बुधवार, ४ जून, २०२५

1938. मुलांची जबाबदारी

   दिवसभरातून अनेकदा वाजते तशी दारावरची बेल वाजली. यावेळी कोण आलं असावं? असे वाटल्यामुळे जरा नाराजीतच सुकन्याने दरवाजा उघडला. दारात काळे काकूंना बघून मात्र ती अगदी भारावून गेली. काकूंसाठी काय करू आणि काय नाही असे तिला झाले. काकूंनी तिच्या आदरातिथ्याचा स्वीकार केला आणि त्या दोघींच्या गप्पांना रंग चढला.
"काकू, गीता बरेच दिवसांत आली नाही. तिचं सगळं व्यवस्थित आहे ना?" सुकन्यानेच सुरूवात केली. खरं म्हणजे आज काकू अचानक इकडे कशा आल्या, मी नेमकी आज सुट्टी घेऊन घरीच आहे, हे यांना कसं कळलं? हे विचार तिच्या मनात आले होते. पण असं विचारणं एकदम बरं दिसणार नाही म्हणून सुकन्याने आपल्या मैत्रिणीची, गीताची चौकशी सुरू केली.
गीता आणि सुकन्या बालपणीच्या मैत्रिणी. दोघींचीही घरं त्यावेळी जवळच होती. शाळेत जाता-येताना एकमेकींच्या घरी जाणं, एकत्र खेळणं, यातच त्या दोघी जिवलग मैत्रिणी झाल्या. गीताचे वडील परगावी नोकरीला असल्यामुळे आठ-पंधरा दिवसांतून घरी यायचे. त्यामुळे बरेचदा सर्व मैत्रिणी गीताकडेच जमत असत. शिवाय काळेबाई पण त्यांच्याच शाळेत संगीत शिक्षिका असल्यामुळे शाळेतल्या कार्यक्रमांच्या स्वागत गीताच्या तयारीसाठीही गीताचे घरंच योग्य ठिकाण झाले होते. या सगळ्यामुळे काळे काकूंशी गीता इतकी एकरूप झाली होती की, पुढे मुली मोठ्या झाल्या नंतरही सुकन्याचा ओढा गीताच्या घराकडे जरा जास्तच होता.
 “सुकन्या, तू कधीपासून इतकी फॉर्मल झालीस?" काळे काकूंशी बोलता बोलता आपल्याच विचारात मग्न झालेल्या सुकन्याला काकूंनी विचारले. मग मात्र भानावर येत आपल्या मूळ स्वभावाला साजेशे हसत मोकळेपणी सुकन्या म्हणाली, "काकू, खरं म्हणजे आज तुम्हाला अचानक इथे आलेल्या बघून मला आश्चर्यच वाटले. त्यामुळेच गोंधळून जाऊन उगाच काहीतरी बोलायचे म्हणून गीताची चौकशी सुरू केली. तुम्ही येण्यापूर्वी मी खरंतर तुमचाच विचार करत होते. आज खरोखरच मला तुमची आठवण येत होती. तुम्हाला आठवतं, आम्ही तुमच्या घरी कसा धुडगूस घालायचो? तुम्ही नवीन घरी रहायला गेल्यानंतर मात्र ते सगळं संपलं. पण नंतर कॉलेजात असताना मात्र मी अगदी नियमितपणे तुमच्या घरी यायचे. त्यावेळी तुमचं घर कॉलेजपासून जवळ होतं, म्हणूनच नाही तर तिथे मी, माझ्या मनातल्या जवळ जवळ सगळ्या भावना तुमच्या बरोबर शेअर करायचे. त्या वयात आईशी मुलीचे जे 'मार्गदर्शक मैत्रिण' असे नाते असते ते नाते माझे तुमच्याशी होते. 
खरं तर आमच्या घरात काही समस्या होत्या किंवा अडचणी होत्या असं नाही. अगदी सर्वसामान्यांसारखं साधं घर. तरीही मला तुमचं घर कधीच परकं वाटलं नाही. मी तिथे अगदी मोकळेपणाने वावरायचे. खरंच, त्यावेळच्या आपल्या मधल्या नात्याची मला गंमतच वाटते. आपलं हे नातं केवळ तुमच्यामुळेच तयार होऊ शकलं. त्यावेळी तुम्ही मला जो भावनिक आधार दिलात, जे मार्गदर्शन केलं त्यामुळेच आज मी माझ्या पदावर चांगल्या प्रकारे काम करू शकते."
"अगं, पुरे-पुरे, किती कौतुक करशील माझं ? आता जरा शांतपणे सांगशील का तुला माझी आठवण का येत होती ते?" सुकन्याला जुन्या आठवणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत काकू म्हणाल्या.
"काकू, आज मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. आजही मला पूर्वी सारख्याच आपल्या सगळ्या भावना तुमच्या बरोबर शेअर करायच्यात. मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहेच." सुकन्याने आपले बोलणे तसेच चालू ठेवले. "आमच्या घरात मला आणि सुयोगला कशी वागणूक मिळायची ते तर तुम्हाला आठवतच असेल. खरं म्हणजे आम्ही जुळी भावंडं, पण बाबांचं झुकतं माप नेहमी सुयोगकडेच. कुठलीही वस्तू आणली तरी पहिली चॉईस सुयोगची आणि उरलेलं माझ्या वाट्याला. आम्ही आपसांत भांडलो म्हणजे सगळी चूक माझी एकटीचीच असल्याप्रमाणे बाबा मलाच रागवायचे. बाबांनी त्याला (सुयोगला) नुसता डोक्यावर बसवून ठेवला होता. आईने कधी माझी बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर बाबा चिडून तिला म्हणायचे, 'तुझ्या फाजील लाडामुळे पोरगी बिघडतेय' बाबांच्या या अशा वागण्यामुळे आपण या घरात नकोसे आहोत का? कुणाला आपली पर्वा तरी आहे का? असेच प्रश्न मला पडायचे. 
मग आपोआपच माझी पावलं तुमच्या घराकडे वळायची. तिथे आल्यानंतर ज्या मोकळेपणानी तुम्ही माझ्याशी बोलायच्या, माझी समजूत काढायच्या. त्या शब्दांनी माझ्या मनाला शांती मिळायची. आता जाणवतंय मला तुमच्या घरी इतक रिलॅक्स का वाटायचं ते. आपल्या मतांचा आदर केल्या जाईल, किमान मनातलं सगळं ऐकलं जाईल. कोणाला तरी आपल्याला काय वाटतंय यात रस आहे. असं पोषक वातावरण मला तुमच्या घरात मिळत होतं. आमच्या घरात मात्र 'आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' असं आश्वासक सुरात मला कुणीच सांगितलं नाही.
माझ्यात आणि सुयोगमधे भेदभाव करण्यात बाबा कधीच कमी पडले नाहीत. बारावीची परिक्षा आम्ही दोघेही पास झालो ते केवळ चार मार्काच्या फरकाने, तरीही पुढे 'मी बी.एस.सी करावे आणि सुयोगने इंजिनिअरींग' असा एकतर्फी निर्णय घेऊन बाबा मोकळे झाले. कधीतरी त्यांच्याच एका मित्राने त्यांना विचारले सुकन्याला पण इंजिनिअरींगला अ‍ॅडमिशन का घेतली नाही? मला अजूनही आठवतं. तेव्हा बाबा म्हणाले होते, 'सुकन्या ऐवजी सुपुत्र असता तर मात्र काहीही तडजोड करून मी त्याला सुद्धा इंजिनिअर बनविले असते. मुलगी कितीही शिकली तरी तिच्या शिक्षणाचा आपल्याला काय फायदा? शेवटी ते परक्याचंच धन. सुयोग हा माझ्या "म्हातारपणाची काठी" ती काठी मला आतापासूनच मजबूत करायला नको?"
     या प्रसंगानंतर मात्र माझ्या मनात बाबांबद्दल कायम अढी राहिली. ग्रॅज्युएशन नंतर बाबांनी माझे लग्न करून देऊन आपले कर्तव्य पूर्ण केले. सुदैवाने माझ्या सासरच्या मंडळींनी मला शिक्षण पुढे चालू ठेवायला प्रोत्साहन दिले आणि आज मी 'वेलफेअर ऑफिसर' या पदावर कार्यरत आहे."
"सुकन्या, तू वेलफेअर ऑफिसर आहे. म्हणजे तुला नेमकं काय काम असतं गं? तुझ्या कामाविषयी मला काहीच माहिती नाही. त्यातला तुझा अनुभव वगैरे सांग ना." विषय बदलण्यासाठी मुद्दामच काळेबाईंनी प्रश्न केला. तेव्हा इथे बदली झाल्यानंतर आपले काम कसे वाढत गेले. काम करताना काही वेळेला आलेले वेगवेगळे प्रसंग, त्यावेळी केलेले विशेष प्रयत्न वगैरे सुकन्या अगदी भरभरून बोलत होती. बोलण्याच्या ओघात तिने सांगितले की, "नुकतेच माझ्या वाट्याला जे काम आलं. त्यामुळे तर मला खूपच नवीन अनुभव येताहेत."
"त्या कामाचं स्वरूप काय ?" काकूंनी विचारलेच.
"वयाच्या मानाने तंदुरूस्त आणि चपळ असणाऱ्या बेकार वृद्धांचे पुनर्वसन." असं म्हणून सुकन्या एकदम गप्प झाली. 
सुकन्या एकाएकी गप्प का झाली? हे काळेबाईंना कळलेच नाही. जरा वेळ थांबून त्या म्हणाल्या, "तंदुरुस्त, चपळ आणि बेकार वृद्ध म्हणजे काय? मला नाही समजले, आणि तू अशी एकाएकी गप्प का झालीस?" तरीही सुकन्या काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी तिला आग्रह केला, "सुकन्या, आज तुला आपल्या सगळ्या भावना माझ्यासोबत शेअर करायच्या होत्या ना मग बोल ना."
सुकन्या सांगू लागली, "आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकिय सुविधा, आरोग्याबद्दलची वाढती जाणीव, फिटनेस बद्धल जागरुकता आणि या सर्वांसाठी मध्यमवर्गाच्या हातात असणारा पैसा या सगळ्याचा परिणाम म्हणून आजचे वृद्ध तंदुरूस्त आणि चपळ आहेत. त्यांची शिकलेली, मोठी झालेली मुले मात्र आपलं वैवाहिक आयुष्य अधिक आरामदायी घालविण्यासाठी, आपल्या पालकांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांच्यापासून दूर परदेशात स्थायिक होतात. तेव्हा या रिटायर्ड लोकांच्या सोबतीला असतं फक्त दुःख आणि दारिद्र्य. मुलं तिकडे छान सुखासीन आयुष्य जगतात आणि आई-वडील मात्र पै-पैसा जोडत राहतात. दिवसेंदिवस महागाई वाढत जाते. यांच्या आयुष्याची प्रत मात्र कमी होत जाते." हे बोलता बोलता सुकन्याचा कंठ दाटून आला. 
तिने खूप प्रयत्नाने दाबून ठेवलेला हुंदका काळेबाईंना समजलाच नाही म्हणून की काय त्यांनी विचारले, "सुयोग काय म्हणतो ? तो अमेरिकेतच स्थायिक झाल्याचं कळलं. तुझी आई गेली तेव्हा तो येऊन गेला ना ? पण तेव्हा मी गीताकडे होते." काळेबाई आपल्याच तालात बोलत होत्या.
काकूंनी सुयोगचा विषय काढताच सुकन्या एकदम भडकली. "काकू, नाव नका काढू तुम्ही सुयोगच, आणि त्याच्या त्या अमेरिकेचं. त्याला तिथे नोकरी मिळाली ती त्याच्या बुध्दीच्या, मेहनतीच्या जोरावर हे कबूल. पण त्याला मोठं करण्यात आई-बाबांनी आपली सगळी शारिरीक, मानसिक आणि आर्थिक शक्ती खर्च केली हे कसं विसरता येईल ? सुयोगने आपलं लग्न ठरवलं तेव्हा सुद्धा आईबाबांनी त्याला अजिबात विरोध केला नाही. पण त्यांच्या आधुनिक सुनेला आपल्या संसारातील सासूची ढवळाढवळ सहन होईनाशी झाली. म्हातारे आईवडील हे त्यांच्या संसारातील अडगळ बनले. मग सुयोगने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व आईंनी अंथरूण धरले."
आईच्या आठवणीने सुकन्याचे डोळे भरून आले. आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत ती काकूंना सांगू लागली. "आईची तब्येत बरी नाही. सुयोग अमेरिकेत आणि मी तिकडे कोकणात. त्यामुळे बाबा अगदीच एकटे पडले. आर्थिक अडचणी तर होत्याच पण मुले दूर गेल्यामुळे 'आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागतेय' हे कटू सत्य पचवणं त्यांना जड जात होतं. या उतारवयात त्यांची होणारी हेळसांड मला पाहवत नव्हती. म्हणून मग आम्ही दोघांनीही आपली बदली इथेच करून घेतली. आईच्या आजारपणात त्या दोघांचीही जास्तीत जास्त काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांना जमेल तेवढी मदतही केली. पण आपलं दुर्दैव असं की आपल्या देशात मुली आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांना भावनात्मक आधार देतात. पण त्यांच्याकडून अन्य कोणत्याही रूपातली मदत घ्यायला आईवडिलांचीच हरकत असते. त्यामुळेच कदाचित माझ्याकडून मदत घेणं आईबाबांना कमीपणाचं वाटे. माझ्या घरी वरच्यावर येण्याचं ते टाळत असत. यातच एक दिवस आई गेली."
गळा भरून आल्यामुळे पुढे बोलणे सुकन्याला कठीण जात होते. काकूंनी तिला प्यायला पाणी दिले. ती पुढे सांगू लागली. "आई गेल्यानंतर सुयोग आपल्या बायकोबरोबर इथे आला तेव्हा चांगला महिनाभर राहिला. आईचे दागीने, तिच्या नावे बाबांनी उतरविलेला विमा, तिने केलेली छोटी मोठी बचत, अगदी चिल्लर भेट वस्तूंपासून ते नातवंडांसाठी आई-बाबांनी केलेली गुंतवणूक या सगळ्यांची त्याला हाव सुटली. बाबांचे राहते घर सुद्धा त्याने त्याच काळात, सगळ्यांच्या नकळत अगदी परस्पर विकून टाकले. दोन दिवसांपूर्वी घराचा नवा मालक ताबा घ्यायला आला तेव्हा हा व्यवहार आम्हाला कळाला. काकू, आता तुम्हीच सांगा बाबांनी कुठे राहवे?"
“तू तुझ्या बाबांना सांभाळू शकतेस. शिवाय तुझे घरही चांगले मोठे आहे." काकू अगदी सहजपणे बोलून गेल्या.
सुकन्या बाबांना आपल्या घरी ठेऊन घ्यायला अजिबात तयार नव्हती. संतापून ती काकूना म्हणाली, "मुळीच नाही. बाबांना घरी आणायला माझी स्वत:चीच हरकत आहे. काकू, बाबांना आधार द्यावा असं मलाही वाटतंय. पण लहानपणापासून मुलगी म्हणून बाबांनी मला जी दुय्यम वागणूक दिली त्याची आठवण मला अस्वस्थ करते. मलाही शिक्षणाची, करिअरची समान संधी आणि हक्क असतानाही केवळ मुलगी म्हणून बाबांनी तो डावलला. मला स्पष्ट आठवतंय. आमच्या घरात सुयोगची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी बाबा वाटेल ती तडजोड करायला तयार असत. माझी मागणी वाजवीपेक्षा वास्त वाटल्यास ते लगेच माझ्या 'मुलगी' असण्याचा उल्लेख करत आणि 'मुलगी' म्हणजे निव्वळ तोटा असेच म्हणत. एकदा तर चिडून जाऊन मी त्यांना विचारलेच, "बाबा, तुम्ही नेहमी 'मुलगा म्हणजे नफा आणि मुलगी म्हणजे तोटा' असे का म्हणता? तर मला समजावण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, "सुकन्या, तू अजून लहान आहेस, तुला कळणार नाही. पण ऐक बेटा, आपण कितीही शिकलो, आपले विचार कितीही उच्च असले तरी आपण समाज बदलू शकत नाही. मुलीचे तिच्या जन्मापूर्वीपासून तर विवाहाच्या वेळेपर्यंत पालन पोषण करायचे. तिला उच्च शिक्षण द्यायचे. तिचे आरोग्य उत्तम राहील याची काळजी घ्यायची. अशी उच्च शिक्षित, आरोग्यदायी मुलगी तिच्या लग्नानंतर मात्र आपल्यासाठी परकीच राहते. तिच्या कमाईवर तर लग्नापूर्वी सुद्धा पालकांचा काहीच हक्क नसतो. तिच्या लग्नात मात्र बापाने न झेपणारा हुंडा सुद्धा हसतमुखानेच द्यायचा. सासरची मंडळी लोभी निघाली तर भर मंडपात व्याह्यांच्या पायावर वधुपित्याने आपली पगडी ठेवायची. त्यानंतरही त्यांची मागणी वाढतच राहिली आणि ती पूर्ण करता आली नाही तर मुलीचा छळ होऊ नये म्हणून वधुपिता कायम तणावात. शिवाय लग्न होईपर्यंत मुलीच्या अब्रूची जोखीम कायम टांगत्या तलवारी सारखी असतेच. या सगळ्याचा विचार करता 'मुलगी म्हणजे तोटाच'. पण मुलाचे तसे नाही, कारण मुलाला शिकवताना कितीही खर्च आला तरी त्याची परतफेड मुलाने नोकरी करून मिळविलेल्या पगारातून होतेच. शिवाय त्याच्या लग्नात मिरवून घेण्यात एक वेगळाच आनंद असतो. आता आपल्या सुयोगचेच बघ ! तो शिकला, नोकरीला लागला की आमच्या सगळ्या काळज्या संपल्या. म्हातारपणी तोच आमचा सांभाळ करणार. म्हणजे सुयोगच आमचा आधार. आमच्या म्हातारपणाची काठी. त्यामुळे त्याचे शिक्षण ही आमच्या पुढच्या आयुष्याची गुंतवणूक आणि आरामात त्याच्या संसारात रमणे म्हणजे त्या गुंतवणकीवरचा नफा आहे की नाही सोपे गणित ?"
"बाबांनी त्यावेळी आमच्या दोघांच्या बाबतीत मांडलेले हे समिकरण मला पटले नव्हतेच. पण त्यांच्यापुढे बोलण्याची काही सोय नसल्यामुळे गप्प बसले. पुढे सुयोगने आईबाबांची जबाबदारी नाकारत परदेशी स्थायिक होण्याचे ठरविले. तेव्हा बाबांनी त्याला प्रोत्साहन दिले ते म्हणाले, "अशी संधी वारंवार येत नाही. तू आमची काळजी करू नकोस. तुझी प्रगती, तुझे यश यातच आमचे सुख आहे. अमेरिकेला गेल्यानंतरही सुयोगने कधीच त्यांना आपल्याकडे बोलावले नाही. त्यांना काय हवं काय नको याची साधी विचारपूसही केली नाही. पण आई गेल्यानंतर आला तेव्हा आपल्या स्वार्थी स्वभावाचा कळस गाठत बाबांचे राहते घर परस्पर विकून मोकळा सुध्दा झाला. बाबा मग कुठे राहतील याचा साधा विचारही त्याच्या मनात आला नाही का? की बाबांच्या नंतर फक्त घरासाठी भारतात यावे लागू नये असा व्यवहारी विचार त्याने केला? 
'सुयोग आपला आधारस्तंभ होऊ शकत नाही.' हे वास्तव स्वीकारून बाबा माझ्या घरी राहायला आले तरी त्यावेळी सुयोगला काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी माझ्यावर केलेला अन्याय मला विसरता येईल का? आईच्या आजारपणात मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ती स्वतःची मानहानी वाटली. मग आता मी त्यांची जबाबदारी का उचलावी? काकू, आपली परंपराच अशी आहे ना की मुलाने आईवडिलांची देखभाल करावी? मग सुयोग सर्वतोपरी समर्थ असताना मी बाबांना आधार का द्यावा? मला बाबांच्या संपत्तीतला, आईच्या दागिन्यातला अर्धा वाटा मिळाला का? मग मी बाबांच्या काळजीचा अर्धा नव्हे तर पूर्ण वाटा का उचलावा? त्यांची म्हातारपणाची तथाकथीत काठी त्यांच्यापासून खूप दूर गेली. शरिरानेही आणि मनानेही. म्हणून आता त्यांच्या जबाबदारीचा बोझा आपल्या खांद्यावर घ्यावा का? सांगा काकू, मी काय करू? गेल्या दोन दिवसांपासून हे असेच विचार माझ्या मनात थैमान घालताहेत. मला खात्री आहे की या परिस्थितीत तुम्हीच मला मार्ग दाखवाल."
सुकन्या सारखी समंजस मुलगी असा काही सवाल करेल याची काळे बाईंना अपेक्षाच नव्हती. त्या तिला समजावू लागल्या, "आपल्या देशात मुलींकडे मदत मागणे पालकांना खूप जड जातं. मुलगा कसाही असला तरी आईवडील ही त्याचीच जबाबदारी असते. मुलांना लहानपणी त्यांच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सर्व गोष्टी मिळाल्या की कधी कधी त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडतोही. सुयोगला आपल्या कर्तव्याची जाणीव नाही. पण तू मात्र आपली जबाबदारी विसरू नकोस. तू तुझ्या बाबांचा सांभाळ करायला समर्थ असताना त्यांनी इतरत्र कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आज या परिस्थितीत बाबांना आधार देताना ते पूर्वी तुझ्याशी कसे वागले याचा अजिबात विचार करू नकोस. बाबांचा सांभाळ करणे, त्यांची जमेल तेवढी सेवा करणे ही तुझी नैतिक जबाबदारी तर आहेच, पण आताच तू सांगितल्याप्रमाणे मला वाटतं तुझे व्यावसायिक कर्मही हेच आहे. वैद्यकिय सुविधा लाभल्याने तंदुरूस्त, फिटनेस बद्धल जागरूकता राखल्यामुळे चपळ आणि मुले परदेशी स्थायिक झाल्यामुळे किंवा रिटायरमेंटमुळे बेकार झालेल्या तुझ्या बाबांच्या वयाच्या म्हाताऱ्या लोकांचे पुनर्वसन करणारी 'समाज कल्याण अधिकारी' असं आपल्याच बाबांना वृद्धाश्रमात पाठवतेय हे चित्र कसं दिसेल? शिवाय आजही मुलगी जन्माला येणं हे पुत्रजन्मा इतकं आनंददायी नसणाऱ्या लोकांसमोर तुझा काय आदर्श राहिल? केवळ मुलींचे पालक आपल्या मुलींकडे आधार म्हणून पाहू शकतील का? आपली मुलगी पुढे आपल्याला आदराने आणि ममतेने वागवेल याची त्यांना खात्री वाटेल का? मुलगा झाला नाही तरी एका सन्माननीय आयुष्यासाठी आपण आपल्या मुलींवर अवलंबून राहू शकतो, असा विश्वास त्यांना कुठून मिळणार? तुझ्यासारख्या उच्च पदस्थ मुलीने आपल्या पालकांना आधार दिल्यानंतर तो आदर्श समाजात रूढ होतो. आज तू आपल्या बाबांना नाकारलंस तर मुलगा आणि मुलगी यात भेदभाव न मानणाऱ्या लोकांनाही प्रश्न पडेल. 'आपण मुलीला जन्म द्यावा का?' मग मुलगा-मुलगी हा भेदभाव कमी कसा होईल? मुलींनाही शिक्षणाची, करिअरची समान संधी कशी मिळेल?" असं बरंच सुकन्याला समजावून काळेबाई निघून गेल्या.
      आपल्या हिशोबी आणि धूर्त भावजयीकडून बाबांना मिळणारी वाईट वागणूक आणि त्याकडे भावाने केललं दुर्लक्ष याचा फारसा विचार न करता बाबांना घरी आणण्याचा निर्णय सुकन्याने मनोमन घेतला.

लेखिका- सौ. शिल्पा ढोमणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...