचे आहे. 
    डॉक्टरने सांगायला सूरवात केली. तुमच्या बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर आहे. तो सुद्धा लास्ट स्टेजला. फार उशीर केलात तुम्ही. त्याने घरात घडलेल्या घटना, त्यामुळे तिचे झालेले दुर्लक्ष सगळे सांगितले.  तसा काही उपयोग नव्हता तरी सुद्धा नागपूरला घेऊन गेले. अडमिट करून घेतले. डॉक्टर म्हणाले वाचण्याची शक्यता शून्य आहे. आपल्याला कॅन्सर आहे या धक्क्याने ज्योती पार खचून गेली.आठ दिवसात सगळ सम्पल. ज्योतीने दवाखान्यातच शेवटचा श्वास घेतला. जेमतेम सातवीत मुलगी. स्वानंद पार खचून गेला. इतकी लहान मुलगी आई बनून त्याचे सांत्वन करीत होती.   मुलीकडे बघुन स्वानंदने स्वतःला सावरले. शेखर आणि नंदा सुद्धा खूप मदत करत होते. 
     एक दिवस मिनाक्षीला पिरियड आला. खूप रक्त जात होते. तिला काहीच कळत नव्हते. तशीच रडत रडत स्वानंद कडे गेली. कपडे पूर्ण रक्ताने माखले होते. बाबा, बाबा मी कुठेही पडले नाही. कुठे ही कोणताच मार लागला नाही. हे रक्त बघा. सगळे कपडे भरले. बाबा साधं खाजवले सुद्धा नाही ओ मी. आज स्वानंदला ज्योतीची आणि आईची खूप आठवण आली. आज त्या असत्या तर किती छान समजाऊन सांगितले असते. पण आता मलाच तिची आई व्हावे लागेल. 
   त्यांनी तिला बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलायला सांगितले. ती जागा स्वच्छ धुवायला सांगितली. तो तसाच मेडिकल मध्ये जाऊन pad घेऊन,  येताना नंदाला घेऊन आला. नंदाने तिला pad लावायला शिकवले. वेळोवेळी ते कसे बदलायचे हे सांगितले. मिनाक्षी खूप गोंधळून गेली होती. नंदा घरी गेल्यावर. स्वानंद ने मिनाक्षीला जवळ घेतले. तिला त्याबद्दल आवश्यक ते सगळे समजाऊन सांगितले. या पुढे स्वतःला कसे जपायचे. याची सुद्धा माहिती सांगितली. थोडी सावरली ती. दिवस जात होते मिनाक्षीचे शिक्षण झाले. स्वानंद ने शेखरला सांगितले आता लेकीचे लग्न करायचे. कुणी मुलगा लक्षात असेल तर सांग.
   दुसऱ्या दिवशी शेखर नंदाला घेऊन स्वानंद कडे गेला. स्वानंद आपल्या लेकीसाठी एक स्थळ आहे. तेच सांगायला आलो . 
काय करतो मुलगा, कुठला आहे ? 
मुलगा माझ्या ओळखीतला आहे. तसा तू सुध्दा ओळखतो त्याला. 
काय ? 
हो अरे ? 
ओळखतो तू ?
 कुठे असतो?
 काय करतो? 
काही तर सांग ? 
अरे हो ! हो ! 
सांगतो सगळ. 
   अरे तो शेखर आहे न कापडाचा दुकानदार त्याचा मुलगा मिथुन . नुकतंच त्याने अजून एक शोरुम टाकले. स्वानंदचां त्याच्या कानावर विश्र्वासच बसेना. 
काय ? 
 काय म्हणाला तू ?
  हो अरे. !  
  तू काल गेल्यावर मी, नंदा आणि मिथुन सोबत बोललो. मिथुन म्हणाला , बाबा असे काही कधी डोक्यात विचार आले नाही. पण मला बायको म्हणून मिनाक्षी नक्कीच आवडेल. 
   बोल तुझे काय मत आहे. स्वानंद च्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहायला लागले.
    मिनाक्षी बोलली, सॉरी काका !
 मला हे लग्न मान्य नाही.
ठीक आहे बेटा !
फक्त कारण कळेल का ?
म्हणजे तुझे कुणावर प्रेम वगैरे आहे का ?
तसे असेल तर आमची काहीच हरकत नाही. हा काका तुझे कन्यादान करेल.
नाही काका ! असे काहीच नाही!
मग काय कारण आहे! 
स्पष्ट सांग !
कोणताच आडपडदा ठेऊ नको. काका मला खूप गरीब आणि अनाथ मुलाशी लग्न करायचे आहे. 
का पण?
चांगली शिक्षित आहे, हुशार आहे. शिवाय सुंदर आहेस मग हे काय?
   सॉरी काका !  असे नका समजू की मला मिथुन आवडत नाही. नक्कीच नवरा म्हणून तो खूप चांगला आहे.    पण काका मी हे घर सोडून सासरी गेले तर माझे बाबा एकटे पडतील. मान्य माझे सासर गावात असेल. पण घरात असन आणि गावात असन खूप फरक आहे. मी बाबांना सोडून कुठेही जाणार नाही.  शेखर आणि नंदा समजून चुकले आता या क्षणी आपण न बोललेले बरे. दोघे घरी आले . 
   दोन दिवसाने मिनाक्षी नंदा कडे आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नंदानेच विषय काढला. म्हणाली,  बेटा  तुझी काळजी आम्ही समजू शकतो. आम्ही सुद्धा तोच विचार केला की स्वानंद भाऊजी यांना आता एकटे सोडायचे नाही. घराचे काम चालू आहेच. त्यांच्यासाठी एक रूम काढायची. त्यांचे हे  घर, तिथे आपण मुलांसाठी स्टडी रूम काढुया. म्हणजे भाऊजीचां वेळ जाणार. बाकी वेळ ते आपल्या सोबत असणार.
   तू फक्त तुझे मिथुन बद्दल लग्नाचे मत सांग. बाकी स्वानंद भाऊजी यांना आपल्या सोबत कसे आणायचे ते आमच्यावर सोड. मिनाक्षी म्हणाली, मावशी असे असेल तर मी मिथुन सोबत लग्न करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नंदा आणि शेखर स्वानंद कडे गेले. म्हणाले भाऊजी आम्हाला मिनाक्षी सून म्हणून आवडते हे आम्ही दोन दिवसापूर्वीच सागितले. मिनाक्षीचां सुद्धा होकार आहे. तुमचे मत सांगा. 
    स्वानंद म्हणाला, अरे शेखर माझ्या सारखा भाग्यवान मीच रे. इतक्या चांगल्या घरी मुलगी जाणार असेल तर, एका बापाला अजून काय हवे रे! खूप उपकार केले मित्रा!  शेखर म्हणाला, मित्रा उपकार तू आणि तुझ्या कुटुंबाने केले माझ्यावर. पण मी इतक्या सहज तुझी मुलगी सून म्हणून स्वीकारणार नाही. 
मला हुंडा हवा आहे!
स्वानंद म्हणाला, बोल काय हवे तुला?
 माझा प्राण सुद्धा देईन रे ! तुझा प्राण नको !
फक्त प्रॉमिस कर मी मागेल ते देशिल. 
 मिनाक्षीची शपथ घेऊन सांगतो. शेखर, तू मागशील ते देईन . 
बोल काय पाहिजे?
    शेखर म्हणाला, नक्की! आपल्या मैत्रीची शपथ !
   हो रे बाबा ! 
आपल्या मैत्रीची शपथ ! 
   मग ऐक, लग्न झालं त्या दिवसा पासून तू आमच्या सोबत राहायला येणार. इथे एकटा राहणार नाही. मुख्य म्हणजे तुझे राहते घर, त्याची आपण सरांच्या नावाने अभ्यासिका करू. गरजू मुले तिथे येऊन अभ्यास करतील. तू त्याची देखभाल कर. वेळ सुद्धा जाईल. बोल माझा हा हुंडा तुला मान्य आहे. मान्य असेल तरच हे लग्न होणार अन्यथा नाही. बरोबर न मिनाक्षी बेटा. 
  मिनाक्षी ने वाकून शेखर काका आणि नंदा मावशीला नमस्कार केला. मिनाक्षी म्हणाली , मावशी- काका खूप खूप धन्यवाद .
   सॉरी खूप खूप धन्यवाद आई, बाबा.
   स्वानंद म्हणाला मित्रा तुझ्यासाठी काय पण रे!
 अन् कुठे पण रे ! 
  तुझा हुंडा मला मान्य आहे. 
   दोघांनी एकमेकांना मिठी मारली.


©️®️     सौ प्रभा कृष्णा निपाणे  कल्याण.
माझ्या "काव्यप्रभा" पेज वरून...
लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीपेस्ट , शेअर करतांना नावानिशी शेअर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...