"आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे? तूला कितीदा सांगितलं ह्या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलताबाईंकडे गेलीस तर खबरदार" मुलाचं हे रोजचंच होतं; पण आज त्यांच्या सुनेनंही त्यामध्ये तोंड घातलं,"घरात इतकी श्रीमंती असतांना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत कित्ती लाज वाटते. काही तर मुद्दाम विचारतात, तुझी सासू मोलकरीण आहे का गुलमोहरमध्य?" हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती."आज सोक्षमोक्ष लागू दे आई. तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे?" मुलाने निर्वाणीचं विचारलं. विनयाला माहित होतं, तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घरमालकीणींचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरीबीपोटी आईचा अपमान, हिडीस पिडीस करणार्या ह्या सोसायटीनं त्याचं बालपण करपून टाकलं होतं. पण ह्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहित नव्हतं आणि ते कळायचं त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोटतिडकीनं शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत आॅफिसर होता. त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार. महिन्याला घरात लाखानं पैसा येत होता. त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त बंगला बांधला होता. डोळ्याचं पारणं फेडणार्या सुखसोयी होत्या त्याच्या बंल्यामध्ये. नोकरचाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लाऊ देत नसे. अस्मि त्याची बायकोही सासूबाईंचं मन राखून राहत असे. ज्या सोसायटीत त्याची आई धुणीभांडी करत असे, त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानानं आग्रहानं बोलावलं जाई. काही वर्षापूर्वी त्यांना हिडीसफिडीस करणार्या ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटे. पण गेल्या तीन महिन्यापासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारण होत्या ह्याच सोसायटीतल्या आईच्या जून्या मालकीणबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रांत नटलेली आणि दागिन्यानं सजलेली त्याची आई ह्यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेनं आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विनयाने साबूदाण्याची मऊसुत, गोड खीर बनवून तो नक्षिदार वाडगा घेऊन ती चारुलताबाईंच्या फ्लॅटकडे चालली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा आला होता.एरवी समंजपणे वागणारी सूनही चक्क विरोधात जाउन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली, "बस्स कर रे अश्विन,हो मी आजही मोलकरीणच आहे पण फक्त चारुलताबाईंची आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वेच्छेने स्वीकारलंय हे पद. का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेच तुझ्याशी.आणि हो सूनबाई तू ही ऐक.' असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सूरवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यापुढे उभा राहिला.
विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेल म्हणून आलेलं एक गरीब जोडपं. शहरातल्याच झोपडपट्टीत इतर अनेकासारखं त्यांचं जगणं सुरु झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयानंही इथल्या बायकांच्या ओळखीनं धुण्याभांड्याचं काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करीत होती,त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहरासारखीच श्रीमंत आणि उच्चभ्रु सोसायटी. श्रीमंतीचा तोरा मिरवणार्या फॅमिली. पण स्वच्छ, चटपटीत आणि कामापुरतंच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापुनचोपुन साडी, कपाळावर मोठी लाल टिकली गळ्यात काळ्या मण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांबलचक केसांचा घट्ट अंबाडा, गव्हाळ शेलाटा बांधा आणि काळेभोर मायाळू डोळे असणारी विनया सुहासचीही खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांच एकमेकांवर. वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं. बघताबघता अश्विन चार वर्षांचा झाला.दोन अडीच महिन्याचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची. पण घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी अशी तिची अवस्था व्हायची.सुहास तर बाळाचे कित्ती लाड करायचा. ओढाताण असायची पण आहे त्यात समाधान मानणारी ही नवराबायको त्यामुळेच सुखी होती. पण म्हणतात ना,काहीवेळा नियती खूप परीक्षा घेते एखाद्याची. अगदी तस्सच झालं. साहित्य टेंपोत चढवत असतांना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं. त्याचा निष्प्राण देह पाहून विनयानं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. सैरभैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. माती चावत होती. आसपासच्या बायांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडं पाहताच तिला थोडं भान आलं. या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं हे लेकरु. त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं आणि तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता.दुःखाचे कढ जगण्याला कठोर बनवत होते. नियतीनं केलेल्या विचित्र खेळानं एक हसतं खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विनया सावरली.पोटात अति रक्तस्त्राव झाल्यामूळे सुहास गेला असं निदान झालं.कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच. गरीबाला विम्याचे लाड कुठले करता येणार? त्यात ही टेंपररी नोकरी असल्यानं, कंपनीही खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही.
सुहासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कढ पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली. कोरडी सहानूभुती दाखवण्या पलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाईंच्या घरी गेली. ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. अगदी शिस्तप्रिय आणि कडक.विनयाही टरकून असे त्यांना.पण बाई विनाकारण कुणाला त्रास देत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर. मुलगा आॅस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरु देशात. हे दोघेच पती पत्नी.सामाजिक कार्याची आवड असणार्या बाई आणि त्यांना पाठींबा देणारे साहेब.अगदी मेड इच आॅदर. आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणार्या चारुलताला मोकळा गळा,मोकळं कपाळ घेऊन आणि दहाबारा दिवसातच रया गेलेली विनया पाहून भडभडून आलं. त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस्स ह्या एका साध्या कृतीनही विनयाला जाणवलं, कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःख मागे पडत गेलं.विनया कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. ह्या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं दिवसें दिवस. अाणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली. दाणदाण पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिणीने विनयाला फ्लॅटबाहेर ढकललं आणि ती ओरडली, 'नवरा नाही म्हणून असले धंदे करते. माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटत. पुन्हा ह्या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख.' रागिणीच्या ह्या आकांडतांडवानं अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅटसमोर.प्रत्येकजण काय झाल? काय झालं? असं विचारु लागला. तसं रागिणी जोरात ओरडली, "अहो ही धंदा करते चक्क. माझ्या मिस्टरांनी पाहिलंय हिला. म्हणून त्यानांही..शी,सांगवत नाही इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे. हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून.' असं सांगून रागिणीने तिला बाहेर काढलं. रडूनभेकून हात जोडणार्या, हतबल, अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीनं आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात कुलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन, चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरुन येणार्या चारुलताना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या.'अगं जरा बघून चाल की', असं म्हणत तिच्याकडे त्या पाहतात तोच, 'चुकलं हो बाईसाहेब.' म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करुन विनया देऊ लागल्या. तिच्या ह्या भांबावलेल्या, घाबरलेल्या,गालावर बोटांचे ठसे उठलेल्या,बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या,विनया तू?आणि हे काय झालंय तुला?' आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून, फिरवलेल्या नजरांनी घायाळ झालेली विनया कोसळली आणि गदगदून रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन आल्या. काय, कसं झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या,' तू उद्या सोसायटीत कामाला ये. कुणी नाही घेतलं तर मी तूला कायम कामावर ठेवीन.' 'पण रागिणीमॅडम, त्या मला कच्ची फाडून खातील.'ती घाबरुन म्हणाली. 'तिचं मी पाहून घेईन. पण तू कामावर यायचं बंद करु नको' चारुलताबाईंनी तिला धीर दिला. ह्रदयात वेदनेचा अंगार लपवत विनया दुसरे दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरीबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं. तिनं नेहमीच्या घरांची बेल दाबली पण तिला पाहताच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले. आम्हाला तुझी गरज नाही म्हणत. पण चारुलताबाईनी तिला घरचं काम करु दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती. चारुलताबाईंबरोबर आणखी एकदोघींनी तिला पुन्हा घरकामावर घेतले आणि रागिणीचा थयथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मिटींग बोलावली.आरोपीच्या पिंजर्यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चारित्र्यहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं ना. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळमुद्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलता बाईंना प्रश्न केला, "मॅडम आपल्या सोसायटीतल्या मोलकरणीबाबत सगळं ठाऊक असतांनाही तुम्ही तिला कामावर ठेवलंत, इतकंच नाही तर सोसायटीतल्या इतर फॅमिलीनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात.या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का? 'हो ना,आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पतीही घरी एकटेच असतात कधीकधी. कसा विश्वास द्यायचा ह्या बाईचा? 'लेलेबाई बोलल्या त्यांच्या मिस्टर आणी इतर बर्याचजणांनी त्यांची री ओढली. "हिला कामावरुन बंद करा चारुलताबाई,आत्तापर्यंत आम्ही हिला सोज्वळ म्हणत होतो. पण नवरा गेल्यापासुन ही बदललीच. विधवा, बेसहारा म्हणून कामं देतो आम्ही पण अहो ही चक्क धंदा करते."रागिणी धुसफुसली तशा, चारुलताबाई ओरडल्या, 'थांब रागिणी,एखाद्यावर आरोप लावण्याआधी, विचार करावा माणसानं,गेली सहा वर्षे ही काम करते आपल्याकडे. आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती? सहा महिन्यापुर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरु घेऊन, खाली मान घालून आपलं काम करत जगते ती.' 'म्हणून काय तिने असं.....'मध्येच बोलणार्या रागिणीच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई म्हणाल्या, 'माझं पूर्ण होऊ दे, मिस्टर ऋषी.असं अचानक काय झालं की तुम्हाला विनया धंदा करते याचा शोध लागला जरा सांगाल आम्हाला?'
'मी पाहिलंय हिला एका माणसाबरोबर. हे हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्क रागिणी नसतांना मलाही खाणाखुणा करते, घाणेरडे हावभाव करते.' 'नाही ओ साहेब मी कधीच असं केलं नाही. मी नाही ओ तसली बाई. कसं पटवून देऊ तुम्हाला?' विनया कळवळली. तसं लेलेबाई पुन्हा करवादल्या 'गप्प गं,तुझ्यासारख्या खाली मान घालणार्यांच्या अंगातच खेळ असतात. 'खरं म्हणजे लेलेबाईंचा खरा राग चारुलतावर होता. कारण नेहमी टिपटाॅप राहणार्या, हसतमुख आणि इंप्रेसिव्ह चारुलताचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोलित मिळालं होतं.' 'पण माझेही मिस्टर बर्याचदा घरी असतात एकटे. त्यांना नाही अनुभव आला कधी असला.'चारुलताबाई बोलल्या. तेवढ्यात सौ. पाटणकर कुजबुजल्या' तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर' आणि हास्याची खसखस पिकली. तशा आवाज चढवून चारुलताबाई म्हणाल्या,माझे मिस्टर शामळू नाहीत. तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात ते. पाटणकरबाई तुमच्या ह्यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी आॅफिसमध्ये केलेली अफरातफर त्याना तुरंगात घेऊन गेली असती. ती भानगड माझ्या शामळू मिस्टरांनीच हाताळली होती बरं का?' तसे पाटणकर बायकोवर खेकसले, तूला कुठं काय बोलावं हे कळत नाही.अाता तोंड मिटा. 'चर्चेला भांडणाचं रुप येणार असा रंग दिसताच कामावरुन काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल.' तशा चारुलताबाई म्हणाल्या,'ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते, मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे,हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही आॅफिसमधून दुपारीच घरी आला होता. कारण तुम्हाला माहित होतं विनया तुमच्याकडे दुपारनंत येते आणि त्यादिवशी रागिणी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याचवेळी विनयानं तुम्हाला बाजूला ढकलल आणि ओरडली मी हे सगळ्या सोसायटीला ओरडून सांगेन. तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली. विनयानही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिणी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती ढूंकुनही पाहत नसे. चूकून लक्ष गूलं तर तिरस्कारानं मान फिरवत असे. तिला बिचारीला माहितच नव्हतं. माफी मागून तुम्ही स्वःतःला वाचवलं होतं,पण तुमच्यातलं भुकेलेलं जनावर अजूनही तसंच होत आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात. तेही रागिणी घरी असतांना विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मात्र तिनंच आपल्याला फशी पाडलंय याचा ओरडून कांगावा केलात.आणि रागिणीनेही कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं.' 'काहीही बोलू नका. ह्यांच्यावर खोटे आरोप करतांना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी.' रागिणी ओरडली. तशा चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या, 'लाज तुझ्या नवर्याला वाटायला हवी रागिणी. विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घसरुन पडल्या तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोक्त बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून,ती तुला जपत होती. तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तूला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं गं तुला इतक्या चटकन पलटायला. खरी कृतघ्नतर तू आहेस. कसलाच विचार न करता तू विनयाला दोषी ठरवलंस.' 'फुकट नाही केलं तिनं काम. जादाचे पैसे मोजलेत तिला. ह्या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करता आहात. काय पुरावा आहे तुमच्याकडे?' 'पुरावा...?हा..हा. पुरावा हवा. तुमच्या आॅफिसमध्ये तुम्ही त्यादिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतलीत. आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरचा सी.सी.टी.व्ही. सांगूलच तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे. आपल्या गेटवरचा वाॅचमनही हेच सांगेल. हो ना मिस्टर ऋषी.ब र्याचवेळा अशी बरीच कारणं देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून. कशासाठी ते सांगू का?'
आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवर्याने सरळ माफी मागितली. पण चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ पोलिसकेसची धमकी दिली. तेव्हा रागिणीनेपुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी केली. विनया हात जोडून म्हणाली 'बाईसाहेब,तुम्ही होतात म्हणून मी वाचले.ह्यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगतेय. रागिणीमॅडमनां त्रास नको.' विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यानाच कौतूक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, 'विनया माझ्याकडे कामाला राहिलच. तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या औटहाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करु.त्याचं भाडं मी स्वतः भरेन. चारुलताबाईंच्या आभाळाएवढ्या मोठ्या आधारानं. विनया भारावून गेली.अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ दहा वर्षे त्या तिथेच राहिल्या. पण विनयाची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती.
पण दिड वर्षापूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये रहायला आल्या. रोज योगा,मैत्रिण कट्ठा,भजन, सत्संग ह्यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला. पण चार महिन्यापुर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला. सुरवातीला निमित्त काढून आत्ता मात्र राजरोसपणे ती चारुलताबाईंच्याकडे जायची. त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने २४ तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसवून वेणी फणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्सही चांगलीच होती. पण विनयाच्या मायाळू स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डाॅ.म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात तुम्ही स्वःहुन चालू लागाल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या,नक्कीच होईन डाॅ.कारण ही माझी लेक आहे ना विनया. तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे.'
हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली, 'आता तूच सांग अश्विन. एका बेसहारा, विधवा स्त्रीला तिचं लेकरु अनाथ होऊ नये म्हणून लेक मानणार्या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्या त्या महान आईला मी कशी विसरु? मला आता जायलाच हवं माझ्या मालकीणबाई माझी वाट पहात असतील.' इतकं बोलून विनया घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं झाल्यासारखं वाटत होतं.
सांयकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किटे भरवून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कुणीही घरी न येणार्या घराची बेल अशी कुणी वाजविली हे पहायला तिनं दार उघडलं आणि ती पाहतच राहीली.दारात अश्विन आणि अस्मि उभे होते. दोघेही आत अले. बेडवर उठुन बसलेल्या चारुलताबाईंकडे पहात अश्विन म्हणाला, "अगं आई,आटप लवकर. तुझ्या आईलाही तयार कर. अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही नाही आवडणार. आपण ह्यांना आपल्या घरी घेऊन जात आहोत. तिच्या लेकीकडे. चल आटप लवकर." विनयाचे डोळे भरुन आले. तिला वाटलं, बघता बघता आपला लेक कित्ती मोठा झाला, वयानं आणि मनानही. तिनं लेकाला आणि सूनेला घट्ट छातीशी धरलं. चारुलताबाई मात्र ह्या आनंदी आणि सुखद धक्क्यानं प्रसन्न हसल्या नेहमीसारखं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा