शनिवार, ७ जून, २०२५

1944. साथी

 “रामभाऊ, चल रे फिरायला...”
विष्णुपंत थकल्या स्वरात म्हणाले. ‘रॅम्बो’ हा त्यांच्या मुलानं- आदित्यनं पाळलेला कुत्रा.
पंत नेहमी त्याला हाक मारताना ‘रामभाऊ’च म्हणायचे. त्याला सकाळ संध्याकाळ फिरवताना आपला व्यायाम होतो, हेच समाधान पंतांना असायचं.
पत्नी अकालीच साथ सोडून गेली. पुन्हा लग्न वगैरे करायच्या फंदात पंत पडलेच नाहीत. आपली नोकरी आणि आदित्यचं संगोपन यातच पंतांचं आयुष्य खर्ची पडलं.
एक पैसाही न खाणारे पंत खात्यात अप्रियच होते. जिथं पाचही बोटं सतत आमरसात ठेवायची तिथं एकही पैसा न खाणारा कोणाच्या पचनी पडणार? त्यामुळं कार्यालयात कोणाशी मैत्री नव्हतीच.
निवृत्त झाल्यावर इतरांनी सोडलेले समाधानाचे सुस्कारे पंतांना कळले होते, पण त्यात वाईट वाटण्यासारखं पंतांना काही वाटलं नाही. आपण आपलं काम इमानानं केलं, याच समाधानात परत कधीही इथं न येण्याचं ठरवून पंतांनी कार्यालयाचा निरोप घेतला.
ग्रॅच्युइटी आणि फंडातून आलेल्या पैशातून पंतांनी एक छोटं टुमदार घर बांधलं. आयुष्य भाड्याच्या घरात गेलेलं… आयुष्याच्या संध्याकाळी तरी स्वतःच्या घरात राहता यावं ही एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी.
पैसे थोडे कमी पडत होते... “बाबा, कशाला काळजी करताय? मला लोन मिळेल सहज तितकं” आदित्य म्हणाला.
त्याला लोन मिळायला सोपं म्हणून पंतांनी घराच्या रजिस्ट्रेशन वर आदित्यचंच नाव घातलं.
“माझे किती दिवस राहिलेत रे? पुढं तुलाच बरं पडेल” म्हणत त्यांनी स्वतःचं नाव घालायला नकार दिला.
निवृत्त तर झाले, पण दिवस खायला उठला. करायचं काय?? सगळ्या आयुष्यात हौस, मौज, छंद जोपासायला कधी सवडच मिळाली नव्हती. ना वेळेची, ना पैशाची. त्यामुळं रॅम्बोला फिरवणं, त्याची काळजी घेणं हाच एक विरंगुळा त्यांच्या मनात उरला होता.
देवकी, आदित्यची बायको मात्र तितकी समजूतदार निघाली नव्हती. नारळ आणि मुलगा कसे निघतील आधी सांगता येत नाही म्हणतात. पंतांच्या बाबतीत सुनेबद्दलही हे वाक्य लागू पडत होतं.
आदित्यच्या ऑफिसमधलीच ही मुलगी, आधी घरी येऊ लागली, तेव्हा पंतांना अगदी पसंत पडली होती. पण लग्नानंतर तिचं वेगळं रूप दिसायला लागलं.
पंतांच्या तशा जेवणाखाण्याच्या फारश्या तक्रारी कधीच नव्हत्या. पण आता वयानुसार चमचमीत, मसालेदार खाणं सोसत नसे. साध्या ताकभातावरही पंत खुश असत, पण देवकीच्या राज्यात न चुकता रात्रीच्या जेवणात तिखटाचा भरणा असायचा.
एक दोन वेळा पंतांनी आधी देवकीला सांगितलं आणि मग आदित्यसमोरही विषय काढला, पण परिस्थिती आणखीच वाईट झाली.
रॅम्बो बिचारा इमाने इतबारे पंतांसमोर असायचा. पण तो पंतांसाठी काहीही करू शकत नव्हता. तोंड उघडून जीभ काढून धापावत शेपूट हलवत पुढे उभा रहायचं, यापलीकडे तो तरी काय करणार?? त्यालाच कवटाळत पंत मनातल्या मनात अश्रू ढाळायचे.
दीपेनच्या– नातवाच्या जन्मानंतर मात्र परिस्थिती आणखीच चिघळली…
देवकी त्यांना नातवाला हात लावू देत नसे. रॅम्बोनं त्याला चाटलेलं सुद्धा तिला चालायचं; पण पंतांचं त्याच्या जवळही जाणं तिला चालत नसे.
शेवटी तिनं आदित्यला काय सांगितलं कुणास ठाऊक, आदित्यनं पंतांना वृद्धाश्रमात ठेवायचा निर्णय घेतला.
पंतांच्या डोक्यावर हा मोठाच प्रहार होता.
“बाबा, आम्हाला जमत नाहीये तुम्हाला सांभाळणं. तिथं सगळे तुमची काळजी घेतीलच…” स्पष्ट शब्दात आदित्यनं सांगितलं.
डोळ्यातलं पाणी निरपत पंत आदित्यच्या गाडीत चढले… आपल्या कष्टाच्या पैशानं बांधलेल्या घरकुलाचा नाईलाजानं निरोप घेत.
‘…परत आपण आपल्या खाटेचं भाडं भरतच जगणार का? स्वतःचं घर नशिबात नाहीच का आपल्या?’
पंतांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
वृद्धाश्रमात गेल्यावर पंतांना सुरुवातीला जरा जडच गेलं. बरोबरीची इतर मंडळी होती, पण मुलानं आपल्याला घरातून बाहेर काढलं, हा धक्का पचवणं सोपं नव्हतं. त्यात पंतांच्याच खात्यातला एकजण तिथंच होता.
“काय पंत? शेवटी इथंच आलात ना? आता सांगा काय उपयोग झाला प्रामाणिकपणे सेवा करून? आम्ही निदान तरुणपणी तरी मौज करून घेतली. तुम्ही तेव्हाही कोरडेच आणि आताही!”
वर्मी बसलेल्या या टोमण्यापुढं निमूटपणे मान तुकवण्यापलीकडे पंत काहीही करू शकत नव्हते. सुरुवातीला दर महिन्याला भेटायला येणारा आदित्य, नंतर नंतर यायचा कंटाळा करू लागला. पूर्वी एकटाच यायचा, मग तेही कमी होत गेलं.
महिन्याची भेट दोन महिन्यांवर आणि शेवटी सहा महिन्यांवर पोहोचली. दिवाळीच्या दिवशी येऊन गेलेला आदित्य आता तर एप्रिल उलटला तरी आला नव्हता.
आज मात्र तो येईल याची पंतांना खात्री होती… येणारच. आज पंतांचा वाढदिवस. निदान आज आदित्य भेटेल तरी. कदाचित दीपेनला पण आणेल…
पंत वाटेकडे डोळे लावून बसले होते.
करता करता दुपार उलटली. खरं तर पंतांना वेळ जाता जात नव्हता. पण सांगणार कुणाला? पंत आपल्या खोलीत बसून होते. सतरा वेळा उठून दरवाज्यापर्यंत जाऊन आले. कुणीच नव्हतं.
बसल्या ठिकाणी पंतांचा डोळा लागला. अचानक दारावर कुणीतरी टकटक केली. पंतांनी आशेनं डोळे उघडले. राजीव– वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता.
“पंत, गेले तीन महिने तुमचे पैसे आलेले नाहीत. फोनही लागत नाहीये तुमच्या मुलाचा. अनामत रक्कम पण संपेल आज. अजून आठवडाभर देतो. तितक्यात पैसे नाही आले तर जागा खाली करावी लागेल तुम्हाला.”
राजीव खरं तर अगदी चांगला व्यवस्थापक होता… पण तो तिथला चाकर. कितीही अदबीनं बोलला तरी त्याचे हात नियमांनी बांधलेले होते.
पंतांचे डोळे डबडबले. “नको राजीव. आठवड्याचा खर्च तरी तुमच्यावर कशाला? मी आजच निघतोय” पंत म्हणाले.
“मला तसं नव्हतं म्हणायचं...”
राजीव सांगू पाहत होता, पण मानी स्वभावाच्या पंतांना ते मान्य होणार नव्हतं.
थकल्या हातांनी आणि श्रमल्या मनानं त्यांनी आपल्या चार वस्तू असलेल्या पिशवीत भरल्या. राजीव थांबवत असतानाही पंत निघाले. राजीवनं हट्टानं हातात कोंबलेली शंभराची नोट मात्र ते नाकारू शकले नाहीत.
“पंत, ही ठेवा सोबत… माझाही नाईलाज आहे. पण मी तरी काय करू? पण जर नाहीच जमलं घरी, तर या परत… बघेन काहीतरी”, राजीव बोलत होता पण पंतांच्या कानात काहीच शिरत नव्हतं.
काय करावं? कुठं जावं? घरीच जाऊ या… आपल्या कमाईतून बांधलंय ते. लवकरच पाऊस सुरू होईल. डोक्यावर छप्पर तर हवं.
तिथं ज्या काही थोड्या ओळखी झाल्या होत्या त्यांचा काही उपयोग नव्हता. ज्यांना स्वतःलाच घरात थारा नाही, ते दुसऱ्याला काय सहारा देणार?
वृद्धाश्रमापासून बस स्टॉप जरा लांबच होता. तळपत्या उन्हात पाय ओढत पंत निघाले. रिक्षानं जाण्याएवढे पैसे नव्हते. टॅक्सीची तर गोष्टच नको.
बऱ्याच वेळानं बस आली. कसंबसं पंतांनी स्वतःला बसमध्ये चढवलं. थरथरत्या हातांनी तिकिटाचे पैसे देताना कंडक्टर म्हणालाच,
“आजोबा, घरात निवांत बसायचं सोडून कुठं फिरताय उन्हात?”
काय सांगणार याला? पंत निमूट बसले. घराजवळ बस आली. पंत उतरले.
‘दीपेन किती मोठा झाला असेल आता? ओळखेल का? किती वर्षांत बघितला नाही त्याला. मागच्या वेळी आदित्य आला, त्यानं फोटो दाखवला होता…’ विचार करतच पंत घरासमोर आले.
त्यांना अचानक रामभाऊची आठवण आली. असेल का अजून जिवंत? असलाच तर तेरा चौदा वर्षांचा असेल. कुत्र्यांसाठी दीर्घायुषीच. थरथरत्या हातांनी त्यांनी घंटी वाजवली.
एका संपूर्णपणे अनोळखी स्त्रीनं दार उघडलेलं पाहून पंतांना धक्काच बसला.
“कोण हवंय आपल्याला?” तिनं विचारलं.
‘हे आपलंच घर ना?’ पंतांना प्रश्न पडला.
हो. घर तर तेच होतं. मग आदित्य…??? देवकी?? आणि दीपेन…??
-“कुणाला भेटायचंय काका??”_ तिनं परत विचारलं.
“माझा मुलगा, सून आणि नातू राहतात इथं. आपण कोण? मी नाही ओळखलं.” पंत जरा चाचरतच म्हणाले.
“गेली तीन वर्षं तर आम्हीच राहतोय. त्यापूर्वी राहत असले तर कल्पना नाही. आम्ही तीन वर्षांपूर्वी विकत घेतलं हे घर.” ती स्त्री म्हणाली.
‘म्हणजे आपल्या अपरोक्ष आदित्यनं घर विकलं?? आपल्याला जराही विश्वासात न घेता??’ पंतांना धक्क्यावर धक्के बसत होते.
“ज्यांनी तुम्हाला घर विकलं, त्यांचा काही पत्ता आहे का?” कसंबसं पंत उद्गारले.
“आत या ना. बसा… माझ्याकडे नाही पण मी माझ्या नवऱ्याला फोन करून विचारते त्यांच्याकडे आहे का.”
लटपटत्या पावलांनी पंत घरात आले. सोफ्यावर बसले. पंख्याच्या गार वाऱ्यानं त्यांना जरा बरं वाटलं.
फोन…! त्यांना अचानक आठवलं. मुलाचा फोन नंबर त्यांच्याकडे होता कुठंतरी. त्यालाच फोन करून विचारू काय ते… विचारानंच त्यांना बरं वाटलं.
तितक्यात पाण्याचा ग्लास घेऊन ती स्त्री आलीच.
“नाही हो… यांना फोन केला होता मी. पण यांच्याकडे पण नाहीये त्यांचा पत्ता. पण फोन नंबर आहे. तो दिलाय त्यांनी.”
“मला जरा फोन लावून द्याल का?” पंत जरा अजीजीनंच म्हणाले.
“करा की… हा घ्या...” हातातला हँडसेट त्यांच्यापुढे करत ती म्हणाली.
“जरा लावून द्या ना… मला हे असे फोन नाही जमत.”
ती खुद्कन हसली.
“थांबा हं. लावते.”
नंबर फिरवून तिने पंतांच्या हातात दिला. एका बाईचा आवाज ऐकून पंत “हॅलो…” करत बोलायला लागले, पण ती बाई बोलतच राहिली…
“आपने डायल किया हुआ नंबर सेवा में नही है.”
हताश होऊन पंत खालीच बसले. आता काय करायचं? समोरच्या ग्लासातलं पाणी पिऊन पंत उठले.
“बघतो, शेजारी कुणाला माहित असला पत्ता तर…” म्हणत घराबाहेर पडले.
पण, आदित्यनं आपल्याला संपूर्णपणे तोडून टाकलं आहे हे त्यांना समजून चुकलं होतं.
त्यांच्या अपेक्षेनुसारच शेजारच्या कुणालाच आदित्य कुठं रहातो माहित नव्हतं.
निराशेनंच पंत जवळच्या बसस्टॉप वर गेले आणि पहिल्या आलेल्या बस मध्ये चढले.
‘आता काय करायचं?’ उत्तर माहित नव्हतं.
चिमटा वाजवीत कंडक्टर आला.
“शेवटच्या स्टॉपचं तिकीट दे बाबा.” पंत कसेबसे पुटपुटले.
दुपारपासून पोटात काहीच नव्हतं. एके काळी स्वतःच्या पण आता दुसऱ्याच्या मालकीच्या झालेल्या घरात मिळालेल्या ग्लासभर पाण्यावर आजचा दिवस घालवला होता. आधीच झालेल्या मनस्तापात उपासाची भर.
बस शेवटच्या स्टॉपवर आली. पंत खाली उतरले. कुठंही जायला शरीरात त्राण नव्हतं. जवळच एक बाग होती. तिथं जाऊन… जरा झाडाच्या सावलीत, ऊन लागणार नाही अशा बेतानं बाकावर बसले.
ग्लानीनं डोळे कधी मिटले त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
कुणीतरी ओल्या फडक्यानं आपले गाल पुसतोय, या जाणिवेनं त्यांना जाग आली.
डोळे उघडून त्यांनी पाहिलं…
त्यांचा रामभाऊ त्यांचे गाल चाटत होता!
प्रेमानं, “काय रामभाऊ, इथं कुठं?” म्हणत त्यांनी रॅम्बोला जवळ घेतलं.
पाठोपाठ “रॅम्बो, रॅम्बो…” अशा हाका मारत दीपेन आला. रॅम्बोच्या ओळखीचा हा कोण माणूस? त्याला कळेना. त्याला शोधत आदित्यही आला.
“बाबाऽऽ…???”
अचानक तोंडातून बाहेर आलेल्या शब्दांनी दीपेनला हा माणूस कोण ते जाहीर केलं. आपले हरवलेले आजोबा सापडले, इतकं कळताच दीपेन येऊन पंतांना बिलगला.
“कुठे गेला होतात आजोबा? मला बाबांनी सांगितलं तुम्ही घर सोडून निघून गेलात ते. आता यापुढं मला सोडून कुठंही नाही जायचं. जर गेलात ना, तर मी सुद्धा घर सोडून निघून जाईन!” दीपेननं जाहीर करून टाकलं.
पंतांनी आदित्यकडे पाहिलं. त्याची मान खाली होती.
कितीतरी दिवसांनी पहिल्यांदाच पंत हसले.
रॅम्बो आणि दीपेनच्या रूपात त्यांना उरल्या आयुष्याचे साथी मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...