मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1514. विसरता न येणारी, आठवणीतली दिवाळी

  दिगंबर कामत यांचे तेरावे झाले. सर्व जवळच्या नातेवाईकांनी गोड घास खाऊ घातला. कामतांचे सुतक फिटले. पुढे चार दिवसांवर दिवाळी होती. त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई होती. 
   आज संपूर्ण पाहुणे गेले. वीणा ताईंना घर खायला उठतं होते. मुलगा, सूनबाई पण आज कामा वर गेले होते. कारण पुढे सलग तीन दिवस सुट्ट्या होत्या. विनाकारण दोन सुट्ट्या वाया जायला नको म्हणून. चार वर्षाचा नातू नील आणि त्या दोघेच घरी होते. 
   नील आज आजीला सारखे सारखे आजी आबा कुठे गेले. त्यांना फोन करून बोलाव ग !  मला बागेत फिरायला जायचे आहे, !  नाहीतर तू चल !  
   वीणाताई त्याला सांगत होत्या नील , आबा आपल्याला सोडून देवाघरी गेले. त्याचा प्रश्न , मग आपण पण जाऊ ?  आजी तू लवकर तयार हो. आई बाबा घरी यायचा आधी आपण आबांना देवाच्या घरून  घेऊन येऊ. त्याचे असे बोल एकूण वीणाताईचे डोळे आपोआप पाझरत होते. त्या सारखा डोळ्याला पदर लावत होत्या. 
   नील मध्येच आजीला म्हणायचा आजी तू रडतेस ?  रडू नको , चल आपण आबांना घेऊन येऊ. वीणाताईनी नीलला छातीशी धरले. खूप रडल्या. नील पुन्हा म्हणाला, आजी मला आबांची खूप आठवण येते. चल ना ग पटकन !
  किती दिवस झाले मला कुणीच गोष्ट सांगितली नाही ? आबा होते तर किती गोष्टी सांगायचे ?
  आता मात्र नील ने भोकाड पसरले. मला आताच्या आता आबाकडे जायचे. वीणाताई त्याला त्यांच्या परीने समजावून सांगत होत्या. शेवटी रडूंन रडून तो झोपी गेला.
   दोन दिवस गेले. शेजारच्या घरी नीलू खेळायला गेला. सौरभ त्याचा मित्र, त्याच्याच वयाचा.  त्याच्या बाबांनी त्याला आज फटाके आणून दिले. सौरभ नीलला फटाके दाखवत होता. सुरसुरी, टिकली, बंदूक बघून नील हरखून गेला. 
   घरी आल्यावर तो हट्ट करायला लागला. मला पण बंदूक पाहिजे, फटाके पाहिजे आणि हो ते स्टार स्टार पण पाहिजे म्हणजे फुल भाजी.  त्याचे बाबा त्याला सांगत होते. नील असा हट्ट करायचा नाही. आपण या वर्षी 
फटाके नाही उडवणार आहोत. आपले आबा देवाघरी गेले न. नील काही केल्या ऐकायला तयार नव्हता. बाबा आपण आबांना देवाच्या घरून घेऊन येऊ. 
  मागे नाही का आबा रीमा आत्त्या कडे गेले होते. मग आपण झुकझुक गाडीत बसून आत्याकडे गेलो आणि आबांना घेऊन आलो. चला आत्ता पण जाऊ. 
  शेवटी त्याच्या आईने त्याला घरातली बंदूक दिली. त्याने ती रागाने फेकून दिली. म्हणाला मला टिकली वाली बंदूक पाहिजे. 
   राघव, त्याचे बाबा यांनी नील ला एक धपाटा दिला आणि गप्प बसवले. तो रडत रडत आजीच्या कुशीत शिरला. 
   रात्र झाली सगळे झोपी गेले. वीणाताई पण झोपल्या. पहाटे पहाटे दिगंबर कामत वीणाताई च्या स्वप्नात आले. म्हणाले काय ग दोन दिवसावर दिवाळी आली आणि तुम्ही काहीच तयारी केली नाही ?  
  फराळ, आकाश कंदील, लायटिंग आणि हो माझ्या नील ला टिकल्या, बंदूक काहीच घेऊन दिले नाही ? उलट राघव ने त्याला एक धपाटा ठेऊन दिला. 
  मला सांग अस लहान मुलाला मारून मुटकून गप्प बसवता येत का? 
   त्याला काय कळतय ग ? तुला तर माहित आहे मला या सगळ्या गोष्टींची खूप आवड. तुझ्या हातचे फराळाचे खाणे म्हणजे वेगळीच मज्जा. काय चव ग तुझ्या हाताला ! 
   तुला आठवत मी जेव्हा पहिल्यांदा ऑफिस मध्ये फराळाचे घेऊन गेलो तेव्हा सगळ्यांनी तुझी चकलीची रेसिपी विचारली होती आणि तो कांदा घालून केलेला चिवडा.  माझ्या बॉस शितल मॅडम पण विचारत होत्या. आठवत न ! 
    मला तुझ्या हातचा दिवाळीचा प्रत्येक पदार्थ आवडतो आणि तू अजून काहीच केले नाही. मग मी आल्यावर मला काय देणार खायला ? 
   हे बघ ! मी नक्की येणार आहे ! 
  तेव्हा तू आज पासून तयारीला लाग आणि हो तो स्टार वाला मोठा आकाश कंदील पण आण!  नील ला खूप आवडतो ना तो !  
    वीणाताई झोपेतच म्हणाल्या , अहो ! तुम्हाला जाऊन जेमतेम पंधरा दिवस झाले हो. डोळ्यातले आसवे सुद्धा अजून आटली नाही आणि तुम्ही म्हणता आकाश कंदील लाव, लायटिंग कर, फराळाचे कर  ! 
  नाही ! नाही ! 
 मला हे शक्य नाही ! 
   शिवाय लोक काय म्हणतील हो ? 
   म्हणतील नवरा मरून पंधरा दिवस पण झाले नाही आणि या बाईला दिवाळी साजरी करायची सुचते. आपल्या लेकाला आणि सुनेला पण नाव ठेवतील हो ही लोकं. तुम्हाला तर माहित आहे तुमचा राघववर आणि राघवचा तुमच्यावर फार जीव आहे. अशी दिवाळी साजरी केली तर म्हणतील बाप मेला दुःख नाही पण आनंद झालेला दिसतो लेकासूनेला. 
   आता मात्र दामोदर कामत वीणाताईच्या बाजूला बसले. त्यांचा हात हातात घेतला. म्हणाले हे बघ वीणा, मी नेहमी मला काय वाटते ? काय आवडते याचा विचार केला ?  लोक काय म्हणतील याचा विचार आणि चर्चा करायला हे लोक आहेतच. त्याचा विचार आपण नाही करायचा.
   आपल्या मुलाने जेव्हा योगिता सोबत लग्न करायचे ठरवले तेव्हा लोकांनी नाव ठेवलीच न. दुसऱ्या जातीची म्हणून किती काय काय बोलत होते ?  पण योगिताने सर्वांची मने जिंकली. उलट शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांच्या सूनेत आपल्या सुनेचा अव्वल नंबर लागतो. आबा आबा करून थकत नव्हती. मुलीची उणीव भरून काढली. मी गेल्यावर मला वाटते लेका पेक्षा जास्त तिचं रडली असेल हो ना ?  
खरय हो तुमचं ! अजूनही तुमच्या आठवणीत रडते ती. अनवधानाने आबा म्हणून हाक मारत असते. मग डोळ्याच्या कडा पुसते.
  तुमच्यावर इतके प्रेम असतांना त्यांनी दिवाळी साजरी करणे शक्यच नाही. म्हणूनच म्हणतो उठ सकाळ झाली. बाजारात जाऊन आकाश कंदील, आणि फराळाचे करायला लागते ते सामान घेऊन ये. मुल ऑफिस ला गेली की कर हळूहळू सगळे. मस्त लायटिंग पण लाव आणि नीलला टिकली,  बंदूक, फुल भाजी घेऊन ये. 
  मी फराळाला नक्की येणार. तू सगळ ताट वाढून माझ्या फोटो समोर ठेव. मी प्रत्येक पदार्थ चाखून पाहीन. करतांना तुला कशाची चव दाखवायची असेल तरी माझ्या फोटो समोर ठेव मी काय कमी, जास्त सांगेन तुझ्या कानात. 
   वीणाताई खाडकन जाग्या झाल्या. त्यांना रूम मध्ये सर्वदूर कामत दिसत होते. 
   त्या उठल्या, पटपट सगळे आवरून बाजारात गेल्या. लेक सून यायच्या आत शेजारच्या मुलाला बोलवून लायटिंग करून घेतली. मग फराळाचे केले. देवापाशी, तुळशी पाशी आणि दारावर पणत्या लावल्या. नीलला घेऊन टिकल्या फोडू लागल्या. लांबूनच लेक येताना दिसला. 
आपल्या दारात लागलेला आकाश कंदील बघून त्याला आश्चर्य वाटले. तो हळूच आई शेजारी येऊन बसला. आईने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नील खूप खुश होता. त्याने विचार केला आईने नीलला खुश करायला हे सगळे केले आसवे. त्याला बिचाऱ्याला आबा मरण पावले म्हणजे नेमके कुठे गेले हे सुध्दा  कळत नाही. तेवढ्यात योगिता पण घरी आली. तिला वाट्ले हे  सगळे राघव ने केले. ती मुकाट्याने घरात गेली. राघव ला बोलावले, दार बंद करून बोलायला सुरवात केली.
  राघव ! 
काय केले तू हे ! 
 अरे थोडा आईच्या मनाचा तरी विचार करायचा ना ? 
  अरे आबा जाऊन जेमतेम पंधरा दिवस झाले ! घरात प्रत्येक ठिकाणी आबा असल्याचा भास होतो. नकळत डोळे पाणावतात आणि तू हे काय केले ? ही लायटिंग, आकाश कंदील काय गरज होती याची ?  मला तुझे हे वागणे अजिबात आवडले नाही. आधी ती लायटिंग काढ बघू. 
  इतक्या वेळ गप्प असलेला राघव म्हणाला, योगिता शांत हो. ती पुन्हा रागाने म्हणाली , कशी शांत होऊ ? तू केवढी मोठी चूक केली ? 
   तेच सांगतो मी. तू शांत हो. मी काय म्हणतो ते ऐक. 
बोल , काय बोलायचे तुला. 
हे बघ यातले काहीच मी केलेले नाही. मी घरी आलो तर हे सगळ होत. पाहून मला पण आश्चर्य वाटले. पण नील खूप खुश होता. आई त्याच्या बरोबर बसून टिकल्या फोडत होती. थोडा वेळ का होईना ती यातून बाहेर निघाली असे मला वाटले. त्यामुळे मी हे सर्व बघून गप्प बसलो. तू सुद्धा शांत हो. 
सॉरी राघव असे असेल तर खरच खूप चांगली गोष्ट आहे. आपण आता फक्त आईच्या मनाचाच विचार करायचा. आईचा आनंद तो आपला आनंद. 
   दारा आडून वीणाताई आपल्या सुनेचे संभाषण ऐकत होत्या. आता तर अजूनच अभिमान वाटला त्यांना आपल्या सुनेचा. 
  त्यांनी राघवच्या बेडरूमचे दार ठोठावले. दोन्ही लेकरांना कवेत घेतले. इतक्या दुःखात सुध्दा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु गळत होते. एक सून सासूच्या मनाचा इतका विचार करते हे खूप सुखावह होते. 
  मग त्यांनी त्यांना सकाळी स्वप्नात आलेले त्यांचे आबा. त्यांच्या सोबत स्वप्नात झालेला संवाद सांगितला. म्हणाल्या खरच सांगत होते तुमचे आबा. चार वर्षांचे लेकरू ते, त्याला आबा कुठे गेले हेही कळत नाही. त्याला का सणाच्या दिवशी रडत ठेवायचे? तुमचे आबा म्हणायचे मला नेहमी हसत खेळत घर आवडते. त्यामुळे ते कायम तसेच असायला पाहिजे.  आता मी सदैव आठवणीच्या रूपात तुमच्या सोबत आहे. 
  योगिता बाळा मी तर थोडे फराळाचे पण केले. उद्या सकाळी अभ्यंग स्नान करून आबांच्या फोटो समोर फराळाचे ठेव. ते नक्की येणार . 
 हो आई म्हणत योगिता अश्रू पुसत कामाला लागली. वीणाताई नी सुध्दा डोळ्याला पदर लावला आणि राघव, तो नजर चुकवत, आपले अश्रू कुणाला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...