"दिपू, चल आवर बाळा लवकर ,मला कामाला जायला उशीर होतो"
"आई, आज इतक्या लवकर जायचे आहे, कोणाकडे काही पूजा बिजा आहे का?"
अरे ! त्या सोनटक्के काकू कडे नवरात्री असते. आज घट बसतात ना. आज पासून नऊ दिवस लवकर जावे लागेल. खूप बायका येतात. घट बसतात, मग पूजा ,आरती त्यानंतर सगळ्यांना खायला काय काय असते? दरवर्षी तुझ्यासाठी देतात त्या, आठवते का? आजपासून नऊ दिवस सगळ्या बायका एकाच रंगाच्या साड्या नेसून येतात. खूप सुरेख दिसतात सगळ्या. नऊ दिवस नऊ रंगाची उधळणच असते. खूप छान वाटते सगळे बघायला.
आई आज कोणता रंग आहे ग. ते तर मलाही माहिती नाही. घराबाहेर पडले की आजचा रंग कळतो.
"ते कसे काय बुवा".
अरे सगळ्या बायका, मुली, इतकचं काय पुरुष मंडळी सुध्दा शक्य तोवर त्याच रंगाचा शर्ट घालतात.
आई ! थांब , मी बाहेर जाऊन बघतो आजचा रंग कोणता तो.
आपल्या गरिबाला कुठले आले रे रंग? आपल्या आयुष्यात रंग भरायला विसरला तो वरचा. त्यात कपाळावरचा रंग पुसला आणि आयुष्य बेरंग केले. तु आहेस, तोच एक रंग माझ्या आयुष्यात. हे सगळ ऐकायला दिपू घरात नव्हता. आई सगळ्या बायका पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून, कोणी ड्रेस घालून आहे. दोन चार माणसे पण पाहिली पिवळा शर्ट घातलेला. त्याने आईची कपड्याची पेटी उघडली.
"अरे ! काय हुडकतो त्या पेटीत?"
"काही नाही, असच."
"त्यात तुझे काहीही सामान नाही. बंद कर ती पेटी."
दिपू," मला खरच उशीर होणार, तू लवकर आवर आणि पहिले ती पेटी बंद कर."
हो करतो.
आई," तुझ्या पेटीत नाही ग पिवळी साडी."
तु त्या पेटीत पिवळी साडी शोधत होता?
हो !
अरे माझ्या कडे नाही पिवळी साडी. "पिवळीच काय कोणत्याच रंगाची नाही."
अरे जेमतेम चार पाच साड्या असतील . त्या पण जिकडे काम करते त्या बायकांनी दिलेल्या.
ये दिपू ! "तुझ्या कडे आहे ना पिवळा शर्ट, मागच्या वर्षी दिवाळीत घेतलेला." तोच घाल.
अग पण आई, "हा देवीचा उत्सव आहे ना!"
हो देवीचा आहे. पण अस काही केलं की सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून तर आजकाल कित्येक पुरुष त्या त्या रंगाचे शर्ट वापरायला लागलेत.
तुझ्याकडे तर नाही ना पिवळी साडी मग सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण होणार?
अरे मी जाते ना सोनटक्के काकूंकडे. तिथे ज्या बायका येतात ना त्यांच्या कडे पाहून, त्यांचा उत्साह बघून आपोआप येते ती ऊर्जा. शिवाय रोज नित्यनेमाने आईच्या चरणी नतमस्तक व्हायला मिळते, तिची सेवा करायला मिळते. तीच देते सकारात्मक ऊर्जा. छोटासा दिपू अस्वस्थ झाला.
दिपू, काय झाले?
नवीन शर्ट हवा का?
तो जुना झाला का?
नाही ग आई. मला नको कोणत्याच रंगाचा शर्ट.
अरे मग इतका अस्वस्थ का?
आई आज मी माझ्या देवी समान आई समोर आणि त्या देव्हाऱ्यातल्या देवी समोर उभा राहून शपथ घेतो की, जेव्हा मला पहिला पगार येईल त्या दिवशी तुला नऊ रंगाच्या साड्या आणणार. शब्द आहे तुझ्या दिपूचा.
हळूच आईच्या मिठीत शिरत, "माझ्या या देवीसाठी".
आई दिपूच्या डोक्यावर हात फिरवत ,डोळ्यातून आनंदाश्रू ढाळत, "दिपू त्यासाठी मोठ व्हावं लागेल, खूप अभ्यास करावा लागेल."
मोठा तर होणारच ! पण अभ्यास करून ,शिकून मोठा होईल. बघच तू.
शारदा डोळे पुसत, दिपू हे घे, घाल पिवळा शर्ट. दिपूने पिवळा शर्ट घातला आणि खेळायला पळाला.
शारदा आपली रोजच्या पेक्षा बरी साडी नेसून कामाला गेली. दिवस जात होते. दिपू चांगले मार्क मिळवून पास होत होता. शारदा अपार कष्ट करून आपल्या लेकाला शिकवत होती. दिपू ने आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले. एम.बी.ए. करून एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. पहिला पगार झाला तेव्हा नवरात्री चार दिवसावर होते. दिपू लहानपणी बोलला ते विसरला नव्हता. पगार मिळाला त्या दिवशी मार्केट मध्ये गेला. गुगल वर नऊ दिवसाचे नऊ रंग शोधले. एक दोन नाही तर तब्बल नऊ रंगाच्या नऊ साड्या घेऊन घरी आला. आई अजून कामावरून यायची होती. देवीसमोर नऊ साड्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. त्यावर थोडे तांदूळ, सुपारी आणि अकरा रुपये ठेवले होते. दार ओढून आईची वाट पाहत होता. दाराची कडी वाजली, दीपूने दार उघडले. देवी समोर साड्यांची रांग पाहून शारदा थक्क झाली.
"दिपू ,अरे इतक्या साड्या, कोणाला द्यायच्या आहेत?"
सांगतो, तू आधी हातपाय धुवून या इथे बस.
शारदा ने हातपाय धुतले. दिपू ने चादर अंथरली. त्यावर शारदाला बसवले.
कुंकवाचा करंडा हातात घेतला. आई जवळ आला. तिला हळद कुंकू लावले. एक एक करून नऊ ओट्या तिच्या ओटीत घातल्या. आई आजपासून कपाळावर ठसठशीत लाल कुंकू लाव आणि नऊ दिवस ह्या नऊ रंगाच्या साड्या नेस. मला तुला देवीच्या रुपात पाहायचे आहे.
"दिपू,? अरे कुंकू."
" हो, कुंकू."
आई आपले बेरंग दिवस संपले, त्या देवी आईने रंग भरलेत आपल्या आयुष्यात. आई आठवते ना, तुला म्हणालो होतो एक दिवस तुला मी सर्व रंगाच्या साड्या घेऊन देणार.
हो रे राजा ! मी तर विसरूनच गेले होते.
"मी कसा विसरेन, देव्हाऱ्याकडे पाहत म्हणाला, दोन्ही देवींची शपथ घेतली होती ना !"
एक एक साडी आईच्या खाद्यावर टाकत दिपू म्हणाला, आई बघ लाल, हिरवा, पिवळा, राखाडी, गुलाबी, जांभळा, निळा, नारिंगी आणि पांढरा. सगळे रंग आणलेत. या वर्षी तू या नऊ साड्या नेसायच्या. माझ्या देवीला मला नऊ रुपात आणि नऊरंगात न्हायलेली बघायची आहे. शारदा चे डोळे आनंदाश्रू ने भरून वाहू लागले. आपल्या मुलाच्या रुपात तिला नऊ देवीचे रूप दिसत होते. तिने मनोमन त्या अदृश्य देवीला हात जोडले. दिपू सुध्दा आपल्या आईला देवीच्या नऊ रुपात अन् नवरंगात बघायला आतुर झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा