मंगळवार, १७ जून, २०२५

1990. गुरूजीला न्यायला आलेला यम सुध्दा रिकामा परत गेला ...!!

 काल आमच्या शाळेत वेगळंच काही प्रकरण घडलं,!
गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं !!

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात,!
चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात.!!

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक,!
तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक.!!

यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू,!
खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू.!!

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद,!
आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद.!!

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन,!
मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन.!!

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला,!
गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला.!!

यमालाही आठवलं त्याचं बालपण,!
दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन.!!

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून,!
उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून.!!

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर,!
गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर.!!

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम,!
केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब.!!

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन,!
किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून.!!

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती,!
पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती.!!

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती,!
डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती?!!

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा,!
तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा.!!

शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन,!!
पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन.!!

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन,!
आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन.!!

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार,!
शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार.!!

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात,!
गुरुजी थेट घुसले एका कपड्यांच्या दुकानात.!!

यम म्हणाला गुरुजी आज इकडं कसं काय?!
तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय.!!

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी,!
आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी.!!

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी,!
तुमच्या अशा वागण्यानं, डयुटी धोक्यात येईन ना माझी.!!

आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून,!
किर्द, दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून.!!

उदया पासून सुरु आहे CO साहेबांचा दौरा,!
कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा.!!

परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग,!
पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग.!!

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी,!
लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी.!!

पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर,!
नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर.!!

कामाच्या या तानाची डोक्यात भेळ,!
आमच्याकडं नाही यमा  मरायलाही वेळ..!!

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा,!
कांदा मुळा भाजी आणि आमचा मात्र खडू आणि फळा.!!

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम,!
त्यांच्या मधेच दिसतो रहिम अन त्यांच्या मधेच दिसतो राम.!!

फुकट पगार  म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव,!
हरकत नाही आज माझा घेऊन टाक तू जीव.!!

यमाला आलं गलबलून, ते सारं काही ऐकून,!
तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही कधीच चुकून.!!

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार,!
सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार.

टाटा बाय बाय करत करत  यम गेला निघून,!
परत येण्याआधी तो, घ्या ना छान जगून.!!

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं,!
नरक आणि स्वर्ग तर इथेच आहे सगळं.!!

कामाशी काम करून घडवा नवा भारत,!
कामाशिवाय इथं कुणीच अमर नाही ठरत...!!

🌹🌹🌹🌹🌹
समस्त शिक्षक वर्गाला सविनय समर्पित...🙏🙏🙏🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎤🎤

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...