लग्न अगदी महिन्यावर आलं होतं. पत्रिका छापून झालेल्या. खरेदी अर्धी अधिक उरकलेली. आणि मुलीचे आई - बाबा अचानक मुलाघरी आले. मुलाकडील मंडळी अर्थातच बावचळली, पण स्वागत मात्र चांगलंच केलं त्यांनी होणार्या व्याह्यांचं. मुलीचे आई - बाबा चांगलेच अस्वस्थ दिसत होते. ते पाहून मुलाच्या आई - बाबांनीही जरा वेळ जाऊ देत, अखेर विचारलं व्याह्यांना... त्यांच्या या अशा अचानकच येण्याचं प्रयोजन. हे विचारलं मात्र, मुलीची आई कळून येईल इतपत रडू लागली. आणि मुलीचे बाबा... खाली असलेली आपली मान, आणिक खाली करुन बसून राहिले. तेवढ्यातच स्वतः मुलगीही येऊन पोहोचली तिकडे. तिला बघून तर मुलाचेच काय, पण तिचे स्वतःचेही आई - बाबा चक्रावले. कारण हे त्यांच्या योजनेत नव्हतंच.
आपल्या आई - बाबांकडे आश्वासक नजरेने पाहत, मुलगी बोलू लागली... "आई - बाबा... माझ्यामुळे तुमची कुचंबणा झालेली, मला नको होती. म्हणूनच तुम्ही इथे येताय हे कळल्या कळल्या, मी ही धावपळ करत इथे आले". त्यानंतर आपल्या होणार्या सासू - सासर्यांकडे बघत ती बोलली... "मला खरंच माहित नव्हतं ह्याबद्दल. कारण आपल्याला आपली स्वतःची पाठ, दिसूच शकत नाही ना. त्यामुळेच नाही दिसला मला... माझ्या पाठीवरच बरोबर मध्यभागी असलेला... तो... तो एक... एक पांढरा डाग. साधारण एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा. परवा घरच्या केळवणासाठी... मला साडी नेसायला मदत करतांना, माझ्या आईला दिसला तो. आम्ही वेळ न दवडता, लागलीच डाॅक्टरांकडे गेलो मग. आणि... आणि आम्हाला कळलं की, तो कोडाचा डाग आहे. जो... जो दिवसाकाठी थोडा थोडा, वाढत जाऊ शकतो. आणि कदाचित पुर्ण अंगही भरु शकतं माझं, ह्या कोडाने. हे आम्ही दोन डरमॅटोलाॅजिस्ट्सकडून, कन्फर्म करुन घेतलंय. आईंना मी सांगतेय त्या गोष्टीची खात्री करुन घ्यायची असेल, तर मी आतल्या खोलीत यायला तयार आहे". इतकं बोलून झाल्यावर... मुलीने मुलाकडे पाहिलं, आणि त्याला "साॅरी" म्हणत... ती ही मान खाली घालून उभी राहिली.
मुलाने नी त्याच्या आई - बाबांनी एकमेकांकडे बघितलं, नी मुलगा बोलू लागला... "आपली एंगेजमेंट झालीये... एकमेकांच्या नावाची अंगठी घातलीये आपण. So marriage is just a formality now, for me at least... झालेल्या करारावर मारवा लागणारा, एक शिक्का फक्त. Or else we are already engaged. त्यामुळेच आता उशिर झालाय अगं. आता तुझ्या पाठीवरच नाही तर... दर्शनी भागावर जरी कुठे डाग असता, तरी माझा तुला नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तो डाग वाढत जाऊन, तुझं अख्ख अंग पांढरं होईल पुढे कधीतरी... ह्या भितीने मी आत्तापासूनच माझं मन काळवंडून घेणं, मला पटत नाही. तेव्हा ही गोष्ट कळल्यामुळे, मला खरंच कणभरानेही फरक पडलेला नाहीये. एखाद्याला मनापासून एकदा स्विकारल्यावर, त्याच्या शरिरात उद्भवलेल्या कुठल्याशा दोषामुळे त्याला नाकारणं... मला अत्यंत चुकीचं वाटतं. आणि ते ही पुर्णपणे कल्पना असतांना की, मुळात तो दोष हा कुठलाही संसर्गजन्य रोग नाही... की तो जेनेटीकही नाहीये शंभर टक्के. म्हणजे पुढच्या पिढीत तो हमखास उतरतोच, असं अजिबात नाही. बाकी मग चांगल्या - वाईट नशिबाचा भाग तर, सगळ्यांच्याच बाबतीत असतो. त्यामुळे तू आणि तुझे आई - बाबा... तुम्ही सगळेच प्लिज लक्षात घ्या की, मी तरी इथवर येऊन माघार अजिबातच घेणार नाहीये. आणि माझे आई - बाबा ह्या माझ्या निर्णयात... पाठीशीच उभे राहतील माझ्या, ह्याची मला खात्री आहे".
हमसून हमसून रडत होती, मुलीची आई आता. आणि मुलीचे बाबा चश्म्याआडच्या, आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत होते. मुलगी एकटीच उभी होती, अजूनही खाली बघत... पायाच्या अंगठ्याकडे. मुलगा तिच्या आई - बाबांपाशी जाऊन बसला... आणि मुलीला आपल्याजवळ बसायला बोलावलं, त्याच्या आई - बाबांनी. मुलीच्या खांद्यावर थोपटून मुलाची आई म्हणाली... "तुला सांगू का... माझ्या आईला पुर्णपणे कोड होतं. आणि मला स्वतःला काहीही नसूनही, फक्त ह्या कारणास्तव जेव्हा माझं लग्न ठरेना... तेव्हा आई - बाबांनी आणि घरच्या इतर मोठ्यांनीही निर्णय घेतला की, आईने आता पुढेच यायचं नाही... लपून रहायचं. पण मी मात्र ठाम नकार दिला त्या गोष्टीला. एकतर ती फसवणूक ठरली असती, कोणाबरोबर तरी केलेली... आणि दुसरं म्हणजे ज्या आईने मला इतक्या मायेने वाढवलं, तिला स्वतःच्या स्वार्थासाठी असा दुजाभाव देणं... मला मंजूर होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी कोणाचंही ऐकलं नाही... ठाम राहिले माझ्या निर्णयावर. ठरवलं होतं की कोणीतरी नक्की असेल नशिबात माझ्या, जो अशा भाकड समजुतींना थारा देणारा नसेल. आणि नसेलच कोणी असा, तर आजन्म अविवाहीत राह्यलाही तयार होते मी. तेवढ्यात ह्यांचं स्थळ आलं मला. काडीचाही फरक पडला नव्हता ह्यांना, माझ्या आईच्या पुर्ण अंगावर कोड असण्याचा. अगदी सुखाने चाललाय तिस वर्षांपासून संसार आमचा. पण ह्या एका गोष्टीमुळे, आदर मात्र प्रचंडच वाटत आलाय मला ह्यांचा... अगदी कायमच. आणि आता अभिमान वाटत राहिल कायम... वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत योग्य निर्णय घेणार्या, त्यांचा 'वारसा' खर्याअर्थी चालवणार्या आमच्या लेकाचा".
मुलीने जागेवरुन उठत... भरल्या डोळ्यांनीच होणार्या सासूबाईंना नी सासरेबुवांना, वाकून नमस्कार केला. मुलीच्या आई - बाबांनी, बसल्या जागेवरुनच हात जोडले व्याह्यांना. अतिशय सामंजस्याने मिटलं होतं, हे पांढर्या रंगाच्या डागाचं प्रकरण. अगदी कुठल्याशा भळभळणार्या जखमेला... थंडगार मलम लाऊन, पांढरी पट्टी केल्यासारखं.
- सचिन श. देशपांडे
अंगावर नेसलेलं पांढरं आपण पवित्र समजतो, पण अंगावर उठलेलं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा