गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

1526. प्रिये पहा.....!

      अनघा हॉल बाहेर ऍक्टिवावर बसली होती, आत मध्ये बुवांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. पार्किंग लॉट मध्ये नेहमीप्रमाणे भरपूर गाड्या आणि स्कूटरस लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला तो अजूनही संपला नव्हता, पण आता पाच दहा मिनिटात संपेल याचाअनघाला अंदाज होता. कार्यक्रम संपला की 15 मिनिटात अर्जुन बाहेर येईल हे तिला माहीत होते, आज अर्जुन बरोबर बाहेर जेवायला जायचे ठरले होते, पण कार्यक्रम अजून संपत नव्हता, तिचे एक सारखे घड्याळात बघणे सुरू होते. एवढ्यात आतून आवाज बंद झाले आणि लोकं हॉल बाहेर पडू लागली. हळूहळू हॉल खाली झाला. दहा मिनिटांनी अर्जुन बाहेर आला, इकडे तिकडे पाहताना त्याला अनघा दिसली, तसा तो तिच्या दिशेने येऊ लागला.
जवळ येताच त्याने स्कूटर चालवायला घेतली, अनघा मागे बसली, अर्जुन म्हणाला  "कुठे जायचे जेवायला? 
"कुठेही! आता थोडा उशीर झाला तर" देविका मध्ये जाऊ, तिथे गुजराती डिशेस चांगल्या मिळतात, अर्जुन ने स्कूटर हॉटेल देविकाच्या दिशेने वळवली. स्कूटर बाहेर लावून दोघं आत गेली. एक कोपऱ्यातले टेबल पकडून तिथे बसली. वॉशरूम मध्ये जाता जाता तो अनघाला म्हणाला  "
"दे ऑर्डर, तुला काय आवडते ते'. अनघाने दोन गुजराती पदार्थांची ऑर्डर दिली, सोबत रायता, पापड आणि रोट्या मागवल्या. अर्जुन रुमालाने हात पुसत पुसत समोर येऊन बसला, तेव्हा तिने विचारले" प्रोग्रॅम कसा झाला?
"नेहमीप्रमाणे उत्तम ! बुवांचा कार्यक्रम कधी फेल होत नाही, एवढ्या वर्षांची तपश्चर्या आहे बुवांची, रोजचा रियाज कधी चुकणार नाही बुवांचा '.
"आणि तुझा? तू पण कधी रियाज चुकवत नाहीस, मी तुला ओळखते त्यापासून तुझी मेहनत कधी कमी होत नाही, पण तू स्वतः कार्यक्रम करत नाहीस त्यामुळे तुझी मेहनत दिसत नाही. तू बुवा ना साथ करत असतोस, पण स्वतः कार्यक्रम करण्याचे धाडस करत नाहीत.'
" झालं तुझं सुरू!'
" मग मी बायको आहे ना तुझी, मला तुझी काळजी वाटणारच, बुवांना साथ करत राहिलास तर स्वतः कधी मोठा होणार नाहीस, एका वटवृक्षाखाली दुसरं झाड मोठं होत नाही.'
" ते खरं आहे पण बुवांना कसं सांगू, मी आता वेगळे कार्यक्रम करतो म्हणून. शेवटी गेली वीस वर्षे त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यामुळे माझं नाव भारतभर आहे.'
" नाव आहे भारतभर पण ते बुवांचा साथीदार म्हणून. गायक म्हणून नव्हे. तसा तू गेली वीस वर्षे बुवांकडे शिकतो आहेस, त्यांना कार्यक्रमात साथ करतो आहेस, मग बुवा का म्हणत नाहीत  " अर्जुन, आता तू स्वतंत्र कार्यक्रम कर म्हणून '.
" नाही म्हणत हे मात्र खरं '.
"बुवा आता 80 वर्षाचे आहेत पण त्यांची तब्येत ठणठणीत. मग त्यांच्या शिष्यांना कार्यक्रम कसे मिळणार? ओरिजिनल समोर असताना डुप्लिकेट ना कोण बोलवणार? बुवांना मिळणाऱ्या बिदागीतून तुला पाच टक्के तरी देतात का ते, कार्यक्रम ठरला की तुझी किती धावपळ, मग ते चार-पाच दिवस तुला धड झोप नसते, कार्यक्रमाची तयारी तुझ्यावर सोपवून ते निर्धास्त असतात. फक्त आयत्यावेळी येऊन गायच. सर्व कौतुक वा, वा बुवांना. तू मागे बसून साथ संगत करत असतोस. त्यांचा स्वर कुठे कमी पडतोय असं वाटलं की स्वर बरोबर ॲडजस्ट करतोस, म्हणून बुवांचं गाणं परिपूर्ण होतं.' पण बुवा ना त्याची किंमत नसते. "
" किंमत नसते असं म्हणू नकोस अनघा, लोकांकडे माझं कौतुक करत असतात, अर्जुन पाठीमागे असतो म्हणून मी निर्धास्त असतो  ".
"आणि शिव्या ही घालतात. जरा कुठे साथीदार चुकला की शिव्या तुला, कोण साथीदार उशिरा आला की शिव्या तुला, पडद्याच्या पाठीमागे बाटलीची सोय केली नसेल तर शिव्या तुला  ".
"मग मी तरी काय करू, बुवा खेरीज माझं अस्तित्वच नाही, अशी परिस्थिती आहे '.
"मग समज, उद्या समजा बुवांचं काही बरं वाईट झालं तर तू काय करशील? तू बुवांचा मुलगा परेश नाही तरी तुझ्यावर जाळफाळत असतो, तुला हाकलून देईल तो  ".
"गेली वीस वर्षे मी बुवा समवेत आहे, आता अचानक वेगळा होऊ?
 एवढ्यात जेवण आले. अनघाने दोन प्लेटमध्ये जेवण वाढून घेतले. आणि ती जेवता जेवता बोलू लागली. " बुवा ना न दुखवता हळूहळू वेगळे कार्यक्रम घ्यायचे, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तू आता 32 वर्षाचा आहेस, उंच, गोरा देखणा आहेस. भाषा स्वच्छ आहे, माझ्या मते तू संगीत नाटकांसाठी योग्य आहेस  ".
"मी आणि संगीत नाटक, कधी स्टेजवर उभा राहिलो नाही अजून, स्टेजवर जातो तो बैठक घालून बसतो  गाण्यासाठी. "
"सरावानंतर सर्व जमेल, स्टेजवर काय उद्या जायचं नसतं, त्याकरिता तालमी असतात, घोटून घोटून तालमी घेतल्या जातात, मग रंगीत तालमी असतात आणि स्टेजवर सह कलाकार पण असतात  ".
"पण मला नाटकात कोण घेईल?'
"निश्चित घेतील, आपली" परांजपे नाट्य कंपनी आहे ना, ती संगीत नाटकांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता वर्षाताई वयस्क दिसू लागल्यात, त्यांच्या नाटक कंपनीत तरुण गायक नसल्याने त्यांची नाटके बंद झाली आहेत. पण त्यांना नाटके सुरू करायची आहेत, तरुण गायक नटाच्या त्या शोधात आहेत  ".
" पण त्यांना विचारणार कोण?
" मी विचारीन, तू संगीत नाटकात काम करायला तयार असशील तर मी उद्या त्यांच्या घरी जाते, एकदा तू नाटकात गायक नट म्हणून प्रसिद्ध झालास की मग तुला मैफलीसाठी विचारतात की नाही बघ  ".
अर्जुन ने मान डोलावली. जेवण संपवून हॉटेल बिल देऊन ती दोघं सदाशिव पेठेतील आपल्या घरी गेली. अर्जुन ची आई जागीच होती, ती दोघं बाहेरून जेवून येणार आहेत याची तिला कल्पना होती.
 दुसऱ्या दिवशी अनघा वर्षाताईंकडे गेली, वर्षाताईंकडे संगीत शिकायला येणारी मुलं होती  ती आता घरी गेली होती, त्यामुळे वर्षाताई निवांत बसल्या होत्या. अनघा घराचे फाटक उघडून आत गेली, तेव्हा वर्षाताईंनी तिला "या 'म्हंटल.
 कोण आपण? वर्षा ताईंनी विचारले.
"वर्षाताई, मी अनघा साठे, अर्जुन साठेची पत्नी ".
" अर्जुन म्हणजे बुवांचा साथीदार, अरे वा, अर्जुन म्हणजे मोठा कलाकार, इकडे कशी काय आलीस?'
वर्षाताई, अर्जुन ची इच्छा आहे संगीत नाटकात काम करायची, नाटकामुळे प्रेक्षकांची आणि स्टेजची भीती चेपते म्हणून '.
"अर्जुन संगीत नाटकात काम करणार? " क्षणार्धात वर्षाताईंच्या डोळ्यासमोर उंच, गोरा, भरदार शरीर यष्टीचा अर्जुन साठे उभा राहिला शिवाय बुवांच्या तालमीत उत्तम गाणारा.
" अगं मी खरंतर अशा तरुण गायक नटाच्या शोधात आहे, मी आमची नाटके बंद केलीत कारण पुण्यातील बहुतेक गायक नट वृद्ध झालेत, अगदी माझ्यासकट  ( वर्षाताई हसल्या ). आणि संगीतावर प्रेम करणारे नट राहिले नाही. त्यांना टीव्ही  मालिका किंवा रियालिटी शो ची आवड. त्यामुळे अर्जुन काम करायला तयार असेल तर मी माझ्या कंपनीची संगीत नाटके सुरू करणार, एक चांगला देखणा गायक नट मिळाल्यावर इतर कलाकार जमवायला वेळ लागत नाही. अर्जुन काम करायला तयार असेल तर मी प्रथम "संगीत सौभद्र ' प्रथम उभे करीन. कृष्णाच्या भूमिकेत अर्जुन सारखा देखणा गायक नट हवा, एकदा घेऊन ये अर्जुन ला '.
" उद्याच येतो आम्ही' असे म्हणताना अनघाच्या मनात भीती वाटत होती, अर्जुन कृष्ण तर रुक्मिणी कोण करणार? स्वतः वर्षाताई करणार की काय? वर्षाताईंचं आता वय दिसायला लागलय,' असे विचार अनघाच्या मनात येत असतानाच फाटक उघडून एक वीस-बावीस वर्षाची देखणी गॉगल लावलेली तरुणी आत आली. वर्षाताई तिच्याकडे पहात म्हणाल्या " अनघा या नवीन सौभद्र मध्ये ही माझी मुलगी मयुरी रुक्मिणीच्या भूमिकेत असेल ". अनघा मयुरी कडे पाहतच राहिली. एकदम देखणी मुलगी." अनघा ही उत्तम गाते बर का, माझ्याकडे शिकतेच शिवाय अनंतराव धर्माधिकारी बुवांकडे पण शिकते. "
 मयुरी येऊन आईच्या शेजारी बसली, तिच्या चेहऱ्यावर  " ही कोण?' असं प्रश्नचिन्ह होतं.
" अगं ही अनघा,  बुवांचा साथीदार अर्जुन आहे ना त्याची पत्नी '.
" हो का नमस्ते. मयुरी ने अनघाला नमस्कार केला.
"अगं अर्जुनला संगीत नाटकामध्ये काम करण्याची इच्छा आहे हे सांगायला अनघा आली होती, मी तिला म्हटलं, अर्जुन नाटकात काम करत असेल  तर आम्ही"सौभद्र' चा विचार करू.
" हो हो अर्जुन सर काम करत असतील तर छानच होईल.
" अर्जुन कृष्ण आणि तू रुक्मिणी. नारद, सुभद्रा, अर्जुन ही पात्रे शोधायला लागतील.'
" अनंतरावांच्या क्लासमध्ये काही नवीन नट तयार होत आहेत, त्यांना मी विचारते उद्या '
" हो, उद्या त्यांना घेऊनच ये. आता श्रावण महिन्यापासून नाटकाचा व्यवसाय सुरू होतो. गणपतीच्या अकरा दिवसात साखर कारखान्यांना नाटके हवी असतात, आपलं नाटक एका महिन्यात स्टेजवर जायला पाहिजे. अनघा तू उद्याच अर्जुन ला घेऊन ये.' तेवढ्यात त्या आतल्या खोलीत गेल्या आणि संगीत सौभद्र चे पुस्तक घेऊन आल्या. " हे घे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे अजरामर " सौभद्र '. अर्जुन ला वाचायला सांग. अनघा आनंदाने घरी गेली, दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुन आणि अनघा वर्षाताईंकडे आली. मयुरी ने आपल्या क्लास मधून तीन तरुण पुरुष कलाकार आणि दोन स्त्री कलाकार आणले होते. काल अनघाने नेलेले सौभद्र चे पुस्तक अर्जुन ने पूर्ण वाचलेच होत. वर्षाताईंनी अर्जुनला कृष्णाची भूमिका त्याचा वावर बोलणे हे समजावून सांगितले. गाणी पाठ करायला दिली. नारद सुभद्रा बलराम अर्जुन हे पण निवडले गेले.
    आता रोज चार पाच तास सौभद्र च्या तालमी सुरू झाल्या. मयुरीला तसे सर्व नाटक पाठच होते, गाणी पाठ होती. अर्जुनने झटपट पाठांतर केले. सहाव्या दिवसापासून त्यांच्या उभ्याने तालमी सुरू झाल्या. अर्जुन आणि मयुरी यांच्या कृष्ण आणि रुक्मिणी च्या संवादासह हालचाली वर्षाताईंनी बसवल्या. नारदाच्या भूमिकेसाठी भरत हा एक चांगला नवीन तरुण मुलगा मिळाला. संगीत साथ करणारे परांजपे नाट्यमंडळीचे नेहमीचे होतेच. ते येऊन गाणी बसवू लागले. वर्षाताईंनी ठरवले सुदैवाने यावेळी सर्व तरुण मंडळी मिळाली आहेत, तर नेपथ्य पण नवीनच करायचे. वर्षाताईंनी नवीन प्लॉट्स तयार केले. प्रायोगिक नाटकांसाठी उत्तम प्रकाशयोजना करणारा सहाय्यक प्रकाश योजनेसाठी बोलावला गेला. वर्षाताईंनी कपडेपट नवीनच बनवले. मागील पडदे गॅलरी सर्व चकाचक नवीन.  वर्षाताईंना अंदाज आला होता हे नाटक चांगला धंदा करणार. नाटकाच्या तीन रंगीत तालमी झाल्या आणि परांजपे नाट्यमंडळीचे पुण्याच्या टिळक नाट्य मंदिर मध्ये सलग चार प्रयोग लावले. लोकात कुतूहूल निर्माण झाले. अर्जुन साठे ला गायक म्हणून लोक ओळखत होतेच तू कृष्णाची भूमिका करणार होता. वर्षाताईंची तरुण मुलगी मयुरी रुक्मिणी करणार होती. भरत हा नवीन गायक नारद करणार होता.
 स्थळ - टिळक नाट्य मंदिर, पुणे
      सायंकाळी पाच वाजता पडद्यामागे पात्र परिचय सुरू झाला. परांजपे नाट्यमंडळी पुणे सविनय सादर करीत आहे, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे अजरामर नाटक  " संगीत सौभद्र"   कलाकार- नारद - भरत जोशी,  कृष्ण- अर्जुन साठे आणि द्रौपदी मयुरी परांजपे. नाटक हाउसफुल्ल होतं, पहिल्यांदा नारदाचा प्रवेश " लग्नाला जातो मी......, म्हणत त्याने प्रेक्षकांची मने जिकंली. मग अर्जुन, बलराम,सुभद्रा ही पात्र येऊन गेली. आणि मग रुक्मिणीच्या महालातील प्रवेश सुरू झाला. रुक्मिणीवर प्रकाशझोत पडला मात्र, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तरुण देखणी, रुक्मिणी त्यांनी गेल्या कित्येक वर्षात पहिली नव्हती.
    मग रुक्मिणीच्या महालात आला कृष्ण. उंच देखणा अर्जुन साठे कृष्णाच्या भूमिकेत शोभून दिसत होता. मग नाट्यसंगीतांची मेजवानी सुरू झाली, " नभ मेघानी आक्रमिले, नच सुंदरी करी कोपा आणि मग कृष्ण रुक्मिणीला सांगतो, बोलण्याच्या नादात रात्र संपत आली आणि आता पहाट होते आहे, अचानक स्टेजवरील लाईट मंद झाले. खिडकीतून मंद निळा प्रकाश कृष्ण आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावर पडला आणि कृष्ण गाऊ लागला  " प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी...... प्रिये पहा!
 प्रेक्षकांनी अख्ख नाट्यगृह डोक्यावर घेतलं. " वन्स मोअर, वन्स मोअर 'ने नाट्यगृह दानानल, विंगेतून वर्षाताई आनंदाश्रू पुसत होत्या, त्यांच्या बाजूला अनघा पण होती, तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते.     चार तासानंतर नाटक संपले, प्रेक्षकांचा लोंढा कलाकारांना भेटायला स्टेजवर आला. सर्वांना अतिशय उत्तम असे सौभद्र बघायला मिळाले. सर्व तरुण रसरशीत कलाकार. टिळक नाट्यमंदिर मधले ओळीने चारही प्रयोग हाऊसफुल्ल झाले. मग दोन दिवसांची विश्रांती घेऊन कोथरूडच्या नाट्य मंदिरातही चार प्रयोग हाऊसफुल्ल झाले. पुण्याच्या सर्व पेपर्स मध्ये कौतुक करणारी उत्तम परीक्षण आली. प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी नाट्यगृहाकडे वळल्या होत्या. मग पिंपरी चिंचवडचे प्रयोग पण हाऊसफुल्ल झाले. मग मुंबई दौरा, ओळीने आठ प्रयोग, सर्व प्रयोग हाउसफुल. मग नाशिक सोलापूर सांगली, कोल्हापूर, सर्व ठिकाणी हाउसफुल चा झेंडा.
     .... मग गोवा दौरा सुरू झाला, गोव्यातील वर्तमानपत्रातून अर्जुनच्या गाण्याचे कौतुक सुरू झाले होते, इथेही प्रेक्षकांनी प्रयोगांना गर्दी केली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरी अर्जुन चे गाणे ठेवले. खरंतर अर्जुन याआधी स्वतंत्र असा कधीही गायला नव्हता. त्याला भीती वाटत होती, पण अनघा त्याच्या मागे होती  " घाबरू नकोस, हीच संधी आहे, तुझं नाव लोकांपर्यंत पोहोचू दे.'. अर्जुन ने गोव्यातील साथीदार घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केला. गोव्यातील अनेक मातब्बर लोकांची अर्जुन ची ओळख झाली. त्याला गोव्यात अनेक सुपाऱ्या येऊ लागल्या. पण अनघाने सौभद्रचे प्रयोग सुरू असल्याने या सुपार्‍या स्वीकारल्या नाहीत. पुन्हा एकदा पुण्यात परांजपे नाट्यमंडळीचे सौभद्र ने पुण्यात धुमाकूळ घातला.
याच काळात पुण्यात दुसरीकडे एक नाट्य रंगलं होतं.
स्थळ - डेक्कन जवळील बुवांचा बंगला.
      कोचवर बुवा सुपारी कातरत बसले होते. त्यांच्या समोरील खुर्चीवर बुवांच्या पत्नी मोहिनीबाई बसल्या होत्या. एवढ्यात बाहेरून बुवांचा मुलगा परेश आला.
परेश - बाबा, अर्जुन ने गोव्यात मुख्यमंत्र्यांसमोर मैफिल केल्याची बातमी आहे. आणि ती चांगलीच गाजली म्हणे. गोव्याच्या वर्तमानपत्रात मोठ्या मोठ्या बातम्या आल्या आहेत. बाबा अर्जुन तुमचा शिष्य म्हणवता, मग एका शब्दाने त्याने तुम्हाला कळवलं नाही.
मोहिनीबाई - मागचं सगळं विसरला अर्जुन. दहा वर्षाचा होता तेव्हापासून येथे येतोय. नाटकात भूमिका घेतली सांगितले नाही. आपल्या गुरूंना नाटकाला बोलावलं नाही. आता म्हणे गोव्यात मैफिली करायला लागला आहे. अहो एकदा त्याला बोलवा आणि खडसावून विचारा.
बुवा - खडसावून विचारायला त्याने काही कॉन्ट्रॅक्ट केलं नव्हतं माझ्याबरोबर. तो गेली वीस-बावीस वर्षे इथे येतो. मी त्याला गाणे शिकवतो, तो माझ्या कार्यक्रमाला साथ करतो, एवढच.
मोहिनीबाई - एवढेच काय एवढेच, या बंगल्यावरचं अन्न खाल्लं त्याने, अन्नाला विसरू नये माणसाने.
परेश- बाबा आता तुमच्या मैफिलीत तो साथ करणार आहे की नाही?
बुवा - साथ करणे किंवा न करणे ही त्याची मर्जी, पण त्याची साथ संगत असल्याशिवाय माझं गाणं रंगत नाही हे खरे.
परेश- पण तुम्ही त्याचेवर अवलंबून राहू नका. दुसरा कुणीतरी शोधा.
बुवा -( चिडून ) मग तू येतो साथ करायला? तुझ्या जन्मापासून तू इथे राहतोस,
परेश- तुम्हाला माहित आहे मला तुमच्या गाण्यात किंवा मैफिलीत इंटरेस्ट नाही.
बुवा - मग कशात इंटरेस्ट आहे? दारू पिण्यात की रेस खेळण्यात?
मोहिनीबाई - जाऊदे तो विषय, पहिल्यांदा अर्जुनचे काय ते पहा,
परेश - बाबा तुमचा 20 तारीख ला नाशिकला प्रयोग ठरतो आहे, 21 तारीख ला पनवेल आहे, त्याला निरोप धाडा, येतो का पहा, मी सांगतो त्याच्या नाटकाचा दौरा 20 तारीख पासून बेळगावच्या बाजूला आहे, तेव्हा तो येणार नाही. मोहिनीबाई - परेश तू मुद्दाम अर्जुन ला फोन कर, त्याला सांग 20 आणि 21 चे कार्यक्रम ठरले, मग काय करतो बघ. परेशने अर्जुन ला फोन करून बुवांचे कार्यक्रम 20 आणि 21 तारखेला ठरल्याचे सांगितले, अर्जुन ला काय करावे हे कळेना. तू तातडीने वर्षाताईंकडे गेला. वर्षाताईंनी पाहिलं सौभद्र नाटकाचा प्रयोग वीस तारखेला निपाणी आणि 21 तारीख ला इचलकरंजी होता. 22 तारीख ला बेळगावचा प्रयोग करून कंपनी गोव्यात जायची होती. अर्जुन हा परांजपे नाट्यमंडळीचा हुकमाचा एक्का होता. त्याच्या गाण्यासाठी लोक पुन्हा पुन्हा नाटकाला येत होते. पण वर्षाताई नाही हेही माहित होते, अर्जुन हा बुवांचा उजवा हात आहे. इतकी वर्ष तो बुवा ना साथ करत आहे. वर्षाताईंनी 20 आणि 21 तारखेचे नाटकाचे प्रयोग रद्द केले. 22 तारीख पासूनच बेळगावहून दौरा चालू ठेवला.
           अर्जुन नेहमीप्रमाणे वीस तारीख ला नाशिकला पोहोचला. स्टेजवर जाऊन साथीदारांसह हार्मोनियम तबला यांची तालीम घेऊ लागला. नेहमीप्रमाणे साऊंड सिस्टिम व्यवस्थित आहे की नाही याची त्याने दोन दोन वेळा खात्री केली. कार्यक्रमानंतर बुवांची  " बाटली' ची व्यवस्था आहे की नाही हे पाहिले. साडेआठ वाजता बुवा आले. ते सर्व साथीदारांना भेटले. पण अर्जुन कडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. बुवा बैठकीवर बसल्यानंतर अर्जुन मागे बसला. मग तंबोरा जुळण्याचे काम सुरू झाले. मनासारखा तंबोरा जुळल्यानंतर आणि कार्यक्रम सुरू केला, कार्यक्रम नेहमीप्रमाणे रंगला आणि तीन तासानंतर संपला. नेहमीप्रमाणे अर्जुन दहा मिनिटानंतर बाहेर पडला. वर्षाताईंनी ड्रायव्हर सह गाडी तयार ठेवली होती त्यात बसून तो पुण्याला रवाना झाला. दुसऱ्या दिवशी अर्जुन पनवेलच्या कार्यक्रमाला वेळेत हजर झाला. कालच्या सारखीच सर्व तयारी पाहिली आणि आणि कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि तीन तासानंतर संपला. मग अर्जुन पुण्याला रवाना झाला. परेश आता मुद्दाम अर्जुनचे नाटक दौरा असे तेव्हा बुवांचे कार्यक्रम ठेवू लागला. नाटकाचे प्रयोग आणि बुवांचे कार्यक्रम यात अर्जुनची फार ओढाताण होऊ लागली. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. पण अनघा त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
        20 जूनला सौभद्र चा ठाण्यात दुपारी प्रयोग होता. परेशने बुवांचा त्याच दिवशी रात्री नऊ वाजता कार्यक्रम खंडाळ्यात ठेवला होता. त्यामुळे साडेतीन चे नाटक साडेसहा पर्यंत संपवून खंडाळ्याला जायचे अर्जुनने ठरवले होते. अर्जुन ने साडेसहाला प्रयोग संपवला आणि धावत धावत बाहेर येऊन वर्षा ताईंनी ठेवलेल्या गाडीत बसला. सदाशिव ड्रायव्हर सीटवर बसूनच होता. साडेआठ पर्यंत खंडाळ्याला पोहोचायला हवे होते. संध्याकाळच्या गर्दीत सदाशिवने गाडी जोरात घेतली. गाडीने पनवेल मागे टाकले, स्पीड वाढव अजून स्पीड वाढव म्हणू लागला, म्हणून सदाशिवने गाडीचा स्पीड 125 च्या पुढे घेतला, आणि एका वळणावर गाडी दुभाजगावर आदळली आणि लांब फेकली गेली.
     मागच्या गाड्या थांबल्या. पोलिसांना फोन केले गेले. ॲम्बुलन्स मागवली गेली. पोलिसांची व्हॅन आली आणि एका बाजूचा पत्रा कापून ड्रायव्हर सदाशिव ची डेड बॉडी बाहेर काढली. अर्जुन मागच्या सीटवर पण ड्रायव्हरच्या विरुद्ध सीटवर बसल्यामुळे रक्तबंबाळ झाला आणि विव्हळत होता. त्याला बाहेर काढून प्रथम पनवेलच्या इस्पितळात आणि मग ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवले गेले. अनघा पुण्यात होती, वर्षाताई पण पुण्यात होत्या. वर्षाताई गाडी घेऊन तिच्या घरी गेल्या. अनघाला आणि अर्जुनच्या आईला गाडीत घालून त्या ठाण्याच्या दिशेने  निघाल्या. अनघाचा आणि अर्जुनच्या आईचा आक्रोश सुरू होता. वर्षाताई त्यांना धीर देत होत्या, डॉक्टरांची टीम अर्जुन वर उपचार करत होती, विविध चॅनेलवर अर्जुनच्या अपघाताची बातमी फोटोसकट सांगितली जात होती. सर्व लोक हळहळत होते. " अर्जुन बरा होऊ दे ' म्हणून देवाला नवस घालत होते.
     बुवाना ही बातमी खंडाळ्यात समजली. परेश कार्यक्रम चालू करा म्हणत होता, पण बुवांनी कार्यक्रम रद्द केला. बुवांचे सर्व बुवांचे सर्व वादक हे अर्जुनचे नेहमीचे सवंगडी, अर्जुन चा अपघाताचे बातमी ऐकून ते रडू लागले. ती सर्व मंडळी भाड्याची गाडी करून ठाण्याकडे रवाना झाली. बुवाना हॉस्पिटलमध्ये जायचे होते, पण परेशने त्यांना जाऊ दिले नाही. त्याने जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवले आणि तो पुण्याला घेऊन आला. बुवा गप्प बसून होते. मनातल्या मनात रडत होते. अर्जुन दहा वर्षाचा असताना त्याची आई आपल्याकडे घेऊन आली होती. अर्जुन चे वडील पण गायक होते. लहान मोठ्या बैठका करत होते पण हृदयविकाराने ते लवकर गेले. अनघा आणि अर्जुन ची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे अनेक नाट्य कलाकार सिनेमा टीव्हीची मंडळी जमली होती. आत मध्ये डॉक्टरांची टीम तातडीची ऑपरेशन्स करत होती. रक्त चढवले जात होते. वर्षाताई हॉस्पिटलच्या डीन ला भेटली. " कितीही खर्च होऊ देत, गरज असेल तर बाहेरचे डॉक्टर्स बोलवा पण अर्जुन ला बरा करा ' असा निरोप तिने दिला.
      पहाटे तीन वाजता डॉक्टरांची टीम बाहेर आली. " सध्या तरी तो धोक्याच्या बाहेर आहे, आता यापुढे कसा रिस्पॉन्स देतो तो पाहू ' असे डॉक्टरने अनघाला आणि वर्षा ताईला सांगितले. अनघा तेथेच थांबली, वर्षाताई अर्जुन च्या आईला तिच्या बहिणीकडे घेऊन गेली. सर्व प्रमुख वर्तमानपत्रातून सौभद्र मधल्या कृष्णाला अपघात झाला, अशा मथळ्याच्या बातम्या आल्या होत्या. अर्जुनचे श्रीकृष्णाच्या वेशातील फोटो झळकले होते. त्याची गाणी ऐकवली जात होती. शहरापासून खेड्यापर्यंतचे लोक अर्जुनच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते नवस बोलत होते. पंधरा दिवस झाले तरी अर्जुनच्या तब्येतीत फार बदल दिसेना, डॉक्टरना त्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेबद्दल काळजी वाटत होती. जवळची माणसे हॉस्पिटलमध्ये येऊन त्याच्या रूममध्ये त्याला बघून जात होती. अनघाशी बोलून तिला धीर देत होती.
     इकडे बुवांच्या बंगल्यात बुवा बेचैन झाले होते. वर्तमानपत्रातील बातमीप्रमाणे अर्जुन अजून शुद्धीवर येत नव्हता. बुवाना अर्जुन ला भेटायला जायचे होते. पण मोहिनीबाई आणि परेश त्यांचेवर लक्ष ठेवून होते. त्यांना भेटायला जाऊ देत नव्हते. पण एका दिवशी बुवांनी ठरविले, आता या दोघांचे ऐकायचे नाही त्यांना त्यांची जागा दाखवायची. सकाळी सकाळी फोन करून त्यांनी त्यांचा ड्रायव्हर मोहनला  " टाकी फुल्ल कर ' असा निरोप दिला. आठ वाजता मोहन गाडी घेऊन आला, नसीब व आपल्या खोलीतून दाराकडे निघाले. हॉलमध्ये मोहिनीबाई कोचवर बसलेल्या होत्या. बाहेर जायची तयारी केलेले बुवा, बाहेर पडताच, मोहिनी बाईंनी मोठ्याने विचारले  
"कुठे निघालात? बुवा उद्गारले  "अर्जुन ला भेटायला जातोय ठाण्याला, का तुझी भीती आहे का?
"जायचं नाही, तो खाल्ल्या मिठाला जागला नाही.'
"मी जाणार, कोण मला अडवतो ते मी पाहतो,'.
 तेवढ्यात परेश बाहेर आला " बाबा बाहेर पडू नका, वाईट परिणाम होतील '.
"अरे जा रे, पाच पैसे कमवण्याची अक्कल नाही, मी पैसे कमवतो आणि तू उधळतोस,'.
 मोहिनीबाई संतापाने बोलल्या " तुम्ही बाहेर पडला तर आम्ही घरात राहणार नाही '.
 " चालते व्हा. एक मिनिट थांबू नका इथे ' बुवा कडाडले आणि घरातून बाहेर पडले आणि मोहनला गाडी बँकेकडे घ्यायला सांगितली. मोहनने बुवांच्या बँकेकडे गाडी घेतली. बुवा तडक बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. स्वतः बुवा बँकेत आले म्हणून बँक मॅनेजर उभे राहिले. बुवाने आपले चेकबुक हरवले असल्याने ते रद्द करावे असा अर्ज लिहून दिला. कारण ते चेकबुक परेश वापरत होता, तसेच परेश वापरत असलेले एटीएम कार्ड रद्द करण्याचा अर्ज दिला. तेथून मोहनला  " गाडी ठाण्याकडे घे' असं सांगितलं आणि ते मागे डोके टेकूनबसले. तीन तासाच्या पुणे ते ठाणे या प्रवासात छोटा अर्जुन तो आता गायक अर्जुन डोळ्यासमोर येत होता.
 ... दुपारी दोनच्या सुमारास बुवांची गाडी जुपिटर हॉस्पिटलच्या आवारात शिरली, बुवा खाली उतरले आणि हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागले. भारतातील सुप्रसिद्ध गायक बुवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्याने हॉस्पिटल मधील ऑफिस स्टाफ पुढे आला. हॉस्पिटल मधील अधिकाऱ्यांसह बुवा अर्जुनच्या रूम कडे चालू लागले. बुवा खोलीत आले, अनघा बेड जवळ बसली होती. बुवा आत येताच अनघा उठली. बुवांनी अर्जुन कडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. अनघा उभी होती तिच्या डोक्यावर हात ठेवला. बुवा ना भरून आलं होतं. अनघा पण डोळे टिपत होती. सदगदीत स्वराने बुवा अनघाला म्हणाले " मुली रडू नकोस. मी दत्ताचा उपासक आहे. दत्त महाराज अर्जुनच्या पाठीमागे आहेत. माझं निगडित दत्त मंदिर आहे हे तुला माहिती आहेच. दरवर्षी दत्त जयंतीला  माझं गाणं त्या दत्त मंदिरात ठरलेलं असतं. दरवर्षी अर्जुन साथीला असतोच. दत्त जयंतीला अजून साडेचार महिने आहेत. यावर्षी या दत्त जयंतीला माझं आणि अर्जुनचं संयुक्त संयुक्त गाणं दत्त महाराजां समोर होणार आहे. तोपर्यंत अर्जुनला खणखणीत बरं व्हावंच लागेल. तो दत्त जयंतीला दत्त महाराजांकडे स्वतःच्या पायांनी येणार आहे. आणि माझ्या समवेत गाणे ही म्हणणार आहे. हा माझा शब्द आहे आणि अर्जुन चा गुरु म्हणून अर्जुनला आज्ञा आहे. त्याला निगडित दत्त जयंतीला यावेच लागेल.".
   बुवा गप्प झाले. व मोठ्या प्रयासाने डोळ्यातील अश्रू थोपवत होते. अनघा मूसमुसत होती. पुन्हा एकदा अनघाच्या डोक्यावर हात ठेवून बुवा बाहेर पडले.  बुवा घरी पोहोचले, मोहिनीबाई आणि परेश रागारागाने त्यांचे कडे पाहत होती. बुवा कडाडले " परेश यापुढे माझे कार्यक्रम ठरवू नकोस. मी आता 80 वर्षे पार केली. आता मला निवृत्ती घेऊ दे. दुसऱ्यांची गाणी ऐकू दे. यापुढे मला विचारल्याशिवाय बँकेतून पैसे काढायचे नाही. मी बँकेला तशी सूचना देऊन ठेवली आहे, आणि स्वतः काहीतरी नोकरी धंदा बघा. बापाच्या जीवावर खूप मजा मारलीत आता यापुढे नाही  ".
 बुवा येऊन गेल्यानंतर अर्जुन ची तब्येत सुधारू लागली. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आता समाधानी होते. हळूहळू अर्जुन डोळे उघडू लागला. पातळ पदार्थ घेऊ लागला. पुन्हा एकदा न्यूरोलॉजिस्ट कडून त्याच्या सर्व तपासण्या झाल्या. त्याच्या तब्येतीत प्रगती दिसत होती. हळूहळू तो हात हलवू लागला. पाय हलवू लागला. दिवाळीपर्यंत अर्जुन वॉकर घेऊन चालू लागला. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर अनघाची सेवा आणि आईच्या आशीर्वादाने त्याच्या तब्येतीत झटपट सुधारणा दिसू लागली. बसल्या बसल्या अर्जुनने गाण्याचा रियाज सुरू केला.
       हल्ली दर आठ दिवसांनी बुवा अर्जुनच्या घरी येत होते. त्याच्या तब्येतीतील प्रगती पाहत होते. बडे बडे अनघाच्या हातात पैसे कोंबत होते. वर्षाताई कन्या मयुरीसह येतच होत्या. येताना भाजी फळे आणत होत्या. बुवा आता घरी येऊन अर्जुनला गाणं शिकवत होते. त्याच्या रियाझवर लक्ष ठेवत होते. नोव्हेंबर अखेर पर्यंत अर्जुन घरातल्या घरात फिरू लागला. आता दत्त जयंतीच्या उत्सवाची सर्वजण वाट पाहत होते. अर्जुन बरा झाला आणि बुवा निश्चिन्त झाले. आता दत्त जयंतीला दत्त मंदिरात कार्यक्रम होणार होता.
स्थळ - निगडी येथील दत्त मंदिर
        निगडीतील दत्त मंदिरात दत्त जयंतीची गडबड सुरू होती. बुवा दोन दिवस आधीच हजर झाले होते. सर्व तयारी जातीने पाहत होते. मोठा मंडप घातला होता. खूप महिन्यांनी बुवा गाणार होते, अर्जुन पहिल्यांदाच बुवांसमोर गाणार होता. दत्त जन्माचा कार्यक्रम नेहमीसारखा पण जास्त उत्साहाने पार पडला. दुपारी महाप्रसाद होता. सायंकाळी सातला बुवांचे गाणे म्हणून लोक जमू लागली होती. गाण्यासाठी स्टेज सजवले होते. बुवांचे वादक सहकारी हजर झाले. वादक मंडळी अर्जुन ची वाट पाहत होती. साडेपाच वाजता अर्जुन वर्षाताईंच्या गाडीतून आला. सर्व वादक सहकाऱ्यांची त्याने चौकशी केली. बुवांनी त्याला आपल्या जवळ बसवले. आणि आज कुठले कुठले राग गायचे आहेत याची माहिती दिली. बरोबर सात वाजता बुवा बाहेर आले आणि स्टेजवर बसले. सर्व वादक मंडळी तयारच होती. अर्जुन येऊन बुवांच्या मागे बसला. बुवा आणि त्याच्या हाताला धरून आपल्या शेजारी बसविले. तंबोरे मनासारखे जुळेपर्यंत बुवा आपल्या गाण्याला सुरुवात करत नसत. तंबोरे मनासारखे जुळले आणि बुवांनी एका रागाने सुरुवात केली. त्यातून हळूच यमन, पुरिया, शुद्ध कल्याण करून आलापी सुरु केली. धीर गंभीरपणे आलापीतून तो राग श्रोत्यांसमोर ठेवला. राग फुलत गेला तशी त्याची लय वाढवली. मग वरचा षडज आला, तेव्हा श्रोते बेभान झाले. दृत सुरू केल्यानंतर तानांची नुसती बरसात केली. मग एक नाट्यसंगीत म्हणून मध्यंतर केले.  मध्यंतरानंतर अर्जुन ला गायला सांगितले. अर्जुन ने बुवा ना नमस्कार केला. श्रोत्यांना नमस्कार केला आणि गायला सुरुवात केली. दरबारी, मालकंस,मिया -मल्हार, अभोगी एकापाठोपाठ एक राग श्रोत्यांच्या अंगावर येऊन आदळत होते आणि श्रोते चिंब भिजत होते. दोन तास अर्जुन गात होता. बुवान सकट सर्वजण मान हलवत होते. समेवर आले कीं मांडीवर थाप मारत होते.
      मग बुवानी माईक हातात घेतला. आणि ते श्रोत्यांसमोर बोलू लागले  "माझ्यावर गाण्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हाला आणि भारतातील आणि परदेशातील असंख्य श्रोतेहो, तुम्हाला माझा नमस्कार. गेली 50 वर्षे माझ्यावर उदंड प्रेम केले, गेली 50 वर्षे मी भारतात आणि परदेशी गातो आहे, मैफिली करतो आहे, पण आता थांबायची वेळ आली आहे, मी माझ्या वयाची 80 वर्षे पुरी केली आहेत, आता मला विश्रांती हवी आहे, आता माझ्या शिष्य माझी जागा घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना जागा करून देणे हे माझे कर्तव्य आहे. आज दत्त महाराजांच्या साक्षीने गायलेली ही माझी शेवटची मैफिल.' ही वाक्य बोलल्या बरोबर अर्जुनसह सर्व स्टेजवरील आणि श्रोते पण उभे राहिले." नाही नाही बुवा, तुम्ही गायले पाहिजे, तुम्ही निवृत्त होऊ शकत नाही, " असे ओरडून सांगत होते. अर्जुन पण बुवा ना कळकळीने काही सांगत होता. पण बुवा ऐकत नव्हते.
 .. बुवा स्टेजवर उभे राहिले. सोबत अर्जुनला उभे केले आणि बोलू लागले" श्रोतेहो, हा माझा शिष्य अर्जुन साठे. यापुढे माझी गादी चालवील. मी माझा निर्णय दत्त महाराजांच्या समोर घेतला आहे. तो बदलणे शक्य नाही. माझ्यावर जसं प्रेम केलं तसं माझ्या शिष्यावर प्रेम करा. " असं म्हणून बुवांनी आपल्या गळ्यातली शाल अर्जुनच्या गळ्यात घातली. सर्व श्रोत्यांसमोर हे सर्व अचानक घडले त्यामुळे अर्जुन भारावून गेला. अर्जुन ने बुवा ना नमस्कार केला.
 बुवा आणि अर्जुन ला आपल्या बाजूला बसवले आणि दोघे भैरवी गाऊ लागले
"सजल नयन नित धार बरसाती
भावागंध त्या जळी मिसळती '
बुवांचा आणि अर्जुनचा तो आर्त सूर ऐकून श्रोत्यांच्या डोळ्यातून केव्हाच अश्रू वाहू लागले होते, दोघेही भैरवी आळवीत होते.
"थकले पैंजण, चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले '
 या ओळी गाता गाता स्वतः बुवा, अर्जुन, सारे संगीत साथ करणारे आणि श्रोते रडू लागले. सारे वातावरण सर्द झाले होते. साऱ्यांचे कंठ दाटून आले होते. भैरवी संपली तसे बुवांनी तमाम श्रोत्यांना साष्टांग नमस्कार घातला. रडणाऱ्या बुवा ना अर्जुन ने आणि इतरांनी उभे केले. आज रडत रडत श्रोते बुवांना येऊन भेटत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी गळा भेटा होत होत्या.
     अर्जुनला मैफलीची निमंत्रणे येत होती, पण अनघा अर्जुन ला म्हणाली "पहिल्यांदा नाटक सुरू कर कारण संकटाच्या वेळी वर्षाताई पहाडासारख्या मागे उभ्या होत्या.' परांजपे नाट्यमंडळीचे " सौभद्र ' पुन्हा धुमधडाक्यात सुरू झाले. तसेच अर्जुनच्या मैफिली पण सुरू झाल्या. "बुवांचा शिष्य ' असं नाव झाल्याने लोक कौतुकाने अर्जुनच्या गाण्याला गर्दी करत होती.  आता सौभद्रचे मुंबईत सलग दहा प्रयोग लागले होते. रोजच्या मैफिली आणि नाट्यप्रयोग यामुळे अनघाला अर्जुन व्यवस्थित भेटत नव्हता. त्यामुळे अनघा कंपनी बरोबर मुंबईत आली.
 एके दिवशी पहाटे पहाटे अनघा आणि अर्जुन फिरायला वरळ सी फेस वर आली. वरळी सी फेस च्या कठड्यावर बसल्यानंतर अनघा अर्जुन ला म्हणाली "महाराष्ट्राच्या जनतेसाठी एवढी गाणी म्हणतोस, वन्स मोअर घेतोस, मग माझ्यासाठी गाणं कधी म्हणणार?' अर्जुन ने उगवणाऱ्या सूर्याकडे पहात आणि अनघाला तो सूर्य हाताने दाखवीत गाणे सुरू केले "
"रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी '
होत उष :काल हा, प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा......! त्याची ही आळवणी ऐकून अनघा त्याला बिलगली.

 प्रदीप केळूसकर 9422381299 / 9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...