बुधवार, ११ जून, २०२५

1952. भेट

        त्या पाच बहिणी होत्या. विजया, विद्या, विमला, विनया आणि विशाखा ! वडील, दामोदर शिक्षक होते. आई कमलाताई, पाच मुलींच्या संसाराचा रथ ओढताना दमून जात होती. प्रपंच सांभाळून उरलेल्या वेळात ती शिवणकामाचे वर्ग घेऊन चार पैसे मिळवत होती. दोन वेळच्या जेवणाची ददात नव्हती पण इतर काही करण्यासाठी पैसा पुरत नव्हता. 
मुलींचे दोन्ही काका अगदी सुखवस्तु परिस्थितीतले होते. मोठे काका प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी आजीच्या पंचाहत्तरीचा उत्तम कार्यक्रम योजला होता. मधले काका इंजिनिअर! त्यांनी मोठा हॉल घेतला होता. अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण होतं.
कमलाताई चिंतेत होत्या... त्या कार्यक्रमाला शोभेल अशी भेट सासुबाईंना कशी द्यायची? या महिन्यात शाळेनं बाबांचा पगार अजून दिला नव्हता.
मुली शिवणाच्या वर्गात काय भेट द्यावी ही चर्चा आईसोबत करत बसल्या होत्या… आई एकदम उठली. तिथं पडलेले कापडाचे कापलेले तुकडे तिनं उचलले.
विनया व विमलाला तिनं ते फुलाच्या आकारात कापून द्यायला सांगितलं. 
विशाखा व विजूला त्या तुकड्यावर आजीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांची चित्रं व मजकूर लिहिण्याचं काम दिलं. 
टेक्नॅालॅाजी शिकणाऱ्या विद्याला सर्व लिखाण व फोटो स्क्रिन प्रिंटींगद्वारे स्टेन्सिल व शाई वापरून त्या तुकड्यांवर प्रिंट करायचं काम दिलं.
काही दिवसांत एक आगळीवेगळी रजाई (क्विल्ट) तयार झाली. पंचाहत्तर तुकडे कलात्मकरित्या जोडून केलेल्या त्या रजाईवर आजीचं आयुष्य साकारलं होतं…
त्यावर नातवंडांचे प्रेमानं लिहिलेले संदेश होते… आजीनं केलेलं पहिलं कीर्तन होतं… तिच्या मुलांचे जन्म होते… आजोबांची शेती होती… पहिलं घर होतं…
कार्यक्रमाला आलेले पाहुणे कौतुकानं त्या रजाईपाशी थबकत होते. ‘याहून उत्तम भेट असुच शकणार नाही…’ हे आजीचं वाक्य ऐकून मुलींच्या श्रमाचं सार्थक झालं!
यथावकाश मुलींची लग्नं झाली. संसार सुरू झाले पण महत्त्वाच्या प्रसंगी कलात्मक रजाईची भेट देण्याची पद्धत बदलली नाही.
पाच बहिणी वेगवेगळ्या गावात रहात होत्या… पण तरी त्या आपल्या आठवणीचे, संदेशाचे तुकडे बनवून ते एका बहिणीकडे पाठवत असत. ती बहीण ते तुकडे एकत्र करून रजाई पूर्ण करत असे. आता तर इतर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना देखील या उपक्रमात सहभागी व्हायचं होतं.
एकाहून एक सुंदर रजाया बनवल्या जात होत्या. आयुष्यातले आनंदाचे प्रसंग त्यावर चितारले जात होते. मनाला उभारी देणारे मजकूर लिहिले जात होते. उत्कृष्ट रंगसंगती, उत्तम शिवण व कलात्मकतेनं जोडलेल्या अनेक तुकड्यांतून ती व्यक्ती साकार होत होती! त्या प्रेमाच्या रजाईची भेट मिळताच अनेक डोळे पाणावत होते.
आता पाच बहिणींनी अशा रजाया गिऱ्हाईकांसाठी बनवायला सुरूवात केली. त्याला प्रचंड मागणी होती. गिऱ्हाईक आपल्या आठवणींचा खजिना त्यांच्यापुढं उपडा करत. त्यातून दरवेळी एक मास्टरपीस बनत असे. आयुष्याचं पुस्तकच म्हणा ना!
मुलींची आई आता ऐंशी वर्षांची झाली होती. एका मोठ्या हॉलमधे कमलाताईंचा वाढदिवस साजरा होणार होता. आईच्या वाढदिवसानिमित्त बनवलेल्या रजाईवर आजीच्या वाढदिवसाच्या वेळी आलेली रजाईची कल्पना चितारली गेली. आईच्या शिवणाच्या वर्गात पडलेले कापडाचे तुकडे कापणाऱ्या पाच बहिणी बघून आईला अश्रू अनावर झाले!
“आई, तुझ्या शिवणाच्या वर्गात बसून आजीला काय भेट द्यावी ही चर्चा करत असताना जी कल्पना जन्मास आली तिचा विस्तार आता प्रचंड वाढलाय… पैशानं आपण श्रीमंत नव्हतो पण आपल्याकडे प्रेमाची आणि आठवणींची श्रीमंती कायम होती; ती आपण क्विल्टच्या रूपानं आजीला दिली. प्रेमाची श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा फार मोठी असते, असं सांगणाऱ्या या रजाया तू आम्हाला बनवायला शिकवल्यास!
“आता लोक आपआपले फोटो, पत्रं घेऊन येतात व एक एक तुकडा कसा हवा ते सांगून आपल्याकडून रजाई बनवून घेतात… त्यावेळी पैशाची चणचण असणारे आपण आज अनेक कर्मचाऱ्यांचा रोजगार देताहोत. आता हा उद्योग इतका वाढलाय की, त्यासाठी नवी शोरूम बनवण्यात आलीय!
“…तर आई, बाबा, ‘कमला क्विल्ट पॅलेस’ या आपल्या नव्या शोरूममधे प्रसंगानुरूप अनेक प्रकारची क्विल्ट्स मिळणार आहेत! 
“आई, तू व बाबांच्या हस्ते या शोरूमचं आज उद्घाटन करायचंय!”
समोरचा पडदा उघडताच नव्या शोरूमवरची ‘कमला क्विल्ट पॅलेस’ची चकचकणारी पाटी, स्टाफ व हितचिंतक बघून आई बाबा सद्गदित झाले! लाल रिबन कापताना आई पाच मुलींकडे कौतुकाने बघत होती!
तिनं चार शब्द बोलायला सुरुवात केली…
“आयुष्य हे सुख दु:खाच्या अनेक तुकड्यांनीच बनलेलं ‘क्विल्ट’च असतं…! आपल्या आयुष्याचं ‘क्विल्ट’ बघताना माणूस या प्रवासात काय काय घडलं याचं सिंहावलोकन करतो.
“प्रत्येक आयुष्य तितकंच महत्त्वाचं असतं… आपल्या श्रमाची, कष्टाची जाणीव असलेली ही ‘क्विल्ट्स’ माणसाला खूप काही मिळवून देतात.
“या पाच मुली… हे आमच्या आयुष्यातील पाच उत्तम तुकडे आहेत. त्यांच्यामुळं आमच्या आयुष्याचं गुलाबी ‘क्विल्ट’ अप्रतिम बनलंय…”
तिच्या आवाजातून अभिमान ओसंडत होता. सद्गदित झालेल्या बाबांचा हात पकडून ती आपण  निर्माण केलेलं क्विल्ट आणि ‘कमला क्विल्ट पॅलेस’कडे अभिमानानं बघत राहिली.

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...