इराण आणि इस्त्रायल यांची सध्याची परिस्थिती पाहता इस्त्रायल देश आपल्या देशरक्षणा साठी काय काय करू शकतो याचा हा एक जबरदस्त नमुना...नक्की वाचा, प्रसंग जुना आहे पण इस्राएल आजही तसाच आहे.
# इस्रायल
एक अत्यंत छोटा असा देश, जिथं ज्यू लोक राहतात. देशाची सध्याची लोकसंख्या 92 लाख इतकी तर 470 किलोमीटर लांब आणि 135 किलोमीटर रुंद इतकं लहान क्षेत्र असणारा हा छोटुसा देश. देशाची राजधानी जेरुसलेम हे शहर आहे. हा देश आकाराने आपल्या आसाम राज्यापेक्षा ही लहान आहे पण या देशाचा डंका अख्या पृथ्वीवर वाजतो आहे. त्याला तशी बरीच कारणे आहेत. लेखात पुढं याची कांही ठराविक / निवडक कारणे माहिती स्वरूपात येतीलच.
"ज्यू आणि नाझी लोकांची दुष्मन" हा तसा फार मोठा आणि वेगळा विषय आहे, आज त्यावर सविस्तर लिहिता येणार नाही पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी लोकांनी (हिटलरच्या आदेशाने) ज्यू लोकांच्या किती अमानुषपणे कत्तली केल्या हे जगजाहीर आहे. अश्या वेळेत जिवंत उरलेल्या ज्यूंना जीव मुठीत घेऊन नाझी लोकांपासून दूर निघून जाणे यापेक्षा वेगळा मार्ग उपलब्धच नव्हता.
मग त्यांनी जायचं तर कुठं??
पूर्वेइतिहास पाहता 2000 वर्षापूर्वी इस्रायल हा ज्यू बहुल भाग होता पण त्यावेळी कांही उलथापालथ होऊन ज्यू लोक इस्रायल सोडून जगात विखुरले गेले. दरम्यान च्या काळात हा भाग पॅलेस्टाईनच्या अधिपत्याखाली गेला. तथापि कांही उर्वरित ज्यू लोक मूळ देशी राहतच होते. दुसऱ्या महायुद्धात म्हणजे 40च्या दशकात मात्र ज्यू लोकांना आपला जीव वाचवून आपल्या मायदेशी परतण्या शिवाय गत्यंतर उरले नव्हते. याच महायुद्धाच्या काळात नाझी लोकांना शक्य तसं थोपवायला आणि निर्वासित /विस्थापित ज्यूना आधार देण्यासाठी आपली संगठना तयार केली आणि त्यांनी पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात केली. या संगठनेच्या माध्यमातून जथ्थेच्या जथ्थे इस्रायलला परतु लागले. 1949 पर्यत जवळपास 7 लाख ज्यू इस्रायलला परतले आणि तंबू मारून राहू लागले. 13 डिसेंबर 1949 ला इस्रायलला जागतिक पातळीवर स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली. अजूनही कांही ज्यू मंडळी इतर देशांतून आपल्या मायभूमीत परततच होते. 1952 पर्यत 7लाखाचा आकडा साडे अकरा लाखांवर पोचला.
आता ज्यू लोक आपल्या मूळ देशी तर परतले पण खरा संघर्ष इथुन पुढं चालू झाला. इस्रायल देशाचे भौगोलिक स्थान पाहिले तर एक गोष्ट अगदी पटकन लक्षात येईल आणि ती म्हणजे हा देश पाच ही बाजूने मुस्लिम बहुल देशांनी वेढलेला आहे. आणि या सर्व देशांना बिगर मुस्लिम शेजारी अजिबात नको होता, आजही नको आहे. पॅलेस्टाईन, लेबनॉन, सीरिया, इजिप्त आणि जॉर्डन असे इस्रायल चे शेजारी आहेत. त्यात पलेन्टाईन चे वाढीव दुखणं हे ही आहे की इस्रायल ने त्यांच्या अधिपत्याखाली असणारा प्रभाग इस्रायल म्हणून आपला पूर्व हक्क सांगून काढून घेतला होता. अश्यात मग त्यांचे संबंध कसे असतील याची कल्पना करून पाहा. जेंव्हा इस्रायल ला स्वतंत्र देश म्हणून जागतिक मान्यता मिळाली तेंव्हा मात्र या सर्व शेजारी राष्ट्रांनी यावर प्रचंड आक्षेप घेत आपला विरोध दर्शविला होता पण याचा जास्त कांही फायदा झाला नाही. मग पॅलेस्टाईन ने आपलं वेगळं हत्यार उपसले आणि मग इस्रायली लोकांच्या नागरी वस्तीत अतिरेकी हल्ल्यांचे सत्र चालू झाले. 50 चे दशक हे पॅलेस्टाईन ने रक्तरंजित करून सोडले.
ज्यू लोक नाझी लोकांना का आवडत नव्हते??
ज्यू लोक मुळातच हुशार आणि जिद्दी असतात. बुद्धीचातुर्य तर विचारायलाच नको. मग असे लोक जगाच्या कोणत्याही भागात असले तरी स्वभावानुसार आपली हुशारी दाखवत उद्योग धंदे आणि उच्चपदस्थ नोकरीवर राहायचे आणि हेच कारण पुढं करत व ज्यू लोकांमुळे आपण नाझी लोकांना नोकऱ्या, आणि धंद्यापासून वंचित राहावे लागत आहे असा कांगावा करत हिटलर ने नाझी लोकांची माथी भडकवली आणि मग महायुद्धाच्या कठीण प्रसंगाचा आधार घेत ज्यू लोकांचा सामूहिक नरसंहार चालु केला. आता हा मुद्दा मी इथं मुद्दाम सांगितला आहे जेणेकरून ज्यू लोक कसे असतात हे आपल्या लक्षात यावे. सर्व जगातून विस्थापित होऊन परतलेले ज्यू लोक आपल्या मूळ भूमीत परतले आणि त्यांना सगळयाच बाबतीत अगदी शून्यातून सुरुवात करावी लागली. अजिबात साथ न देणारी आणि उलटपक्षी सतत त्रास देणारी शेजारी राष्ट्ये, शेतीसाठी उपलब्ध नसणारे पाणी, फक्त एक बाजूला असणारी समुद्र सपाटी अश्यात त्यांनी आपल्या चिकाटी आणि हुशारीने आजचा इस्रायल उभा केला आहे जो अख्ख्या जगात सरंक्षण, युद्धकला, अद्ययावत मिलिटरी व शस्त्रे तंत्रज्ञान आणि अत्यंत कमी पाण्यात मुबलक शेती अश्या विविध क्षेत्रात आपलं नाव करून आहे.
-------------------------------------------------------------------
#मोसाद.....ज्याच्यासाठी हे अख्खे जग ही कमी पडते.
मोसाद हे नाव ऐकताच जगातील कोणत्याही देशाचा आणि खतरनाक दहशतवादी थरथर कापतो अशी ही गुप्तहेर संस्था. इस्रायलची ही संस्था म्हणजे आतंकवाद आणि दहशतवादी यांचा कर्दनकाळ आहे. या संस्थेचा डायरेक्टर हा थेट आणि फक्त इस्रायलच्या पंतप्रधानांशी बोलतो इतर कोणीही त्यावर अधिकार गाजवू शकत नाहीत. अधिकृतपणे 7000 कर्मचारी संख्या असणारी ही जगातील एकमेव गुप्तचर संस्था आहे. या संस्थेत वेगवेगळे असे आठ विभाग आहेत.
त्यापैकी महत्त्वाचे विभाग खालील प्रमाणे;
१. #राजकीय_विभाग : हा विभाग इतर देश जे इस्रायलशी राजकीय दृष्ट्या जोडलेले नाहीत यांच्याशी गरजेनुसार संपर्क साधत माहितीची / मदतीची देवाण घेवाण करतो
२. #मातसोदा_विभाग : हा विभाग दुष्मनांवर हल्ला करण्याचे प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी करतो
३. #किडोन_विभाग : हा विभाग अगदी गुप्तपणे व मागे कांहीही पुरावे न सोडता दुष्मनाला यमसदनी पाठवण्याचे काम करतो. हा विभाग म्हणजे मोसादचा अगदी उच्चपदस्थ आणि मुकुटमणी असणारा विभाग आहे.
४. #वेंच्युर_कॅपिटल : हा विभाग नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्टार्टप सतत उभा करत असतो, सद्य स्थितीतील तंत्रज्ञान आणखी पुढं कसं विकसित करता येईल याचा पाठवपूरवा करत असतो
५. #ऑपरेशन_हारपून : हा विभाग अतिरेकी आणि दुष्मन संस्थांच्या आर्थिक बाबींवर सतत लक्ष ठेऊन असतो आणि त्यांची आर्थिक रसद, पुरवठा कोणत्या पद्धतीने थोपवता येईल यावर काम करत त्याची अंमलबजावणी करत आर्थिक नाकेबंदी करतो.
अश्या विविध पातळीवर पण सुसूत्रता साधत हे विभाग काम करत दुश्मनाला मुळातून उपटून काढतात. मोसाद कडे उपलब्ध असणारे तंत्रज्ञान हे जगातील सर्वात अद्ययावत असे तंत्रज्ञान असते हे आता जगाला वारंवार कळून चुकले आहे. आपल्या दुष्मनाला त्याच्या (कोणत्याही देशात असणाऱ्या) घरात घुसून मारून, मागे कोणताही पुरावा न सोडणे ही त्यांची खासियत आहेत. त्यांचे पराक्रम वाचताना/ बघताना तोंडात बोटं जावीत असे आहेत.
यासाठी खालील एक उदाहरण थोडक्यात देतो.
-------------------------------------------------------------------
इराण हा थेट शेजारी नसला तरी इस्रायलच्या जवळ असणारा देश. याच देशात 70 च्या दशकात जगातील पाहिले राजकीय धार्मिक परिवर्तन होत शिया आणि सुन्नी हा वाद सुरू झाला आणि जगातील मुस्लिम लोकांना अधोगती कडे नेणारा टोकाचा धार्मिक खेळ सुरू झाला. मग यांना इस्रायल आपल्या भागात नको असणे हे स्वाभाविकच झाले. इराणने पॅलेस्टाईन, इजिप्त आणि जॉर्डन या देशांना इस्रायल विरोधात अतिरेकी कारवाईसाठी मदतीचा ओघ सुरू केला. इराण मध्ये भरपूर प्रमाणात तेल साठा असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या कशाचीही कमतरता नव्हती मग त्यातीलच रक्कम ही इस्रायल विरोधी कारवाईत वापरली जाऊ लागली. इस्रायल ने यासाठी अमेरिका सारख्या बलाढ्य देशाकडे याची तक्रार ही केली पण इराणने अमेरिकेला ही जुमानले नाही. त्यात आधीच इराण आणि अमेरिका हे संबंध ही तसे चांगले नव्हतेच. अश्यात मग इराण ने आपला परमाणू कार्यक्रम चालू केल्याची कुणकुण इस्रायल आणि अमेरीका यांना लागली. ही गोष्ट 2014 च्या आसपासची आहे. यावर इराणला अमेरिकेने जाब विचारताच त्यांनी आम्ही अणुऊर्जा वापरून विद्युत निर्मिती करणार आहोत असा कांगावा केला. पण मोसाद च्या रिपोर्ट नुसार इराणमध्ये अणुबॉम्बच बनवत आहेत याची खातरजमा केली होती. यासाठी उत्तर कोरियाची मदत मिळत असल्याची ही बातमी हाती आली होती. इराण ज्या वैज्ञानिकाच्या जोरावर हा अणुबॉम्ब बनवू पाहत होते त्यांचे नाव डॉ मोहसीन फाकरिजादे.
डॉ मोहसीन फाकरिजादे हे वैज्ञानिक इराणच्या अणुबॉम्बचे संशोधक, त्यांनी विविध देशांच्या भूमीगत मदतीने हे संशोधन चालू ठेवले होते. 2019 ला इस्रायलला हे संशोधन पूर्ण होणार असल्याची खात्री पटली आणि त्यांनी अमेरिकेला यात हस्तक्षेप करून हे काम थांबवावे असं विनंती केली कारण धर्मांध शक्तीच्या हाती हे संशोधन लागले तर इस्रायल सहित इतर देशांना ही यातून धोका निर्माण होणार होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबाबत इराणला समज देण्याचा प्रयत्न केला पण इराणने ताकास तूर लागू दिले नाही.
-------------------------------------------------------------------
मग हा कार्यक्रम थांबवायची जबाबदारी मोसादने आपल्या हाती घेतली.
27 नोव्हेंबर 2020 च्या दुपारी 1 वाजता मोहसीन फाकीरजादे आपल्या पत्नीसोबत ऑफिसला जाण्यास बाहेर पडले, त्यांच्या सोबत इराण मिलिटरी मधील सर्वात ताकदवर असे 14 कमांडो नेहमीच सोबत असतं. अगदि त्यांच्या घरात ही. कारण अमेरीका आणि इस्रायल पासून त्यांना सतत धोका आहे हे इराणी सरकार जाणून होते. आजही त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता पण त्यांनी तो ऐकला नाही. आज स्वतःची खाजगी गाडी स्वतःच चालवत घराबाहेर पडले, रोजच्या सवयीनुसार बुलेट प्रूफ गाड्यांचा ताफा ही त्यांच्या मागून निघाला.
गाडी एक चौकातून वळून मुख्य रस्त्यावर आली, आणि एक स्पीड ब्रेकर जवळ येताच मोहसीन यांनी गाडीचा वेग कमी केला, इतक्यात.....
.
.
.
कुठूनतरी सुसाट गोळीबार सुरू झाला आणि गाडीचा विंड शिल्ड फोडत गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या. शेजारील सीटवर बायको होती त्यांना नेमकं काय झालंय हे कळायच्या आत गोळ्यांचा दुसरा राउंड फायर झाला आणि मोहसीन रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाले. त्याच्या शेजारी फूटभर अंतरावर असणाऱ्या त्यांच्या बायकोला साधा ओरखडा ही आला नव्हता हे विशेष. एवढ्यात आसपास एक मोठाला स्फोट झाला. त्यांच्या कारच्या मागील ताफ्यातील कमांडो पटापट मोहसीन यांच्या गाडीकडे धावले पण तोवर फार उशीर झाला होता, मोहसीनना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले पण ते कांही हाती लागले नाहीत. आता इराणी तपास यंत्रणा कामाला लागल्या पण हे नेमकं कोणी आणि कसं केलं याचा कांही सुगावा लागत नव्हता. शेवटी त्यांनी जनतेत प्रक्षोभ उसळणार या भीतीने "कांही दूचाकीस्वार आले आणि त्यांनी डॉ मोहसीन यांच्यावर गोळीबार करत त्यांना मारून टाकले" अश्या आशयाची बातमी प्रसारित केली, यामागे इस्रायल असावे हा अंदाज ही वर्तवण्यात आला. इराण ने जागतिक पातळीवर याबाबत आगपाखड केली पण कोणीही यावर कांहीही प्रतिक्रिया दिली नाही.
-------------------------------------------------------------------
2021 उजाडले, जवळपास एक वर्षाच्या कालावधी नंतर इस्रायल मधील वर्तमानपत्रातातून मात्र या घटनेला जबाबदार आपण असल्याचे मोसाद संस्थेने जाहीर केले. आणि मग यातून हे कसे केले गेले याची एक एक माहिती बाहेर येऊ लागली.
ती अशी....
2019 मध्ये डॉ मोहसिन यांना संपवल्या शिवाय इराणचा अणुबॉम्ब कार्यक्रम थांबणार नाही हे अमेरिका आणि इस्रायलला कळून चुकले होते. अमेरिका स्वतः हे काम करण्यास उत्सुक नव्हती पण तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलला हे काम करण्याची मोकळीक दिली आणि हे काम ताबडतोब करणे इस्रायल ला ही जरुरी होऊन बसले होते. मग इस्रायलने ताबडतोब ऑपरेशन च्या हालचाली सुरू केल्या. डॉ मोहसीन यांच्या दैनिक सवयी, वेळापत्रक यांचा अभ्यास केला गेला. त्यावरून त्यांना कसे मारता येईल याचा अभ्यास सुरू केला. त्यांना शार्प शूटर, स्थानिक बॉम्ब अश्या पद्धतीने मारणे म्हणजे थेट आणि उघडपणे करावं लागेल तसेच या कामात आपले सहकारी पुन्हा मायदेशी परतणे ही अशक्य होते. मारायचं तर आहे पण ते अगदी गुपित पणे असा प्लॅन जरुरी होता.
मग त्यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्स वापरण्याचा घाट घातला. आता त्यांनी इराण मधील कांही एजेंट गाठले आणि आपला कार्यक्रम सुरू केला. बेल्जियम मधून कांही अद्ययावत यंत्रे, रोबोट आणि इतर सामुग्री इस्रायल मध्ये आयात केली गेली, त्यांचा सराव केला गेला आणि मग ती सगळी यंत्रणा पुन्हा वेगवेगळ्या पार्ट मध्ये विभागून/उलगडून वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये टाकून जवळपास 8 महिन्याच्या काळात थोडे थोडे करत इस्रायल मधून इराण मध्ये स्मगलिंग करून पोचवण्यात आली , तिकडं इराण मध्ये पोचवल्यावर ते पार्ट पुन्हा एकत्र जोडण्यात आले. आता ते कुठं आणी कसे ठेवायचे हे ही फायनल झाले. सगळी यंत्रणा इराण मध्ये सर्रास वापर असणाऱ्या निसान ट्रकमध्ये बसवण्यात आल्या, या सर्व यंत्रणेचे एकूण वजन 1 टन होते. हा निसान ट्रक दिसायला अगदी सर्वसाधारण होता.
त्यातील यंत्रणा खालील प्रमाणे होत्या;
१. स्वयंचलित मशीन गन
२. गाडीच्या भोवतीने लावलेले कॅमेरे
३. उपग्रहाशी जोडलेले इंटरनेट यंत्र
४. आर्टीफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा
५. गाडीच्या तळाशी विस्फोटके.
हे सगळं साहित्य पुन्हा इराण मध्ये पोचल्यावर पुन्हा जोडून त्याची पुन्हा चाचणी करण्यात आली. त्यावेळी मोसादला कांही गोष्टी लक्षात आल्या त्या अश्या की ती यंत्रणा आणि मोसाद चे कंट्रोल स्टेशन यांचा उपग्रहाद्वारे होणारा संपर्क आणि मग त्यातून दिलेली कमांड यात 1.6 सेकंद इतक्या वेळेची तफावत होत आहे. म्हणजे सावजावर हल्ला करताना इतक्या वेळेच्या फरकामुळे सावज सुटण्याची भीती होती.
दुसरं म्हणजे चालत्या गाडीवर गोळीबार करणे म्हणजे गतीत असणारे सावज असणार म्हणजेच टार्गेट ची जागा सेकंदागणिक बदलत राहणार हे साहजिकच होते.
तसेच आणखी एक अडचण म्हणजे गोळीबार सुरू केल्यानन्तर त्या इम्पॅक्टमुळे मशीन गन असणारा तो ट्रक हलणार होता त्यामुळे टार्गेट वर निशाणा साधने कठीण होणार होते.
यावर उपाय म्हणून त्यांनी ही वेळेची तफावत, गतीत असणारे सावज आणि गोळीबार करताना होणारी ट्रकची हालचाल या सर्व बाबी गृहीत धरून आपली सगळी यंत्रणा सेट/प्रोग्रामिंग केले आणि अनेकदा सराव करत आपलं ध्येय निश्चित केले.
या यंत्रणेला सोबत म्हणून आणखी एक ट्रक ज्यात फक्त कॅमेरे होते तो ट्रक ज्या चौकातून गाडी वळून मुख्य रस्त्यावर येते तिथ लावला गेला. म्हणजे सावज मूळ ठिकाणी येत असल्याची खात्रीदायक माहिती काही मिनिटं आधी कळावी.
फायनली तो दिवस आला आणि 27 नोव्हेंबर 2020 ला गाडी त्या चौकातून जाताना पहिल्या ट्रकने सिग्नल मोसाद स्टेशन वर पाठवले आणि पुढं ऑटोमॅटिक मशीन गन असणाऱ्या ट्रकला स्टँडबाय चा संदेश पाठवला. आता तेहरान या इराणच्या शहरात असणारे हे सावज 1600 किलोमीटर लांब असणाऱ्या जेरुसलेम या इस्रायल च्या शहरातून टिपले जाणार होते.
जिथं हा हल्ला करणारा ट्रक उभा होता ते ठिकाण निवडण्याचे कारण म्हणजे तिथं वर्दळ ही कमी असते आणि रस्त्यावर स्पीड ब्रेकर ही होते. म्हणजे गतीत असणारे सावज आता मंद गतीत येणार होते. कांही वेळात सावज त्या ठिकाणी पोचले. कॅमेरे हे सर्व इस्रायल मध्ये दाखवत होते. आधीच दबा धरून बसलेल्या मोसाद कंट्रोल स्टेशन मधून मग ते बटन दाबले गेले आणि कांहीच सेकंदात ती यंत्रणा कार्यान्वित झाली आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेने डॉ मोहसीन यांचा चेहरा स्कॅन करत आपलेच सावज असल्याची खात्री केली आणि फायनली ऑटोमॅटिक मशीन गनला कमांड रिलीज केली आणि सावज टिपले गेले.
जागतिक इतिहासात प्रथमच 1600 किलोमीटर अंतरावरून मशीन गनचा चाप ओढला गेला आणि त्याचं परफेक्शन इतकं अचूक होते की सावजाशेजारी एक फुटावर असणाऱ्या व्यक्तीला साधा ओरखडा ही आला नाही. आता ही यंत्रणा इराणच्या हाती लागू नये म्हणून काम फत्ते होताच मोसादने दुसरे बटन दाबले आणि ते दोन्ही ट्रक विस्फोट होऊन जळून खाक झाले. अश्या परिस्थितीत इराणला याचा कांहीच थांगपत्ता लागणे शक्य नव्हते. मोसादने स्वतः कबुल केल्यानंतरच हे सगळं गुपित बाहेर पडले.
मोसाद म्हणजे अतिरेकी आजारावर एक जालीम औषध आहे. ज्याचा गुण आल्याशिवाय राहत नाही.
ज्यू लोकांची देशभक्ती आणि देशप्रेम हे अख्ख्या जगात वेगळं आहे.
प्रत्येक युवक आणि युवतीला मिलिटरी साठी काम करावंच लागतं, घरोघरी लघु उद्योग म्हणून इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवली जातात . प्रत्येक नागरिक देशासाठी कांही ना कांही श्रमदान करत असतो.
त्यांना 24 तास सतर्क राहायचं असत कारण ते चहुबाजूंनी दुश्मनांनी वेढलेले आहेत.
मोसाद चे अनेक किस्से आहेत, वेळोवेळी ते शेअर करत राहीनच.
(टीप: वरील माहिती विविध डॉक्युमेंटरी, गुगल आणि यु ट्यूब वरून संकलित केलेली आहे)
कमेंट, शेअर करत राहा 👍👍👍
लेखन
बापा
बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
के लाईन शिपिंग कंपनी
टोकियो जपान.
(फोटो सौजन्य गुगल बाबा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा