शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

1537. लग्नाला यायचं हं..!

      लग्न करुन अनिता देशमुखांच्या घरी आली. तिचे माहेर कल्याणचे आणि आता सासर सांगलीचे. नवरा विनोद इन्शुरन्स कंपनीत नोकरीला आणि अनिता प्रायव्हेट बँकेत. फेसबुकवर दोघांची ओळख झाली, चॅट सुरु झालं, विनोदचा मोकळा ढाकळा स्वभाव तिला आवडला. विनोदची लहान फॅमिली. आई-वडिल आणि एक मोठी डॉक्टर बहिण. वडिलांची म्हैसाळ भागात शेती होती त्यामुळे ते बर्‍याचदा तिकडेच असत. विनोदच्या मोठ्या बहिणीने लग्न केले नव्हते. ती त्याच बंगल्यात बाहेरच्या रुममध्ये जनरल प्रॅक्टीस करायची. 
     अनिताचे आणि विनोदचे भेटायचे ठरले तेव्हा ती सांगलीत पहिल्यांदाच आली. तेव्हा विनोदची डॉक्टर बहिण तिला भेटली. पहिल्याच भेटीत तीने अनिताचे मन जिंकले. सुंदर, स्मार्ट, हुशार तरतरीत स्त्री. विनोदपेक्षा १२-१३ वर्षांनी मोठी असेल. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली तरी लक्षात राहते अशी विनोदची ताई होती. तिचे आधुनिक विचार, चांगले वाचन, नाटकाची, संगीताची आवड. या घरात आल्यावर ताईसारखी मोठी बहिण, मार्गदर्शक मिळेल म्हणून अनिता हरखून गेली. अनिताच्या आई-वडिलांना भेटायला म्हणून विनोद कल्याणला आला तो प्रभातच्या गाडीतून. तेव्हा प्रभात दादा अनिताला पहिल्यांदा भेटला. प्रभात दादा हा त्यांचा फॅमिली प्रâेंड. खरतर तो ताईचा वर्गमित्र. पाचवीपासून दहावीपर्यंत ताईच्या वर्गात. लहानपणापासून त्यांच्या घरात येत होता. अनिताला प्रभात दादा पण आवडला. एकदम मस्त माणूस. बडबड्या, सढळ खर्च करणारा, संगीताचा आणि नाटकाचा शौकीन आणि स्वतः नाटक करणारा. अनिताच्या आई-वडिलांनापण जावई आवडला तसेच प्रभातदादा पण आवडला. 
    अनिता विनोदच्या लग्नात विनोदच्या ताईची आणि प्रभातदादाची जास्त गडबड होती. लग्नाच्या आदल्या दिवशी सीमंतपूजनानंतर नाच, गाणी सुरु होती. पहिल्यांदा लहान मुले, मग तरुण मुले-मुली, शेवटी सर्वांनीच ताईला फारच आग्रह केला तेव्हा ताई माधुरीच्या गाण्यावर बेफाम नाचली. एरवी शिस्तीची असणारी ताई एवढी नाचू शकते हे अनितालाच काय कुणालाच माहित नव्हते. एवढ्या नाचानंतर आणि दमल्यानंतर सुध्दा आलेल्या सर्व पाहुण्यांना गादी, उशी, पांघरुण मिळालं की नाही याची ताई जातीने चौकशी करत होती. 
दुसर्‍या दिवशी लग्नात सुध्दा ताईचा उत्साह पाहण्यासारखा होता. देशमुखांच्या घरात दुसर्‍या पिढीतले पहिले लग्न म्हणून झाडून सर्व नातेवाईक, मित्रमंडळी लग्नातील कामाला मदत करत होते. अनिताला वाटले मुंबईत अशी एकमेकांना मदत करणारी माणसे कमी, उलट नावे ठेवायला जास्त. सांगलीत मोकळा ढाकळा कारभार होता. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी देवदर्शनाला जायचं म्हणून विनोदने प्रभातदादाला फोन केला आणि प्रभात दादाने ड्रायव्हरसह गाडी पाठवून दिली. विनोद आणि अनिता नृहसिंहवाडीला दत्त दर्शनाला गेली. दत्त दर्शन केल्यानंतर कृष्णेच्या काठावर दोघं विसावली. गेले दोन तीन दिवस मनातले विचारायची हिच संधी म्हणून अनिता विनोदला म्हणाली - 
‘‘विनोद, प्रभात दादाला तू हक्काने गाडी पाठव असं कसं म्हणालास ?’’
‘‘अग त्यात विशेष काही नाही. तो आपल्या घरचाच आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांसाठी करतच असतो. त्यात कुणाला काही वाटत नाही. प्रभात दादा दोन तीन दिवस घरी आला नाही तर माझ्या आईला चुकल्या चुकल्या सारखे वाटते. आणि मी प्रभात दादाच्या घरी गेलो नाही तर त्याच्या आईला करमत नाही.’’
‘‘आणि ताई ? ती जात नाही प्रभात दादाच्या घरी ?’’
‘‘फारशी जात नाही, फक्त कुणाला बर नसलं तर डॉक्टर म्हणून जाते. विशेषतः काकुंचं ब्लडप्रेशर बघायला जाते. प्रभात दादा फारसा आजारी नसतोच कारण त्याच्याकडे पंचवीस औषध कंपन्यांच्या एजन्सीज आहेत त्यामुळे त्याला औषधांची माहिती आहे. त्यामुळे बरं नसलं तर तो स्वतः औषध घेतो.’’
‘‘मग ताई फारशी का जात नाही ?’’
‘‘कारण असं काही नाही, खरतर ती आणि प्रभातदादा एका वर्गातले. ताई वर्गात खूप हुशार, प्रभात दादा फार हुड होता. खूप मस्ती करायचा म्हणून तो ताईला आवडत नव्हता.’’
अनिताला हसू आलं. 
‘‘कमाल आहे ताईची, तो मस्ती करायचा म्हणून आवडायचा नाही, लहानपणी मुलं विशेषतः मुलगे मस्तीखोरच असतात. तू मस्ती करत नव्हतास का?’’
‘‘मी फारसा मस्ती करायचो नाही, ताईला ते आवडायचं नाही. लहानपणापासून ताईच्या शिस्तीत वाढलोय मी. अभ्यास, व्यायामशाळा, शाखा एवढचं माझं विश्व.’’
‘‘अच्छा ! तरीच तू ताईचा लाडका. आणि आई-बाबांचा?’’
‘‘बाबांची ताई फार लाडकी, तिला कोणी बोललेल त्याना आवडत नाही. आणि बाबा घरी असले की ताई जणू त्यांच्या सेवेत असते. आईचा मी लाडका, मला तळहातावरच्या फोडासारखी जपायची आई. पण एकंदरीत काका-काकू, आत्या, मावशी सर्वांची ताई फार लाडकी. ती पण सर्वांची खूप काळजी घेते. नाती जपावीत तर ती ताईनेच. मला ते जमत नाही.’’
‘‘विनोद, नाती ही जपायचीच असतात. मला जमत नाही असं चालत नाही. माणसे जोडावीत. ’’
‘‘खरं आहे, मला पण प्रयत्न करायला हवा. पण ताई सर्वांना फोन वगैरे करत असते म्हणून मी करत नाही.’’
‘‘मग ताईने लग्न का नाही केले ?’’
‘‘ते ताईलाच माहित. तिला खूप स्थळे येत होती, ओळखीतून, नात्यातून मावशीने कित्येक स्थळे आणली. पण तिने इंटरेस्ट घेतला नाही हे खरे.’’
‘‘मग तिचे कुठे प्रेम वगैरे होतं का?’’
‘‘मला म्ााहित नाही. नसावं... तसा मी तिच्या पेक्षा १३ वर्षांनी लहान. पण तिच्या मैत्रिणी घरी येतच असतात. आईपण मैत्रिणींना हिच्यासाठी नवरा बघा असं सांगत असते. बाबा, काकांना, मामांना ताईच्या लग्नाबद्दल सांगताना मी ऐकले आहे. पण ताईने गांभीर्याने कधी घेतलंच नाही.’’
‘‘अरे पण आता ती ३८ वर्षांची झाली. तिचे तारुण्य कितीशे राहिले? तिला काही इच्छा, भावना आहेतच ना ? तू आता भाऊ म्हणून तिच्या लग्नासाठी प्रयत्न करायला हवा, तुझे कर्तव्य आहे ते.’’
‘‘मी ? माझे कर्तव्य ?’’
‘‘मग ? नुसते ताईकडून लाड करुन घेतोस, तिच्या आयुष्याकडेपण बघायला नको ?’’
‘‘पण ती काही बोलत नाही, लग्नाबद्दल काही सांगत नाही.’’
‘‘भारतातल्या स्त्रिया असं ‘माझं लग्न करा, मला लग्न करायचं आहे’ असं सांगत नाहीत. आपण समजून घ्यायचं असतं.’’
एवढ्यात गाडीचा ड्रायव्हर त्यांना बोलवायला आला तसे त्यांचे बोलणे राहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी अनिता उठली तेव्हा ताई बॅटमिंटन खेळून येत होती. बॅटमिंटनच्या कपड्यात ती फारच तरुण आणि आकर्षक दिसत होती. तिने अनिताला हाय केलं आणि ती आंघोळीला गेली. आज अनिताने किचनचा ताबा घेतला होता. सकाळच्या न्याहारीसाठी आंबोळी आणि चटणी असा बेत केला होता. आंघोळ करुन ताई न्याहारीला आली आणि आंबोळी चटणी बघुन खुष झाली. 
एवढ्यासाठी दुसर्‍या गावातील मुलीशी लग्न करावं, विन्याने बरं केलं, सांगलीतली मुली बघितली नाही, नाहीतर रोज पोहे, उप्पीट नाहीतर दडपे पोहे या खेरीज काही मिळाले नसते नाश्त्याला. पण विन्याने लग्न केले कल्याण मधली पण मालवणी मुलीशी. आता रोज मालवणी पदार्थ खायला मिळणार. ’’
‘‘ए अनिता, तू मासे बनवत असशील ना? मी तुला फिश मार्वेâटमधून मासे आणून देते. मस्त पैकी माशांचे कालवण बनव आणि सोलकढी.’’
‘‘हो ग ताई, तू मासे आणचं, मी कसे मालवणी स्टाईलने आमटी करते, प्रâाय करते ते बघच. आणि आता आईकडे गेले की आमसुले घेऊन येते. आमच्या गावाहून परुळ्याहून काका आमसुल पाठवतात आम्हाला.’’
नाश्ता करुन ताई तिच्या दवाखान्यात गेली. तेवढ्यात आई, विनोद यांचा पण चहा नाश्ता झाला आणि साडेनऊला अनिता बँकेत जायला निघाली. विनोद तिला बँकेत सोडून त्याच्या ऑफिसमध्ये जाणार होता. आज अनिताचा सांगलीच्या बँक शाखेत पहिला दिवस म्हणून अनिता थोडी लवकर निघाली. वाटेवर प्रभात दादाची एजन्सी लागायची. विनोदने रस्त्यावरुन अनिताला प्रभात दादाची एजन्सी दाखवली. पहिल्या दिवशी अनिता हजर झाली आणि सांगलीच्या शाखेतील सर्वांची ओळख करुन घेतली. संध्याकाळी अनिता बँकेतून चालत चालत घराकडे येत होती. एवढ्यात मागाहून प्रभातदादा बुलेटवरुन आला. 
‘‘काय आज बँकेत हजर झाली वाटतं?’’
‘‘होय हो प्रभात दादा ! आज पहिला दिवस, सर्वांची ओळख करुन घेण्यात आजचा दिवस संपला.’’
‘‘तुमच्याच बँकेत माझ्या एजन्सीचे अकांउंट आहे बरं का? आता बरं झालं कधी एनीएफटी वगैरे काढायची असेल तर तुला फोन केला तर काम होईल.’’
‘‘चल बस, तुला सोडतो घरी.’’
प्रभात दादाच्या बुलेटवर बसून अनिता घरी आली. अनिताने चहासाठी आग्रह केला तेव्हा तो बुलेटवरुन उतरला. मागोमाग चालताना त्याचे लक्ष ताईच्या दवाखान्याकडे गेले. 
‘‘डॉक्टरीण बाईचा दवाखाना सुरु झाला वाटतं’’
‘‘हो तर, हल्ली पेशंटपण खूप वाढलेत’’
‘‘ का नाही वाढणार ? एवढी हुशार डॉक्टरबाई, शिवाय कमी खर्चात पेशंटना बरं करणार, पण आमच्या धंद्याला हिचा जास्त फायदा नाही.’’
‘‘का हो प्रभात दादा अस का म्हणता ?’’
‘‘अगं ही जास्त औषधे लिहित नाही, मग आमच्या औषध धंद्याला हिचा काय उपयोग ?’’
‘‘ते बरचं की, गरीब पेशंटचा फायदा नाही का ?’’
‘‘हो, हो चहा दे, तिचं जास्त कौतुक करु नकोस. लहानपणापासून ओळखतोय मी तिला.’’
अनिताने दिलेला चहा घेतला आणि दोन मिनिटे आईना भेटायला प्रभात दादा गेला. अनिता सासूबाईंच्या खोलीत गेली तेव्हा त्या टिव्ही पाहत होत्या. अनिता आत येताच त्यांनी अनिताची चौकशी केली. 
‘‘काय गं, आज इकडच्या शाखेत पहिला दिवस तुझा ! नव्या ओळखी वगैरे झाल्या की नाही ?’’
‘‘हो तर, आज नवीन ओळखी, परांजपे म्हणून मॅनेजर आहेत इथे, तुम्हा सर्वांना ओळखतात ते.’’
‘‘अग तो परांजपे डॉक्टरांचा पुतण्या, ओळखणार नाही तर काय ? अग त्याची आई आमच्या भजनात असते. रोज सोमवारी, मंगळवारी आम्ही भजनासाठी राम मंदिरात जमतो तेव्हा ती तिथे येते. खूप वर्षापासूनची ओळख आहे.’’
‘‘आई, तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारु ?’’
‘‘अग विचार ना !’’
‘‘आई, आपल्या ताईने लग्न का केल नाही हो ?’’
‘‘हो, हा प्रश्न तु विचारणार हे माहित होतच, सर्वजण विचारतात आणि उत्तर देता देता मी मेटाकुटीला येते. पण तुला माहित असायला हवच कारण या घरची सून आहेस तू. अग ती मनावर घेत नाही हाच प्रश्न. स्थळ येतात पण ती हसून सोडून देते. माझ्या बहिणीनी, नणंदांनी ओळखीतून सर्व प्रयत्न झाले. पण बाईसाहेब लक्ष घालत नाहीत. तिच्या बाबांची ती फार लाडकी. ते पण कुणाकुणाला सांगत असतात. पण हिच्यावर काही परिणाम नाही.’’
‘‘पण तिच्या मनात काय असेल हे बाहेर यायलाच हवं. तिच्या खास मैत्रिणी वगैरे ?’’
‘‘सर्वांना सांगून झालं. सर्वांनी हात टेकले.’’
एवढ्यात विनोदचे बाबा बाहेरुन आले आणि त्यांना चहा देण्यासाठी आई किचनमध्ये गेल्या. त्यामुळे तो विषय तिथेच राहिला. अनिताला पाहताच बाबा म्हणाले -
‘‘अग अनिता, उद्या प्रभातच्या घरी जाऊन या, त्याच्या आईचा फोन आलेला म्हणाल्या - लग्न झाल्यानंतर विनोद आनिता आली नाही घरी ?’’
‘‘हो बाबा, उद्या शनिवारच आहे, विनोदला सांगते उद्या प्रभात दादाच्या घरी जाऊया म्हणून.’’
दुसर्‍या दिवशी शनिवार होता. विनोदच्या मोटर सायकलवर बसून अनिता प्रभात दादाच्या घरी विश्राम बागेला गेली. नविनच डेव्हलपेंट झालेल्या भागात प्रभात दादाचा भलामोठा बंगला होता. मोटर सायकलचा आवाज ऐकून प्रभातची आई बाहेर आली. 
‘‘या, या विनोदराव, घरी हक्काची बायको आली म्हटल्यावर काकुला विसरला वाटतं ? लग्नाला आठ दिवस झाले तरी इकडे फिरकलास नाही कुठे बाहेर गेलेला की काय ?’’
‘‘नाही ग काकू, अनिताला सध्या रजा मिळणार नाहीय, तेव्हा देव दर्शन करुन ती बँकेत हजर झाली. आता दिवाळीत जाऊ कुठेतरी.’’
‘‘जा जा फिरुन या, मग एकदा दोनाची तीन झाली की राहिलं.’’
अनिता हसली.
‘‘पूर्वीच्या बायका अशी चेष्टा केली की लाजायच्या, आताच्या हसतात याला म्हणतात नवीन पिढी.’’
सर्वजण मोठ्याने हसले.
‘‘प्रभात दादा नाही आले अजून ?’’ अनिताने विचारले.
‘‘प्रभात ? तो दहा शिवाय उगवायचा नाही. एजन्सी सातला बंद केली की तो ‘भावे’ मध्ये जाणार, तेथे त्याचा ग्रुप जमलेला असतो. मग साडेनऊ पर्यंत नाटकाची प्रॅक्टिस, तेथून मग मित्रांबरोबर गप्पा मग दहा नंतर घरी.’’
‘‘मग त्यांच जेवण ?’’
‘‘मी त्याचं जेवण टेबलावर ठेवते. मला नऊ वाजता झोपायची सवय. तो येऊन जेवण गरम करतो आणि जेवतो.’’
अनिता अंदाज घेत होती. प्रभात दादाच्या बायकोचा कुठे उल्लेख होत नाहीय, ती माहेरी वगैरे गेली की काय ?’’ तेवढ्यात विनोद म्हणाला -
‘‘अनिता तुला प्रभातच घर दाखवतो.’’
अनिता विनोद बरोबर घर पहायला गेली. खाली तीन बेडरुम्स, हॉल, किचन, स्टोअर रुम, वरती दोन गेस्ट रुम्स सर्व ठिकाणी उंची फर्निचर्स, टाईल्स, सर्व चकाचक. सर्व घर पाहून अनिता विनोद पुन्हा हॉलमध्ये आले. 
‘‘छान आहे हो घर, केव्हा बांधलं हे ?’’
‘‘हे घर प्रभातने बांधलं, पाच वर्षे झाली त्याला. पूर्वी आम्ही नळभागात दोन खोल्यात रहायचो. प्रभात ने धंदा सुरु केला आणि खूप वाढवला मग घर बांधलं.’’
‘‘छानच आहे हं... कर्तृत्ववान आहे प्रभात दादा !’’ अनिताने कौतुक केले. तिच्या कौतुकानंतर आईनी एक निश्वास टाकलेला अनिताने ऐकला. तिला विचारायचं होतं - प्रभात दादाची बायको, मुलं कुठं आहेत ? पण पहिल्यांदाच ती या घरी आलेली त्यामुळे असे काही विचारने म्हणजे आगाऊपणा दिसला असता म्हणून ती गप्प राहिली.
काकूंना नमस्कार करुन विनोद - अनिता निघाली आणि कृष्णेच्या घाटावर येऊन बसली. घाटावर अनेक जोडपी, प्रेमीयुगुलं, वयस्क बरीच मंडळी बसली होती. अनिताच्या ओठावर केव्हापासून येत होतं पण मघा काकू समोर असताना तिने विचारायचे टाळले. आता घाटावर आल्यावर तिने विनोदला विचारले -
‘‘विनोद, प्रभात दादाची बायको मुलं कुठे दिसली नाहीत ती ?’’
‘‘मला वाटलचं होत तू हे विचारणार. प्रभात दादाचं पुण्याच्या आरती महाजन बरोबर लग्न झालं होतं. अगदी लग्न जमवणार्‍या संस्थेत नाव घालून. आरती कमालीची देखणी होती. तिचे वडिल पुण्यातील प्रतिष्ठित वकील. लग्न पुण्यात धुमधडाक्यात झाले. आम्ही सर्वजण लग्नाला चार दिवस होतो ताई सोडून.’’
‘‘आ, ताई लग्नाला आली नाही ?’’
‘‘नाही. त्याच मुहूर्तावर तिच्या जवळच्या मैत्रिणीचं अहमदाबादला लग्न होतं त्यामुळे ताई त्या लग्नाला गेली.’’
‘‘बर मग?’’
‘‘आरतीचं आणि प्रभातचं अजिबात जमेना. काकू सांगायच्या सतत त्या दोघांच तू-तू, मी-मी होत असे. चार महिन्यातच आरती माहेरी निघून गेली. एका वर्षानंतर तिने डायव्हर्स मागितला आणि प्रभातने तो दिला. आता तिने दुसरं लग्न केलं अस म्हणतात. पण प्रभात गप्प आहे. माझ्या बाबांनी त्याला परत लग्न करायचा सल्ला दिला पण तो बघुया असं म्हणून या विषयावर गप्प झाला. बिचारी काकू एकटी झालीय. त्यात हे महाशय दहा वाजता उगवणार.’’ 
एवढं बोलून विनोद गप्प झाला. अनिता गप्प होती. कृष्णामाई संथ वाहत होती. कृष्णेच्या पलिकडची लहान लहान घरं पाण्यात बुडालेली दिसत होती. सांगली - कोल्हापूर रस्त्यावर वाहने धावत होती. अनिताच्या मनात आले. लग्न करुन सांगलीत आले त्याला अजून आठ दिवस झाले नाहीत. तो पर्यंत एक देखणी, सुसंस्कृत स्त्री लग्न करत नाही आणि एक कर्तबगार पुरुष लग्न करुन एकटा झालाय. प्रत्येकजण आपआपल्या कामात बिझी आहे असं दाखवतोय, पण ही माणसं एकटी आहेत. काही तरी करायला हवं. 
दुसर्‍या दिवशी अनिताने कोकणी पध्दतीचे घावण आणि नारळाचं दूध आणि गुळ घालून रस बनविला. ताई बॅडमिंटन खेळून, आंघोळ करुन नाश्त्याला आली आणि घावण आणि रस पाहून बेहद्द खूश झाली. अनिताच्या पाठीवर कौतुकाचा धपाटा घालून खायला बसली. रसात बुडवून घावण तोंडात घालता घालता - ‘‘मस्त, मस्त’’ असं बडबडत राहिली. अनिता हळूच म्हणाली - 
‘‘ताई तुम्हाला एक विचारु ? रागावू नका. ’’
‘‘अग विचार, विचार ! आज मी बेहद्द खूश आहे. हे घावण खाऊन मी तृप्त झाली आहे, विचार’’
‘‘ताई, तुम्ही एवढ्या देखण्या, कर्तबगार, मनमिळावू मग अजून लग्न का करत नाही ?’’
‘‘अरे व्वा ! तूच हे विचारायची राहिली होतीस. मल्ाा सांग प्रत्येकाने लग्न केलेचं पाहिजे असं आहे का? आणि लग्न केलेले सुखी होतात काय ?’’
‘‘सुखी कोणच नसतं हो ताई, समस्या प्रत्येकाला असतात, तरीपण पुरुष आणि स्त्रीने एकत्र येण्याची पध्दत आहे. नाहीतर वंश वाढणार नाही आणि प्रत्येकाला आपला स्वतःचा आधार हवा असतो. वेल स्वतः वाढतेच पण तिला काठीचा आधार मिळाला की भरभर वाढते.’’
‘‘काही वेली जमिनीवर पसरतात, मी त्याचपैकी एक आहे असं समज अनिता.’’
‘‘तुम्ही बोलायला हरणार आहात का ताई ? तरी पण मला वाटतं, मी पण एक स्त्री आहे मला समजतात स्त्रीच्या इच्छा, भावना. त्यांना कोंडून ठेवू नये असं वाटतं. तुम्हाला तुमचा हक्काचा पार्टनर मिळायला हवा. कोणी योग्य तुम्हाला वाटला नाही का ? ’’
‘‘एवढी वर्षे मी एकटी राहिले याचा अर्थ नाही असं समज.’’
‘‘ताई, मला थोडी आगाऊ म्हणा किंवा मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे कदाचित मोकळ्या स्वभावाची म्हणा, मला निश्चित वाटतं तुमच्या सारख्या स्त्रीसाठी अनेकजण झुरले असतील पण तुम्ही दुर्लक्ष केलं असणार.’’
‘‘असेल कदाचित’’ नाश्ता संपवता संपवता ताई म्हणाली. तिच्या कपात चहा ओतता ओतता अनिता म्हणाली -
‘‘मला लग्न होऊन जेमतेम आठ दिवस झाले. म्हणजे सांगलीत मी फक्त आठ दिवसांपूर्वीच आले. एवढ्यात मला दोन सुंदर, सुस्वभावी कर्तबगार व्यक्ती बाहेरुन आनंदी पण आतून दुःखी दिसतात.’’
‘‘मी नाही हं दुःखी, मी माणसं, माझे पेशंट, मित्रमंडळी यासर्वांत एवढी अडकलेली असते की दुःख करायला वेळच नाही माझ्याकडे आणि दुसरं कोणाबद्दल बोललीस ?’’
‘‘प्रभात दादा बद्दल. मला कालच समजलं, प्रभात दादा पण एकटे आहेत. त्यामुळे काकूना पण त्रास होतो आहे.’’
‘‘प्रभातचं लग्न झालं होतं’’
‘‘हो कळलं मला, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. ताई प्रभात दादा तुमचे वर्गमित्र ना ?’’
‘‘चौथी पासून दहावीपर्यंत, पण त्याचे आणि माझे कधीच जमले नाही. लहानपणी सतत भांडायचो आम्ही’’
‘‘आणि आत्ता ?’’
‘‘आत्ता मी प्रभात बरोबर जास्त बोलतच नाही. कधी समोर आलाच तर जेवढ्यास तेवढे’’
‘‘प्रभात दादा सर्वांना प्रिय आहेत मग तुमच्या बरोबर का जमत नाही?’’
‘‘लहानपणी माझ्या वेण्या ओढायचा तो, त्यामुळे त्याच्या पासून लांब लांब राहिले मी. तो घरी येतो नेहमी. आईबाबांबरोबर, तुझ्या नवर्‍याबरोबर त्याचे गुळपिठ असते पण माझ्याबरोबर नाही.’’
‘‘ताई, सांगलीत आल्यापासून मला तुम्ही खूप आवडलात. तसेच प्रभात दादापण फार आवडले. पण माझे दुर्दैव हे की, माझी दोन्ही आवडती माणसं एकटी आहेत. ताई धाडसाने बोलते मी रागावू नका. मला वाटतं तुम्ही आणि प्रभात दादा ‘‘मेड फॉर इच अदर’’ आहात.’’
‘‘काय ?’’ ताईने दचकून विचारले. ‘‘कोण प्रभ्या ? एक नंबरचा मस्तीखोर तो आणि मी एकत्र येऊ ? शक्यच नाही....’’ एवढं बोलून ताई ताडताड चालत आपल्या रुममध्ये गेली आणि तिने दरवाजा आतून लावून घेतला. 
सुकन्या (ताई) -
आत्ता अनिता बोलून गेली - तुम्ही आणि प्रभात दादा मेड फॉर इच अदर आहात. प्रभात माझा नवरा ? छे ! छे !! अजिबात नाही. सीटी हायस्कूलमध्ये मी पाचवीत होते तेव्हा काही द्वाड पोर मुलींना त्रास द्यायची. मागून वेण्या ओढायची. प्रभ्या त्यातला एक. मग सहावीत आमच्या वर्ग शिक्षकांनी नाटक बसवले. त्यात प्रभ्या आणि मी होतो. प्रभ्या नाटकात काम छान करायचा. (अजूनही त्याचे नाट्य प्रेम आहेच. भावे नाट्यगृहामध्ये त्याचा ग्रुप जमतो. प्रभ्या नाटकात काम छान करतो.) एकत्र नाटक केल्यामुळे तो घरी यायला लागला. त्याचे वडिल आणि माझे वडिल मित्र निघाले. दोघही संघाचे कार्यकर्ते. त्यामुळे संघाच्या बैठकीत ते भेटायचे. आम्ही आठवीत असताना प्रभ्याचे वडिल वारले आणि तो पोरका झाला. माझ्या आईवडिलांनी त्याला खूप सांभाळले. त्यामुळे तो घरचाच झाला. बाबा, आई, विनोद यांचे त्याच्याशी खूप जमते. एमआर म्हणून तो कंपनीत नोकरीला लागला आणि त्या लाईनची ओळख झाल्यानंतर त्याने आपली एजन्सी काढली. फार मोठा बिझनेस वाढवला त्याने. 
मी बारावीनंतर बीएएमस करायचे ठरवले तेव्हा सरकारी कोट्यातून मला सावंतवाडीचे आयुर्वेदिक कॉलेज मिळाले. सावंतवाडीतील मस्त तळ्याकाठी कॉलेज मिळाले म्हणून मी खूश होते. तेथे मला भेटला तन्मय, तन्मय फोंडेकर. गोव्याचा. सर्वांना तो आवडायचा. अभ्यासात हुशार होताच पण त्याच्या अंगात अनेक कला होत्या. संगीतात त्याला जास्त रुची होती. त्याचे वडिल गायक होते. आई संगीत विद्यालयात शिक्षिका होती. घरात संगीताचे वातावरण. अनेक शास्त्रीय गायक त्यांचेकडे यायचे. त्याची आणि माझी ओळख झाली आणि मी त्याच्याकडे ओढले गेले. त्याचे बोलणे ऐकत रहावे असे वाटायचे. सावंतवाडीतील तलावात केशवसुतांच्या तुतारीसमोर बसून आम्ही मस्त गप्पा मारायचो. मला वाटायचे त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे, कधीतरी तो प्रेमाचे विचारेल, लग्नाचे विचारेल पण फक्त एकदाच तारकर्लीला वर्गातील मित्रमंडळी गेलो होतो तेव्हा मी त्याच्या बाजूबाजूने चालत होते. सुर्यास्त व्हायला आला आणि तो क्षण डोळ्यात साठविण्यासाठी आम्ही एकटक सुर्याकडे पाहत राहिलो. माझ्या बाजूला तन्मय होताच. त्या अंधुक अंधुक प्रकाशात तन्मयने माझा हात हातात घेतला. मी पण माझी बोटे त्याच्या बोटावर दाबली. मी सुर्याकडे पहायच्या ऐवजी तन्मयकडेच पाहत होती. हळूच त्याच्या खांद्यावर माझे डोके टेकले. पण दुसर्‍या क्षणी सुर्य बुडाला तशी मुले मोठ्याने ओरडली आणि तन्मय बाजूला झाला. त्यानंतर सुध्दा तो नेहमी सारखाच बोलायचा. तो डॉक्टर होत होता, पण पुढे संगीत शिकायचे की डॉक्टरी करायचे हे त्याचे निश्चित होत नव्हते. मिनिटा मिनिटाला त्याचे बेत बदलायचे. 
फायनल परीक्षा झाली आणि मुलांनी हॉस्टेल सोडले. जो तो आपआपल्या घरी जायला निघाला. मला वाटत होते. तन्मय आता तरी आपल्याशी प्रेमाचे बोलेल पण त्याचे काही चिन्ह दिसेना म्हणून मीच त्याला गाठले आणि मला तू आवडतोस आपण आयुष्यभरासाठी एकत्र येऊया असे म्हटले. तेव्हा तो घाई घाईत म्हणाला, 
‘‘सुकन्या, माझं काही निश्चित नाही गं, मी बनारसला संगीत शिकण्यासाठी जातोय. एवढ्यात लग्न वगैरे करण्याचा काही विचार नाही. तू माझी वाट पाहू नकोस.’’ असं म्हणून त्यानं झिडकारलच मला. मी सांगलीत आले तरी पण त्याची वाट पाहत राहिले. दवाखाना सुरु झाला, पेशंट यायला लागले पण मनातून कुठेतरी वाटत होते कधीतरी तन्मयचा फोन येईल. त्याची वाट पाहत एवढी वर्षे राहिले. आता मात्र मी निराश झाले आहे. तन्मयची वाट पाहण्यात अर्थ नाही. माझ वय वाढत चाल्लय. अनेकांनी चांगल्या चांगल्या मुलांची स्थळे सुचवली, मी नकार देत राहिले आणि आज अचानक अनिताने प्रभात बरोबर लग्नाचे विचारले. पण प्रभात मला आवडतो का ? हा प्रश्न. आणि तो माझ्याशी लग्नाचा विचार करु शकतो का ? हा ही प्रश्न. तस त्याच्या मनात असतं तर त्याने आरती बरोबर लग्न करण्याआधी मला विचारलं असतं. त्यामुळे प्रभात बरोबर लग्न ? नहीं, कभ्भी नहीं...!
अनिता -
देशमुखांच्या घरात मी नवी खरी पण आगाऊपणे ताई आणि प्रभात दादा यांचे लग्न ठरवायला निघाले. आठ दिवसांच्या सहवासाने वाटलं होतं की ही दोघं खरचं एकमेकांसाठी आहेत. ताईला मी प्रभातदादा बद्दल विचारले पण तिचं तेच तुणतुणं, ‘‘तो द्वाड होता, म्हणून त्याच्याशी माझं जमत नाही वगैरे...’’ लहानपणाचा द्वाड गुण आत्ता राहिलायं का ? आणि हल्ली मुली द्वाड मुलांवरच जास्त मरतात हे या काकूबाईंना कोण सांगणार ? ताई नंतर आता प्रभात दादाकडेपण चाचपणी करायला हवी. तशी संधी मला मिळाली. शनिवारी अर्धा दिवस बँक, त्यामुळे दुपारी दोनला मी घरी चालत निघाले. वाटेत प्रभात दादाची एजन्सी. मी प्रथमच दादाच्या एजन्सीमध्ये पाय ठेवला. बाहेर कॉम्प्युटरवर काम करणार्‍या मुलीने दादाचे ऑफिस दाखवले. मी केबिनचे दार उघडून आत गेले एवढ्यात दादाने मला पाहिले. 
‘‘अग ये ये, अनिता, आज प्रथमच ऑफिसमध्ये ? काय विशेष ?’’
‘‘दादा, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं’’ मी आजुबाजूला पाहत म्हटलं. 
‘‘ओके’’ दादाने केबिनचे दार बंद केलं आणि म्हणाला, 
‘‘आता बोला’’
‘‘दादा, त्या दिवशी मी विनोद बरोबर पहिल्यांदा तुमच्या घरी गेलेली.’’
‘‘हो, हो आई बोलली मला. तू येणार हे माहित असतं तर मी आधीच आलो असतो घरी. ’’
‘‘नाही, अचानक ठरलं. दादा मी नवीन असून काही विचारु का ? रागावू नका. दादा तुमचं वैवाहिक जीवन असं अर्धवट राहिलं याचं वाईट वाटत हो मला. काकू पण एकट्या झाल्यायत. एवढ्या मोठ्या घरात दोन माणसं, तुम्ही दिवसभर बाहेर, तुम्ही काहीतरी विचार करायला हवा. कोणीतरी आपल्या हक्काचं हवं ना ?’’
‘‘हो ग, मला पण समजतं.’’ असं म्हणताना प्रभातच्या डोळ्यात पाणी आलं. घसा भरुन आला. 
‘‘माझ्या आयुष्याचा खेळच झालाय सध्या. एकदा पायरी चुकली की गडगडून पडायच हे निश्चित.’’
‘‘झालं ते झालं दादा, पण तुम्ही लवकरात लवकर लग्नाचा विचार करावा असं मला वाटतं.’’
‘‘लग्नानं तोंड कडू झालयं ग माझं.’’
‘‘पण ते तोंड गोड करु शकणारी स्त्री आहे ना आपल्याकडे !’’
‘‘काय ? कोण ग बाई ?’’
‘‘तुमची बालमैत्रिण, ताईबद्दल बोलतेय मी. तुम्ही दोघ एकमेकांसाठी अनुरुप आहात असं मला वाटतं.’’
‘‘कोण सुकन्या ? ती घमेंडी मुलगी? अनिता त्या घरात मी शिरलो तो सुकन्येचा वर्गमित्र म्हणून पण तिचं माझं कधी जमलचं नाही. ती स्कॉलर पहिली बेंचवाली. आम्ही लास्ट बेंचवाले. तिच्या दृष्टीने ढ आणि मस्तीखोर. त्या घरातली सर्व मंडळी मला एकदम जवळची आहेत एक सुकन्या सोडून. तिच माझ्याशी कधी जमलं नाही आणि यापुढे जमणार नाही.’’
‘‘पण दादा, तुम्ही विचार करावा.’’
‘‘सॉरी अनिता, हे कधीच जमायचे नाही.’’
निराश होऊन मी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडले. हे दोघेहीजण आपआपला अहंम सांभाळत आहेत. 
पुढे चार महिने गेले आणि एक दिवस अनिता बँकेत काम करीत असताना तिच्या नवर्‍याचा विनोदचा तिला फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. 
‘‘अनिता, प्रभातला मोठा अ‍ॅक्सिडंट झालाय’’
‘‘कुठे ?’’ अनिता किंचाळली. 
‘‘पुण्याहून सांगलीला आपल्या गाडीतून येत होता. सातार्‍याजवळ याची गाडी लक्झरी गाडीवर आदळली. प्रभातला खूप लागलय बहुतेक, मी आणि ताई तिकडे जातोय.’’ एवढं म्हणून विनोदने फोन ठेवला. अनिताचे पाणी पाणी झालं. मॅनेजरना सांगून ती बाहेर पडली आणि रिक्षा करुन घरी आली. घरी पोहोचेपर्यंत विनोद आणि ताई सातार्‍याला रवाना झाले होते. आईबाबा सगळे काळजीत होते. बाबांनी जाऊन प्रभातच्या आईला पण या घरीच आणले होते. बाबांच्या कानाला मोबाईल चिकटलेला होता. सगळीकडून ते बातम्या घेत होते. थोड्या वेळाने समजले कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याचे. बाबा ताईला सतत फोन करत होते. पण ताई फोन घेत नव्हती. घरातील वातावरण चिंताजनक झाले होते. प्रभातच्या आईला खोटचं - आता बर आहे प्रभातचं असं सांगून वेळ मारत होते. 
     सायंकाळी सात वाजता ताईने बाबांना फोन लावला. ताई रडत रडत बोलत होती. बाबा फार सिरीयस कंडिशन आहे हो, डोक्याला मार लागलाय. बाकी पाय मोडलाय, हात प्रâॅक्चर आहे ते सर्व बरं होईल पण स्कल इंज्युरीची भिती वाटते. काही तरी तातडीने निर्णय घ्यायला लागेल. मी प्रयत्न करते आहे मग तुम्हाला कळवते. असं म्हणून ताईने फोन ठेवला. बाबांच्या पण डोळ्यात पाणी जमा झाले होते पण ते इतरांना दाखवत नव्हते. बळेबळे सर्वांना दुधभात खायला लावला आणि त्यांनी सांगलीच्या आमदारांना फोन लावला. आमदार पण संघाशी संबंधीत त्यामुळे बाबांच्या चांगल्या ओळखीचे. आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या पीएना फोन लावला आणि एअर टॅक्सीने प्रभातला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. ताई आणि विनोद बरोबर होतेच. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून खास मेसेज आल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुंबईतील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या झाल्या आणि तातडीने ब्रेन सर्जरी झाली. हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आले पंधरा दिवसानंतर कदाचित आणखी एक ऑपरेशन करावं लागेल. प्रभात बेशुध्द होता. ताई सतत बाहेर काळजीत बसलेली असायची. डॉक्टर्स रोज औषधं लिहून देत होते. ताई आणून देत होती. सांगलीतील घरातील वातावरण टेन्स होते. कधी कसला फोन येईल याची भिती वाटत होती. अनिता रजेवरच होती. किचनमध्ये थोडफार शिवजून सर्वांना बळेबळे खायला लावत होती. पंधरा दिवसांनी मुंबईतील प्रसिध्द न्युरोसर्जनने दुसरं ऑपरेशन केले आणि अपघातानंतर डोक्यात आलेले सर्व अडथळे बाहेर काढले. आता डॉक्टरना आशा वाटायला लागली. आणखी चार दिवसांनी प्रभात किंचित डोळे उघडायला लागला. पण अजून नजरेत ओळख नव्हती. काही दिवसांनी नजरेत ओळख यायला लागली. त्याने सर्वात प्रथम ताईलाच ओळखले. सुकन्या... म्हणून तो पुटपुटला. दोन दिवसाने त्याने विनोदला ओळखले. मग हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ताई चौवीस तास त्याच्यावर लक्ष ठेवून होती. त्याच्या तब्येतीतील सुधारणा सांगलीत घरी कळवित होती. चार महिन्यानंतर प्रभातला डिस्चार्ज मिळाला आणि तो सांगलीत डॉ. शहांच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाला. डॉ. शहा ताईच्या खास ओळखीचे त्यामुळे सर्व सोपे झाले. हळूहळू प्रभात स्टीक घेऊन चालू लागला. ओळखू लागला, थोड थोड बोलू लागला. 
     पंधरा दिवसानंतर प्रभातला डिस्चार्ज मिळाला पण अजून त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते त्यामुळे तो देशमुखांच्याच घरी आला. सकाळ संध्याकाळी ताई त्याचे खाणे पिणे, व्यायाम यावर लक्ष ठेवून होती. या अपघातानंतर ताई आणि प्रभात यांच्यातला अबोला कमी झाला. अनिताच्या लक्षात आलं आता प्रभात घरात कुणाही पेक्षा ताईबरोबर जास्त बोलू लागला. दोघंही एकमेकांच्या सहवासात आनंदी दिसत होते. त्यानंतर प्रभातच्या तब्येतीत सुधारणा झाली. देशमुखांच्या घरी सहा महिने राहिल्यानंतर तो आणि त्याची आई आपल्या घरी गेली. गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी प्रभात हॉस्पिटलमध्ये होता, सिरीयस होता. यावेळी प्रभात पूर्वीसारखा झालेला. दोन्ही घरात आनंद होता. प्रभातच्या घरी दरवर्षी गणपतीची पूजा व्हायची. गेल्यावर्षी झाली नव्हती याची प्रभातच्या आईला रुखरुख होती. यंदा तिने गणपती आणून सत्यनारायण घालायचा असे ठरविले. सत्यनारायण पूजा झाली, सर्व पाहुणे, आमंत्रित गेले आणि घरची मंडळी कॉफि प्यायला बसली. 
अनिता - 
केवढं मोठं संकट टळलं. प्रभात दादा खडखडीत बरे झाले. पुन्हा मोटर सायकल चालवायला लागले. ऑफिसात जायला लागले. त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट होतीच पण ताईने त्यांची जीव तोडून काळजी घेतली म्हणून तिला श्रेय द्यावेच लागेल. प्रभात दादाला याची जाणीव होती. हल्ली मी पाहते दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दल स्निग्ध भाव दिसत होते. एकमेकाच्या वार्‍यालाही न उभा राहणारे आता गप्पा मारायचे. आणि खरं सांगू याचा मला खूप आनंद होतो. प्रभात दादांकडे सत्यनारायणाच्या नंतर दोन्ही घरची मंडळी होती. ताई मस्त नारिंगी साडीत होती, प्रभात दादा लेंगा, झब्बा, जॅकिटमध्ये होते. दोन्ही घरची मंडळी समाधानाने कॉफि पित असताना मी बोलायला लागले. 
‘‘बाबा, आई, काकू तुम्हा सर्वांपुढे मी लहान आहे, तशीच दिड वर्षापूर्वीच लग्न करुन देशमुखांच्या घरी आली आहे. मी आगाऊ बोलत असेन तर मला क्षमा करा. पण या गणपतीच्या आणि सत्यनारायणाच्या कृपेने आपले प्रभात दादा बरे झाले. आपल्या ताईने खूप मेहनत घेतली. आपला डॉक्टरी व्यवसाय जवळ जवळ सहा महिने बंद ठेवून ती प्रभात दादांच्या तब्येतीसाठी झटली. तिच्याच मुळे आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांमुळे प्रभात दादा बरे झाले. मी लग्न होऊन सांगलीत आले तेव्हा मला कळलं आपली ताई अविवाहित आहे. एवढी सुंदर, हुशार, मेहनती, सुस्वभावी स्त्री एकटी का आहे ? तसेच प्रभात दादांचे लग्न अयशस्वी ठरले त्यामुळे ते पण एकटेच आहेत. मला वाटते या दोन वर्ग मित्रांना आता एकटे ठेवायचे नाही. ही दोघं एकमेकांसाठी अनुरुप आहेत. तेव्हा या दोघांची लग्नगाठ लवकरात लवकर मारावी.’’
जे सर्वांच्या मनात होतं तेच कदाचित अनिता बोलत असल्याने सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांनी ताईकडे पाहिलं. ताई प्रथमच हलकेच हसली. प्रभात दादापण खूष दिसला. त्या दोघांकडे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आई उठल्या आणि ताईकडे गेल्या. ताईने त्यांच्या खांद्यावर आपली मान ठेवली. आईने कौतुकाने तिला थोपटले. बाबा खुश झाले. काकूंसमोर हात जोडून उभे राहिले. 
‘‘वहिनी, माझ्या लेकीला सून करुन घ्या.’’
काकू खुशीने हसल्या, दोन्ही घरं आनंदीत झाली.
मग लग्नाची तयारी सुरु झाली. खरेदी सुरु झाली. घरांना रंगरंगोटी केली गेली. पाहुण्यांना, नातेवाईकांना निरोप गेले. सर्वांना खूप आनंद झाला. पत्रिका छापायला दिल्या, छापून आल्या पण. अरे हो, मघापासून मी तुम्हाला गोष्ट ताईच्या आणि प्रभात दादाच्या लग्नाची गोष्ट सांगतेय पण तुम्हाला आमंत्रण द्यायचे राहिले नाही का ?
।। श्री गजानन, दत्त महाराज प्रसन्न ।।
स.न.वि.वि.,
आमचे येथे आमची कन्या,
चि. सौ. कां. सुकन्या (ताई)
हिचा शुभविवाह 
चि. प्रभात
(वैâ. शंकरराव प्रभावळकर, सांगली यांचा सुपुत्र)
दि. १५ नोव्हेंबर सकाळी १०.३० मि.
स्थळ : श्री दत्त मंदिर सभागृह, नृहसिंहवाडी,
ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. 
आपले,
श्री. दत्तात्रय ज्ञानेश्वर देशमुख
सौ. माधवी दत्तात्रय देशमुख
आमच्या ताईच्या आणि प्रभात दादाच्या लग्नाला यायचं हं....
श्री. विनोद दत्तात्रय देशमुख
सौ. अनिता विनोद देशमुख
हेच आमंत्रण समजून सर्वांनी लग्नाला यायचं हं....!

- प्रदिप केळूसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...