शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

1469. सत्ता, संपत्ती, अहंकार व अवहेलना

      एक सनदी अधिकारी सेवानिवृत्त होतात. नोकरीत असताना सभोवताली प्रचंड गर्दी. सोबत कायम नोकर चाकर असायचे ‌केबिनच्या बाहेर भेटणाऱ्यांची कायम मोठी रांग असायची. अशा परिस्थितीत एक दिवस ते सेवानिवृत्त होतात. पदावर असताना लोकांवर गुरगुरणं, सतत खुर्चीचा रुबाब दाखवणं.  स्वतःला शहाणा समजणं. या गोष्टी नित्य नियमाच्या होत्या. आय.ए.एस. अधिकारी म्हटलं की मग वेगळाच रुबाब असतो. आज तोच अधिकारी सेवानिवृत्त झाला होता. सकाळी लवकर उठल्यावर देखील वेगळाच रुबाब असायचा परंतु आज मात्र परिस्थिती वेगळी होती. आज खाली गाडी उभी नव्हती. ड्रायव्हर देखील नव्हता. बायकोला डबा देखील बनवायचा नव्हता‌. ना जाण्याची घाई होती. ना कसली चिंता. एक दिवस गेला तशी तशी त्याची बेचैनी वाढू लागली. नोकरीत असताना घरी देखील तो असाच रुबाब दाखवायचा. आज त्यामुळं घरातलं देखील कोणी त्याच्याशी नीट बोलत नव्हतं. घरात देखील तो आता लोकांना नकोसा वाटू लागला. साधारणपणे एक महिना निघून गेला. परंतु त्याला काहीच सुचेना. नोकरीवर असताना कधी कुणाशी धड बोलला नाही. कुणाला आपलंसं केलं नाही. आणि म्हणून आता एकाकी राहण्याची वेळ या गृहस्थावर आली होती. एके दिवशी अचानक त्याने ठरवलं की सकाळी जरा मॉर्निंग वॉकला जाऊयात. मैदानावर गेल्यावर देखील मनातल्या मनात पुटपुट करायचा. अरे...मी एवढा मोठा कलेक्टर असताना हे लोक मला ओळखत नाहीत. अनेकांना तो स्वतःहून ओळख सांगायचा. नंतर लोक ऐकायचे आणि निघून जायचे. असं करता करता त्याची एका वृद्ध असणाऱ्या गृहस्थाशी ओळख झाली. त्या वृद्ध गृहस्थाला देखील तो सांगायचा अहो, मला ओळखलं का? मी कलेक्टर होतो. मी हे केलं. मी ते केलं. मी असा होतो. मी तसा होतो. हे सगळं तो शांतपणे ऐकून घ्यायचा पंधरा दिवस झाले तरी तो समोरचा गृहस्थ काहीच बोलत नव्हता. एक दिवस याच्या मनात विचार आला की मीच बोलतोय हा गृहस्थ काहीच का बोलत नाही. म्हणून न राहून त्याने त्या गृहस्थाला विचारलं काय हो? मीच फक्त माझं सांगतोय. तुमचं काहीतरी बोला ना. त्या ग्रहस्थाने सांगितलं की अरे बाबा, काय बोलणार तुझी नि माझी परिस्थिती सारखीच तरीपण या अधिकाऱ्याने विचारले की तुम्ही कुठे काम करत होता ते तर सांगा. तेव्हा तो समोरचा वृद्ध व्यक्ती सहज बोलून गेला की मी सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होतो. हे ऐकून या माजी कलेक्टरच्या अंगाला घाम सुटला. त्या सदगृहस्थाने बोलायला सुरुवात केली की साहेब आपण नोकरीवर असताना, खुर्चीवर असताना आपल्याला एक दिवस सेवानिवृत्त व्हायचंय की बाब कधीच विसरू नये.  सेवानिवृत्तीनंतरही लोकांनी तुमच्याजवळ यावं. तुम्हाला फोन करावा. तुमची विचारपूस करावी आणि कायम संबंध ठेवावेत असं वाटत असेल तर पदावर असताना सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. मी म्हणजेच राजा. मी म्हणजेच सर्व. मला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. मी जे करतो ते कोणालाच माहीत नाही. सतत मी मी करत बसल्यास आज आपल्या दोघांवर जी वेळ आली आहे तीच वेळ आज पदावर असणाऱ्या लोकांवर येणार आहे. तेव्हा वेळीच शहाणपण सुचलं असतं तर आपल्यावर ही वेळ आली नसती.
तात्पर्य.
आपण कोणत्याही ठिकाणी कामावर असाल. कोणत्याही पदावर असाल तरी आपल्या सभोवतालच्या, आपल्या हाताखालच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांसोबत चांगले संबंधित प्रस्थापित करा. त्यांच्याशी गोड बोला. शक्य होईल तितके त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. अडीअडचणीला त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. निःस्वार्थी मित्र जोडा, चांगली माणसे जोडा. जेणेकरून भविष्यकाळात आपल्या सभोवताली काही माणसं असतील. नाहीतर पदावर असताना नेहमी मी मी  म्हणणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण पाहिलेलं आहे.  त्यामुळे कोणत्याही सद्यस्थितीचा अहंकार किंवा गर्व न करता सर्वांशी प्रेमाने वागा. पैसा येतो जातो, सत्ता येते जाते. केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे तर माणसंही तितकीच महत्त्वाचे आहेत हे समजणं देखील खूप शहाणपणाचे ठरेल. कारण एकदा का वेळ निघून गेली की ती परत येत नाही. त्यामुळे पदाचा फाजील अभिमान करण्यापेक्षा कायमस्वरूपी एक माणूस म्हणून जगल्यास माणसं आपोआप जवळ येतील. तुम्हाला एकटं पडल्याची कधीच जाणीव होणार नाही. चला तर मग माणसं जोडुयात. नाहीतर मग उशीरा शहाणपण सुचणं काही कामाचं नाही.
अहंकार नसलेला माणूस साधा वाटतो. हा साधेपणाच त्याचं सौंदर्य वाढवतो. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की आपल्या वृत्तीतून, आपल्या वागणुकीतून आणि आपल्या कृतीतून सौंदर्य निर्माण करणे हे सर्व आपल्यावर अवलंबून असते. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा आपण कोणाचाही वाईट विचार करत नाही. कुणाचेही अहित चिंतत नाही. जीवनांत चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा. कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल.
                                                                               
सुरक्षित राहा व काळजी घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...