आज दिवसभर त्याला काम होतं. म्हणजे ते रोजच असायचं. पण आज जरा जास्त होतं. त्याचं काम सोप्या शब्दात सांगायचं तर त्याच्या ऑफिसच्या मुंबईतील चार ऑफिसची कागदपत्रे साहेब लोकांच्या सह्या वगैरे घेऊन ह्या ऑफिसातून त्या ऑफिसात नेणे. काम जोखमीच होतं. पण तो ते उत्तम रित्या करत होता. आज दिवसभर तो फिरत होता. कंपनीने दोन्ही रेल्वे आणि बस चे पास काढून दिले होते त्याला. त्यामुळे त्याला एकदम भारी वाटत असे. तर आज फार फिराफीरी झाली होती. शेवटची फाईल बॅलार्ड पियर ऑफिसातून सही घेऊन त्याने मारोळ ऑफिसात पोहोचवली आणि तो साधारण साडेसातला ऑफिसातून निघाला !
बाहेर पडतो तो प्रचंड पाऊस. त्याने छत्री उघडली आणि अंधेरी स्टेशनला जाणाऱ्या बसच्या रांगेत उभा राहिला. मोबाईल आणि पाकीट त्याने प्लास्टिकच्या पिशवीत टाकून खिशात ठेवले. बसला प्रचंड लाईन होती. रस्त्याला फुल ट्राफिक. पाऊस कोसळत होता! आता इथून अंधेरी स्टेशन. मेट्रो परवडत नसल्याने अंधेरीहून ट्रेन ने दादर आणि दादर वरून वांगणी. तिथून पुढे बस नाहीतर शेयर रिक्षाने वीस मिनिटं ! छत्री असूनही तो अर्धा भिजला होता. पॅन्ट गुढघ्यापर्यंत चिंब झाली होती आणि शर्टपण त्याच्या जुन्या झालेल्या छत्रीच्या कापडातून ठिबकणाऱ्या पाण्याने ओला झाला होता! बस आली. लोक छत्र्या बंद करत, अर्धे भिजत, ब्यागा सांभाळत बस मध्ये घुसले. तो पण चढला. रोजची सवय !
बसने ट्राफिक कापत अंधेरी स्टेशनला यायला एक तास घेतला. तो स्टेशन वर आला आणि चर्चगेट फास्टची वाट पाहू लागला. गाड्या दहा मिनिटं लेट होत्या. गाडी आली. तो चढला. उलट जात असल्याने फार गर्दी नव्हती. तो बसला. रुमालाने चेहरा पुसून त्याने बॅग मधून पाण्याची बाटली काढून पाणी प्यायलं. तो डोळे मिटून मागे डोकं टेकवून बसला. थोडी झोप लागली पण बांद्रा जाताच ती यंत्रवत उडून तो जागा झाला ! दादर नामक जनसागरात गाडीतून उतरल्यावर सेंट्रल रेल्वे प्लॅटफॉर्मला जाताना अक्षरशः जनसागर पोहून प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागत होतं. ते पण रोजचं होतं. त्याने लीलया तो जनसागर पार केला आणि तो प्लॅटफॉर्म वर आला तो अनौन्समेंट झाली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या अर्धा तास उशिरा धावत होत्या! फलाटावर तोबा गर्दी होती. भिजलेल्या आणि घराकडे निघालेल्या श्रमिकांची !
गाडी आली. लोक जिवाच्या आकांताने त्यात घुसले. हा गर्दी बरोबर आपोआप आत गेला. हे रोजचं होतं. आज गर्दी थोडी जास्त आणि ओली हाच फरक! अक्षरशः मुंगीला शिरायला जागा मिळणार नाही असे लोक एकमेकांना चिकटून उभे होते. ह्याच्या समोर उभा असलेल्या माणसाच्या लाल तोंडातून तो खात असलेल्या तंबाखूचा दर्प येत होता ज्यात दारूचा वास मिसळला होता. सबंध डब्यात सार्वजनिक घामाचा वास भरून राहिला होता. त्यात भिजलेल्या कपड्यांचा कुबट वास मिसळला होता. गाडी पळत होती. पाऊस असल्याने सगळ्या खिडक्या आणि दारं बंद होती. लोक स्टॅच्यु केल्या सारखे एकमेकांना खेटून अचल उभे होते. त्यातच तो देखील ! मध्ये मध्ये सिग्नलला, उशीर करत, संथ धावत गाडी वांगणी स्थानकात पोहोचली तोवर बारा वाजले होते. तो आणि त्याच्या सारखेच काही तुरळक लोक गाडीतून उतरले. स्टेशन बाहेर कोसळणारा पाऊस आणि मोजक्या रिक्षा. तो रहात असलेला रानवारा प्रकल्प दूर डोंगराच्या पायथ्याशी होता. तो शेयर रिक्षात बसला. काळोख्या रस्त्यावर झुंजूमंजू प्रकाशात रिक्षा पाऊस कापत निघाली. ड्रायव्हर हाताने वायपर हलवत होता पण समोर फार काही दिसत नव्हतं. तो रोजच्या अंदाजाने रिक्षा चालवत होता. दोघांना वाटेत सोडून रिक्षा ह्याला घेऊन निघाली. आजूबाजूला झाडी आणि खडबडीत रस्ता. रिक्षा घराजवळ चौकात थांबली. त्याने पैसे दिले आणि छत्री सांभाळत तो घराकडे जाऊ लागला. मिट्ट काळोख. रस्त्यात आणि घरातही. तशीही लोड शेडिंग ने वीज कमीच असे. त्यात पाऊस म्हणजे तर वीज जायला मुहूर्त मिळालेला.
तो घरी पोहोचला. कडी वाजवली. बायकोने दार उघडलं. घरात मेणबत्ती तेवत होती. पावसाने बाहेरून आणि आतून थोडं शेवाळ धरलेल्या घराच्या भिंतींना शेवाळाचा वास येत होता. त्यांची संपूर्ण इमारत पावसाळ्यात शेवाळमय होत असे. लीकेजचा कायम स्वरूपी रोग होता इमारतीला !
बायको- भिजलात हो खूप.
तो- हम्म...पाऊस आहे भरपूर...
बायको- तुम्ही अंग पुसा. मी जेवायला वाढते गरम गरम.
बायको किचन मध्ये गेली. तो टॉवेल ने अंग पुसून कपडे बदलू लागला. समोरच त्याची चार आणि सहा वर्षांची दोन मुलं गाढ झोपलेली होती. त्याने अंग पुसून टॉवेल दांडीवर टाकला तोवर बायको जेवणाच ताट घेऊन आली. काही खास नव्हतं. वांग्याचं भरीत, गरम भाकरी आणि ठेचा. तो जमिनीवर जेवायला बसला. बायकोने ताट आणि पाण्याचा तांब्याभांड त्याच्या समोर ठेवलं. त्याने एक घास घेतला आणि आहा... तब्बेत खुश.
बायको- तुम्ही जेवा मी अजून भाकऱ्या आणते.
त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला-
तो- बस इथे...
ती- काय?
तो- आमच्या कंपनीतून पाच लाख कर्ज मिळालं त्यात आपले थोडे घालून ही छोटीशी जागा घेतली आपण. आपली जागा ! रोज इथे परत येण्यासाठी खूप प्रवास करतो मी. कारण मला दार उघडणारा तुझा हसरा चेहरा दिसत असतो आणि आठवत असते तुझ्या हातांची ही चव !
इतक्यात दोन्ही मुलं जागी होऊन त्याच्या पाठीमागून येऊन त्याच्या पाठीवर रेलून "बाबा आलात? पाऊस खूप पडतोय. उद्या मी होडी करणार आहे." अशी चिवचिव करू लागली.
तो बायकोला म्हणाला -
तो- आपलं घर लहान आहे, लांब आहे, सोयी फार नाहीत. पावसाळ्यात तर हालच होतात. पण ह्या पोरांची चिवचिव आणि तुझं हास्य इथे भरून आहे. हाच माझा स्वर्ग आहे !
तिच्या डोळ्यात अश्रू तराळले. मुलं त्याला बिलगून चिवचिवाट करत होती. आत गॅस वर भाकरी करपली होती. पण स्वर्ग सुखाचा आनंद घेणाऱ्या त्या चौघांना त्याची पर्वा नव्हती. पाऊस बाहेर कोसळत होता. आत त्या चिमुकल्या घरातल्या मिणमिणत्या प्रकाशात मात्र स्वर्ग अवतरला होता !-
© मंदार जोग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा