तेव्हा मी बारा वर्षांची लहानशी मुलगी होते. मी माझ्या आजीआजोबांबरोबर उत्तर कर्नाटकमधील एका खेड्यात राहत असे. त्यावेळी दळणवळणाची साधनं काही आजच्यासारखी उपलब्ध नव्हती, त्यामुळे सकाळचा पेपर आम्हाला दुपारीच मिळायचा. नियतकालिकंसुद्धा एक दिवस उशिरा येत. आम्ही सगळेजण पेपर, पत्र आणि मासिकं घेऊन येणाऱ्या बसची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असू. त्यावेळी कन्नडमध्ये त्रिवेणी नावाची एक लेखिका फार लोकप्रिय होती. इतक्या चांगल्या लेखिका अभावानेच पाहायला मिळतात. तिची लेखनशैली सोपी, सुटसुटीत होती. तिचं लेखन सर्वसामान्यांच्या पचनी पडेल, त्यांना रुचेल असंच असे. ती माणसामाणसांच्या मूलभूत मानसिक समस्यांविषयी लिहायची, त्यामुळे तिचं लिहिणं आम्हाला आपलं वाटायचं. कन्नड साहित्याचं दुर्दैव असं, की ती लेखिका अकाली हे जग सोडून गेली. आज अजून चाळीस वर्षं लोटल्यानंतरसुद्धा लोकांना तिच्या कादंबऱ्या आवडतात. त्यावेळी कर्मवीर नामक कन्नड साप्ताहिकामध्ये तिची एक कादंबरी काशीयात्रे (काशीयात्रा) क्रमशः प्रसिद्ध होत असे. एक म्हातारी स्त्री आणि काशी किंवा वाराणसीला जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा याविषयीची ही कहाणी आहे. काशीला जाणं आणि भगवान विश्वेश्वराची आराधना करणं ही बऱ्याच हिंदूंच्या मते अत्यंत पुण्यप्रद गोष्ट आहे. त्या म्हाताऱ्या स्त्रीचाही असाच गाढ विश्वास होता. काशीला जाण्यासाठी तिची जी धडपड चालली होती, त्याचं वर्णन त्या कादंबरीत रेखाटलेलं होतं.
त्याच कथेत एक अनाथ तरुण मुलगी असते. ती प्रेमात पडते. परंतु लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात. अखेर ती म्हातारी स्त्री स्वतःचे काशीला जाण्यासाठी जमवलेले सगळे पैसे त्या मुलीच्या हवाली करते व स्वतः काशीला जातच नाही असं दाखवलं होतं. ती म्हणते, या पोरक्या मुलीचा आनंद त्या काशीविश्वेश्वराच्या पूजनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. माझी आजी कृष्तक्का कधी शाळेत गेली नाही. तिला लिहिता-वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं, की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरश: जिवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्दन्शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती, त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची. त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे. म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची. एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेड लागू शकतं, हे मला आत्ता समजतं; पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची. देवळाच्या ओसरीत आजी व तिच्या मैत्रिणी रोज भेटायच्या. आम्ही तिथेच लपाछपी खेळत असायचो. त्या सगळ्या जमल्या की या कादंबरीवर त्यांच्यात हमखास चर्चा चाले.
एकदा मी आणि आमच्या घरची काही लहान मुलं. आम्ही सगळे शेजारच्या गावात लग्नासाठी गेलो होतो. त्याकाळची लग्नं म्हणजे भलंमोठं खटलं असायचं. आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची. सगळी आतेमामेभावंडं जमायची. आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो. मोठ्यांचा काही धाक नसायचा. सगळं नुसतं स्वातंत्र्य, कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत. मी जाताना दिवसांसाठी म्हणूनच गेले; पण नंतर चांगली आठवडभर तिथे राहिले. मी गावी परत आले; आणि पाहिलं तर काय, आजीचे डोळे भरून आले होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला. कितीही संकट कोसळली तरी आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी. काय झालं तरी काय? मला काळजी वाटली. अव्वा, सगळं ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? मी तिला अव्वा म्हणूनच हाका मारत असे. उत्तर कर्नाटकात अव्वा म्हणजे आई. तिनं नुसती मान हलवली, पण काही बोलली मात्र नाही. मला काहीच कळलं नाही. नंतर मी ते सगळं विसरूनही गेले. तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण झालं की घराच्या गच्चीत झोपत असू. उन्हाळ्याचे दिवस होते. पौर्णिमा होती. अव्वा माझ्याजवळ येऊन बसली. आपला प्रेमळ हात माझ्या कपाळावर फिरवू लागली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला ते कळलं.
मी विचारलं, काय: झालं गं?
अगं, मी अगदी लहान होते ना, तेव्हा माझी आई वारली. माझा सांभाळ करणारं, मला चांगलंवाईट काय ते समजावून सांगणारं कुणीच नव्हतं. माझ्या वडिलांचा व्याप खूप मोठा होता. त्यांनी दुसरं लग्न केलं. त्याकाळी मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्त्वाचं मानलं जात नसे. त्यामुळे मी कधी शाळेत गेलेच नाही. माझं लहान वयातच लग्न झालं, लगेच मुलं झाली. मी संसारात गुंतले. पुढे नातवंडं झाली. तुम्हा सगळ्यांना चांगलंचुंगलं करून खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा. आपण शाळेत गेलो नाही... अशी खंत कधीतरी वाटायची. म्हणूनच आपल्या मुलांनी व पुढे नातवंडांनी भरपूर शिकलं पाहिजे, असा माझा आग्रह असे…
आपली ही बासष्ट वर्षांची आजी हे सगळं आत्ता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का सांगते आहे, हे काही मला कळेना. मला ती खूप खूप आवडायची. फार प्रेम होतं माझं तिच्यावर. ती आत्ता आपल्याला हे जे सगळं सांगते आहे, त्या पाठीमागे नक्की तसंच काहीतरी कारण असणार.
असं मला तेव्हासुद्धा वाटलं. मी तिच्या तोंडाकडे पाहिलं. तिचा चेहरा दुःखी दिसत होता. डोळे पाण्यानं भरले होते. ती दिसायला छान होती. नेहमी हसतमुख असायची. पण त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती, ती मात्र आजही मला स्पष्टपणे आठवते.
मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला. अव्वा, रडू नको ना. काय झालं? मी काही करू का तुझ्यासाठी?
हो. मला तुझीच मदत लागणार आहे. तुला ठाऊक आहे?... तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे तो 'कर्मवीर'चा अंक आला. मी तो उघडला. 'काशीयात्रे' गोष्टीचं पान उघडलं, चित्रं पाहिली... पण काय लिहिलंय, ते काही मला समजेना. मी कितीतरी वेळा त्या पानांवरून हात फिरवला. यात काय बरं लिहिलं असेल? माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळलं तर किती बरं होईल. असं मला वाटत राहिलं. पण ते कसं शक्य होतं? मी जर शाळा शिकले असते तर? म्हणून मग मी तुझी उत्सुकतेनं वाट पाहू लागले. मला वाटलं तू जर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस, तर किती बरं होईल. एकदा वाटलं, सरळ असंच उठावं, तिकडे त्या गावी यावं आणि तुला सांगावं वाचून दाखवायला! मला खरं तर आपल्याच गावातल्या कोणालातरी वाचून दाखवायला सांगता आलं असतं. पण तसं कुणी मिळालंच नाही मला. तेव्हा मला खूप परावलंबी आणि असहाय वाटलं. माझ्याजवळ इतका पैसाअडका आहे; पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल, तर काय उपयोग त्या सगळ्याचा?
यावर काय बोलावं, ते मला समजेना. अव्वा बोलतच होती.
मी ठरवलंय. उद्यापासून कन्नडची बाराखडी शिकायची. मी आता खूप मेहनत करणार आहे. हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलंय. दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे. त्याच्या आत मी लिहा- वाचायला शिकणार. त्यादिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार. मला स्वावलंबी व्हायचं आहे.
तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता. मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटलं.
अव्वा, या वयात... बासष्टाव्या वर्षी तू मुळाक्षरं शिकणार? तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत… तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत. तुला चष्मा लागलाय... तुला स्वयंपाकघरात किती काम असतं…! मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली. पण तिनं मंद स्मित केलं…
योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते. मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करीन. पण मी हे नक्की करून दाखवीन. शिक्षणाला वयाची अट नसते.
दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शिकवणीला सुरुवात झाली. ती इतकी हुशार होती. गृहपाठ करण्याचा तिचा झपाटा तर थक्क करून सोडणारा होता. ती वाचायची, घोकून म्हणायची, लिहायची आणि पाठ करायची. मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिलीवहिली विद्यार्थिनी. मी एक दिवस कॉम्प्युटर सायन्स शिकवणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे, हे तेव्हा मला कुठे माहीत होतं?
नेहमीसारखा दसऱ्याचा सण आला. एव्हाना काशीयात्रे ही कादंबरी पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेली होती. मी गुपचूप ती विकत आणली. माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवघरापाशी बोलावून घेतलं. तिथं तिनं मला चौरंगावर बसवलं. तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होतं. त्यावेळी तिनं एक विलक्षण गोष्ट केली. तिनं मला वाकून नमस्कार केला. मला आश्चर्याचा धक्का बसला. मनातून खूप अवघडल्यासारखं झालं मला. आपण नेहमी देवाला, वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो. त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी. ही तर आपली फार मोठी परंपरा आहे.
पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होतं. हे काही बरोबर नव्हतं. त्यावर ती म्हणाली, हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे, तर माझ्या गुरूला आहे. माझ्या या गुरु मला इतकं प्रेमानं लिहायला, वाचायला शिकवलं आहे. इतक्या आत्मविश्वासाने आणि तेही एवढ्या थोड्या वेळात. आता मी स्वावलंबी आहे. आपल्या गुरूचा मान राखणं, हे माझं कर्तव्यच आहे. लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता गुरूंना आदर दाखवला पाहिजे, असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलेलं नाही का?
मग मी पण तिच्या पाया पडले आणि या माझ्या पहिल्यावहिल्या बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं. तिनं ते तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं, काशीयात्रे. त्यानंतर तिने त्रिवेणी हे लेखिकचं नाव आणि पुस्तकाच्या प्रकाशकाचं नावही मोठ्यांदा वाचलं. आपली ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे, हे मला कळून चुकलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा