वासवदत्ता एका प्रसिध्द टीव्ही चॅनेलवर मॅनेजर म्हणून काम करत होती. तिने सुरु केलेला “फ्लेवरफुल” हा कुकिंग शो खूप प्रसिद्ध झाला होता. जगातील सर्व पदार्थ त्या शो वर बनत असतं. कित्येक गुणी व होतकरू शेफ ना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असे. हल्लीच्या गडबडीच्या जगात पौष्टिक आहार पटकन कसा बनवायचा याचे उत्तम धडे तिथे मिळतं. वासवदत्ताचं सुंदर निवेदन ही प्रेक्षकांना पर्वणीच होती. वासवदत्ताच्या घरी मात्र वेगळीच अडचण निर्माण झाली होती. तिची स्वयंपाकाची बाई, यशोदा, अचानक आजारी पडली त्यामुळे तिला विश्वासाची नवी बाई हवी होती. पण मनासारखी बाई मिळालेली नव्हती. एका संध्याकाळी वासवदत्ता दमून घरी आली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. बाहेर नऊवारी नेसलेली एक बाई उभी होती. वय साधारण पन्नास - बावन्न असावे. कपाळावर अधेलीच्या आकाराचे कुंकू, गळ्यात बोरमाळ व कानात ठसठशीत कुड्या घातलेली ती बाई अगदी तरतरीत दिसत होती.
“म्याडम, मी हिराबाई. खालच्या मजल्यावर सैपाकाचे काम करत्ये. तुमाला कामाची बाई हवी आहे नव्हं? एकदम स्वच काम हाय माझं. खालचे लोक कधीपन घर माज्यावर टाकून बाहेर जातात” ती आत्मविश्वासाने म्हणाली.
वासवदत्ताला तिचा धीटपणा आवडला. थोडावेळ तिच्याशी बोलून ती म्हणाली, "या उद्यापासून कामाला ! "
हिराबाईच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
“तुमच्यासारखी कडे सैपाक करायचा मंजे परीक्षाच हाय माजी” म्हणत ती कामाला येऊ लागली. तिच्या हाताला चव होती. तिनं बनवलेलं लसणाचं सार, गावरान पद्धतीचे तिखट लोणचे, उडदाचे घुटं, थालीपीठं, मसालेदार कोंबडी, गोडाचे पदार्थ वगैरे एकाहून एक चविष्ट पदार्थ खाताना वासवदत्ता खुष झाली होती. चार महिन्यात हिराबाई तिच्याकडे छान रुळली.
"हिराबाई, काय चव आहे ग तुझ्या हाताला!" म्हणत वासवदत्ता बोटे चाटत खानदेशी डाल बट्टी खात होती.
हिराबाई म्हणाली, "ताई, माज्या मनात एक इचार आलाय. तुज्या टीवी वर माझी मसालेदार कोंबडी करून दावावी का? मी छान सांगेन कशी करायची. माज्या भाषेत सांगितलं तर चालतंय नव्ह?" गोंदलेल्या हनुवटीवर हात ठेवत तिनं निरागसपणाने विचारले.
वासवदत्ता म्हणाली, "हिराबाई, अगदी माझ्या मनातली गोष्ट बोललीस बघ. तुझ्या भाषेतील गोडवा काही वेगळाच आहे. पदार्थ कसा करायचा ते काल मला सांगत होतीस ना तसे करता करता सांगायचे. एक ट्रायल घेऊ पुढच्या आठवड्यात."
हिराबाई खूष झाली. पुढच्या आठवड्यात ट्रायल झाली. इरकल नेसून थोडासा मेकअप केलेली हिराबाई अगदी खानदानी दिसत होती. काही रिहर्सल नंतर शो रेकॉर्ड झाला व हिराबाई लहान पडद्यावर झळकली. खास ग्रामीण भाषेतील चविष्ट पदार्थ दाखवणारी प्रेमळ हिराबाई लोकांना एकदम आवडली.
"फ्लेवरफुल" ची लोकप्रियता अजून वाढली. हिराबाईला रस्त्याने जाताना अनेक चाहते ओळखू लागले. तिच्या हातात आता पैसाही खुळखुळत होता.
"हिराबाई, हेमा मालनला बी कुनी येवड इचारत न्हाइ!" तिच्या मैत्रीणी थट्टेनं म्हणत. हिराबाई खुषीने हसून म्हणे, "व्हय व्हय.. पुरं झालं!"
चार महिन्यांनी एक दिवस अचानक हिराबाई वासवदत्ताला म्हणाली, "ताई आता पुरे झालं. आता शो करण्याची जरूर न्हाई."
वासवदत्ता चमकली. "का ग हिराबाई, फार काम होतय का तुला? हवे तर कमी करू पण बंद का करायच?
हिराबाई "अरे नारायणा", म्हणत जमिनीवर बसली. तिचे डोळे भरून आले होते. ती डोळे पुसत म्हणाली, “ताई, काय सांगू तुला! माजा लेक याच गावात राहतो. कर्ज काढून त्याचे लग्न करून दिलं. त्याची बायको, सुमा, शिकलेली मुलगी हाय. तिला माजं वागणं अजेबात आवडत नाही. ती मला लेकाला आणि नातवंडांना भेटू देत न्हाई. लेकाचं काय चालत नाही तिच्यापुढे.
आता मला चार लोक वळखायला लागल्यावर ही पण मुलांना घेऊन भेटायला आली. द्येवाची क्रिपा. लेक पण पाया पडून गेला. आता मला काही नको.”
वासवदत्ता म्हणाली, "अग हिराबाई, तुझ्यात गुण आहेत. तुझे करणे/बोलणे छान आहे म्हणून तुला यश मिळाले ना? ते असं एकदम का सोडून द्यायचं?”
"ताई, लेकाला आनि नातवंडांना भेटाया जीव कासावीस होत व्हता. आता मला परसिध्दी, पैसा काय बी नको.”
वासवदत्ता तिच्याकडे बघत राहिली. आईपणात सर्वस्व ओतणाऱ्या आयांची मनं सुनांना कधी कळतील? चार चार घरची कामं करत एकटीने मुलाला शिकवलं. आणि आता त्याची बायको त्याला आईला भेटू देत नाही.
आई वडीलांना देव मानणाऱ्या, एकत्र कुटूंबपध्दती असलेल्या आपल्या देशात सासु/आई एवढी नकोशी कधीपासून होऊ लागली? बाई बाईला समजून घेत नाही. न्युक्लिअर फॅमिली मधले तोटे या मुलांना दिसत नाहीत. प्रेमाचे चार शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले हे वृध्द जीव मन मारून जगत राहतात. ही आहे आपली संस्कृती?
नात्यातील गोडी वाढवण्यासाठी फ्लेवरफुल मधून या विषयावर भाष्य केलं तर? असा नवा शो सुरू करून नव्या जुन्या पिढ्यांना एकत्र आणता येईल का? ती विचारात गढलेली असताना हिराबाई “निघते” सांगून बाहेर पडली
दारावरची बेल वाजली म्हणून वासवदत्तेनं दार उघडलं. बाहेर हिराबाईची सून, सुमा उभी होती.
“काय बिनसवलस ग? हिराबाईला काय बोललीस? ती शो करायचा नाही का म्हणतेय?” वासवदत्तेनं रागानं विचारलं.
सुमा खाली मान घालून म्हणाली, "माझे लाडू बिघडले म्हणून सासूबाई मला ते कसं सुधारायचं सांगू लागल्या म्हणून मला राग आला. मी रागाच्या भरात म्हणाले की आल्यात मोठ्या टीव्ही वर काम करणाऱ्या. ताईनं नसता भाव दिलाय तुला. बंद करा तो शो नाहीतर मुलांना भेटू देणार नाही.”
वासनदत्ता भडकली. “तिचं नाव झाल्यावर ते वापरून, तिला न सांगता, तू माझ्याकडे नोकरी मागायला आलीस. तू कशी वागवतेस हिराबाईला मला तेव्हाच कळलं होतं म्हणून तुला सांगितलं की हिराबाईशी धड वागलीस तरच नोकरी टिकेल म्हणून. का वेडंवाकडं बोललीस तिला? आणि काय ग? नातवंडं, मुलगा हे प्यादं पुढं करून तिच्या भावनांशी खेळते आहेस? तुझा तो धाकटा सदू आहे ना त्याची बायको तुला अशीच दूर लोटणार आहे बघं..ऐकून ठेव माझे शब्द.”
“ चुकलं ताई. माफी मागते. परत नाही बोलणार.” म्हणून सुमा बाहेर पडली.
ती बाहेर पडताच हिराबाई मागच्या दारानं आत आली.
“मी घरी जाताना ही बया दिसली म्हणून मी पण माघारी वळले. ताई, तरी मी म्हणत होते की सुमा का मला चांगलं वागवतीया? तुझ्यामुळचं होय? लई गुनाची हायेस ग ताई! मला पोरं भेटाया लागली तुज्यामुळं ! शो च काय पण तू म्हनशील ते कराया तयार हाय मी.” हिराबाई हात जोडून म्हणाली.
आयुष्यातील गोडी फक्त गोडधोड पदार्थानं वाढत नाही. ती नात्यातल्या जवळीकेने वाढते. एकमेकाचा मान राखण्यानं वाढते. सासू-सून हे नातचं असं आहे की जिथं अर्थाचा अनर्थ होत राहतो. मुली शिकल्या म्हणून त्यांच्यात नाती जपण्याचे शहाणपण आलं नाही आणि पुर्वीच्या रितीभातीत अडकलेली सासू कधी अपेक्षांमधून बाहेर पडली नाही. अपेक्षा न ठेवता राहणे दोघीना जमत नाही.
आयुष्य हा जर एखादा पदार्थ असेल तर त्यात मान, आदर, समजूतीचे मसाले घालून त्यावर प्रेमाची फोडणी दिली की हा पदार्थ उत्तम होणार यात काही शंका नाही. या पदार्थाची चव बिघडू नये, त्यातला रस जाऊ नये म्हणून काहीतरी केलंच पाहिजे..वासवदत्तानं काही निश्चय केला.
“नाती जपताना” ठेवावे का नव्या शो चं नाव?” मानसोपचार तज्ञ, विचारवंत यांच्याकडून तरूण आणि वृध्दांना एकत्र आणून नाती कशी जपायची असा शो प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी फ्लेवरफुल चा भाग म्हणून करायचा निश्चय करून तिनं स्क्रिप्ट लिहिण्यास सुरूवात केली.
आयुष्य फ्लेवरफुल करण्यासाठी माणसाला खरं काय हवं असत आज तिला उमगलं होतं ! न जाणो या शो मुळे आपली दुरावलेली सून पण कदाचित बदलेल व आपल्याशी बोलू लागेल अशी आशा आता तिच्या मनात निर्माण झाली होती.
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा