रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफर भाई ने आपल्या पोराला,आसीफला, हाक दिली. ‘ओ आसीफ.. चल गाडीयां अंदर लगा’.
आसीफ मित्रासोबत गप्पा मारत होता.
मित्राला ‘चल उद्या सकाळी काॕलेजात भेटू’ म्हणत त्याने कटवले व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला.
बारा बाय दहा च्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गि-हाइकाच्या गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही हे त्यालाही माहित होतं. त्यात बारीक पाउस चालू झाला होता.
गाड्या लावून होइपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेउन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं...त्यांना बरं वाटल.. "आपण नशीबवान..पोरग काॕलेज शिकतय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतय. नाहीतर आपल्या भावांची पोरं..सगळीजण गॕरेजच्या कामात..पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.”
पाउस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोचणे आवश्यक होतं.
दुकानाचे शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाउन बसलेला आसीफ लगेचच म्हणाला ‘दुकान बंद हुआ भाई’.
जफरभाईनी आसीफकडे फक्त एक कटाक्ष टाकला.
त्यांनी समोर येत त्या जोडप्याला विचारलय ‘काय झालं गाडीला?’
तरुणाने सायलेंसर कडे बोट दाखवत म्हंटलं ‘गावातनं निगालो तवाच जरा गचके मारत होती..मिस्त्रीला दावायला वेळ नवता..जरा इमरजन्शी झाल्या’ बायकोकडे हात दाखवत तो म्हणाला ‘हिच्या गावी दत्तवाडला निगालतो..पण इथ नाक्यापर्यंत कसतरी आलो आणि गाडी बंद पडली..तीन किलोमीटर ढकलत आणलीय..लवकर पोचायचय..हिचे आबा..म्हंजी वडील..लई शिरीयस हायेत. बघा जरा काही होतय का काही करुन चालू..’
जफरभाईनी तरुणीकडे पाहिले. तिच्या चेह-यावारचे भावच सर्व सांगून गेले. त्याने दोघांना छपराखाली आडोशाला घेतलं.
‘बघू’ म्हणत त्यानी बाईक स्टँडला लावून चेक केली. पेट्रोल बघितले..ते अजून बरंच शिल्लक होतं. बराच वेळ किक मारुन बघितली..गाडी सुरु होत नव्हती.
सगळ्या गोष्टी चेक केल्यावर ते उभे रहात म्हणाले
‘इंजिन सिझ झालय..गाडीतलं सगळ इंजिन आॕइल लीकेज झालय..तुम्ही तशीच गाडी मारली त्यामुळे इंजिन जॕम झालय..वेळ लागंल दुरुस्त करायला..पूर्ण इंजिन खोलायला लागंल..आता जरी खोललं तरी सकाळपर्यंत होणार नाही काम. त्यात पाउस आहे..कामगार घरी गेला आताच..आता नाही येणार रात्री ’
त्या तरुणाने बायकोकडे पाहिलं. ती आता रडवेली झाली होती. नव-याकडे पहात म्हणाली
‘आता कसं करायचं..शेवटची बस पण गेली आता..नउला..’
तरुण काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन घेतला
‘हां हॕलो..बोल सोपान..अरे हाय..वाटेत हाय..जरा गाडीला प्राॕब्लेम झालाय..दुरुस्त करुन येतोय...नाही पण...अरे हो कळलं तस़ लगोलग निघालोच की..बर बर..आमी लवकर येतोय..काळजी करु नका..तासाभरात पोचतो..’
त्याने फोन बंद करत बायकोकडे पाहिलं.
‘सारकं तुझं नाव घ्यायल्यात तुमचे आबा..लवकर या म्हणाल्यात..कंडिशन नाजूक आहे..’
आता मात्र तिचा बांध फुटला..ती हमसून हमसून रडायला लागली. भरीस भर म्हणून पाउस आता जोरात कोसळायला लागला. तिरका पाउस आता दुकानाच्या छपरातून आत येउ लागला.
तो तरुण जफरभाईंकडे आला व हात जोडत म्हणाला
‘दादा..तुमीच मदत करा. लवकर काहीपण सोय होईल का बघा..रिक्शा..सुमो..काहीपण..पैसे काय लागेल ते देतो तिथं पोचून’
जफरभाईनी आसीफकडे पाहिलं. पोराने मान हलवली.
‘अबी कोन जायेगा अब्बा? दत्तवाड बोलेतू ह्यांशे नही बोलेतो तीस किलोमीटर..और वोबी मेन रोडशे दस किलोमीटर अंदर..हजार दिये तोभी कोई नही जायेगा.’
जफरभाईंनी मान डोलावली. मग विचार करुन बोलले..
‘अस्लम को फोन कर..रिक्शा लेकू आ बोल उसको.’
‘अब्बा..ऐशे क्या कर रहे तुमे..? अस्लम मुंबई गया नत्ता क्या रहीमचाचा के साथ..? एअरपोर्ट छोडने..आजच रहीमचाचा का हज का फ्लाइट हत्ता..अस्लम कल आयेगा वाप्पीस..’, आसीफने आपला बाप पण काय या लोकांच्या चक्करमधे अडकतोय अशा अविर्भावात उत्तर दिलं.
‘अरे हां..मै भूलही गया..’ जफरभाई उद्गारले.
मग काहीतर सुचून त्याला चटकन म्हणाले ‘एक काम कर..तू इनकी गाडी दुकान मे लगा..कस्टमरकी एक गाडी निकालकू रख..मै दस मिनट मे आतूं..’
त्या जोडप्याला धीर देत जफरभाई म्हणाले ‘तुमी थांबा..मी तुमची रिक्षाची व्यवस्था करुन येतो..खच्चून दहा मिनीटात येतो’
असं म्हणत पोराला पुढे काही बोलायची संधी न देता त्यांच्या बाईकवरुन जफरभाई पावसात भिजत निघून गेले.
आसीफने त्या दोघांकडे एकदा “काय आफत आहे!!” अशा नजरेने पाहिलं व दुकान उघडलं. एक गाडी बाहेर काढली व त्या जोडप्याची गाडी आत दुकानात लावली. ते दोघे अपराधी नजरेने त्याच्याकडे पहात होते.
दहा पंधरा मिनीटे गेली. तरुणीच्या गावातून पुन्हा फोन येउन गेला. तिच्या आबांची अवस्था अजूनच खराब झाली होती. सगळे तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. मधेच एक रिक्षा दुकानासमोरुन न थांबता निघून गेली. आसीफ त्याच्या मोबाईलवर गर्क होता.
तेवढ्यात अजून एक रिक्षा येताना दिसली. मुसळधार पावसामुळे दिसत नव्हतं पण रिक्षा दुकानाशी आली आणि ड्रायव्हर सिटवरुन जफरभाई स्वतः उतरले.
आसीफने बापाकडे आश्चर्यचकित होत पाहिलं व विचारलं
‘अब्बा..तुमीच जाने वाले रिक्षा लेकू ..अबी ये बारीशमे...? पागल हुये क्या??’
‘क्यों..? गॕरेजशे पयले मै रिक्षा चलाता नत्ता क्या?’ मग जोडप्याकडे वळून तो म्हणाला ‘चल बसा भाउ..बस गं पोरी?’
ते दोघे रिक्षात बसले. तसा मुलाच्या बाजूने आसीफ पण रिक्षात बसला.
‘अब्बा..मै भी आ रा..रस्ता मेरकू पता है..और वाटार से शाॕर्टकट है वो तुमकू पता नही होगा’
जफरभाई हसले व त्याला म्हणाले
‘गाडी बाहर है..उसकू चेन लाॕक कर..और ताला लगा..ये ले चेन और लाॕक..’ अस म्हणत जफरभाईनी पायातली चेन आणि कुलूप काढून त्याला दिले.
आसीफ ने मनातल्या मनात बापाला मानले.
“अब्बाला माहित होतं मी घरी जाणार नाही..रिक्षाने त्यांच्याबरोबरच जाणार..शेवटी, बाप बाप होता है”
गाडी लाॕक करुन ते निघाले. भयंकर पाउस सुरु होता. समोरचं नीट दिसत नव्हते. आसीफ समोर त्याच्या अब्बांशेजारी बसून रस्ता सांगत होता.
त्याला माहिती असलेल्या शाॕर्टकटने वाटारवरुन घेत जफरभाईंनी एका तासात रिक्षा दत्तवाडला त्या तरुणीच्या घरी पोचवली.
घरासमोर थांबता क्षणी रिक्षातून उतरुन ती तिरासारखी धावत ओरडतच घरात शिरली ‘आबा मी आले..मी आले आबा.....’
जफरभाईंच्या रिक्षाभोवती लोक जमा झाले. गावातल्या लोकांना सर्व हकीकत एव्हाना कळली होती. सर्वांच्या चेह-यावर जणू देवाला पाहिल्याचे भाव होते. कुणीतरी पाणी व चहा घेउन आले व त्यांना प्यायला लावला.
दहा मिनीटे शांतता होती...
मग अचानक आतून मोठ्या आवाजात आक्रोश ऐकू आला. जफरभाईंनी आकाशाकडे पाहिले व निश्वास टाकत म्हणाले..’या अल्लाह…!!’
थोड्या वेळाने त्या तरुणीचा भाउ सोपानने येउन जफरभाईंचे हात हातात घेतले व म्हणाला
‘मिस्त्री साहेब तुमी दोघांनी देवासारखं काम केलं...दाजी व आमच्या बहिणीला टायमात आणलं..ते बी अशा पावसात..तुमचे लई उपकार झाले..तिला पाहून आमच्या आबाने जीव सोडला..जनमभर घोर लागला असता तिला जर भेट चूकली असती तर..कशी परतफेड करु?’ सोपान त्यांचे पाय धरायला वाकला.
‘अरे अरे..भाउ..काय करताय..!!’ त्याला अडवत जफरभाई म्हणाले ‘तुमच्या बहिणीच्या वयाची पोरगी आहे माझीपण..लगीन होउन गेली सासरी..आता जर मी तुमच्या आबाच्या जागी व ती तुमच्या ताईच्या जागी असती तर अजून कुणीतरी हेच केल आसतं..वेळ आली तर तुमीपण तेच केलं आसतं जे आमी केलं’
रिक्षा स्टार्ट करत जफरभाईंनी रडणा-या 'त्या' तरुणाचा हात हातात धरत म्हंटलं..
‘तुमच्या बायकोला सांभाळा..गाडी रिपेअर करुन ठेवतो तयार उद्या..या कधीपण, येउन घेउन जा दोन चार दिवसात, जमेल तसं....’
लांब गेलेल्या रिक्षाकडे व नंतर तिच्या टेललँपकडे तो तरुण व सोपान दोघे पहात राहिले...ते दिसेनासे होइपर्यंत.
रिक्षाने आणून सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची त्यांनी दिलेली नोट परत करीत जफरभाईंनी दिलेले उत्तर त्यांच्या कानात अजून घुमत होते..
‘माणूस मरतो दादा..माणूसकी नाही….
खुदा हाफीज..!!’
© सुनील गोबुरे, सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा