मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1487. लक्ष्मीची पावलं

 माझं फूटवेअरचं शोरूम नुकतंच सुरू झालंय. अगदी दोन महिन्यांपूर्वी. मोक्याची प्रशस्त जागा. चांगला नावाजलेला ब्रॅन्ड आहे. लेदर शूज, स्पोर्टस् शूज, फ्लोटर्स, सॅन्डल्स, चप्पल,स्लीपर्स. लेडीज, जेन्टस्, किडस्. ब्रायडल डिझाईन्स. भरपूर व्हरायटी. ब्रॅन्डेड असलं तरी खिशाला परवडणेबल. पहिल्या दिवसापासून गिर्हाईकांची गर्दी. मी आणि माझी सात जणांची टीम.  हम साथ साथ है ! गिर्हाईक देवो भव || गिर्हाईक म्हणजे देव. गरीब, श्रीमंत, मिडलक्लास. असा भेदभाव करायचा नाही. प्रत्येकाशी अदबीनं वागायचं. ऊत्तम सर्वीस द्यायची. खरं सांगू? असं एखाद वेळी होतं. कुठला तरी गरीब बिच्चारा बाप.  पोराचं बोट धरून बिचकत बिचकत दुकानात शिरतो. एसीची गार हवा खाऊन गपगार पडतो. पोराला पसंत पडलेले ते स्पोर्टस् शूज.  जरासे महागडेच. किमतीचं लेबल तो हळूच चोरून बघतो. नाॅट परवडणेबल.  त्याचा चेहरा हतबल. मी हेल्पलेस.  ब्रॅन्डेड शूजच्या किमती फिक्स्ड असतात. एकदम आठवतं. पुढच्या महिन्यात कंपनीतर्फे सेल लावायचाय. 30% डिस्काऊंटवाला. काही तरी जुगाड करायला हवं. मी हेड आॅफीसशी बोलतो.  ते शूज त्या सेलमधे अॅडजस्ट करा असं रिक्वेस्टतो. मेरे घरवाले कस्टमर आहे असं सांगतो.  " ये पेहली बार और आखरी बार" हेड आॅफीस फोनवर जोरात कुरकुतं. मी जास्त हेडेक करून घेत नाही. डिस्काऊंटेड प्राईझ त्या बापाला कशीबशी परवडणेबल. बाप लेकाची ती जोडी, आनंदात माझ्या दुकानाबाहेर पडते. ती आनंदी पावलं बघून मी श्रीमंत होतो. जाताजाता मी हळूच त्याच्या कानात कुजबूजतो." पुढच्या महिन्यात सेल सुरू होतोय. 40% डिस्काऊंटमधे. वहिनींना घेऊन या. दोघांसाठी टिकाऊ चप्पल देतो. स्वस्तात. पुन्हा वर्षभर चपलांकडे बघायला नको." त्याला पटतं. तो येणारच.  अगदी नक्की. एक एक गिर्हाईक जोडतोय. माझा फायदा हवाच. गिर्हाईकाचंही नुकसान नको. धंदा असा 'चालायला' हवा. सांगतो ते ऐका. आमच्या ब्रॅन्डच्या चपला वापरा. मग बघा. तुमचाही बिझनेस जोरात 'चालेल'. अगदी पळेल सुद्धा. कधी येताय शोरूमला भेट द्यायला? बोलता बोलता विसरून गेलो. खूप महत्वाचं सांगायचंय तुम्हाला.
     ईवलीशी गोष्ट आहे. अगदी परवाचीच.  रात्री साडेनऊचा सुमार. दुकान बंद होत आलेलं. शटर निम्मं खाली. आवराआवर चाललेली. एक पोरगा दुकानात शिरतो.  गावाकडचा.  तरतरीत. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट. गळ्यात टाय.
टिपीकल.  हा नक्की मार्केटिंगवाला असणार.  नवानवा. व्हॅक्युम क्लीनर नाहीतर वाॅटर फिल्टरच्या कंपनीवाला.  मी विचारलं त्याला. वाॅटर फिल्टर कंपनीवालाच होता तो. बोलण्यात गावाकडचा लहेजा. तरीही काॅन्फीडन्ट. बावीस तेवीस वर्षांचा असेल. आमचं लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज. व्यवस्थित पाॅलीश केलेले. एकंदर वस्तू जपून वापरण्याचा स्वभाव असावा त्याचा. बहुधा हे शूज कंपनीने दिले असणार. " बोला, काय सेवा करू? " 'माझ्या आईला चप्पल हवीय. पाचशे रूपयापर्यंत. टिकाऊ पायजे. पैशाची फिकीर न्हाई. हजार रूपये लागले तरी बी चालतंय " ' त्या आल्या आहेत का? त्यांच्या पायाचं माप ?" त्यानं आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद. कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं. " काय माप सांगू  साहेब?  माझ्या आयनं जिंदगीभर,  पायात कदी चप्पलच घातली नाय. बाप दारू ढोसून मेला. आई ऊसतोड कामगार. काटा कुट्यात कुटं बी जात्ये अनवानी. ढोरावानी मेहनत केली. मला शिकीवलं  पालावरच्या शाळंत शिकलो. बी काॅम झालो. अन् जाॅबला लागलो हिथं. शिकतोय हळू हळू. भाषा बी सुदरंल. आज पैयला पगार झालाय.
गनपतीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ ? सवालच पैदा होत न्हाई. किती वर्सांचं स्वप्न हाई. पहिल्या पगारातून आयेला चपला नेयाच्या." मी चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती.
" चालतंय की " त्याची तयारी होती. " किती पगार आहे रे तुला? " ' सध्याच्याला बारा हजार. रहानं, खानं धरून सात आठ हजार खर्च होतात इथं. दोन तीन हजार आयेला धाडतो.' आठशे रूपये जरा...? मी बाॅक्स पॅक करून दिला. त्याने पैसे दिले. आनंदात तो बाहेर निघाला. एवढी महागाची भेट.. किंमत करताच येणार नाही त्या चपलांची. " थांब जरा..." मी अजून एक बाॅक्स त्याच्या हातात दिला. " ही चप्पल आईला.  तुझ्या या भावाकडून गिफ्ट. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. आईला सांग तुझ्या. आता अनवाणी फिरायचं नाही. नाही म्हणायचं नाही." माझे आणि त्याचे. दोघांचेही डोळे भरून आलेले. " काय नाव तुझ्या आईचं ? " मी विचारलं.
"लक्ष्मी" तो ऊत्तरला. " माझा नमस्कार सांग त्यांना. एक वस्तू देशील मला? पावलांची आऊटलाईन काढलेला, 
तो कागद हवाय मला." "देतो की " आनंदात ऊड्या मारत तो निघून गेला. तो घडीदार कागद मी दुकानाच्या देव्हार्यात ठेवला. काल बायको लेक आल्या होत्या दुकानात. देव्हार्यातला तो कागद लेकीनं बघितला. " काय आहे हे बाबा ?" 'लक्ष्मीची पावलं आहेत बेटा ती.  त्यानं बरकत येते धंद्याला.' लेकीनं मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला.
आम्ही सगळ्यांनीच. "लक्ष्मीची पावलं" || महालक्ष्मी प्रसन्न ||

कौस्तुभ केळकर नगरवाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...