बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

1554. प्रवास

  वास्तविक ध्येय गाठण्यासाठी किती वेळ लागेल, हे कशावर अवलंबून आहे? एकदा एक साधू रस्त्याच्या कडेला बसले होते, तेव्हा एक प्रवासी त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांना एक कागद दाखवून विचारले, 
"महाराज, हे ठिकाण किती लांब आहे ते सांगाल का?"
आपल्या दोन्ही हातातल्या त्या दोन भल्या मोठ्या सुटकेसेस सांभाळत त्या व्यक्तीने पुढे विचारलं,
"तिथे पोहोचायला किती वेळ लागेल?" 
त्या साधूने काहीही उत्तर दिले नाही. ते उठले आणि प्रवाशाला इशाऱ्याने आपल्या बरोबर येण्यास सांगितले आणि ते त्याच्यासोबत चालू लागले. साधूच्या अशा विचित्र वागण्याने तो प्रवासी आश्चर्यचकित झाला आणि थोडासा भयभीतही. तो साधूला म्हणाला, 
"कृपया आपण स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला फक्त अंतर जाणून घ्यायचे आहे. मी तिथे एकटा जाऊ शकेन."
तरीही साधू काही न बोलता त्या  प्रवाश्याबरोबर चालत राहिला. पंधरा मिनिटांनी ते थांबले आणि साधू म्हणाला, "तुला तुझ्या ठिकाणी पोहोचायला इथून दोन तास लागतील."
"हे तुम्ही मला आधीच सांगू शकला असता. माझ्या बरोबर एवढ्या लांब चालत येण्याची आवश्यकता नव्हती."  प्रवासी साधूला म्हणाला. 
ते म्हणाले, "तुझा चालण्याचा वेग जाणून घेतल्याखेरीज तुला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज मी कसा सांगू शकलो असतो? कुठल्याही स्थानी पोहचण्याची वेळ ही रस्त्याच्या लांबीवर नाही तर चालणार्‍याच्या वेगावर अवलंबून असते. तू या दोन मोठ्या सुटकेसेस घेऊन  चालत आहेस, साहजिकच त्यामुळे तुझा वेग थोडा कमी होईल. आता तुझ्या सोबत चालल्यानंतर मी तुला सांगू शकतो, की गावात पोहोचायला तुला दोन तास लागतील."
असं बोलून तो साधु आपल्या वाटेने निघुन गेला. प्रवाश्याने  त्याचे आभार मानले आणि  काहीवेळ त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला. जणूकाही त्या साधूने त्याला ‘जीवनाचे ध्येय’ गाठण्याची योग्य वेळ सांगितली होती. 
      प्रत्येक गोष्ट आपल्या वेगावर अवलंबून असते आणि आपला वेग आपल्या स्थितीवर अवलंबून असतो. धावत जाऊन आपण आपल्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचू शकतो. आपण चालतही अंतर कापू शकतो, अशावेळी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ थोडा जास्त असेल. आपला वेग असाही असू शकतो की आपण आपल्या गंतव्यस्थानी लगेच पोहोचू शकू. हीच गोष्ट आंतरिक प्रवास (जीवनाचे खरे ध्येय) साध्य करण्यासाठीही लागू होते.  आपणच ते प्रवासी आहोत ज्यांच्या हातातील दोन मोठ्या सूटकेसेस म्हणजे - एक आपल्या भूतकाळातील अनुभवांनी भरलेली आणि दुसरी म्हणजे भविष्यातील आपल्या आशा-आकांक्षांनी भरलेली. आपण भूतकाळाच्या आणि भविष्यकाळाच्या या ओझ्यातून मुक्त झालो, की  वर्तमानात जगू लागतो आणि मग आपल्या जीवनाच्या प्रवासाचा वेग उत्साहाने आणि आनंदाने वाढतो. अत्यंत तळमळीने आणि तीव्र इच्छेने जर आपण सर्वोत्तम प्रयत्न केले तर आपण आपल्या ध्येयापर्यंत इथेच आणि ह्याच क्षणी पोहचू शकू.
  ♾            
 एक माणूस धावत जाऊन आपले ध्येय गाठतो आणि दुसरा चालत जाऊन आपले ध्येय गाठतो, ह्यात काय फरक आहे?  एक आपला वेळ वाचवतो, तर दुसरा वेळ खर्च करतो.

बाबूजी                  
Heartfulness Meditation💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...