मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1491. घर म्हणून

      अनपेक्षितपणे आभाळ गच्च भरून आलं. नेमकी ऑफिस सुटायची वेळ आणि ताडताड पावसाची झोडप सुरु झाली. चहूबाजूंनी भरलेलं आभाळ वेडावाकडा त्याचा कोसळ. मध्येच विजेचा लपका. पाच मिनिटांत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन गेले. खरं तर ऑफिस समोरच बस स्टॉप होता. पण पावसाने उडवलेली तारांबळ बघता बस वेळेत आली तरी घरापर्यंत वेळेत पोहचेल ही खात्रीच नव्हती.  नेमका घरातला आठवड्याचा भाजीपाला संपलेला  होता....! आज सगळ्यांच्या टिफीनला बटाट्याच्या भाजीचा हुकमी एक्का कामी आला होता. आज येता येता भाजी घेऊनच येईन. तिने सासूबाईंना निघताना सांगितलेच होते. पण पावसाचा‌ हा रुद्रावतार बघता. आपलं घरापर्यंत पोहचणंच तिला मुश्किल वाटू लागलं. भाजी बिजीची बातच लांबची ! 
 इकडं पाऊस खुप आहे. तू निघालीस का गं ऑफिस मधून. येताना‌ दुध घेऊन ये बाई अर्धा लिटर. माझ्याकडून ऊतूच गेलं बघ.
इकडेही खुप पडतोय आई. दुकानापर्यंत पोहोचणं ही अवघड झालंय. छत्री असून देखील काही उपयोग नाही. बघते जमलं तर. जमणार नव्हते च तसंही ! पण तरीही कशाला फोनवर पटकन नाही जमणार म्हणून सांगायचे. ती छत्री,बॅग,साडी सांभाळत स्टाॅपच्या दिशेने निघाली.  पाण्याच्या लोंढ्यातून मार्ग काढत काही वेळाने बस आली तोवर जीव नुसता अर्ध ओला होऊन गेला होता. तुफान भरुन आलेली बस. माणसांच्या गर्दीबरोबर ती आपोआप आत लोटली गेली. एक ओला कुबट दर्प आतमध्ये कोंडून राहीला होता. आजुबाजुला सगळं च दमट ओलसर. कितीही अंग आकसून उभं राहायचा प्रयत्न केला तरी. कुणाची जाणूनबुजून तर कुणाची नाईलाज म्हणून शरीराशी होणारी घसट. देहाला स्पर्शून पुढे जात होती.
  वीस मिनिटांचे अंतर तासाभराने आटोक्यात आले. तो अजून धुवांधार कोसळतच होता. तिचा जीव पार आंबून गेला होता. पावसामुळे काळोख ही गच्च जमा झाला होता. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश देखील ओला झाल्यामुळे आकसलेला होता. डोकं दुखायला लागलं होतं. कधी एकदा घरी जाऊन स्वच्छ हातपाय धुवून कोरडे कपडे घालते असं तिला झालं होतं..दुधाचे ती पार विसरुनच गेली. सासूबाई तिची वाटच बघत होत्या...कहरच केला ग या पावसाने. ती दिसताच. त्या पुढे येत म्हणाल्या.
पटकन आवरुन ये. आलं घालून चहा करते तुझ्यासाठी.
अरेच्चा...दुधाचे विसरलोच की आपण...! चहासाठी तर हवेच होते की....
ते सांगायचे ही त्राण तिच्यात उरले नव्हते. ती बाथरुमकडे वळली.
 तिच्या पर्स आणि छत्री खेरीज तिच्याजवळ काही नाही. सासूबाईंच्या लक्षात येऊनच गेलं. ही विसरली असणार किंवा खुप थकलेली असणार.
 ती येई पर्यंत त्यांचा तिच्या साठी चहा तयार झाला. चहा आल्याचा ताजा वास तिच्या नाकात शिरला. मघापासून  आलेली मरगळ एकदम कुठच्या कुठे पळून गेली. टेबलापाशी येत ती म्हणाली. पण आई मी दुध आणायला विसरले अहो...!
  त्या हसल्या. ठिक आहे ग. तिच्यासमोर भरपूर दूध घालून मगभर चहा ठेवताना, त्या म्हणाल्या घर म्हणून रोजच मी कपभर दुध बाजूला काढून ठेवते. दुसऱ्या दिवशी नव्या दुधात ते दूध मिसळताना. नव्याने परत काढून ठेवते. संसारात पडल्यापासून ची ती आमची सवयच अगं. तेंव्हा सकाळी एकदा गवळी दूध घालून गेला की परत दूध आजच्यासारखे कधीही कुठेही मिळत नसे. त्यामुळे घर म्हणून काही गोष्टी त्यातूनच वगळून ठेवायच्या आणि प्रसंगाने वापरायच्या. स्वयंपाकघरातल्या आमच्या अखत्यारीत असलेल्या वस्तू अशाच घर म्हणून बाजूस ठेवत ठेवतच आमचा संसार पार पडला बघ. अगदी पोळी भाकरीच्या डब्यात सुद्धा चतकोर पोळी/भाकरी ठेवायचीच घर म्हणून..! हा शिरस्ताच होता त्याकाळी. सगळं संपवायचं नाही. शिळ्याला ताटात घेऊन ताज्याकडे वळायचं. कारण जुन्यातूनच तर नव्याचा खरा प्रवास सुरु झालेला असतो. आत्ताची तिची  चहाची अत्यंतिक निकड, सासूबाईंच्या घर म्हणून ठेवलेल्या दुधामुळे मनासारखी भागली होती. चहाच्या घोटाबरोबर त्यांचा काटकसरीचा काळ ही तिने पिऊन टाकला. नव्या उत्साहाने तिने रात्रीच्या स्वयंपाकाचा ताबा घेतला.
आई भाज्या काहीच शिल्लक नाहीत करायला घर म्हणून. काही ठेवलंत का तुम्ही. म्हणजे रात्रीच्या जेवणाचे काहीतरी होऊन जाईल. तिने हसत हसत लगेचच त्यांची फिरकी घेतली.  मेथीच्या जुडीतली मुठभर पानं मी नेहमी वाळवून  ठेवते बघ बाटलीत. फक्कड लसणीची फोडणी घालून डाळ मेथीचे वरण कर. त्यांनी हसत हसत तिच्या फिरकीचे सूत धरुन तिला आपल्या काटकसरीत ओढून घेतलं...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...