"सुनबाई झाला का डबा?" नारायणरावांनी शर्टची बटनं लावतालावता विचारलं.
"हो नाना झालाय. फक्त दोन मिनिटं "
सुनेने डबा आणला. नारायणरावांनी तो बँगेत टाकला. बँग खांद्याला लावली.
"आज कुठे नाना?" सुनेने विचारलं. नारायणराव तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून हसले.
"बघूया. जी गाडी समोर दिसेल तिच्यात बसायचं."
ते बाहेर आले. पोर्चमधल्या कारकडे आणि स्कुटर्सकडे ढुंकूनही न पहाता त्यांनी सायकल काढली आणि स्टेशनकडे निघाले.
गेल्या सहा महिन्यांपासून नारायणरावांचं असंच चालू होतं. रेल्वेत गार्ड असतांना रोज कुठे ना कुठे मालगाडी नाहीतर एक्स्प्रेसने जावं लागायचं. तीन वर्षांपूर्वी ते निव्रुत्त झाले. प्रवासाची खुप आवड असल्याने तीन वर्षात त्यांनी अनेक देशविदेश पालथे घातले. पैशांची कमतरता नव्हतीच शिवाय बलदंड ठणठणीत शरीर. त्यामुळे अगदी कंटाळा येईपर्यंत त्यांनी यात्रा केल्या. सहा महिन्यापुर्वी त्यांची बायको वारली आणि त्यांच्या यात्रा थांबल्या. सुदैवाने त्यांची दोन्ही मुलं चांगली निघाली होती. एक मुलगा मुंबईत डाँक्टर होता तर दुसऱ्याची गांवातच फर्निचर, टिव्ही, एसीची मोठी एजन्सी होती. दोन्ही सुनाही खुप चांगल्या होत्या. सोबतीला गोड नातवंडं. कशाकशाची कमतरता नव्हती. पण नारायणरावांना करमत नव्हतं. रोज संध्याकाळी ते ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन बसायचे खरे पण त्याच त्या आजाराच्या गप्पा ऐकून वैतागायचे. ते स्वतः इतके निरोगी होते की औषध म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं. निरोगीपणा त्यांच्या जिन्समध्येच असावा. त्यांचे वडिल ९५ वर्षे तर आई ९९ वर्षे जगली. त्यांचे दोन मोठे भाऊ ७५-८० च्या घरात होते आणि धडधाकट होते. आपल्यालाही कमीतकमी २० वर्ष काहीच होणार नाही हे नारायणरावांना माहित होतं आणि त्यामुळेच ते अस्वस्थ होते. काहीतरी सकारात्मक, विलक्षण करावं असं त्यांना वाटायचं पण ते काय करावं हे समजत नव्हतं. समाजसेवाही त्यांनी करुन पाहीली. पण संघटनांमधील भांडणं,लाथाळ्या त्यांना रुचल्या नाहीत. समाज मान्यतेनुसार त्यांचं जीवन सफल होतं. नारायणरावांना मात्र आपलं आयुष्य सार्थकी लागलं नाही असंच वाटायचं. आजकाल ते जमेल तसं स्टेशनवर यायचे. मिळेल ती गाडी पकडून एखाद्या दुरच्या गावी जायचे. त्या गावात फिरुन झालं की दुसरी एखादी गाडी पकडून रात्री घरी परतायचे. येतांना सुनेला एखादं गिफ्ट आणि नातवंडाना खाऊ आणायचे. त्यांच्या या छंदाबद्दल कुणालाही काही हरकत नव्हती. कारण घरीही ते रिकामे बसायचे नाही. सगळ्यांना मदत करायचे.
ते स्टेशनवर आले.भोपाळकडे जाणारी गाडी आली तसे ते स्लिपरकोचमध्ये जाऊन बसले. रेल्वेचा पास असल्यामुळे भाड्याचा प्रश्न नव्हता. शिवाय त्याचं व्यक्तीमत्व असं बलदंड होतं की त्यांना अडवायची कुणाला हिंमत व्हायची नाही. आजबाजूच्या प्रवाशांशी ते गप्पा मारत बसले. खंडवा आलं तसे ते खाली उतरले. गावात जाऊन धुनीवाले बाबांचं दर्शन घेतलं. स्टेशनवर येऊन जेवण केलं. तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. दोन तासांनी गाडी आली त्यात ते परतीच्या प्रवासाला बसले. त्याचं स्टेशन आलं तसे ते दारात जाऊन उभे राहिले. प्लँटफाँर्मवर उतरताक्षणीच त्यांना पुढच्या बोगीजवळ गर्दी दिसून आली. आरडाओरडही ऐकू येत होती. जवळ जाऊन त्यांनी गर्दीत शिरुन पाहीलं एक तरूण प्लँटफाँर्मवर पडलेला दिसला. मांडीपासून त्यांचा पाय तुटून वेगळा झाला होता. रक्ताचं थारोळं साचलं होतं तो तरुण रडत होता ,ओरडत होता आणि दवाखान्यात घेऊन चला म्हणत होता. गर्दितले बघे मोबाईलने त्याचे फोटो काढत होते, कुणी व्हिडीओ शुटींग करत होते पण मदतीला कुणीच जात नव्हतं. नारायणरावांनी ते पाहीलं.एक संतापाची तिडीक त्यांच्या डोक्यातून गेली.
"अरे बघता काय? उचला त्याला " ते ओरडले पण कुणीही जागचं हललं नाही.
"अहो काका तो अँक्सिडंट आहे. रेल्वे पोलिस आल्याशिवाय त्याला हलवता नाही येणार" एकाने शहाणपणा शिकवला.
" गेलंय का कुणी पोलिसांना बोलवायला?"
सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पहायला लागले.
"सरका बाजुला" नारायणरावांनी त्वेषाने गर्दिला बाजला ढकललं. खाली वाकून दोन्ही हातांनी त्या तरुणाला उचललं आणि ते धावत सुटले.स्टेशनच्या बाहेर येऊन त्यांनी रिक्षा गाठली.
"सिव्हिल हाँस्पिटलला चल"
" काका अँक्सिडंटची केस आहे मी येऊ शकत नाही. तुम्ही अँब्युलन्स बोलवा" रिक्षावाला तंबाखू चोळत म्हणाला.
नारायणरावांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं.
" आता तू चलतो की मी तुझी रिक्षा घेऊन जाऊ"
त्याने घाबरुन रिक्षा सुरु केली. नारायणरावांनी त्या तरुणाला रिक्षात बसवलं आणि सिव्हिल हाँस्पिटलला घेऊन आले.इमर्जन्सी रुममध्ये त्याला ठेवलं पण तिथे कुणीच नव्हतं. एक नर्स डुलत डुलत आली.
"तुम्ही अगोदर केस पेपर बनवा आणि ही अँक्सिडंटची केस आहे तुम्ही पोलिसांना कळवलंय का?"
" अहो सिस्टर तो माणूस वेदनांनी कळवळतोय. रक्तप्रवाह असाच चालू राहिला तर तो मरुन जाईल. तुम्ही अगोदर डाँक्टरांना बोलवा. बाकी फाँर्म्यालिटीज होत रहातील"
"डाँक्टर बाहेर गेलेत आणि तुम्ही कोण यांचे?"
" मी बाप आहे त्याचा !" नारायणराव रागाने जोरात बोलले. नर्सने घाबरुन वाँर्डबाँयला बोलावलं. त्या तरुणावर उपचार सुरु केले.
" सिस्टर त्याचा पाय तुटलाय. त्याचं आँपरेशन करावं लागेल. तुम्ही डाँक्टरांना ताबडतोब बोलवा"
"सांगितलं ना डाँक्टर बाहेर गेलेत येतील थोड्याच वेळात !"
नारायणराव अस्वस्थ झाले. बाहेर येऊन त्यांनी सिव्हिल सर्जनचं आँफिस शोधून काढलं. शिपायाला न जुमानता दार ढकलून ते आत गेले. सिव्हिल सर्जन फायलीत डोकं घालून बसले होते. त्यांनी मान वर करुन पाहीलं नाराणरावांनी त्यांना थोडक्यात सगळी केस सांगितली.
" असतील डाँक्टर इथेच कुठेतरी. येतीलच थोड्याच वेळात" सर्जन बोलले
नारायणरावांनी त्यांच्याकडे संतापाने पाहीलं. "साहेब तुम्ही डाँक्टरांना लगेच पाठवताय की मी मुख्यमंत्र्यांना फोन करु? मुख्यमंत्री नातेवाईक आहेत माझे." बोलताबोलता त्यांनी खिशातून मोबाईल काढला. सिव्हिल सर्जननी फोन उचलला. डाँक्टरांना ताबडतोब इमर्जन्सी वार्डमध्ये जाण्याच्या सुचना दिल्या. बाहेर येऊन नारायणरावांनी पोलिसांना, त्या तरुणाच्या घरच्या लोकांना फोन केले. हाँस्पिटलच्या फाँर्म्यालिटीज पुर्ण केल्या. त्या तरुणाचे आईवडील कुठल्याशा गावाहून एक तासात आले. स्टेशनवरुन काही तरुणही आले. त्यांच्याकडून कळलं की तो तरुण रेल्वेत गोळ्याबिस्कीटं विकायचा. चालत्या गाडीतून उतरतांना त्याचा पाय घसरला आणि तो गाडीखाली आला. प्लँटफाँर्मवरच्या लोकांनी त्याला धरलं नसतं तर त्याचे तुकडे झाले असते. जीवावरचं पायावर निभावलं होतं. एकुलत्या एक मुलाला असं अपंग झालेलं पाहून त्याच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केला. नारायणरावांच्या डोळ्यातही पाणी आलं पण त्यांनी त्या दोघांनाही धीर दिला. रात्र झाली होती त्यांना आता घरी परतायला हवं होतं. त्यांनी बाहेर येऊन त्या तिघांसाठी पोळी भाजीचं पार्सल घेतलं. त्यांना ते देऊन ते घरी परतले.
दुसऱ्या दिवशी ते परत हाँस्पिटलला आले. त्या तरुणाचं आँपरेशन करुन त्याला एका वाँर्डमध्ये जमीनीवर टाकलं होतं. काल मुख्यमंत्र्याचा नातेवाईक असल्याची जी थाप त्यांनी मारली होती ती चांगलीच कामी आली होती. हाँस्पिटल तुटूंब भरलेलं होतं. दोनशे खाटांच्या त्या हाँस्पिटल मध्ये साडेतिनशे पेशंट होते. नारायणराव हाँस्पिटलमध्ये फिरु लागले. कळकट भिंती, त्यावर थुंकलेलं, जागोजागी अस्वच्छता, वरांड्यात, जिथे जमेल तिथे पेशंटना टाकलेलं आणि सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव ! नारायणराव रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी बोलले. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अस्वस्थ होऊन ते बाहेर आले. हाँस्पिटलच्या प्रांगणात ठिकठिकाणी चुली लागल्या होत्या रुग्णांसोबत आलेल्या बायका स्वयंपाक करत होत्या.त्यांची मुलं तिथंच खेळत होती. सगळं पाहून नारायणरावांना अतीव दुःख झालं. ही परीस्थिती कशी बदलता येईल याचा ते विचार करु लागले.
थोड्या वेळाने ते आत गेले. अपघात झालेल्या तरुणाला भेटले.
" किती शिकला आहेस बेटा?"
" ग्रँज्युएट आहे मी काका. नोकरी मिळत नाही. म्हणून गाडीत गोळ्याबिस्कीटं विकतो."
" नोकरी करायची इच्छा आहे?"
"हो काका. पण आता कोण देणार मला नोकरी? मी असा अपंग!"
नारायणरावांनी मोबाईल काढला. मुलाशी बोलले. सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी मोबाईल बंद केला खिशातून एजन्सीचं कार्ड काढून त्या तरुणाला दिलं.
"तुझं काम झालं. हाँस्पिटलमधून सुटल्यावर या ठिकाणी जा. महिन्याला दहा हजार मिळतील. चालेल?"
तरुणाचा चेहरा आनंदाने फुलून गेला. त्याची आई नारायणरावांच्या पाया पडली.
ही घटना घडून आता पाच वर्षे होऊन गेली होती. नारायणरावांनी नेहमीप्रमाणे हाँस्पिटलच्या सायकल स्टँडवर सायकल लावली आणि सगळीकडे नजर टाकली. सगळीकडे स्वच्छता दिसत होती. उजव्या बाजुला दहा रुपयात जेवण, पाच रुपयात नाश्ता आणि दोन रुपयात चहा देणाऱ्या सेवाश्रमवर लोकांची गर्दी दिसत होती. डाव्या बाजूला दोनशे खाटांचं नवीन रुग्णालय दिसत होतं. जुनी इमारतही नवीन रंग रंगोटी केल्यामुळे चमकत होती.
" नमस्कार नाना" एक वयस्कर कार्यकर्ते समोर उभे होते.
"आणि अभिनंदन. आज तुम्हाला रुग्णमित्र पुरस्कार मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत खरंच खुप काही केलं तुम्ही या दवाखान्यासाठी आणि रुग्णांसाठी. आमदार,खासदार ,आरोग्यमंत्री,सामाजिक संस्था यांच्या मागे लागून तुम्ही या दवाखान्याचा कायापालट करुन टाकला."
"अहो ते त्यांचंच काम होतं. ते करत नव्हते म्हणून मी त्यांच्याकडून करुन घेतलं"
" पण काही म्हणा अगदी मुंबई, पुण्यातल्या अत्याधुनिक हाँस्पिटलसारखा झालाय दवाखाना. विश्वास बसत नाही डोळ्यांवर"
नारायणरावांनी स्मित केलं.
" यात तुमच्यासारख्या शेकडो ज्येष्ठ नागरीकांचा मोलाचा वाटा आहे"
" अहो आम्ही अडगळीत पडलेल्या फर्निचरसारखे होतो. तुम्ही आमच्यात प्राण फुंकले"
नारायणराव समाधानाने हसले. मग सगळीकडे नजर टाकून म्हणाले.
" अजून खुप काही करायचंय. आता आपण खेड्यापाड्यांकडे वळायला हवं. तिथंही आरोग्याच्या खुप समस्या आहेत. पण काही म्हणा आता कुठे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय."
© दीपक तांबोळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा