तुम्ही मला ओळखलं का? नाही बहुतेक, मी प्रतिभा. ओळखलं नसणार तुम्ही! अहो मी या कथेची नायिका, प्रतिभा. मला तुम्हाला माझी गोष्ट सांगण्यासाठी कथेच्या लेखकाने तुमच्यासमोर आणले आहे.
माझी कथा सांगण्यासाठी तुम्हाला साठ वर्षांपूर्वीच्या माझ्या गावी न्यावे लागेल. आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ. भाऊ सर्वात मोठा आणि मग मागच्या आम्ही पाच बहिणी. त्याकाळी असं प्रत्येकाच्या घरात असायचं. 12 13 भावंड असायची.
माझे वडील काय व्यवसाय करायचे मला कधीच कळले नाही. आमचे घर रस्त्यालगत होते म्हणून ते घराच्या बाहेर चार-पाच भरण्या बाकावर घेऊन आपण स्टुलावर बसायचे. कमरेला पंचा आणि मलमलचा सदरा किंवा बरेच वेळा उघडेच बसायचे. त्या भरण्यात भाजलेले शेंगदाणे, चणे आणि कुरमुरे असायच. ते चणे फुटाणे विकून ते काय पैसे मिळवायचे कोण जाणे. पण आमच्या घरात कमालीची गरिबी होती. माझी आई सहा भावंडांची भूक भागवता भागवता हैराण होई. आमची शेती वगैरे नव्हती. होते फक्त चार माड. त्याला आम्ही विहिरीतून पाणी काढून शिपायचो.माझी आजी म्हणजे आईची आई कधीमधी आम्हाला तांदळाच्या कण्या पाठवायची. किंवा गुळ पाठवायची. तिने हे सामान पाठवले की आमचे दोन दिवस जरा बरे जायचे. कित्येक रात्री आम्ही परड्यात वाढलेली टायकुलाची भाजी किंवा अळू ची भाजी खाऊन झोपायचो.
अशा परिस्थितीत आमच्या घराजवळच असलेल्या सरकारी शाळेत आम्ही जात होतो. कोणी कोणी जुने दिलेले दोन-तीन फ्रॉक आमच्यापाशी होते. चार बहिणी आलटून पालटून तेच फ्रॉक वापरत होतो. कोणीतरी दिलेली जीर्ण पुस्तके वापरत होतो. या परिस्थितीत सुद्धा आमचा दादा हुशार होता. त्याचा वर्गात नेहमी पहिला नंबर. बाकी आम्ही बहिणी अभ्यासात जेमतेम. एक वर्ष नापास एक वर्ष पास करत करत जात होतो. माझ्या पुढच्या चार बहिणींनी सातवीत शाळा सोडली आणि त्या कुणाकुणाकडे कामे करू लागल्या. कुणाचे तरी लाडू वळून दे, जेवण करायला मदत कर, सत्यनारायणाचा प्रसाद कर. अशा मदतीमुळे दोन पैसे मिळायचे शिवाय त्या दिवशीचे जेवण मिळायचे. मी शेंडेफळ म्हणून सर्वांची लाडकी. शिवाय मी दिसायला पण सर्वात देखणी. म्हणून माझी शाळा सुरू होती.
दादा सातवी पहिल्या नंबराने पास झाला. माझ्या आईच्या वडिलांनी म्हणजेच आजोबांनी त्याला हायस्कूल मध्ये घातले. कोणी जुने कपडे दिले कोणी कोणी पुस्तके दिली कोणी वह्या दिल्या. असे दादाचे शिक्षण सुरू होते.
एकदा त्याच्या शाळेत दामले नावाचे सावरकर प्रेमी आले होते. ते एका साखर कारखान्याच्या संचालक पदावर होते. सावरकर जयंती निमित्त दादाने त्यांच्या उपस्थितीत सावरकरांवर उत्कृष्ट भाषण केले. त्याने दामले प्रभावित झाले. त्यांनी शिक्षकांकडे दादाची चौकशी केली. शिक्षकाने आमच्या घरची परिस्थिती सांगितली. ते ऐकून त्या दामलेनी दादाला जवळ बोलावले. त्यांनी दादाला आपले कार्ड दिले आणि मॅट्रिक झाल्यावर आपल्याला भेटायला सांगितले. दामले दादाला साखर कारखान्यात नोकरी देणार होते. दादा चांगल्या गुणांनी मॅट्रिक झाला आणि मार्कलिस्ट हातात पडल्याबरोबर दामले ना भेटण्यासाठी जाऊ इच्छित होता, पण एसटी साठी पैसे नव्हते. तेव्हा माझ्या आतेच्या नवऱ्याने त्याला पन्नास रुपये दिले आणि त्यांच्या मुलाचे जुने कपडे दिले. दामले ना भेटायला त्यांच्या गावी गेला. त्या साखर कारखान्याच्या आवारात दादाला दामले भेटले आणि त्यांना सर्व आठवले. त्यांनी त्याला नोकरी दिली. राहायची कारखान्याच्या हॉस्टेलमध्ये सोय केली. अशा रीतीने आमच्या दादाचा पगार सुरू झाला. दादा ने पोस्टाचे कार्ड लिहून बाबांना सर्व कळवले. आणि अशाही परिस्थितीत आम्ही दिवाळी साजरी केली.
तोपर्यंत माझ्या दोन मोठ्या बहिणी लग्नाच्या झाल्या होत्या. थोडीफार धडपड करून त्या दोघींची लग्न एका मंडपात करून दिली. तोपर्यंत दादाला स्थळे सांगून येऊ लागली. शेवटी शेजारील जोशींच्या मुलीशी दादाचे लग्न ठरले. जोशी ना दोन गावची भिक्षुकी होती, त्यामुळे आमच्या घरात तांदूळ डाळ गुळ नारळ येत राहिले आणि आम्ही व्यवस्थित जेऊ लागलो. जोशींच्या ओळखीने माझ्या तीन आणि चार नंबरच्या बहिणीचे लग्न झाले. राहिले फक्त मी. दादाची आणि आईची इच्छा होती की मी खूप शिकावे. पण मला शिक्षणात जास्त रस नव्हता. मी जुनी अकरावी कशीबशी पास झाले आणि गावात नवीनच सुरू झालेल्या वाचनालयात नोकरीला लागले. त्या ठिकाणी बरीच पुस्तके होती. अशा रीतीने मला पुस्तके वाचण्याचा छंद जडला. मग मी लायब्ररी सायन्स चा एका वर्षाचा कोर्स केला. आणि एका हायस्कूलमध्ये वाचनालयात नोकरीला लागले. इथे फारसा पगार नव्हता पण माझे भागत होते. अशा रीतीने मी स्वावलंबी झाले. त्या हायस्कूलमध्ये इतर पण शिक्षिका होत्या, त्या दर शनिवारी तालुक्याच्या गावी हिंदी सिनेमा बघायला जायच्या. त्यांच्याबरोबर मी पण हिंदी सिनेमा बघायला जाऊ लागले. आणि मी वयाच्या 19 व्या वर्षी सिनेमाचा पडदा प्रथम बघितला. हिंदी सिनेमातील प्रणय प्रसंग पाहताना मी मोहरून जाऊ लागले. त्यातील हिरो माझ्या स्वप्नात येऊ लागले. आता जाता येता माझ्या तोंडात हिंदी गाणी येत होती.
माझ्या बहिणीत सर्वात मी देखणी, त्यामुळे मला खूप स्थळे सांगून येऊ लागली. पण माझा दादा आता स्थळे नीट पारखून लक्ष देऊ लागला. इतर चार बहिणींची लग्न करताना परिस्थिती नसल्याने आणि त्यांची शिक्षण ही नसल्याने फक्त धडधाकट नवरा बघून लग्न लावून दिली होती. त्यामुळे दादाने आलेली अनेक स्थळे नाकारली. दादाला माझ्यासाठी शक्यतो नोकरीवाला मुलगा हवा होता. शेवटी मामलेदार ऑफिसमध्ये नोकरीला असलेला अशोक चे स्थळ आले आणि मी खुश झाले. मुलगा स्मार्ट होता, घरदार होते आणि त्याकाळी अप्रूप असलेली स्वतःची स्कूटर होती. एकंदरीत फारसे नातेवाईक नसलेले आणि सुस्थितीतील हे स्थळ होते.
बघण्याचा कार्यक्रम सावंतवाडी दादाच्या एका स्नेहाकडे झाला. संध्याकाळी चार ची वेळ म्हणून दादा वहिनी आणि दादाचे सासरे जोशी पोचलो. नवऱ्याचे आई-वडील आणि बहीण साडेतीन वाजता आले. आमची एकमेकांशी ओळख झाली, मंडळी बोलायला चांगली होती. त्यांना मी आवडले हे कळत होते. पण नवरा मुलगा साडेचार वाजेपर्यंत आला नव्हता. तो नोकरीवरून परस्पर येणार होता म्हणे. सर्वजण वाट पाहत असताना तो पाच वाजता त्याच्या मित्राबरोबर स्कूटर वरून आला. माझा भाऊ आणि जोशी त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे कडे दुर्लक्ष करून तो आपल्या मित्राशी बोलत होता, पाच दहा मिनिटे थांबून तो निघून गेला. मला हे अशोकचे वागणे खटकले पण त्याकाळी मुलींनी बाहेर बोलण्याची परवानगी नव्हती. 10 मे रोजी सावंतवाडी छोट्या हॉलमध्ये आमचे लग्न झाले. माझ्या सर्व बहिणी भाऊजी भाचरे लग्नाला हजर होती. या आधी चार बहिणीच्या लग्नात आम्ही काहीच खर्च केला नव्हता, आता थोडीफार परिस्थिती होती दादा ने सढळ हाताने खर्च केला. माझ्या नवऱ्याला अशोकला सोन्याची अंगठी घातली. पोशाख शिवला आणि सर्वांचे मानपान केले.
लग्न करून मी माझ्या सासरच्या घरी आले. मला घर फारच आवडलं. आधुनिक सोयीयुक्त घर होतं. घरात नळातून पाणी आलं होतं. संडास बाथरूम घरात होत. मला आता पहिल्या रात्रीची उत्सुकता होती. हिंदी सिनेमात मी पाहिलेलं सजवलेला पलंग, त्यावर गुलाबाच्या पाकळ्या, आणि नवऱ्याची वाट पाहत असणारी नवरी. असे प्रसंग माझ्या आयुष्यात पण यावे अशी अपेक्षा होती. पण लग्न करून बाहेर गेलेला माझा नवरा अशोक रात्रीचे दहा वाजले तरी घरात परतला नव्हता. मी माझ्या खोलीत. हळूहळू दबक्या आवाजात सुरू असलेल्या बाहेरचा संवाद माझ्या कानी येऊ लागला.
बाबा - अजून हा आला नाही, निदान आजच्या दिवशी तरी वेळात यायला नको.
आई - येईल हो, मित्रात बसला असेल.
बाबा - नवीन नवरी घरात आणली आहे, तिच्या मनाचा विचार करायला नको?
आई - सुधारेल हो, घरात चांगलं खायला मिळालं तर बाहेर कशाला कोण जाईल?
माझ्या कानावर हळूहळू बाहेरचे संवाद येत होते. दिवसभराच्या थकव्याने माझे डोळे जड झाले होते. एवढ्यात बाबांनी पुढचे दार उघडल्याचे ऐकू आले.
बाबा - जेवून घे बाबा किती वाट पाहायची?
अशोक - मला जेवण नको.
आई - असा काय छळतोस आम्हाला, ती नवीन नवरी काय म्हणेल?
एवढ्यात खोलीचं दार ढकललं गेलं आणि माझा नवरा आत आला. मला पाहताच तोंड दुसरीकडे वळवून लाईट बंद करून झोपी गेला. हे काय चालल आहे मला कळेना. मी पाहिलेले हिंदी सिनेमात नवरी दुधाचा प्याला घेऊन येते, मग नवरा तिला जवळ घेतो, आणि......
मला रडू येत होतं. आई बाबांची, दादाची वहिनीची आठवण येत होती. दादा वहिनी मी मोठ्या हौसेने माझं लग्न लावून दिलं आणि माझा नवरा माझ्याकडे बघायला तयार नाही? रडता रडता कधीतरी माझा डोळा लागला. नवीन सुनेसारखी मी सकाळी लवकर उठून आंघोळ आटपली आणि चहा करून इतरांची वाट पाहत बसले. थोड्यावेळाने आई स्वयंपाक घरात आल्या. माझ्याकडे काळजीने बघत चहा पिऊ लागल्या. मग सासरे आले त्यांनी पण चहा घेतला. त्यांचा चेहरा मला उतरलेला दिसत होता. मी चहा घेऊन आमच्या खोलीत गेले, तर नवरोबा गाढ झोपी गेले होते. मी चहाचा कप परत आणला हे पाहून आई म्हणाल्या " उठला नाही का अजून, रात्र उशिरा झोपले म्हणजे सकाळी उशिरा उठायला होते. काल आपले लग्न झाले आहे याचे पण भान नाही याला '.
एवढ्यात अशोक बाहेर आला, तसे सासरे म्हणाले "अशोक, प्रतिभा ला घेऊन ओटावण्याला जाऊन ये, देवदर्शन करून या '.
अशोक - मला वेळ नाही, मी कधी देवळात जात नाही हे तुम्हाला माहित आहेच.
बाबा - मग तिला सावंतवाडीत घेऊन जा.
अशोक - जमणार नाही, माझा मित्र असतो बरोबर माझ्या गाडीवर.
आई - अरे दुसऱ्याची पोर आली आहे लग्न करून आपल्या घरात. तिच्या मनाचा काही विचार करावा.
अशोक - मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, माझं ऐकलं नाहीत.
एवढे बोलून अशोक बाहेर पडला आणि स्कूटर स्टार्ट करून चालता झाला. पुन्हा नेहमीचच सुरू. उशिरा येणे, कधी जेवायचे कधी नाही जेवायचे. रात्र उशिरा यायचे आणि माझ्याकडे पाठ करून झोपी जायचे.
एवढे दिवस तोंड मिटून सहन करणारी मी आता असह्य झाले म्हणून एकदा सकाळी आई बाबांना विचारले
"काय चालले आहे हे? माझ्या नवऱ्याला मी आवडत नव्हते तर लग्न कशाला करायचं? रात्री अपरात्री यायचं आणि माझ्याशी एक शब्द बोलायचं नाही. पाठ करून झोपी जायचं ".
आई - आम्ही हरलो प्रतिभा. त्याला ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कुत्र्याचं शेपूट. त्याच्या ऑफिस मधील एका बाईशी याचे संबंध. तिने नवऱ्याला टाकले आणि याला पकडले. एक मुलगा आहे तिला. सगळी शरम कोळून प्यायली ती.
बाबा - तिच्या तावडीतून याला सोडवायला गेलो. पण त्यात तुझा बळी गेला प्रतिभा.
प्रतिभा - मग मी काय करावं?
दोघेही रडू लागले. मी दादाला पत्र लिहिलं. चार दिवसात दादा वहिनी धावत आली. माझी परिस्थिती बघून दादा हादरलाच. सासू-सासर्यांना विचारावं तर ते रडत बसायचे. त्या रात्री दादा वहिनी आमच्या घरी थांबली, त्यांना अशोकला भेटायचं होतं. साडेदहा वाजले तरी नेहमीप्रमाणे अशोक घरी आला. दादा वहिनींना पाहून तो संतापला
अशोक - बोलावल्याशिवाय पाहुण्यांनी यायचं नसतं हे कळत नाही का?
दादा - सर्व कळतं. पण तुम्हाला भेटण्यासाठी थांबलोय.
अशोक - झालं ना भेटून? दार उघड आहे.....
दादा - जायचं तर आहेच, प्रतिभाची काय वाट लावली आहे तुम्ही? पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं तुमचं, आणि तुम्ही साडेदहाला घरी उगवताय?
अशोक - माझ्या घरात कधी यायचं ते मी ठरवीन.
दादा - ते ठरवा, पण ऑफिस मधली कोण ही बाई, तिच्या घरी पडलेले असता म्हणे.
अशोक - काहीतरी बोलू नका, कोणी सांगितलं?
दादा - तुमच्या आईने सांगितलं, या दोघांचे चेहरे बघा. कोण आपल्या मुलाबद्दल वाईट सांगेल कधी?
अशोक - ती मूर्ख आहे दोघं.
दादा - तुम्ही त्या बाईचा नाद सोडणार आहात का नाही?
अशोक - नाही, मला तुमच्या बहिणीची लग्नच करायचं नव्हतं. पण आमच्या घरातल्या मंडळींनी रडून रडून मला भरीस घातलं. त्यांना कुटुंबाचा वारस हवा होता.
दादा - तुमच्यासारख्या माणसाशी बोलण्याची माझी इच्छा नाही. आम्ही गरीब असलो तरी माझ्यावर चांगले संस्कार झाले. पण आम्ही फसलो. चांगला सुशिक्षित नोकरी करणारा नवरा बघून माझी लाडकी बहीण तुम्हाला दिली.
माझ्याकडे वळून दादा म्हणाला "चल प्रतिभा, या असल्या नवऱ्याबरोबर एक रात्र पण इथे राहू नकोस '.
मी पण वाट बघतच होते. गेले पंधरा दिवस गुदमरले होते. खोलीत जाऊन माझी बॅग भरली आणि दादाने आणलेल्या भाड्याच्या गाडीत बसले. बाहेर पडताना सासू-सासर्यांचे चेहरे केविलवाणी दिसत होते. दादा वहिनी बरोबर गावी आले. मी पंधरा दिवसात माहेरी आलेली पाहून आई-वडील धास्तावले. वडील रडू लागले. माझ्या बहिणी न करता त्या पण भेटायला आल्या. सर्वांना हळहळ वाटली. सर्व बहिणीत शिकलेली आणि देखणी मी. दादा वहिनींना पण अपराधी वाटत होते. व्यवस्थित चौकशी न करता लग्नाची घाई केली. चांगलं घराणं, नोकरी, घरदार पाहून लग्नाची घाई केली. आठ दिवस मी माहेरी राहिले, पण गावात आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. लांबून लांबून चौकशा सुरू झाल्या, त्यामुळे मी माझ्या नोकरीवर हजर राहण्याचे ठरवले.
मी पुन्हा माझ्या शाळेत हजर झाले. दादा वहिनींना खूप काळजी वाटत होती म्हणून माझी आई माझ्याबरोबर आली. बाबांना दादा आपल्याकडे घेऊन गेला. मग मी वाचनाचा सपाटा लावला. शाळेच्या वाचनालयात तसं काम कमी, पण आजूबाजूला पुस्तकच पुस्तक. पाच-सहा वर्षानंतर आई आजारी पडू लागली, मग दादा ने तिला आपल्याकडे नेले. माझं वय आता 27 वर्षे होत. दादा वहिनीं मागे लागली होती की अशोकला घटस्फोट घेऊन मी आता दुसर लग्न करावं. पण मी लग्नाचा धसकाच घेतला होता. हळूहळू मी लिहू लागले. सावंतवाडीच्या वैनतेय एक कथा लिहिली. संपादकांना ती आवडली त्यांनी छापली. मग कथा आणि कविता लिहिण्याचा झपाटा लागला. मग अनेक काव्यवाचन स्पर्धेत आणि कथा वाचन स्पर्धेत मी भाग घेऊ लागले. यामुळे अनेक नवोदित लेखकांच्या ओळखी झाल्या.
काव्यवाचन स्पर्धांमध्ये भेटला विनोद. माझ्यासारखा आपण तो ग्रामीण भागातून आला होता. एका साखर कारखान्यात नोकरीला होता. उत्तम कविता करायचा. आजऱ्याच्या काव्यवाचन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला, म्हणून विनोदने अभिनंदन असे पत्र पाठवले. मी त्याला उत्तर पाठवले. आणि पत्रोतरांचा सिलसिला सुरू झाला. त्याच्या नजरेत माझ्याबद्दलचे प्रेम दिसत होतं. मलाही त्याच्याबद्दल प्रेम वाटत होतं. त्याने मला लग्नाबद्दल विचारलं तर काय उत्तर द्यायचं याचा मी विचार करत होते. आता ध्यानीमनी स्वप्नी विनोद येऊ लागला. नकळत मी खूप वर्षांनी स्वतःला आरशात पाहू लागले. चांगली साडी आणि मॅचिंग करू लागले. गाणी गुणगुणायला लागले. माझ्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच हिरवळ येणार होती. पण........
तो रविवार होता. मी सावंतवाडीतील वैनतेय ऑफिसमध्ये जाण्यासाठी सावंतवाडी स्टॅन्ड वरून चालत निघाले. तळ्याजवळ वळताना मला सावंतवाडीतील तावडे समोर आले. तावडे सुद्धा आमच्याबरोबर कविता वाचनात भाग घेत असत. मला पाहताच ते थांबले. " काय प्रतिभाताई कुठे निघालात?'.
" वैनतेय मध्ये जाते. एक लेख द्यायचा होता '.
" बरं, तुम्हाला कळलं का? रत्नागिरीत आपल्याबरोबर तो विनोद देसाई नाही का कविता म्हणायचा?'
विनोद च नाव ऐकतात मी थबकले. " त्याचं काय?
"अहो, विनोद गेला एक्सीडेंट मध्ये. तुम्हाला कळलं नाही काय?'
मी हे ऐकतात सटपटले. डोळ्यासमोर अंधारी आली. मी आता खाली पडणार एवढ्या तावडे ने हाताला धरून कठड्यावर बसवले. धावत जाऊन समोरच्या हॉटेल आतून पाणी आणले." बाई काय झालं? ऊन लागलं का? की विनोद ची बातमी सांगितली म्हणून घाबरलात? तावडे काळजीने विचारत होते.
मी हळूहळू उठत म्हटले " काय झालं विनोदच?'
" अहो तो निपाणी होऊन गडहिंग्लजला जाताना तवंदी घाटामध्ये त्याची मोटर सायकल स्लिप झाली आणि...
"पुरे पुरे, मला ऐकवत नाही, मी म्हणाले आणि हळूहळू सावरत तावडी ना नमस्कार करून वैनतेय ऑफिसमध्ये जाण्याऐवजी पुन्हा एसटी स्टँडच्या दिशेने चालू लागले. एक तासाने गावी जाणारी एसटी मिळाली ती पकडून घरी आले. आयुष्यात दुसऱ्यांदा मला ठोकर लागली होती. एकंदरीत माझ्या आयुष्यात लग्नाचं आणि पुरुषाचं सुख नव्हतं. पुढे अनेक दिवस विनोद ध्यानीमनी स्वप्न येत होता, पण हळूहळू मी विसरण्याचा प्रयत्न केला. मग माझा आयुष्य म्हणजे शाळेत जाऊन वाचनालयात बसणे. घरी येऊन जेवण बनवणे, शनिवारी एखाद्या बहिणीकडे जाणे. भाचरांचे कौतुक करणे, आई-वडिलांना भेटणे. काही वर्षांपूर्वी माझे बाबा गेले. दोन वर्षांनी आई गेली. पण दादा आणि वहिनी माझं माहेर शिल्लक ठेवलं होतं. मोठ्या सुट्टीत दादाकडे जात होते. दादाच्या दोन मुली त्यांना लळा लावला होता. कधीकधी मी माझ्या सासरच्या घरी पण जात होते. आई-बाबांची चौकशी करत होते. त्यांच्याकडून कळल्याप्रमाणे अशोक क्वचितच घरी येत होता, बाकी त्या बाई बरोबरच राहत होता.
...वर्षे येत होती जात होती. मी मोठी होत होते. तारुण्य हळूहळू लयाला गेले होते. माझ्या वाचनालयात मला मोठा पगार नव्हता. पेन्शन मिळणार नव्हती. पगारच थोडा असल्याने बचत किती असणार? दादा निवृत्त झाला आणि दादा आणि वहिनी गावी आली. आमचे जुने घर पाडून दादाने नवीन घर बांधले. दादा ने मुलींची लग्न करून दिली. मी निवृत्तीनंतर काय करावे कोठे जावे अशा विचारात होते. माझी तब्येत चांगली होती. त्यामुळे कुठे नोकरी मिळाली तर हवी होती.
शेवटी मी निवृत्त झाले आणि गावी आले. आता दादा वहिनी आणि मी तिघे घरी राहत होतो. अचानक एक दिवस सावंतवाडीच्या गोगटे वकिलांचा माणूस मला शोधत शोधत आला. गोकटेने मला त्यांच्या ऑफिसमध्ये सावंतवाडीत बोलावले होते असा त्याने निरोप दिला. मला कळेना, गोगटे यांचे माझ्याकडे काम काय? दुसऱ्या दिवशी दादा आणि मी एसटीने सावंतवाडीला गेलो आणि सकाळी नऊ वाजता गोगटेनच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. गोगटे वकील माझी वाटच पाहत होते. त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि ते बोलू लागले.
गोगटे वकील -प्रतिभाताई, मी गेला महिनाभर तुम्हाला शोधतो आहे. तुम्ही निवृत्त झालात हे कळले पण नेमक्या तुम्ही कुठे राहता हे कळत नव्हते. असो. मुद्दाम तुम्हाला बोलावले. तुमचे पती अशोक यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाल्याचे तुम्हाला कळले असेलच. ( अर्थात मला हे माहीत नव्हते ). मी गप्प राहिले.
गोगटे - अशोक माझा मित्र. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. तू तुमच्याशी कसा वागला हे अशोकने मला सांगितलं. शेवटची आठ दहा वर्षे त्याला त्याचा पश्चाताप होत होता. तो ज्या बाईन बरोबर राहत होता क्या बाई पाच वर्षांपूर्वी वारल्या. त्याआधी सुमारे चार-पाच वर्षे त्या आजारी होत्या. त्यांच्या मुलाने अशोकला घराबाहेर काढले. मग तो गावच्या घरात एकटाच राहत होता. त्याला खूप मधुमेह होता. खायची बंधने होती. एकट्याने सर्व करायची त्याला सवय नव्हती. जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपले आयुष्य आता फारसे राहिले नाही. तेव्हा तो माझ्याकडे आला आणि त्याने आपले मृत्युपत्र केले. मृत्युपत्र करण्याचे कारण म्हणजे त्या बाईच्या मुलांनी त्याच्या प्रॉपर्टीत हक्क सांगू नये म्हणून. माझ्याकडे त्याचे ते मृत्युपत्र आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने त्याचे गावचे घर तुमच्या नावे केल आहें. शिवाय त्याच्या बँकेत असलेले सुमारे 30 लाख रुपये तुमच्या नावे केलेले आहेत. शिवाय तो सरकारी अधिकारी असल्याने त्याला मिळणाऱ्या पेन्शनची फॅमिली पेन्शनवर तुमचे नाव नोंदवले आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कागदपत्रे वगैरे मला दिलीत तर दरमहा तुम्हाला 20000 रुपये पेन्शन मिळू शकेल. आणि हे एक पत्र अशोक ने तुमच्यासाठी लिहून ठेवले आहे, ते वाचा.
असं म्हणून वकिलानी अशोकचे पत्र माझ्या हातात दिले. मी दादाकडे पाहिले. दादा पण वकिलांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला होता. मी थरथर त्या हाताने पत्र फोडले.
प्रतिभा हिस,
हे पत्र तू वाचशील तेव्हा मी या जगात नसेन. मी तुझ्यासारख्या चांगल्या मुलीवर अन्याय केला. मी कशाच्या गुंगीत होतो मला कळत नाही. गुंगीच्या बाहेर आलो तेव्हा उशीर झाला होता. मला तिने भुरळ घातली होती. तिच्याशिवाय काही दिसत नव्हते. तुझे आयुष्य माझ्यामुळे बरबाद झाले. मला क्षमा कर. माझा मित्र गोगटे वकील तुला बाकी सर्व सांगेल.
अशोक
मी पत्र दादाच्या हातात दिले. मी गोगटे वकिलांना आठ दिवसात येऊन भेटते असे सांगून मी बाहेर पडले.
वाचकहो, मी या कथेची नायिका प्रतिभा, माझी कथा तुम्हाला सांगितली. आता या क्षणी मला प्रश्न पडला आहे की अशोकने ठेवलेले पैसे मी स्वीकारावे की न स्वीकारावे? माझे मन दोन्ही दिशेने धावते आहे. माझ्या मनात दोन तऱ्हेचे विचार येत आहेत
1- पहिले म्हणजे ज्या माणसाने मला पत्नीचा दर्जा दिला नाही, माझ्याकडे ढुंकूनही पाहिली नाही, माझे आयुष्य माझे तारुण्य उजाड केले, त्याचे पैसे मी स्वीकारावे का?
2- दुसरे म्हणजे माझ्या निवृत्तीनंतर मला निश्चित उत्पन्नाचे साधन नाही. पेन्शन नाही. बचत नाही. स्वतःचे घर नाही. तेव्हा नावाला का होईना मी त्याची बायको होते हे पैसे आणि पेन्शन मी स्वीकारावे का?
वाचकहो, तुमचा सल्ला काय आहे? तुमचा सल्ला मी मान्य करीन. कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तरी माझ्या या कथेबद्दल तुमची मते या कथेच्या लेखकाला कळवा. विश्वास ठेवा, तुमच्या मताप्रमाणेच मी निर्णय घेईन.
आपली
...प्रतिभा
लेखक -प्रदीप केळूसकर 9422381299/9307521152
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा