"कुठलाही डॉक्टर देव नसतो. तोही माणूसच असतो. पेशंटवर उपचार करताना त्याच्याकडून चुका होऊ शकतात..." अशी आशयाची पाटी आपल्याला हॉस्पिटलमध्ये दिसते. एखाद्या पेशंटचा डायग्नोसिस करताना, त्याला औषधं देताना, त्याच्यावर सर्जरी करताना डॉक्टरकडून चूक होऊ शकते आणि पेशंट दगावू शकतो हेच सांगण्याचा प्रयत्न ती पाटी करत असते.
बऱ्याच वेळा होतं असं की एखादा पेशंट डॉक्टरच्या चुकीने दगावला आहे हे फक्त त्या डॉक्टरलाच माहीत असतं. अर्थात असं कोणी जाणून-बुजून करत नाही पण डॉक्टरच्या दृष्टीने तो खूनच असतो. त्याच्या चुकीमुळे पेशंट जीवाला मुकतो. अशा घटनेला वैद्यकीय क्षेत्रात मेडिकल मर्डर म्हणतात.
वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ञांना एकमेकांशी कुजबुजताना पाहिलं की सामान्य माणसांना त्यांच्याविषयी कुतुहल वाटतं. ही डॉक्टर मंडळी एकमेकांशी आपलं ज्ञान शेअर करत असतात का अज्ञान?
शहरात चौदा तज्ञ डॉक्टरांचा एक रहस्यमय ग्रुप असतो - द एक्स ग्रुप. मागच्या वीस वर्षांपासून हा ग्रुप दर तीन महिन्यांनी एकत्र येऊन काहीतरी गुप्त चर्चा करत असतो.
या ग्रुपमध्ये सत्तरी पार केलेले डायग्नाॅस्टीशीयन डॉक्टर शहांपासून नुकतंच चाळीशीत प्रवेश केलेल्या न्युराॅलाॅजीस्ट डाॅक्टर वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा समावेश असतो. तीन महिन्यांतून एकदा भेटणाऱ्या या क्लबमधील सदस्य त्यांच्यापैकी एखाद्या डॉक्टरकडून त्याच्या हातून घडलेल्या वैद्यकीय खुनाची कबुली घेतात तसंच त्या पेशंटला कसं वाचवता आलं असतं यासंबंधी चर्चा करतात.
हॉटेल ट्रायडेंटच्या नेहमीच्या सिक्रेट चेंबरमध्ये आज ती त्रैमासिक मीटिंग भरली होती. रात्री सुरू होणारी ही मीटिंग पहाटेपर्यंत चालत असे. खूनी डॉक्टर त्याच्या पेशंटला कुठला आजार होता, त्याने पेशंटला कुठली औषधं दिली, त्याच्यावर कसले उपचार केले त्याचे तपशील सांगतो. इतर डॉक्टर कन्फेशन देणार्या डॉक्टरला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याची उलटतपासणी घेतात. चर्चेत या विषयावर उपस्थित तज्ञ डॉक्टर आपापली मतं मांडतात आणि मृत पेशंटला नेमका कुठला आजार होता आणि त्याला काय ट्रीटमेंट द्यायला हवी होती याचा उलगडा करतात.
खुनी डॉक्टरकडून झालेली चूक दुसऱ्या कुणाकडून होऊ नये असा या मीटिंगचा उद्देश असतो.
द एक्स क्लबची मागची मीटिंग खूपच वादळी ठरली होती. त्या रात्री खूप पाऊस पडत असूनही क्लबमध्ये पंधरावा सदस्य येणार म्हणून जुने चौदाही सदस्य आवर्जून मिटींगला आले होते.
डॉ यतीन क्लबचा पंधरावा व नवा सदस्य. क्लबचे हेड डॉक्टर शहांनी केलेल्या शिफारशीमुळेच त्याला क्लबचे सदस्यत्व मिळाले होते. तो पहिल्यांदाच मिटींगला आला होता. तिशीतला हा उमदा डॉक्टर त्या रात्री अत्यंत अस्वस्थ दिसला. तो खुर्चीत बसून चुळबुळ करत होता. आपल्या हातून झालेल्या पहिल्या मेडिकल मर्डरचे कन्फेशन देताना कुठलाही डॉक्टर दबावाखाली येणारच!
त्या मीटिंगमध्ये डाॅ यतीनच नाही तर अजूनही दोन डॉक्टरांना त्यांच्या हातून झालेल्या मेडिकल मर्डरची कबुली द्यायची होती. मीटिंग उशिरापर्यंत चालणार हे लक्षात आल्यावर डॉ यतीनची चुळबुळ अजूनच वाढली.
"डाॅ यतीन, हा तुमचा पहिला मेडिकल मर्डर असल्याने तुम्ही घाबरला आहात. पण काळजी करू नका" समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये डॉ यतीन साठी वाईन सर्व्ह करत डॉक्टर वाजे म्हणाले. "थोडी घ्या. तुम्हाला बरं वाटेल. इथे उपस्थित सर्वच डॉक्टरांनी मेडिकल मर्डर्स केले आहेत."
डॉक्टर वाजेंना डॉ यतीनशी बोलताना पाहून अध्यक्ष डाॅक्टर शहांनी वाजेंना शांत राहण्याची खूण केली. डाॅ यतीन यांनी पहिल्यांदा कन्फेशन द्यावं असं काहींना वाटलं. पण डॉक्टर शहांनी डॉ यतीनला शेवटचा नंबर दिला.
पहिलं कन्फेशन देण्यासाठी डॉ दिलीप उभे राहिले. कन्फेशन डॉक्टर देणाऱ्या डॉक्टरांना पहिल्या नावाने हाक मारायची पद्धत होती.
"मागच्या महिन्यात आपल्या नगराध्यक्षांनी एक घरगुती पार्टी दिली होती. पार्टीत दिलेल्या अन्नामधून श्री जोगळेकरांच्या तीन मुलांना विषबाधा झाली. विषबाधेची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षांनी मला जोगळेकरांच्या घरी पाठवलं.
"अकरा, नऊ आणि सात अशा वयांची जोगळेकरांची तीन मुलं. मी तिघांनाही तपासलं. अकरा व नऊ वर्षांच्या मुलांना बऱ्याच उलट्या झाल्या होत्या. मी त्यांच्या आईला मुलांनी काय काय खाल्लं त्याबद्दल विचारलं आणि त्यांना एरंडेल तेलाचा डोस दिला.
"सात वर्षांच्या मुलाला उलट्या झाल्या नव्हत्या. पण तो निस्तेज दिसत होता, त्याला थोडा ताप होता आणि मळमळतही होतं. त्यालाही नंतर उलट्या होणार असं समजून प्रिकॉशन म्हणून मी त्यालाही एरंडेल तेलाचा डोस दिला.
"दुसर्या सकाळी अकरा व नऊ वर्षांची मुलं बरी झाली पण सात वर्षांच्या मुलाची तब्येत खूपच बिघडली आणि त्यात तो दगावला. धाकट्याला नेमकं काय झालं असावं?" असं विचारत डॉ दिलीपने कन्फेशन संपवलं.
"तुम्ही पहिल्यांदा मुलांना पाहिलं त्या वेळी धाकट्याला अक्यूट अपेंडीसायटिस होता. तुम्ही दिलेल्या एरंडेल तेलाने अपेंडीसायटिस फुटला आणि त्यातच..." डॉक्टर पाटकर म्हणाले. ते गॅस्ट्रोएन्टरोलाॅजीस्ट होते. पेशंटच्या पोटाला हात लावताच त्यांना आजार समजत असे. अशा तऱ्हेने डॉ दिलीपच्या केसच्या उलगडा झाला.
"एरंडेल तेलाने केलेला खून!" ओठांवर आलेलं हलकंसं हसू दाबत द एक्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शहांनी पहिल्या केसवर त्यांचं मत नोंदवलं.
दुसऱ्या कन्फेशनसाठी डॉ मनोज उभे राहत असताना डॉ यतीनने हात वर केला पण डॉक्टर शहांनी इशारा करून डॉ यतीनला हात खाली करण्यास सांगितले. धावण्याची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धावक आपापल्या मार्कवर जसे बसतात अगदी तशा अवस्थेत डॉ. यतीन खुर्चीवर बसला होता. कुठल्याही क्षणी तो त्या सिक्रेट चेंबर मधून बाहेर पळत सुटला असता असं वाटत होतं.
द एक्स क्लबच्या चौदा मेंबर्सपैकी काहीजण डाॅ यतीनचे हिरो होते. तो त्यांना स्वतःचे आदर्श मानत होता. त्यांच्यासमोर आपल्या अपराधाची कबुली देताना तो नक्कीच अवघडणार होता.
दुसरं कन्फेशन सुरू झालं...
डॉ मनोज एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये सर्जन होते. आता ते त्यांच्या हातून घडलेल्या मेडिकल क्राईमबद्दल सांगू लागले...
"काही दिवसांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये एक स्त्री पेशंट आली होती. तिला पित्ताशयाचा आजार होता. हे पित्ताशयाचे आजार कसे असतात ते आपल्याला माहीतच आहे! तिच्या पोटाच्या वर उजव्या भागात कळ येत होती. नंतर ती कळ मागे पाठीकडे व उजव्या खांद्याकडे जात होती. पित्ताशय सुजल्याची चिन्हे!
"मी रात्री तिला औषधे दिली. सकाळी येऊन पाहिलं तर तिच्या पित्ताशयाला सूज आलेली. त्यानंतर एकच तासात तिचं निधन झालं." डॉ मनोजने कन्फेशन संपवलं. त्यांच्या पेशंटला नेमकं काय झालं असावं हे आता त्यांना इतरांकडून जाणून घ्यायचं होतं.
"तुम्ही पेशंटचं शवविच्छेदन केलं का?" तिथे उपस्थित लंग स्पेशालिस्ट डाॅक्टर तांबोळी यांनी विचारलं.
"नाही," डॉ मनोज म्हणाले. "पेशंटच्या नातेवाईकांनाही त्याची गरज वाटली नाही."
"अ परफेक्ट मर्डर!" डॉक्टर तांबोळी म्हणाले. "तुम्ही पेशंटच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि तिला चुकीची औषधे दिलीत. पेशंटची अटाॅप्सी केली असती तर तुम्हाला तिची उजवी कोरोनारी आर्टरी सुजलेली दिसली असती!"
म्हणजे आजार फुफ्फुसाचा आणि उपचार पोटावर! डॉ मनोज यांना त्यांची चूक समजली पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. त्यांच्या हातून घडलेल्या मेडिकल मर्डर्समध्ये एकाची भर पडली होती.
"निष्काळजीपणामुळे डॉ मनोज यांच्या हातून झालेला हा तिसरा मर्डर आहे" जीभ गालातल्या गालात फिरवत द एक्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शहा म्हणाले.
"आता सर्वात तरुण गुन्हेगार डॉक्टर!" डॉ यतीनकडे बघत तीन-चार डॉक्टर एकत्रच बोलले. डॉ यतीन दडपणाखाली आलेला दिसत होता.
"कम ऑन यंग डाॅक्टर!" डॉक्टर शहा म्हणाले, "तुमचं वय आणि प्रॅक्टीस पाहून तुमच्या हातून अगदीच क्षुल्लक अपराध घडला असावा असे दिसत आहे. आमच्या हातून फार भयंकर गुन्हे घडले आहेत. तुम्ही जर ते ऐकले असते तर आज तुम्हाला तुमचा गुन्हा आमच्यापुढे काहीच वाटला नसता!"
डॉक्टर शहांच्या बोलण्याला इतर तेरा डॉक्टरांनी मान हलवून संमती दिली. नेहमी मद्यपान करणारे पहिल्यांदा मद्यपान करणाऱ्याला जसं प्रोत्साहन देतात तसं ते सर्वजण डाॅ यतीनला "कम ऑन" म्हणून प्रोत्साहन देत होते.
"माझ्याकडे एक सतरा वर्षांचा अतिशय प्रतिभावान युवक आला होता," डॉ यतीन सांगू लागला. "तो कविता लिहायचा. माझ्याकडे येण्याअगोदर दोन आठवड्यांपासून तो पोटदुखीने त्रस्त होता. तसा तो माझ्याकडे अगोदरच येणार होता; पण त्यावेळी त्याची पोटदुखी थांबल्याने तो आला नाही. नंतर दोन दिवसांनी पुन्हा त्याचे पोट दुखू लागले.
"मी पहिल्यांदा त्याला पाहिला त्यावेळी त्याच्या अंगात ताप होता. त्याला जुलाब होत होते. जुलाबातून रक्त व पू बाहेर पडत होता. आम्ही त्याच्या मल-मूत्राच्या तपासण्या केल्या पण रिपोर्टमध्ये कुठलाही बॅक्टेरिया आढळला नाही. शेवटी मी अल्सरेटिव्ह कोलायटिसचं निदान केलं. अपेंडीसायटिसची शक्यता नसल्याने मी त्याला सल्फसलाझाईन दिलं. माझ्या उपचारांनी कसलीच सुधारणा न झाल्याने मागच्या आठवड्यात तो बिचारा हे जग सोडून गेला."
"अ परफेक्ट क्राईम!" डॉक्टर वाजे बोलू लागले. "शवविच्छेदन केल्यानंतर तुम्हाला तुमची चूक समजली असेल ना?"
"नाही. आम्ही पेशंटचे शवविच्छेदन केले नाही." डॉ यतीनने सांगितले.
"मग तुमची ट्रीटमेंट चुकली हे तुम्हाला कसं समजलं?" डाॅक्टर तांबोळींनी विचारलं.
"पेशंट दगावला याचा अर्थ माझी ट्रीटमेंट चुकली," डाॅ यतीन म्हणाला.
"एका अर्थी तेही बरोबरच आहे." डॉक्टर पाटकर म्हणाले. डाॅक्टर पाटकर ऑर्थोपेडीस्ट होते.
"अशा तऱ्हेने आपल्यातल्या एका तरुण आणि हुशार डॉक्टरांनी एका कवीला संपवलं आहे," द एक्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शहा बोलू लागले. "डाॅ यतीन, तुम्ही मराठी काव्याची मोठी हानी केली आहे." डॉक्टर शहा उपहासात्मक बोलत होते.
"माझी ट्रीटमेंट नक्कीच चुकली पण माझा डायग्नोसिस चुकला असं तुमच्यापैकी कोणीही म्हणू शकत नाही." डॉ यतीन थोडसं उर्मटपणे बोलला.
एका तरुण डॉक्टराने तिथे उपस्थित अनुभवसंपन्न डॉक्टरांना सरळ सरळ आव्हानच दिलं होतं. डॉ यतीनचा डायग्नोसिस चुकीचा होता हे सिद्ध करण्यासाठी आता सर्वच जण पुढे सरसावले.
"तुमचा हा पेशंट कधी दगावला म्हणालात?" डाॅक्टर वाजेंनी विचारलं.
"मागच्या बुधवारी" असं सांगून डॉ यतीन म्हणाला, "तुम्ही असं का विचारलंत?"
"पेशंटच्या आई-वडिलांनी तुमच्याविरुद्ध तक्रार केली नाही?" आता डॉक्टर शहांनी विचारलं.
"नाही. तुम्हा सर्वांच्या भाषेत सांगायचं तर तो एक परफेक्ट मर्डर होता. शिवाय पेशंटला व त्याच्या आई-वडिलांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांना असंच वाटत होतं की मी पेशंटला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो." डॉ यतीन आत्मविश्वासपूर्वक बोलत असला तरी त्याची चुळबुळ मात्र कमी होत नव्हती.
"तुमच्या केसमध्ये एक गोष्ट करण्यासारखी होती..." डॉक्टर पाटकर असं म्हणताच सर्वांचे कान टवकारले. "तुम्ही म्हणत आहात की पेशंटची पोटदुखी येत-जात होती आणि त्याच्या पोटाला सूजही नव्हती. याचा अर्थ पेशंटच्या पोटात एखादा टोकदार फाॅरेन ऑब्जेक्ट गेला असणार आणि त्या ऑब्जेक्टने त्याच्या आतड्याला होल केलं असणार!"
"माझा पेशंट सतरा वर्षांचा युवक होता. टाचणी किंवा पीन गिळायला तो काही लहान नव्हता." डॉ यतीन थोडा चिडलेला दिसला.
"टोकदार फॉरेन ऑब्जेक्ट म्हणजे टाचणी-पीनच असायला हवी असं नाही," डाॅ यतीन थोडं जास्त बोलत आहे असं वाटून आतापर्यंत काहीच न बोललेले डॉक्टर श्रीनिवास बोलले. "तो फाॅरेन ऑब्जेक्ट चिकन बोनही असू शकतो."
"याचा तर मीही विचार केला होता," डॉ देशमुख बोलू लागले. "पण तो ऑब्जेक्ट चिकन बोन असू शकत नाही. चिकन बोन पेशंटच्या इसोफेगस मधून पोटापर्यंत जाऊच शकत नाही. चिकन बोन पेशंटच्या इसोफेगसमध्येच अडकणार."
"तुम्ही अगदी जवळ आला आहात!" द एक्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शहा म्हणाले, "फक्त तो फॉरेन ऑब्जेक्ट चिकन बोन नसून फिश बोन होता!"
डॉक्टर शहांनी फायनल डायग्नोसिस करताच डॉ यतीन झटकन उठून कोट व हॅट घेण्यासाठी निघाला.
"माय डिअर यंग फ्रेंड! आता कुठे मीटिंग सुरू झाली आहे आणि तुम्ही लगेच निघालात?" टेबलवर ठेवलेल्या वाईनचा ग्लास ओठांना लावत डॉक्टर पाटकर म्हणाले.
"डॉक्टर, तुम्ही म्हणालात ना माझ्या केसमध्ये मला करण्यासारखी एक गोष्ट होती?" डॉ यतीनने डॉक्टर पाटकरांना विचारलं.
"हो." डाॅक्टर पाटकर म्हणाले.
"ती गोष्ट मी आताही करू शकतो; कारण माझा पेशंट अजून जिवंत आहे." द एक्स क्लबचे चौदाही मेम्बर डाॅ यतीनकडे आश्चर्यचकित मुद्रेने बघू लागले. "माझ्याकडून त्याचा योग्य डायग्नोसिस होणार नाही हे आज दुपारी माझ्या लक्षात आलं आणि पेशंटकडे फक्त चोवीस तास शिल्लक होते म्हणून डॉक्टर शहांना विनंती करून मी ही मीटिंग घ्यायला लावली."
बोलता बोलता डॉ यतीन दरवाजापर्यंत गेला. दरवाजा बंद करताना तो म्हणाला, "आदरणीय डॉक्टर सहकाऱ्यांनो, मी तुमचा खूप आभारी आहे."
संजीवन हॉस्पीटलचा सातवा फ्लोअर. डॉ यतीन त्याच्या कवी हृदयाच्या पेशंटवर सर्जरी करत होता, त्याच्या हातात काही सर्जिकल इक्विपमेंट्स होते, तिथे उपस्थित तत्पर नर्स त्याची मदत करत होत्या. आणि विशेष म्हणजे या ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील चौदा तज्ञ डॉक्टरांची टीम बाहेर उपस्थित होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा व्हॅटीकन सिटीमधील पोपच्या सर्जरीसाठी सुद्धा इतके अनुभव व तज्ञ डॉक्टर एका ठिकाणी जमले नसते!
तासाभराने ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला.
"हे साफ करून घ्या आणि बाहेर बसलेल्या डॉक्टर शहांना दाखवा." रक्ताने भिजलेल्या ग्लोव्ह्जमधली कसलीशी वस्तू नर्सच्या हातात देत डॉक्टर यतीन म्हणाला. पण बाहेर बसलेल्या द एक्स क्लबच्या सदस्यांना इतका धीर कुठे?
"द फिश बोन ! " नर्सच्या हातातली वस्तू जवळजवळ हिसकावूनच घेत डॉक्टर शहा म्हणाले. एखादा दुर्मिळ खजिना हाती लागावा अशा तऱ्हेने द एक्स क्लबचे मेंबर त्या फिश बोनकडे पाहत होते.
तीन आठवड्यांनी डॉ यतीनचा कवी हृदयाचा सतरा वर्षीय पेशंट चालू फिरू लागला.
( अमेरीकन चित्रपट पटकथाकार व दिग्दर्शक बेन हेक्ट लिखीत 'मिरॅकल ऑफ द फिफ्टीन मर्डरर्स' )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा